'आम्ही तिथे मृतदेहासारखेच होतो', सीरियाच्या तुरुंगातील कैद्यांची अंगावर काटा आणणारी कहाणी

    • Author, एलिस कडी
    • Role, बीबीसी न्यूज, दमास्कस

तुरुंग हा शब्दच मुळी अंगावर काटा आणणारा आहे. माणसाला आयुष्यात सर्वात प्रिय आणि महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य. त्यामुळेच प्राचीन काळापासून कोणत्याही माणसाला शिक्षा देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तुरुंगवास.

मात्र, तुरुंगातील शिक्षेला देखील काही मर्यादा असतातच ना. पण सीरियातील बशर अल-असद यांच्या राजवटीत सेडनाया या कुप्रसिद्ध तुरुंगात कैद्यांना ज्या यातना दिल्या जात होत्या, त्यांचा जो छळ केला जात होता, ते ऐकून-वाचून अंगावर काटा येतो. मन भयग्रस्त होतं.

फक्त मृत्यूची वाट पाहायला लावणाऱ्या या छळाबद्दल सेडनाया तुरुंगातून सुटका झालेल्या कैद्यांनी बीबीसीला सांगितलं. मृत्यूचं दार असलेल्या या भयकंर तुरुंगातील कैद्यांच्या हादरवून टाकणाऱ्या अनुभवांचा हा ग्राऊंड रिपोर्ट.

सीरियातील बशर अल-असद यांची राजवट संपुष्टात आणल्यानंतर बंडखोर गटांनी सीरियातील कुख्यात सेडनाया तुरुंगातील कैद्यांची सुटका केली. सीरियातील सत्तांतरातील हा महत्त्वाचा क्षण होता.

या घटनेला आता एक आठवडा होत आला आहे. या तुरुंगातून सुटका झालेल्या चार जणांनी बीबीसीला त्यांची कहाणी सांगितली आहे. तुरुंगातील त्यांचे अनुभव कोणत्याही माणसाला हादरवून टाकणारे आहेत.

(पूर्वसूचना : या लेखातील काही माहिती तुम्हाला विचलित करू शकते.)

आपल्या बराकीच्या बाहेरचा गोंगाट ऐकून सर्व कैद्यांमध्ये शांतता पसरली होती.

बाहेरून एकानं मोठ्या आवाजात विचारलं, "तिथे कोणी आहे का?" मात्र भीतीपोटी कोणत्याही कैद्याच्या तोंडून आवाज निघाला नाही.

कारण अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव होता की, जेव्हा बराकींचा दरवाजा उघडतो तेव्हा कैद्यांना मारहाण, बलात्कार आणि अत्याचाराला तोंड द्यावं लागतं. मात्र, आता दरवाजा उघडण्याचा अर्थ होता काही वेगळाच होता, ते म्हणजे 'स्वातंत्र्य'.

बंडखोर गटाच्या सैनिकांकडून कैद्यांची सुटका

त्यानंतर अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यात आल्या. तुरुंगाच्या कोठडीत बंद करण्यात आलेले सर्वजण तुरुंगातील जाडजूड मात्र छोट्याशा दरवाजासमोर रांगेत उभे राहिले.

कैद्यांना दिसलं की, तुरुंगातील सुरक्षा कर्मचाऱ्यांऐवजी कॉरिडॉरमध्ये बंडखोर गटांचे सैनिक उभे आहेत.

30 वर्षांचे कासेम अल कबालानी त्या प्रसंगाबद्दल सांगतात, "आम्ही त्यांना सांगितलं - आम्ही इथे आहोत. आम्हाला मुक्त करा."

त्यांनी पुढे सांगितलं की दरवाजा उघडताच ते 'अनवाणी पायानंच पळत सुटले.'

इतर कैद्यांप्रमाणेच ते पळत सुटले आणि त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

31 वर्षांचे अदनान अहमद गनेम म्हणाले, "जेव्हा ते (बंडखोरांचे सैनिक) आले आणि त्यांनी ओरडून आम्हाला बाहेर जाण्यास सांगितलं, तेव्हा मी तुरुंगाबाहेर पळत सुटलो. मात्र, मी इतका घाबरलेलो होतो की, मी मागे वळून देखील पाहिलं नाही. कारण मला वाटलं की न जाणो ते मला पुन्हा तुरुंगात टाकतील."

