'बाईचं काम पाणी आणणंच आहे, पार म्हातारी होईपर्यंत ते वर जाईपर्यंत तिला तेच करावं लागतं’

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

डोक्यावर हंडा, पायाखाली तुडवली जाणारी वाट आणि पाण्याच्या एकेक थेंबासाठी धडपड..

भारतातल्या लाखो महिलांच्या वाटेला आलेलं हे जगणं. शाळा सोडून, रोजंदारी सोडून, आराम सोडून, आरोग्य सोडून आणि महत्त्वाचं म्हणजे मनःशांती हरवून एकच काम पाणी भरणं.

पण या पाणी भरण्याची काय किंमत मोजावी लागते भारतातल्या महिलांना ?

प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. ती किंमत ती वस्तू बनवायला लागलेलं सामान, त्यात गेलेला वेळ आणि त्यासाठी लागलेले श्रम यावर ठरते.

देशातल्या लाखो बायका दिवसरात्र काम करत असतात पण वेळेची आणि श्रमाची मोजदाद होत नाही. त्यातलंच एक काम रोज पूर्ण कुटुंबासाठी दूरवरून पाणी आणणं... या पाण्याच्या हंड्याची काय किंमत मोजावी लागते महिलांना? त्याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होतो का? ते या लेखात बघूया.

सुरुवातीला आम्ही गेलो नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या त्रिंगलवाडी या गावी. इथल्या महिलांच्या दिवसातला बराचसा वेळ फक्त पाणी आणण्यातच जातो.

गाव खरं त्रिंगलवाडी धरण्याच्या जवळ वसलं आहे, पण महाराष्ट्रातल्या अनेक लहान मोठ्या गावांचं प्राक्तन याही गावाच्या नशिबी आहे. धरणाच्या पाण्यावर गावकऱ्यांचा हक्क नाही, ते जवळच्या शहरासाठी राखीव आहे.

रोज चार तास पायपीट

असंही धरणही आटलंच आहे. उरलं सुरलं पाणी अवैध टँकर संपवायला निघालेत.

गावातच आम्हाला भेटल्या सुनिताबाई भुरबडे. सकाळचं पाणी भरून त्या तालुक्याला मसाला दळायला निघाल्या होत्या. त्यांना बसवून घेतलं.

पाण्याचा काय त्रास आहे ते सांगा असं म्हणालो. तोवर आणखीही बायका आल्या आणि भडाभडा बोलायलाच लागल्या.

“पाण्यासाठी आमचे चार घंटे तर जातातच दिवसातले. जाऊन येऊन. किती लांब आहे माहितेय ना. एका दिवसात तीन चार चकरा होतात पुन्हा घरात येऊन आडवंच पडावं लागतं. एवढ्या लांब पाणी म्हटल्यावर, आणि पाण्याशिवाय तर आपल्याला पर्याय नाही,” सुनिताबाई म्हणाल्या.

सतत डोक्यावर हंडे वाहिल्याने तब्येतीच्या अनेक तक्रारी त्यांच्या मागे लागल्यात. सुनिताबाईच नाही, गावातल्या इतर बायकांनी काही ना काही दुखणी आहेतच.

कुणाचे हातपाय दुखतात, कुणाची कंबर.

“तरास होतो. चक्कर येती उन्हामधी, डोकं दुखतं,” सुनिताबाई सांगू लागल्या.

औषधं वगैरे घेता काही? असं विचारल्यावर म्हणाल्या, “कायचं आलं औषधं इथे खेड्यावर.चाललंय, घेतली एखादी गोळी तर घेतली नाही तर चाललाय रगडा कामाचा.”

पाणी भरणे बायकांची जबाबदारी?

थोड्या वेळाने बायका कुठून पाणी भरतात ते बघायला निघालो आम्ही.

त्रिंगलवाडी धरण पूर्ण आटलं होतं. त्याच्या मधोमध जाऊन बसणं ही शक्य होतं. जे पाणी शिल्लक राहिलं होतं ते संपूर्णपणे प्रदुषित झालं होतं. पिण्यालायक नव्हतं.

म्हणूनच या महिला धरणाच्या किनाऱ्यावर लहान लहान खड्डे खणून त्यात जे पाणी झिपरतं ते आपल्या हंड्यांमध्ये भरतात. माती नॅचरल फिल्टरेशनचं काम करते. पण हे करण्यात खूप वेळ जातो.

