You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गाझात पिण्याच्या पाण्याचे साठे आणि सांडपाण्याच्या सुविधांवर हल्ले, युद्धस्थितीत नवे संकट
- Author, कायलिन डेवलिन, मरियम अहमद आणि डॅनियल पालुंबो
- Role, बीबीसी व्हेरिफाय
इस्रायलनं हमासच्या विरोधात सुरू केलेल्या लष्करी कारवाईनंतर गाझामधील पाणी आणि स्वच्छतेशी संबंधित शेकडो पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे किंवा त्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. बीबीसी व्हेरिफायनं केलेल्या सॅटेलाईट विश्लेषणात ही बाब समोर आली आहे.
एका दुरुस्ती पुरवठा डेपोचंही प्रचंड नुकसान झाल्यामुळं दुरुस्तीच्या कामांवरही गंभीर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
स्वच्छ पाण्याचा तुटवडा आणि सीवेज किंवा सांडपाणी यामुळं आरोग्यविषयक गंभीर संकट निर्माण झालं असल्याचं मदत करणाऱ्या संस्थांचं मत आहे.
युद्धाच्या नियमानुसार, लष्करी कारवायांसाठी वापर होत असल्याचे पुरावे मिळाले नसतील तर, अशा महत्त्वाच्या सुविधा किंवा ठिकाणं याचं संरक्षण करणं हे इस्रायलचं कर्तव्य आहे. पण तसं असतानाही अशा प्रकारचा विनाश सुरू आहे.
हमासकडून नागरी सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलानं बीबीसीबरोबर बोलताना केला आहे.
गाझामध्ये कायम स्वच्छ पाण्याचं दुर्भिक्ष्य पाहायला मिळालं आहे. त्यामुळं हा भाग पाण्यासाठी प्रामुख्यानं बोअरहोल आणि डिसॅलिनेशन (विक्षारण) प्रकल्पांवर अवलंबून आहे.
पण पाण्यासाठीच्या पायाभूत सुविधांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक ठिकाणांचं गाझानं हमासवर सुरू केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत नुकसान झालं आहे.
त्याचबरोबर सहापैकी चार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचंही नुकसान झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं घाणीमुळं आरोग्याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहेत. तर उर्वरित दोन प्रकल्पही इंधन आणि इतर गोष्टींचा पुरवठा नसल्यानं बंद असल्याचं मदत करणाऱ्या संस्थेनं सांगितलं आहे.
आम्ही विश्लेषण केलेल्या 600 पेक्षा अधिक सुविधांमध्येच या प्रकल्पांचा समावेश होता. गाझाच्या कोस्टल म्युनिसिपालिटिज वॉटर युटिलिटीनं (CMWU) दिलेल्या यादीच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आलं.
गाझाच्या दक्षिणेला असलेल्या खान युनूस शहरातही दोन नुकसानग्रस्त पाण्याच्या टाक्या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसून आल्या.
पाणी आणि स्वच्छतेच्या या सुविधांच्या नुकसानीमुळं आरोग्यासंबंधी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मत, युकेच्या मेडिसिन्स सॅन्स फ्रँटियर्स या संस्थेचे कार्यकारी संचालिका डॉ. नटालिया रॉबर्ट्स यांनी व्यक्त केलं.
“अतिसारासंबधित आजारांच्या प्रमाणात अचानक वाढ झाली आहे,”असं त्या म्हणाल्या.
अशा आजारांमुळं गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास लहान मुलं आणि वृद्ध किंवा आजारी असलेल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रामुख्यानं गर्भवती महिलांसाठी धोकादायक असलेल्या हेपॅटायटिस A-चं प्रमाणही या दूषित पाण्यात जास्त आढळून आलं असल्याचं या संस्थेनं सांगितलं.
"या लोकांच्या हत्या आहेत," असं डॉ. रॉबर्ट्स म्हणाल्या.
गाझातील अनेक लोक आश्रयासाठी रफामध्ये गेले आहेत. त्याठिकाणी आजारांमध्ये वाढ होत आहे. त्या ठिकाणीही कोलेराचा धोका वाढला आहे, असं त्यांनी म्हटलं.