अर्थात ही सर्व घडत असताना तुरुंगातील कैद्यांना बाहेर सीरियात काय घडलं आहे याची अजिबात कल्पना नव्हती. त्यांना हे माहित नव्हतं की, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी देश सोडून पलायन केलं आहे आणि त्यांची राजवट संपुष्टात आली आहे. मात्र लवकरच कैद्यांना याबाबत माहित झालं.

अदनान त्या दिवसाबद्दल सांगतात, "तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायक दिवस होता. त्या क्षणी मला जे वाटत होतं ते शब्दात व्यक्त केलं जाऊ शकत नाही. तो अनुभव म्हणजे जणूकाही मृत्यूच्या दाढेतून परत येण्यासारखाच होता."

कैद्यांनी सांगितले त्यांचे भीषण अनुभव

सीरियातील कुख्यात सेडनाया तुरुंगातून सुटका झालेल्या चार कैद्यांशी बीबीसी बोललं.

कासेम आणि अदनान त्या चार कैद्यांपैकी होते. या तुरुंगात राजकीय कैद्यांना ठेवलं जायचं. या तुरुंगाला 'मानवी कत्तलखान्या'चं नाव देण्यात आलं होतं.

या सर्व कैद्यांनी त्यांचे तुरुंगातील वाईट अनुभव सांगितले. तुरुंगातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलेली वाईट वर्तणूक, झालेले अत्याचार, सोबतच्या कैद्यांच्या हत्या, तुरुंगातील कर्मचाऱ्यांचे भ्रष्टाचार आणि जबरदस्तीनं घेण्यात आलेले कबुली जबाब यासारख्या गोष्टींची माहिती त्यांनी दिली. सर्वच कैद्यांना जवळपास याच प्रकारचे अनुभव आले होते.

एका माजी कैद्यानं आम्हाला तुरुंगाच्या आतील परिस्थिती दाखवली. त्यानं देखील याच प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. किंबहुना सॅडनाया तुरुंगात कैदेत असलेल्या आपल्या नातेवाईक, कुटुंबीय किंवा मित्रांचा शोध घेणाऱ्या कुटुंबांनी देखील काहीशी अशीच माहिती दिली.

एका लष्करी हॉस्पिटलच्या शवागारातून बंडखोर गटांच्या सैनिकांनी काही मृतदेह ताब्यात घेतले. असं मानलं जातं की ते सेडनाया तुरुंगातील कैद्यांचे मृतदेह होते. डॉक्टरांचं म्हणणं आहे की या मृतदेहांवर छळ केल्याच्या खुणा होत्या.

2017 मध्ये अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेनं सादर केलेल्या त्यांच्या अहवालात असद सरकारवर हत्या आणि छळ केल्याचे आरोप केले होते.

एका निर्मनुष्य डोंगरावरील मोठ्या परिसरात 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला काटेरी कुपंणानं वेढलेला सेडनाया तुरुंग बांधण्यात आला होता.

2011 च्या आंदोलनानंतर राजकीय कैद्यांना याच तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तुर्कीस्थित असोसिएशन ऑफ डिटेनीज अँड द मिसिंग इन सॅडनाया प्रिझन या संस्थेचं म्हणणं आहे की या तुरुंगाचं रुपांतर एका 'डेथ कॅम्प' (मृत्यूची छावणी) मध्ये करण्यात आलं होतं.

खोट्या आरोपांखाली अटक

बीबीसी ज्या कैद्यांशी बोललं, त्यांनी सांगितलं की त्यांना सॅडनाया तुरुंगात यासाठी अटकेत ठेवण्यात आलं होतं, कारण ते फ्री सीरियन आर्मी या बंडखोर गटांशी संबंधित असल्याचा संशय होता किंवा बशर अल-असद यांच्या विरोधातील बंडखोरांचा बालेकिल्ला असलेल्या भागातील ते रहिवासी असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.

काही जणांवर तर सरकारी सैनिकांचं अपहरण आणि हत्या करण्याचा आरोप होता. तर काहींना 'दहशतवादी कारवायां'साठी शिक्षा ठोठावण्यात आली होती.

