‘पाण्यामुळे सोयरीक मोडली मग गावालाच दुष्काळमुक्त केलं’, बाबुराव केंद्रेंची गोष्ट

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“माझी सोयरीकच मोडली होती पाणी नसल्यामुळे. मला 32 व्या वर्षी नाईलाजानं मग लग्न करावं लागलं. कारण पोरीच कुणी देत नव्हतं.”

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातलं नागदरवाडी हे गाव. गावात पाण्याची सोय नसल्यामुळे 3 किलोमीटर अंतराहून पाणी आणावं लागायचं. त्यामुळे गावात कुणीही मुलगी द्यायला तयार होत नसे.

असाच अनुभव आल्यानंतर गावातल्याच हनुमंत उर्फ बाबुराव केंद्रे यांनी गावासाठी काम करायचं ठरवलं. पाणी टंचाईचा सगळ्यात जास्त त्रास महिलांना होत असल्याची त्यांना जाणीव होती.

जुन्या दिवसांविषयी विचारल्यावर ग्रामस्थ रेश्माबाई केंद्रे सांगायला लागल्या.

“पाण्याचा लय त्रास होता आम्हाला. आम्ही बाजेवर लेकरायला अंघोळ्या घालावं आणि त्याचा सडा टाकावं, खालल्या पाण्याचा. इतका वनवास होता आम्हाला पाण्याचा.”

यानंतर मग नागदरवाडीत पाण्यासाठीचं काम सुरू झालं. बाबुराव यांच्यासमोर पहिलं आव्हान होतं लोकांना तयार करण्याचं. त्यासाठी गावकऱ्यांच्या आदर्श गाव ठरलेल्या राळेगण सिद्धी, हिवरेबाजार इथं भेटी घडवून आणण्यात आल्या.

बाबुराव केंद्रे सांगतात, “पहिल्या ग्रामसभेमध्ये महिलांना आश्चर्यचं वाटलं, की बाबा आपणच पाणी पेरायचं आणि आपणच पाणी पिकवायचं. ते परेशान झाले. ते सगळे लेकरं-बिकरं घेऊन, घराला कुलुपं लावून आले. साडेतीन तास ग्रामसभा चालली. मग त्या दिवशी ठरलं की इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम गावात राबवायचा. 25 % गावकऱ्यांचं श्रमदान आणि 75 % नाबार्ड, वॉटर संस्थेमार्फत आपल्याला फंड भेटेल.”

3 नियम

सुरुवातीचे 6 महिने गावातील 200 हेक्टरवर काम करण्याचं ठरलं. त्यातून आलेल्या रिझल्टमुळे गावकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला.

बाबुराव सांगतात, “200 हेक्टरवर पडणारा प्रत्येक थेंब अडवला आणि त्याच्याखालीच विहीर होती आमची. सहा महिन्यांनंतर पाऊस पडला. सहा महिन्यानंतर पाणी मुरत मुरत आम्हाला इथंच सापडायला लागलं, त्याच विहिरीत. मग यापेक्षा लाईव्ह पुरावा कोणताच नको म्हटले गावकरी आणि आता सगळंच काम केलं पाहिजे मग आपल्या गावात पाणीच पाणी.”

1999 साली गावात जलसंधारणाचं काम सुरू झालं. त्यासाठी 3 नियम आखून देण्यात आले. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि श्रमदान.

चराईबंदीमध्ये जिथं काम केलंय तिथं जनावरं चारायची नाही. कुऱ्हाडबंदीमध्ये जिथं आपण वृक्ष लागवड केलीय ती झाडं तोडायची नाही. आणि श्रमदान म्हणजे दर एक महिना प्रत्येकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीनं पाणलोटाचं काम एक दिवस मोफत करायचं.

रेश्माबाई सांगतात, “सहा वर्षं कामं केले, खड्डे खणले, बडे खणले. शेताच्या कडेनं पवळी घातल्या. बक्कळ कामं केल्यावं, हाताला फोडं आलेव आमच्या.”

'माती अडवा, पाणी जिरवा'

नामदेव यांचे मोठे बंधू बालाजी केंद्रे इंडो-जर्मन वॉटर शेड डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत मराठवाड्यात काम करत होते. बाबुराव यांना त्यांचं मार्गदर्शन लाभलं.