एक खड्डा खणून तो पूर्णपणे भरायला जवळपास एक ते दीड तास जातो. त्यातून एक किंवा फारफार तर दोन हंडे भरतात. अशा कमीत कमी चार चकरा तरी महिलांना माराव्या लागतात.

पाणी भरण्यासाठी जेवढं अंतर या महिला रोज चालतात, त्यांचं रोजगाराचं स्वप्नं तितकंच दूर जातं.

महिलांची रोजंदारी बुडते.

“आता पाणी भरत राहिल्यावर बारा वाजले, मग कोण घेणारे मोलानं. घेऊ शकल का? त्याच्यातच आख्खा दिवस जातो. कामाला निघून गेलो तर घरात पाण्याचा तपास नाही. इकडं धाव मारावं तर आपल्याला पाणी भेटत नाही, तिकडं जावं तर रोजीरोटी भेटत नाही, काय करावं,” सुनिताबाई उसास टाकतात.

WHO आणि युनिसेफच्या ताज्या अहवालाप्रमाणे जगभरात 1.8 लोकांना पिण्याचं पाणी लांबून आणावं लागतं. पाण्याची सोय नाही अशा सत्तर टक्के घरांमध्ये पाणी आणणं, भरणं ही बायकांची आणि मुलींचीच जबाबदारी असते.

याच रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की भारतात जवळपास 25 टक्के घरांमध्ये दूरवरून पाणी आणण्याची मुख्य जबाबदारी महिलांवर आहे.

पाणी भरण्यावर भारतीय महिलांचे सरासरी 15-20 मिनिटं रोज खर्च होतात, तर ग्रामीण भागात 40 मिनिटं एवढाही वेळ लागू शकतो. पण पुरुषांचा फक्त सरासरी पाच मिनिटं इतकाच वेळ जातो.

जगभरात रोज 20 कोटी तास पाण्यात

सीमा कुलकर्णी महिला किसान अधिकार मंच या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्य आहेत. त्यांचा ग्रामीण महिला आणि त्यांचं आयुष्य या विषयावर अभ्यास आहे. त्या याबद्दल अधिक माहिती देताना म्हणतात, “टाईम युज सर्व्हेचा जो नॅशनल रिपोर्ट आहे, त्यात असं दिसलं आहे की दिवसाचे साडेचार तास महिला पाणी भरणं, चारा आणणं, लाकूड गोळा करणं, इतर कामं यात गुंतलेल्या असतात. म्हणजे त्यांच्याकडे अर्धाच दिवस, पाच ते सहाच तास असतात ज्यात त्या काही मजूरी, स्वयंरोजगार किंवा पैसे मिळवून देणारं काम करू शकतात.”

संयुक्त राष्ट्राचे म्हणणे आहे की की जगभरात महिलांचे पाणी आणण्यावर दररोज 20 कोटी तास खर्च होतात तर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंटरप्राईजच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी पाणी आणणं, भरणं या कामासाठी महिलांचे 15 कोटी कामाचे दिवस खर्च होतात.

म्हणजे जो वेळ त्या रोजगार कमवून स्वतःची आर्थिक उन्नती करू शकल्या असत्या तो वेळ त्यांना अशा कामांमध्ये घालवावा लागतो. याने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर परिणाम तर होतोच पण देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो.

प्रा अश्विनी देशपांडे अर्थतज्ज्ञ आहेत आणि दिल्लीच्या अशोका विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख. त्या म्हणतात, “महिलांचा सर्वाधिक वेळ पाणी आणि इंधन गोळा करण्यात जातो. पाणी आणण्याची मेहनत महिलांनाच करावी लागते. त्यामुळे त्या बांधल्या जातात. सगळा वेळ त्यात जात असल्याने त्या वेगळं काम करू शकत नाहीत. इतर काही काम करून पैसै कमवू शकत नाहीत.”

प्रा. देशपांडे महिलांच्या विनामोबदल्याच्या कामाचा म्हणजेच अनपेड लेबरचा मुद्दाही मांडतात. त्यांच्यामते या कामाची मोजदाद होत नाही, त्यामुळे महिला आर्थिक सक्षमीकरणात मागे पडतात.