सर्वांचं म्हणणं होतं की त्यांच्यावर दबाव टाकून आणि त्यांचा छळ करून त्यांच्याकडून कबूली जबाबांवर सह्या करून घेण्यात आल्या होत्या.

त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा आणि मोठ्या कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जायची. एका कैद्यानं सांगितलं की त्याला न्यायालयात सादर न करता चार वर्षांपासून तुरुंगात कैदेत ठेवण्यात आलं होतं.

सरकारच्या विरोधातील कैद्यांना तुरुंगाच्या लाल इमारतीत कैदेत ठेवण्यात आलं होतं.

कासेम म्हणतात की 2016 मध्ये ते एक चेक पॉईंट पार करत होते. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर फ्री सीरियन आर्मी या बंडखोर गटाबरोबर 'दहशतवादी कारवायां'मध्ये सहभागी झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. वेगवेगळ्या तुरुंगांमधून अखेर त्यांची रवानगी सेडनाया तुरुंगात करण्यात आली होती.

दमास्कस च्या दक्षिण भागात त्यांचं घर आहे. त्यांच्या घरी दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "तुरुंगाच्या त्या दरवाजापलीकडे तुम्ही मृत माणसासारखे असता. तिथूनच तुमच्या छळाची सुरुवात होते."

तुरुंगात नेमकं काय व्हायचं?

तुरुंगातील अनुभवांबद्दल ते म्हणाले की त्यांना पूर्ण निर्वस्त्र करण्यात आलं आणि फोटो घेण्यासाठी उभं करण्यात आलं होतं. तिथे कॅमेराकडे पाहण्यासाठी त्यांना मारहाण करण्यात आली होती.

ते म्हणाले की यानंतर इतर कैद्यांबरोबर त्यांना साखळदंडानं बांधण्यात आलं आणि एका छोट्या अंधार कोठडीत टाकण्यात आलं. तिथे आणखी पाच कैदी होते. त्यांना घालण्यासाठी तुरुंगातील कपडे देण्यात आले. मात्र कित्येक दिवस त्यांना पाणी आणि अन्न देण्यात आलं नाही.

त्यानंतर त्यांना तुरुंगाच्या मुख्य बराकीत नेण्यात आलं. तिथल्या खोल्यांमध्ये कोणतंही अंथरुण नव्हतं. तिथे फक्त एक बल्ब लावण्यात आला होता आणि कोपऱ्यात एक टॉयलेट होतं.

याच आठवड्यात आम्ही जेव्हा तुरुंगाला भेट दिली तेव्हा आम्हाला तुरुंगातील कोठड्यांच्या फरशीवर चादर, कपडे आणि विखुललेलं अन्न दिसलं.

आमच्याबरोबर 2019 ते 2022 या कालावधीत इथे कैदेत राहिलेला एक जण देखील होता. तो आम्हाला तुरुंगाची माहिती देत होता.

या कैद्याची दोन बोटं आणि अंगठा कापलेला होता. त्याचं म्हणणं होतं की तुरुंगात छळ करताना त्याची बोटं कापण्यात आली होती.

तो त्याची कोठडी शोधत अशा जागी पोहोचला जिथल्या भिंतीवर ओरखडण्याच्या खुणा होत्या. त्याचा दावा होता की या त्याच्याच ओरखडण्याच्या खुणा होता. त्या पाहताच तो तिथेच खाली बसला आणि रडू लागला.

त्या माजी कैद्यानं सांगितलं की एका खोलीत 20 जण झोपायचे. मात्र ते एकमेकांविषयी क्वचितच जाणून घेऊ शकत. ते खूपच दबक्या आवाजात एकमेकांशी बोलायचे. कारण त्यांना माहित होतं की पहारेकऱ्यांचं त्यांच्यावर बारीक लक्ष आहे आणि ते सर्वकाही ऐकत आहेत.

कैदी पाहायचे मृत्यूची वाट

कासेम म्हणाले, "इथे प्रत्येक गोष्टीवर बंधनं होती. तुम्हाला फक्त जेवण्याची, पाणी पिण्याची, झोपण्याची आणि मरण्याची परवानगी होती."

