सीरियाच्या बंडखोर नेत्यानं महिलेसोबत फोटो घेतल्यानं वाद, महिलेला 'मुताबरिजाह' का म्हणत आहेत?

    • Author, बीबीसी मॉनिटरिंग

सीरियाचा बंडखोर नेता अहमद अल-शरा याने गेल्या आठवड्यात त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी आलेल्या महिलेला आधी तिचे केस झाकण्यासाठी सांगितल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. अहमद अल-शरा याने या व्हीडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

या घटनेवर उदारमतवादी आणि पुराणमतवादी अशा दोन्ही बाजूंकडून टीका करण्यात आली.

सुन्नी इस्लामवादी गट हयात तहरीर अल-शाम (HTS) च्या प्रमुखाची विनंती म्हणजे बशर अल-असद यांना उलथवून टाकल्यानंतर सीरियामध्ये इस्लामिक व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न असू शकते, असं उदारमतवाद्यांना वाटलं.

तर महिलेला आपल्यासोबत फोटो काढण्यास संमती दिल्याबद्दल कट्टर परंपरावाद्यांनी त्याच्यावर टीका केली.

शराने बीबीसीच्या जेरेमी बोवेनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी त्या महिलेवर बळजबरी केली नाही. पण ते माझे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. मला योग्य वाटतील तसेच फोटो माझ्यासोबत घेण्यात यावे असं मला वाटतं."

तर, ली खीराल्लाह या महिलेनंही, तिला शराच्या विनंतीचा त्रास झाला नाही, असं म्हटलंय.

ती म्हणाली की, "शराने सौम्य आणि वडिलकीच्या स्वरात विचारलं होतं आणि एखाद्या नेत्याला योग्य वाटेल त्यापद्धीतनं स्वत:ला सादर करण्याचा त्यांना अधिकार आहे."

पण, भविष्यातील एखाद्या नेत्यासमोर सीरियासारख्या धार्मिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देशाला आवाहन करण्यात काही अडचणी असू शकतात, हे या घटनेनं दाखवून दिलं.

देशात सुन्नी मुस्लिम बहुसंख्येनं आहेत तर उर्वरितांमध्ये ख्रिश्चन, अलावाईट, ड्रुझ आणि इस्माइलिस यांचा समावेश होतो.

असदला विरोध करणाऱ्या विविध राजकीय आणि सशस्त्र गटांमध्येही अनेक मतप्रवाह आहेत. काहींना धर्मनिरपेक्ष लोकशाही हवी आहे, तर काहींना इस्लामिक कायद्यानुसार शासन हवं आहे.

2017 मध्ये इडलिब प्रांताच्या पूर्वीच्या बंडखोर गडावर ताबा मिळवला तेव्हा पूर्वीच्या अल-कायदाशी संलग्न असलेल्या HTS नं सुरुवातीला कठोर वर्तन आणि ड्रेस कोडचे नियम लागू केले. पण, यावर टीका झाल्यानंतर अलीकडच्या वर्षांत ते नियम मागे घेण्यात आले.

इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण हा मुस्लीम पुरुष आणि स्त्रियांना अदबीने (modestly) पोशाख करण्यास सांगतो.

नाभीपासून गुडघ्यापर्यंतचा भाग झाकणे म्हणजे पुरुषी विनयशीलतेचा अर्थ लावला जातो. तर, स्त्रियांसाठी जेव्हा त्या अनोळखी लोकांसमोर किंवा पतीशिवाय इतर कुणासमोर असतात तेव्हा सामान्यतः त्यांचा चेहरा, हात आणि पाय वगळता इतर सर्व गोष्टी झाकल्या जाव्यात असं सांगितलं जातं.

शराने 10 डिसेंबर रोजी दमास्कसच्या मेझेह भागात दौरा केला तेव्हा ली खीराल्लाहने त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली होती.