हमासनं 7 ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यानंतर गाझामध्ये इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, जवळपास 69,000 घरं उध्वस्त झाली आहेत, तर 2,90,000 घरांचं नुकसान झालं आहे.
मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांच्या मते, अगदी क्वचित घरांमध्येच पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.
बीबीसीचे सॅटेलाईट विश्लेषण
या विश्लेषणासाठी आम्ही संयुक्त राष्ट्र आणि ह्युमन राइट्स वॉच यांच्याकडून योग्य दृष्टीकोनाबाबत सल्ला घेतला.
प्रत्येक ठिकाणासाठी आम्ही तिथली ताजी सॅटेलाईट इमेज आणि 7 ऑक्टोबरच्या पूर्वीची सॅटेलाईट इमेज मिळवली.
या इमारतींचं थोडं नुकसान झालेलं आहे, काही भाग कोसळला आहे किंवा त्यांचं पूर्णपणे ढिगाऱ्यात रुपांतर झालं आहे. पण त्या सर्वांचा समावेश नुकसानग्रस्त इमारतींमध्ये केला आहे.
बीबीसी व्हेरीफायनं, नष्ट झालेल्या आणि नुकसान झालेल्या इमारती किंवा सुविधांमध्ये फरक केलेला नाही. त्याचं कारण म्हणजे, अचूक माहिती मिळेपर्यंत त्याचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे की, ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, याचा अंदाज येत नाही.
पाण्याच्या विहिरींमध्ये शक्यतो जमिनीखालील बोअर आणि इलेक्ट्रिक पंप आणि वरच्या भागात कंट्रोल रूम असते. पण प्रत्येकवेळी कंट्रोलरूम स्पष्टपणे लक्षात येत नसल्यानं आम्हाला नुकसानीचा अंदाज येण्यासाठी त्याच्या जवळपास असलेल्या इमारतींवर अवलंबून राहावं लागलं.
काय आढळले?
एकूण 603 सुविधा किंवा वास्तूंपैकी 53% नुकसानग्रस्त असल्याचं आमच्या विश्लेषणातून समोर आलं.
इतर 51 ठिकाणी काही प्रमाणात नुकसान झाल्याचं आणि सोलार पॅनल नसल्याचं आढळून आलं. पण पाण्याची व्यवस्था असलेल्या सुविधेचं नुकसान झालं किंवा नाही याचा अंदाज येत नसल्यानं त्याचा या विश्लेषणात समावेश करण्यात आला नाही.
या भागातील ताज्या सॅटेलाईट इमेजेस मार्च आणि एप्रिल महिन्यात मिळाल्या आणि एप्रिलपासून आम्ही याबाबत विश्लेषण करत आहोत.
या पैकी पूर्णपणे किंवा आंशिक नुकसान झालेली बहुतांश ठिकाणं ही उत्तर गाझा किंवा दक्षिणेतील खान युनूस शहरात आहेत.
बुरैजमधील एका सांडपाणी प्रकल्पाला ऊर्जा पुरवठा करणारे सोलार पॅनल नष्ट झाले तर सीवेज टँकवर शेवाळ उगवू लागल्याचंही पाहायला मिळालं.
सॅटेलाइट इमेजमधून झालेलं पूर्ण नुकसान स्पष्ट होत नाही. त्यामुळं विश्लेषणात काही नुकसानग्रस्त ठिकाणं सुटलेली असू शकतात. तसंच काही ठिकाणी इंधनाच्या तुटवड्यामुळंही पूर्ण क्षमतेनं काम होत नाहीये.
उदाहरण द्यायचं झाल्यास, देर अल-बालाहमधील युनिसेफचा विक्षारण प्रकल्प हा गाझामधील समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या तीन मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. पण इंधनाच्या तुटवड्याअभावी हा प्रकल्प फक्त 30 टक्के क्षमतेनं काम करत असल्याचं युनिसेफनं सांगितलं.
गाझातील बहुतांश नागरिक बेघर झाले असून तंबूंमध्ये राहत आहे. त्यामुळं रस्त्यावरील सीवेजच्या पाण्यानं त्यांना अधिक धोका निर्माण झाला आहे.