सेडनाया तुरुंगातील शिक्षा खूपच अमानुष स्वरूपाची होती आणि तिथे सतत छळ होत राहायचा.

2019 मध्ये अदनान यांना एका सैनिकाचं अपहरण आणि हत्या केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. ते म्हणाले, "तुरुंगाचे पहारेकरी कोठडीत शिरताच मारहाण करण्यास सुरुवात करायचे. मी सुन्न होऊन पाहत राहायचो आणि माझी वेळ येण्याची वाट पाहायचो."

"आपण जिवंत आहोत याबद्दल रात्री आम्ही देवाचे आभार मानायचो. दररोज सकाळी आम्ही प्रार्थना करायचो की परमेश्वरा, आमच्या शरीरातून आत्मा काढून घे म्हणजे आम्हाला शांततेनं मरता येईल."

अदनान आणि अलीकडेच तुरुंगातून सुटका झालेल्या दोन कैद्यांनी सांगितलं की मारहाण करण्याआधी त्यांना उकिडवं बसवून टायरमध्ये बांधलं जायचं जेणेकरून त्यांना हालचाल करता येऊ नये.

कैद्यांना शिक्षा देण्यासाठी किंवा छळ करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अंमलात आणले जायचे.

कासेम म्हणतात की "तुरुंगातील दोन कर्मचारी त्यांना पाण्याच्या ड्रममध्ये उलटं टांगून ठेवायचे. त्या कर्मचाऱ्यांना वाटलं की आता श्वास थांबून कैद्याचा मृत्यू होईल तेव्हा ते त्याला पाण्यातून बाहेर काढायचे."

ते पुढे म्हणाले, "मी माझ्या डोळ्यांनी कैद्यांचे मृत्यू पाहिले आहेत. रात्री जागरण केल्यावर किंवा मोठ्या आवाजात बोलल्यावर किंवा इतर कैद्यांपासून काही समस्या निर्माण झाल्यास ते असंच करायचे."

याच आठवड्यात सेडनाया तुरुंगातून सुटका झालेल्या दोन नव्या कैद्यांनी दावा केला की तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी कैद्यांच्या केलेल्या लैंगिक शोषणाच्या अनेक प्रकरणांचे ते साक्षीदार होते.

एका व्यक्तीनं सांगितलं की तुरुंगातील परिस्थिती इतकी भयावह होती की जास्त किंवा पुरेसं अन्न मिळावं म्हणून कैदी तुरुंगातील सुरक्षा रक्षकांना सेक्सची ऑफर देखील द्यायचे.

तीन जणांनी सांगितलं की छळ करण्यासाठी तुरुंगातील सुरक्षा रक्षक त्यांच्या अंगावर उड्या मारायचे.

वेदना आणि फक्त वेदना

दमास्कसच्या हॉस्पिटलमध्ये आमची भेट 43 वर्षांच्या इमाद जमाल यांच्याशी झाली.

सेडनाया तुरुंगातील अनुभव सांगताना ते इंग्रजीत म्हणाले, "तिथे जेवायला मिळायचं नाही. झोपू दिलं जायचं नाही. मारहाण केली जायची. भांडणं व्हायची. कैदी आजारी पडायचे. तिथे सर्वकाही भयावह होतं."

त्यांना 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांनी दावा केला की त्यांची अटक राजकीय स्वरुपाची होती.

नंतर ते अरबी भाषेत बोलू लागले आणि म्हणाले की त्यांचं पाठीचा कणा मोडला होता. कारण एका सुरक्षा रक्षकानं त्यांना उकिडवं बसवून त्यांच्यावर उडी मारली होती.

इमाद यांनी आपल्या मित्रासाठी काही औषधं चोरली होती. त्या गोष्टीची त्यांना शिक्षा दिली जात होती.

मात्र इमाद यांच्यासाठी तुरुंगातील सर्वात मोठं संकट होतं तिथली ठंडी. ते म्हणाले, "तिथल्या भिंतीसुद्धा गारठलेल्या होत्या. मी एक जिवंत मृतदेह झालो होतो."

30 वर्षांचे रकान मोहम्मद अल सईद म्हणाले की त्यांना 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर अपहरण आणि हत्येचा आरोप लावण्यात आला होता. मात्र त्यांच्यावरील आरोपांची कधीही न्यायालयात सुनावणी झाली नाही.