बालाजी केंद्रे सांगतात, “जोपर्यंत तुम्ही मातीचा बांध लावत नाही, तोपर्यंत पाणी रोखूच शकत नाही. पाण्याचं बेसिक प्रिंसिपल आहे वाहत जाणं. मग ते सगळंच वाहून नेणार आहे. मग पाण्याला अडवायचं कसं. इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकासात बेसिक भाग आहे माती आडवा, पाणी जिरवा. माती आडवा, पाणी जिरवा याच्यामध्ये डबल डोस आहे. एकतर मातीचं संवर्धन व्हायला लागलेलं आहे आणि पाण्याचं पण संवर्धन व्हायला लागलेलं आहे.”

इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात प्रामुख्याने पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत करण्यावर भर दिला जातो.

नागदरवाडीतील जलसंधारणाचं काम 5 वर्षांत पूर्ण झालं. यातून परिसरातील 1 हजार 14 हेक्टर क्षेत्रावरील पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावात 100 हून अधिक विहिरी, 300 हून अधिक शेततळी आहेत, तर 5 लाख वृक्षांची लागवड करण्यात आलीय. पाणी आल्यामुळे गावकऱ्यांचं आयुष्य सुखकर झालंय.

ग्रामस्थ नीताबाई केंद्रे सांगतात, “पाणलोटचं काम आल्यामुळेच आता घराला विहीर झाल्यावानी आमच्या इथं विहिरी झाल्या आणि हे बघा आता आमच्या दारात पाणी आलं बघा. आता पाण्याचं काही टेंशन नाही बघा.”

इतर गावांनी घेतला आदर्श

तर बाबुराव सांगतात, “जसं नागदरवाडीला गरज होती, वाटीनं पाणी भरत होते. पण आज करोडो लीटरमध्ये पाणी आहे. आम्ही 4 गावाला आज पाणी पाजवलंय, पाजवतोय. 2-3 तांडे पाणी पितात. आणि आमचं वॉटर पर्क्युलेशन होऊन खाली 3-4 गावाला पाणी जातंय.”

नागदरवारडीनं जलसंधारणाचं जे काम केलं ते काम बघून आजूबाजूच्या अनेक गावांनी प्रेरणा घेतली. त्यापैकी एक गाव आहे भिलू नाईक तांडा. या गावात 23 घरं असून जवळपास 26 शेततळं आहेत. अनेक विहिंरींच सुद्धा बांधकाम झालं आहे.

येथील शेतकऱ्यांना या पाण्याचा गेल्या 3 वर्षांपासून प्रत्यक्षरीत्या फायदा होत आहे.

भिलू नाईक तांडा येथील ग्रामस्थ वामन राठोड सांगतात,

“आयुष्य लय चांगलं बदललं साहेब आमचं. उन्हाळ्यामध्ये 4 मण जवारी होत्या, पोते-चार पोते हरभरे होते. 5-10 पोते गहू होते. प्यायला पाणी भरपूर आहे. जनावरालाही पाणी झालं.”

काम करताना तुमच्यावर आरोप होतात, टीकाही होते. पण मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावातील लोकांनी एकत्र येऊन श्रमदान करावं आणि पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडवला पाहिजे, असं बाबुराव आवर्जून सांगतात.

“जन्मल्यानंतरबी पाणी लागतं आणि मृत्यू झाल्यावरबी पाणी पाजून पुढली प्रक्रिया होते. म्हणजे इतकं महत्त्वाचं पाणी आहे. शेतीसाठी, स्वत:साठी, जनावरासाठी पाणी लागतं. म्हणजे पाणी नाही तर काहीच नाही ना. म्हणून पाणी प्रत्येकांना प्रायोरिटीनं जपलं पाहिजे.”

बाबुराव यांना गेल्या वर्षी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं ‘जलप्रहरी’ म्हणजेच 'Water Warrior' या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं. जल संसाधन आणि पाणी संकटावर काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातो.

बाबुराव केंद्रे यांच्या आयुष्यावर नुकताच ‘पाणी’ चित्रपट प्रदर्शित झालाय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)