"सीवेज प्लांटमधील पंप काम करत नसल्यानं हे पाणी रस्त्यावर वाहू लागलं आहे,"असं पॅलेस्टिनियन सेंटर फॉर ह्युमन राइट्सचे मुहम्मद अताल्लाह यांनी बीबीसीला सांगितलं.
महत्त्वाच्या दुरुस्ती डेपोचे नुकसान
या संघर्षामुळं गाझातील प्रशासनाला पाण्याशी संबंधित या ठिकाणांच्या दुरुस्तीच्या कामात आधीच अडथळा येत आहे. पण त्यांच्या दुरुस्तीच्या डेपोवर झालेल्या हल्ल्यामुळं त्यांचं संकट आणख वाढलं आहे.
अल मवासीच्या बाजुला असलेल्या या इमारतीचं 21 जानेवारीच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात प्रचंड नुकसान झालं. यात 4 जणांचा मृत्यू झाला होता तर 20 जण जखमी होते, असी माहिती CMWU नं दिली.
CMWUचे महासंचालक मोन्थर शबलाक यांनी दिलेल्या माहितीनुसार या वेअरहाऊसमध्ये दुरुस्तीसाठी 2000 हून अधिक साहित्य ठेवलेली होती. त्याचा वापर CMWU आणि Unicef तर्फे दुरुस्तीसाठी केला जात होता. पण त्याचं नुकसान झाल्यामुळं या कामावर प्रचंड परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पाण्याच्या टाक्या, पाईपलाइनच्या दुरुस्तीची कामं त्यामुळं रखडली आहेत.
IDF नं दिलेल्या माहितीनुसार खान युनूसमधील हे वेअरहाऊस त्यांचं लक्ष्य नव्हतं. तर त्यांच्या आसपास असलेले हमासचे दहशतवादी लक्ष्य होते. "या दहशतवाद्यांवर हल्ला केला त्यावेळी या वेअरहाऊसचं नुकसान झालेलं असू शकतं."
आम्ही विश्लेषणात समोर आलेल्या पाण्याच्या सुविधा असलेल्या इतर पाच ठिकाणांच्या नुकसानीची माहिती दिली. त्यापैकी एका ठिकाणी हवाई हल्ला झाल्याचं IDF नं नाकारलं तर इतर चार प्रकरणांत प्रत्यक्षात हमासचे सदस्य किंवा ती ठिकाणं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
"हमास त्यांची शस्त्रं आणि इतर साहित्य अशा नागरी सुविधा असेलेल्या ठिकाणी ठेवतं. त्या माध्यमातून ते हल्ला करतात. IDF याचा शोध घेऊन ती नष्ट करत आहेत. "
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात मानवतेविरोधी गुन्ह्यांच्या विशेष सल्लागार लायला सादत यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, ठोस पुरावा नसेल तर, अशा नागरिकांच्या जीवनासाठी महत्त्वाच्या असलेल्या सुविधांचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे.
युद्धातील कारवाईच्या वैधतेवर चर्चा करण्यासाठी त्याचा पॅटर्न समजून घेणं गरजेचं असतं, असं त्या म्हणाल्या.
"तुम्ही प्रत्येक हल्ल्यानुसार विचार करू शकत नाही. त्यांनी [IDF] पाण्याचे पाईप, टाक्या आणि इतर सुविधांवर हल्ले केले आहेत," असं त्यांनी म्हटलं.
"मुद्दाम लक्ष्य न करता अर्ध्यापेक्षा अधिक पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा नष्ट करणं हे अतिशय कठिण आहे. त्यामुळं नागरिकांप्रती बेजबाबदारपणाची भूमिका किंवा जाणून-बुजून केलेलं नुकसान याचाच हा पॅटर्न पुरावा आहे. या सगळ्याच चुका असू शकत नाही, " असंही त्या म्हणाल्या.
विश्लेषणावर प्रतिक्रिया देताना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी आणि मानवाधिकार विषयाच्या वकील सारा एलिजाबेथ दिल म्हणाल्या की, "आपण जे काही पाहत आहोत हे घेराव घालून केलं जणारं युद्ध आणि गाझाचा पूर्ण विनाश आहे. त्यात मानवी जीवन किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कशाचाही विचार करण्यात आलेला नाही."
अतिरिक्त वार्तांकन एरवान रिवा