“जर मॅक्रो इकोनॉमीबद्दल आपण बोलत असू तर आपल्याला दोन पैलू समजून घ्यावे लागतील. एकतर जिथे काम उपलब्ध आहे तिथे महिला काम करू शकत नाहीत कारण त्यांना घरातली कामं करावी लागतात, पण अनेक अशा महिला आहे की हे काम करूनही त्या रोजगार मिळवू पाहातात, पण त्यांना अडचण अशीये की ग्रामीण भागात त्यांच्यासाठी कामच उपलब्ध नाहीये,” त्या म्हणतात.

अर्थव्यवस्थेवर होतो परिणाम

भारताल्या महिलांच्या एकूण विनामोबदल्याच्या कामाचं मूल्य प्रचंड आहे. स्टेट बँकेच्या इकोरॅप रिपोर्टनुसार भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत महिलांच्या अनपेड लेबर, म्हणजेच ज्याचा त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही अशा कामाची योगदान 22.7 लाख कोटी रूपये इतकं आहे. म्हणजेच GDP च्या 7.5 टक्के.

महिलांचं हे अनपेड लेबर वाढतंय, आणि याचा फटका अर्थव्यवस्थेला बसू शकतो असा इशाराही तज्ज्ञ देतात.

“पिरियॉडिक लेबर सर्व्हे मधून समोर आलेला जो ऑफिशियल डेटा आहे, त्यानुसार 2027-18 मध्ये महिलांच्या विनामोबदल्याच्या कामाचा टक्का 31% टक्के होता तर आता तो 2022-23 च्या डेटानुसार 37 टक्क्यांच्या जवळपास आहे. स्टेट सपोर्ट नसल्याने हा टक्का वाढलाय. त्यामुळे पाणी भरणं, अन्नसुरक्षा, केअरवर्क यात महिलांचा खूप वेळ जातो आणि त्या आर्थिक मोबदला मिळेल अशी कामं करू शकत नाहीत आणि याचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो,” सीमा कुलकर्णी विशद करतात.

दूसरीकडे सरकारचं म्हणणं आहे की त्यांनी जानेवारी 2024 पर्यंत 73 टक्के ग्रामीण घरांमध्ये पाण्याच्या नळाचं कनेक्शन दिलं आहे ज्यामुळे महिला आणि मुलींचे पाणी आणण्याचे कष्ट आणि वेळ वाचलाय.

'आठवते तेव्हापासून कामच करतेय'

पण या सगळ्या आकडेवारी आणि चर्चेपासून दूर सुनिताबाईंचं आयुष्य मात्र पाणी वाहण्यात चाललं आहे. एखादं दिवशी पाणी भरावं लागलं नाही आणि खूप मोकळा वेळ मिळाला तर त्या काय करतील?

या प्रश्नाचं उत्तर त्यांना पटकन सुचत नाही.

“मला आठवतंय तेव्हापासून मी कामच करतेय. बाईचं आयुष्य पाणी भरण्यातच निघून जातं. पार म्हातारी होईपर्यंत, पार वरती जाईपर्यंत,” हसत हसत त्या ग्रामीण महिलांच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडतात.

त्यांना तर त्यांच्या मैत्रिणीला भेटायलाही गेल्या महिन्यापासून वेळ मिळालेला नाही.

“ती राहाते गावाच्या एका टोकाला आणि मी राहाते वेगळ्या टोकाला. पाणी भरण्यातून उसंत नाही. मागच्या महिन्यात गावात देवाच्या कार्यक्रमाला भेटली त्यानंतर आजच भेटली तेही तुमच्यामुळ,” सुनिताबाईंच्या बोलण्यावर त्यांची मैत्रीण मान डोलवत असते.

पण सांगाच की जरा डोक्यावर ताण देऊन, की वेळ मिळाला तर काय कराल, असं विचारल्यावर सुनिताबाई म्हणतात,“वेळ मिळाला का मंग मला गाणी म्हणायला आवडतात!”

पण त्यांच्या गाण्यातही पाणीचं ऐकू येतं.

रडू नको बाळा मी पाण्याला जाते,

सोन्याचं ताट तुला जेवायला देते

मोत्याचा हार तुला खेळायला देते

रडू नको बाळा मी पाण्याला जाते...