ते म्हणाले, "आम्ही आंघोळ केली, कोणी आम्हाला भेटायला आलं, आम्ही ऊन अंगावर घेत बसलो किंवा आम्ही आमची कोठडी सोडली की आम्हाला शिक्षा दिली जायची, आमचा छळ केला जायचा."

आपले तुटलेले दात दाखवत ते म्हणाले की एका सुरक्षा रक्षकानं एक लाठी त्यांच्या चेहऱ्यावर मारली होती.

आम्ही ज्या लोकांशी बोललो त्या सर्वाचं म्हणणं होतं की त्यांच्या कोठडीत असलेल्या लोकांची हत्या करण्यात आली होती.

सुरक्षा गार्ड कोठडीत यायचे, नाव पुकारायचे आणि मग त्या कैद्याला बाहेर घेऊन जायचे. त्यानंतर तो कैदी पुन्हा कधीच दिसायचा नाही.

अदनान म्हणाले, "आमच्यासमोरच लोकांची हत्या केली जायची. ते जेव्हा रात्री 12 वाजता हाक मारायचे. तेव्हा आमच्या लक्षात यायचं की आज लोकांना मारण्यात येणार आहे."

इतरांनी देखील अशाच कहाण्या सांगितल्या. त्यांनी सांगितलं की त्या लोकांचं नेमकं काय झालं, हे जाणून घेण्याचा कोणताच मार्ग नव्हता.

छळापासून सुटकेसाठी अधिकाऱ्यांना लाच

कासेम यांचे वडील आणि इतर नातेवाईकांनी सांगितलं की कासेम यांची हत्या होऊ नये यासाठी तुरुंगातील अधिकाऱ्यांना 10,000 डॉलर द्यावे लागले होते. आधी त्यांची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली आणि नंतर त्यांना 20 वर्षांची शिक्षा देण्यात आली.

कासेम म्हणाले की पैसे देण्यात आल्यानंतर तुरुंगातील सुरक्षा रक्षकांच्या त्यांच्याबरोबरच्या वर्तवणुकीत थोडी सुधारणा झाली.

कैद्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की ते तुरुंगात आपल्या लोकांसाठी काही पैसे पाठवायचे, जेणेकरून त्यांना व्यवस्थित अन्न मिळावं. मात्र भ्रष्ट अधिकारी ते पैसे स्वत:जवळच ठेवून घ्यायचे. ते कैद्यांना मर्यादित किंवा अपुरं अन्नच द्यायचे.

काही कोठड्यांमध्ये तर कैदी सर्व अन्न एकत्र गोळा करत असत मात्र तरीदेखील त्यांच्यासाठी ते पुरेसं नसायचं.

अदनान म्हणाले की मारहाणीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे उपासमार. ते म्हणाले, "मी कित्येक रात्री उपाशीपोटी असायचो. एका महिन्यात आम्हाला अशी शिक्षा देण्यात आली की त्यात आम्हाला दिवसाला फक्त एकच ब्रेड दिला जायचा. मग दुसऱ्या दिवशी अर्धा तुकडा दिला जायचा आणि मग त्यातूनही छोटा तुकडा दिला जायचा आणि त्यानंतर काहीही नाही."

कासिम म्हणाले की तुरुंगातील सुरक्षा रक्षक त्यांचा अपमान देखील करायचे.

या सर्वांचंच म्हणणं आहे की कुपोषणामुळे तुरुंगात त्यांचं वजन खूपच घटलं होतं.

कासिम म्हणाले, "तुरुंगात माझं सर्वात मोठं स्वप्नं होतं की मला पुरेसं अन्न मिळावं, माझी उपासमार होऊ नये."

त्यांचे वडील सांगतात की आपल्याला मुलाला भेटता यावं यासाठी त्यांच्या कुटुंबाला तुरुंगातील अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागली. कधी कधी सुरक्षा रक्षक कासिम यांना व्हीलचेअरवर घेऊन यायचे. कारण ते इतके अशक्त झालेले असायचे की त्यांना आपल्या पायांवर नीट उभं देखील राहता यायचं नाही.

