जगन्नाथ यात्रा : ‘108 हंड्यांनी आंघोळ घातल्याने देवाला आला ताप’, पुजाऱ्यांची अजब घोषणा

जगन्नाथपुरी

फोटो स्रोत, TWITTER/PURIOFFICIAL

    • Author, बाळा सतीश
    • Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी

ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे भगवान जगन्नाथाचा जन्मदिवस असं भक्त समजतात. त्या दिवसापासून जगन्नाथपुरीतला रथोत्सव सुरू होतो.

भाविकांची अलोट गर्दी लोटलेल्या पुरीत मात्र सध्या देवदर्शन बंद आहे. त्याला कारणही तसंच आहे. जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलराम आणि लहान भगिनी सुभद्रा यांना ‘ताप आलाय’ असं इथल्या पुजाऱ्यांनी म्हटलंय.

यामुळे पुढचे 15 दिवस मंदिर बंद असणार आहे.

दरवर्षी इथले पुजारी देवाला ‘ताप आल्याची’ घोषणा करतात. त्यानंतर मंदिर काही दिवस बंद राहातं. कोणत्याही प्रकारची पूजाअर्चा होत नाही.

रथयात्रेच्या आधी भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना 108 मंगल कलशांतल्या पाण्याने आंघोळ घातली जाते. या अभिषेकानंतर देवतांना सजवलं जातं.

पण 108 हंड्यांमधल्या पाण्याने भिजून आता देवाला ‘ताप आलाय’ असं इथले पुजारी घोषित करतात आणि देवदर्शन बंद होतं.

“पुरीच्या मंदिराच्या आवारात एक सोनविहीर आहे. देवी शीतला त्या विहिरीचं संरक्षण करते अशी आख्यायिका आहे. ही विहीर वर्षातून फक्त एकदाच अभिषेकाच्या दिवशी उघडली जाते. त्या दिवशी मंदिरातल्या मुळ मूर्ती गाभाऱ्यातून बाहेर आणल्या जातात आणि स्नानवेदी म्हणवल्या जाणाऱ्या एका जागी ठेवल्या जातात. इथून देवाचा अभिषेक भक्त पाहू शकतात. मग 108 कलशांनी देवांना आंघोळ घातली जाते,” धर्मपंडित नांदुरी श्रीनिवास यांनी बीबीसी तेलुगूशी बोलताना सांगितलं.

जगन्नाथ पुरी

फोटो स्रोत, TWITTER/PURIOFFICIAL

“आपण पाण्यात भिजलो तर आपल्यालाही थंडी वाजते. देवांच्या अभिषेकाच्या वेळी त्यांचे दागिने, सजावट, मखर सगळं काढून ठेवलेलं असतं. त्यांची आंघोळ झाली की त्यांना लोकरीच्या कपड्यांमध्ये गुंडाळलं जातं आणि गर्भगृहात आत ठेवलं जातं,” ते पुढे सांगतात.

या 15 दिवसांच्या काळाला अनासरा असंही म्हणतात. या काळात भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेरच्या भागात भगवान जगन्नाथाची जुनी चित्रं ठेवलेली असतात.

एरवी पुरी तिथल्या महाप्रसादासाठी प्रसिद्ध आहे. तिथे वर्षभर 56 प्रकारच्या पक्वानांचा नैवेद्य (छप्पन भोग) देवाला अर्पण केला जातो.

पण 15 दिवसाच्या काळात देवाला पक्वानं नाही तर आयुर्वेदिक औषधं, चाटणं नैवेद्य म्हणून दिली जातात.

15 दिवसांनी घोषणा होते की देवाला बरं वाटलं आहे आणि मंदिर खुलं होतं. अभिषेकादरम्यान देवांच्या मूर्तींचा रंग जातो, त्यामुळे मूर्तींना नवा रंगही दिला जातो.

रथयात्रा

फोटो स्रोत, TWITTER/PURIOFFICIAL

फोटो कॅप्शन, रथयात्रा
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यानंतर एका दिवसासाठी लोकांना देवदर्शन खुलं होतं, याला नारायण दर्शन असं म्हणतात आणि मग रथयात्रा सुरू होते.

ही प्रथा इथे का आहे याचं कारण देताना नांदुरी श्रीनिवास म्हणतात, “असं समजा की जगाचं पालन करणाऱ्या नियंत्यालाही ताप येतो. एखादा लहान मुलगा आपल्या वडिलांना खेळण्यातली बंदूक दाखवून तोंडाने ठो आवाज काढतो, आणि वडील ही खाली पडल्याचं नाटक करतात, भले ते खरं नसेना. तशाच पद्धतीने भक्त म्हणतात की, हो देवाला ताप आला. त्यामागे विचार असा असतो की सर्वशक्तिमान देवही इथे मनुष्यरुपात आहे आणि त्यालाही मनुष्यासारख्या व्याधी आहेत.”

“इथे देव मनुष्य रुपातच आहे असं समजतात. त्या फक्त मूर्ती नाहीयेत, त्यांच्यात प्राणही आहे. म्हणूनच दररोज सकाळी देवाला दंतमंजन दिलं जातं, दर बुधवारी दाढी केली जाते,” श्रीनिवास म्हणतात.

धर्मप्रसारासाठी इथे आलेल्या मुस्लीम आणि बौद्धधर्मियांनी या मंदिरावर अनेकदा हल्ले केलेत असं श्रीनिवास म्हणतात. त्यावेळी इथल्या मुर्ती गुप्त जागी लपवण्यात आल्या होत्या.

रथयात्रा सुरू होण्यापुर्वी रथासमोरचा रस्ता सोन्याच्या झाडूने झाडला जातो, मगच रथयात्रा सुरू होते.

पुरीच्या मंदिराची वैशिष्ट्ये

पुरीच्या जगन्नाथ मंदिराची अनेक वैशिष्टं आहेत. त्यातलं एक म्हणजे इथे भगवान जगन्नाथ आपल्या पत्नीबरोबर नाही तर आपले बंधू बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्यासोबत विराजमान आहेत.

जगन्नाथपुरी

फोटो स्रोत, TWITTER/PURIOFFICIAL

इतिहासकारांच्या मते हे मंदिर दहाव्या शतकात राजा इंद्रद्युमाने बांधलं होतं.

काही प्राचीन ग्रंथांनुसार हे मंदिर गंगा कुळातल्या अनंतवर्मन चौडागंगा या राजाच्या काळात बांधायला सुरुवात झाली होती.

सहसा हिंदू मंदिरामध्ये एकदा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली की त्या कधीच जागेवरून हलवत नाहीत किंवा त्याजागी दुसऱ्या मूर्ती आणत नाहीत. पण पुरीमध्ये लाकडाच्या मुळ मूर्ती आहेत आणि दर 12 किंवा 19 वर्षांनी जुन्या मूर्ती काढून तिथे नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

इथल्या मुळ मूर्तींना हात किंवा पाय नाहीत.

पुरीचं मंदिर भव्य आहे. इथल्या भिंती 20 फुट उंच आहेत तर 4 लाख स्क्वेअर किलोमीटरचं इथलं क्षेत्रफळ आहे.

इथल्या रथयात्रेसाठी दरवर्षी नवा रथ बनवला जातो.

पुरीच्या मंदिराचं स्वयंपाकघर विशेष समजलं जातं. भाविकांची श्रद्धा आहे की इथल्या स्वयंपाकघरावर लक्ष्मी माता देखरेख करते. देशातल्या सर्वात जुन्या स्वयंपाकघरांपैकी एक हे स्वयंपाकघर आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)