त्यासाठी तयार होण्यापूर्वी, शराने तिला तिचे केस झाकण्यासाठी हातवारे केले आणि तिने ते ऐकलंही होतं. तिने केस झाकले आणि नंतर फोटोसाठी त्याच्या शेजारी उभी राहिली.

या घटनेचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. त्यामुळे सामान्य वापरकर्ते आणि माध्यमकर्मी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला.

उदारमतवादी विचार असलेल्या लोकांना वाटलं की, हे HTS च्या शासनकाळात सीरियाच्या संभाव्य भविष्यातील एक त्रासदायक उदाहरण आहे. ज्यात सर्व स्त्रियांना हिजाब किंवा हेडस्कार्फ घालण्याची सक्ती असेल आणि सोबतच इतर पुराणमतवादी धोरणांचीही भीती असेल.

फ्रान्स 24 च्या अरबी वाहिनीने सीरिया 'इस्लामिक राजवटीच्या दिशेने जात आहे का?' या मथळ्यासह या घटनेची चर्चा केली.

इतर लोक त्यांच्या शब्दांत निषेध नोंदवत होते. एका सीरियन पत्रकारानं म्हटलं की, "आम्ही एका हुकूमशहाच्या जागी प्रतिगामी हुकूमशहा आणला आहे."

सोशल मीडियावर इतर काही जणांनी सीरिया अत्यंत अतिरेकी सत्तेवर जात असल्याचा इशारा दिला. तर इतरांनी स्वतंत्र स्त्रीला जबरदस्तीने परंपरावादी लूक स्वीकारण्याबाबत निषेध नोंदवला.

टेलिग्रामवरील इस्लामी कट्टरपंथींनी शरावर टीका केली आहे. शराने पहिल्याच भेटील एका तरुणीला शेजारी उभे राहून फोटो काढण्यास सहमती दिल्याबद्दल ही टीका करण्यात आली आहे.

महिलेवरही टीका

काहींनी खीराल्लाहला 'मुताबरिजाह' म्हटलं. हा महिलांसाठीचा एक नकारात्मक शब्द आहे, ज्यात महिलांनी अदबीनं कपडे घातलेले नसतात किंवा मेकअप केलेला असतो.

अशा कट्टरवाद्यांमध्ये मौलवींपासून प्रभावशाली लोकांपर्यंत अनेक जण आहेत, ज्यांची मतं सीरिया-केंद्रित पुराणमतवादी समुदायांद्वारे ऑनलाईन शेअर केली जातात आणि वाचली जातात. HTS समर्थक आणि अधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचण्याची शक्यता असते.

त्यापैकी बहुतेक सीरियामध्ये स्थित असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने इडलिबच्या पूर्वीच्या HTS चं वर्चस्व असलेल्या बंडखोरांच्या गढीमध्ये ते वास्तव्यास आहेत. काहींनी यापूर्वी HTS मध्ये काम केलं आहे.

त्यांनी असा युक्तिवाद केलाय की, अनोळखी स्त्री-पुरुषांनी जवळून संवाद साधण्याला धार्मिकदृष्ट्या परवानगी नाही. शरा यांनी कठोर धार्मिक शिकवणींच्या विरोधात असलेल्या गोष्टींमध्ये 'व्यर्थ लोकांचे लक्ष' शोधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मिन इडलिब (इडलिबमधून) नावाच्या एका टेलिग्राम चॅनेलवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, इडलिबमधील HTS तुरुंगातून कैद्यांची सुटका करण्यासाठीच्या मागण्यांबाबत संबोधताना HTS नेता तरुण महिलांसोबत सेल्फी घेण्यात खूप व्यस्त होता.

फोटोच्या विरोधात बोलणाऱ्या अनेक पुराणमतवादी व्यक्तींनी याआधीही राजकीय तसेच धार्मिक कारणांसाठी शरावर टीका केली आहे आणि त्यात HTS सोडलेल्या धर्मगुरूंचाही समावेश आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.