रविवारी (15 डिसेंबर) सुटका झालेल्या दोन जणांनी आम्हाला हे देखील सांगितलं की त्यांना तुरुंगात टीबी (क्षयरोग) झाला होता. त्यातील एकानं सांगितलं की त्यांच्यावरील उपचार देखील मधून मधून थांबवले जायचे. शिक्षा देण्याची ही देखील एक पद्धत होती.

अदनान म्हणाले की शारीरिक छळ होण्याची भीती कायमच मनात असायची. या आठवड्यात दमास्कसच्या एका हॉस्पिटल मधील अधिकाऱ्यानं सांगितलं की ज्या कैद्यांना इथे तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं, त्यांच्यात 'मुख्यत: मानसिक समस्या' आढळून आल्या.

जगण्याची आशा संपलेली असताना सुटका

या सर्व लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवरून एक बाब तर निश्चित आहे की ते अशा ठिकाणी होते जिथे कोणतीही आशा नव्हती. तिथे होत्या फक्त वेदनाच वेदना. कैद्यांचा बहुतांश वेळ मौनातच जात असे. बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला होता.

त्यामुळेच ते जेव्हा सांगतात की त्यांना हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) हा इस्लामिक बंडखोर गट आगेकूच करत असल्याबद्दल काहीच माहित नव्हतं, तेव्हा त्याचं आश्चर्य वाटत नाही. तुरुंगातून सुटका झाल्यानंतरच त्यांना सीरियात नेमकं काय सुरू याची माहिती मिळाली.

कासिम म्हणाले की त्यांना हेलीकॉप्टरचा आवाज ऐकू येत होता आणि मग नंतर कॉरिडॉरमध्ये लोकांचा आवाज ऐकू येऊ लागला. मात्र कोणतीही खिडकी नसलेल्या कोठरीत ते कोणत्याच गोष्टीबद्दल निर्धास्त होऊ शकत नव्हते. मग कोठडीचा दरवाजा उघडला आणि सुटका करण्यात आलेले कैदी जितक्या वेगानं पळून बाहेर जाऊ शकत होते, तितक्या वेगानं पळाले.

राकन म्हणाले, "आम्ही पळत तुरुंगाच्या बाहेर पडलो. भीतीपोटी देखील आम्ही पळत सुटलो होतो."

ते म्हणाले की त्या वेळेस त्यांच्या मनात फक्त त्यांची मुलं आणि पत्नी यांचाच विचार येत होता.

राकन पुढे म्हणाले, "या सर्व गोंधळात मला एका कारचा देखील धक्का लागला. मात्र माझ्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मी फक्त आणि फक्त पळतच राहिलो."

अदनान देखील तुरुंगातून पळतच बाहेर पडले आणि त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

ते म्हणाले, "मी फक्त पुढे पळत राहिलो. मला याबद्दल सांगता येणार नाही. मी दमास्कसच्या दिशेनं पळत गेलो."

तुरुंगातून सुटका झाल्याची बाब अजूनही त्यांच्या मनानं पूर्णपणे स्वीकारली गेलेली नाही.

ते पुढे म्हणाले की आता देखील ते रात्री जेव्हा झोपतात. तेव्हा त्यांना असं वाटतं की सकाळी त्यांचे डोळे तुरुंगातच उघडतील. त्यांना अजूनही हे सर्वकाही स्वप्नवतंच वाटतं आहे.

कासिम म्हणाले की तुरुंगातून सुटका झाल्यावर ते तल मनीन या शहराकडे पळाले होते. तिथे एक महिला कैद्यांना अन्न, पैसे आणि कपडे देत होती. त्या महिलेनं त्यांना सांगितलं की बशद अल-असद यांची राजवट संपुष्टात आली आहे.

ते म्हणाले की यानंतर ते आपल्या घरी गेले आणि तिथे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना प्रेमानं आलिंगन दिलं.

कासिम म्हणाले, "तुरुंगातून झालेली सुटका म्हणजे जणूकाही दुसरा जन्मच आहे. याबद्दल काय वाटतं आहे, हे मला शब्दात व्यक्त करता येणार नाही."

अतिरिक्त वार्तांकन: निहद अल-सलेम

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)