You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमानूष छळ, उपासमारी, बलात्कार आणि फाशी; क्रूर असदचा सीरियातील 'मानवी कत्तलखाना'
- Author, मॅट मर्फी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बंडखोरांनी सीरियातील असद कुटुंबाची 50 वर्षांची सत्ता अवघ्या 10 दिवसांत संपुष्टात आणली.
रविवारी (8 डिसेंबर) असद राजवट कोसळल्यापासून लाखो सीरियन नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
हजारो नागरिक आता आपल्या जीवलगांचा शोध घेण्यासाठी सीरियातील कुख्यात अशा सेडनाया तुरुंगाकडे धाव घेताना दिसत आहेत.
1980 च्या दशकात राजधानी दमास्कसपासून 30 किमी अंतरावर असलेल्या एका छोट्या शहरात हा तुरुंग उभारण्यात आला होता. तुरुंग हा नावालाच होता. हा होता असद यांच्याविरोधात उभ्या राहणाऱ्या लोकांसाठीचा 'कत्तलखाना'. आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी असद कुटुंबानं या तुरुंगात कैद्यांना अक्षरशः नरकयातना दिल्याचा आरोप आहे.
सीरियामध्ये 2011 पासून नागरी युद्धाला सुरुवात झाली. असद कुटुंबाच्या दडपशाहीला कंटाळून लोकांमधून या काळात उठाव सुरू झाला. त्यामुळे असद राजवटीत हजारो लोकांना या तुरुंगात कैद करण्यात आले. या तुरुंगात राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांनी कौर्याची परिसीमा गाठली होती. त्यामुळे या तुरुंगाला 'मानवी कत्तलखाना' असं म्हटलं जातं.
सशस्त्र बंडखोरांनी सीरियावर कब्जा केल्यानंतर सेडनाया तुरुंगाचं एक-एक रहस्य आता समोर येत आहे. यापूर्वी कधीच न पाहिलेले तुरुंगातील भीतीदायक फोटो, व्हिडिओ समोर आले आहेत. हजारो नागरिक आपल्या आप्तेष्ठांचा, जीवलगांचा शोध घेण्यासाठी तुरुंगात जमले आहेत. त्यांच्या काही खाणाखुणा मिळतात का हे शोधत आहेत.
या तुरुंगात अनेक रहस्यं आहेत. बंडखोर सैनिक याचा शोध घेत आहेत. त्यासाठी बंडखोर या तुरुंगाचे माजी सुरक्षारक्षक आणि अनेक वर्षांपासून कैदेत असलेल्या बंदिवानांची मदत घेत आहेत.
उजवा गट आणि अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटच्या अहवालानुसार, सेडनायाचे तुरुंग म्हणजे असादच्या क्रूर, अमानूष छळाचा आणि दडपशाहीचं एक प्रतिक बनलं होतं.
'मानवी कत्तलखाना'
सीरियन सैन्याकडून आणि लष्करी गुप्तवार्ता विभागाकडून सेडनाया तुरुंगाचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं. 1980 च्या सुरुवातीच्या काळात या तुरुंगाच्या बांधकामास सुरुवात झाली. बशर अल असद यांचे वडील हाफीज अल असद हे राष्ट्राध्यक्ष असताना 1987 मध्ये 1.4 किमी क्षेत्रफळ असलेल्या या तुरुंगात पहिला कैदी आला होता.
जेव्हा पूर्ण क्षमतेनं हा तुरुंग सुरू झाला तेव्हा त्याचे दोन भाग करण्यात आले. व्हाईट बिल्डिंग (इमारत) ही लष्करी सेवेत असूनही असद राजवटीला विरोध करणाऱ्या संशयितांसाठी होती. ही इमारत इंग्रजी 'एल' आकारात बांधलेली होती.
दुसरी इमारत ही रेड बिल्डिंग म्हणजेच रेड विंग आहे. असद राजवटीला विरोध करणाऱ्या इस्लामी गटाच्या संशयितांना इथे कैद केले जात होते. ही इमारत इंग्रजी 'वाय' आकाराची होती. तीन सरळ कॉरिडॉरमध्ये विभागलेली ही इमारत आहे.
या इमारतींमध्ये सुमारे 10 ते 20 हजार लोक राहू शकतात, असं या तुरुंगातून सुटका झालेल्या कैद्यांशी बोलल्यानंतर समोर आले आहे. बंडखोरांनी रविवारी सीरियावर कब्जा केला. तेव्हापासून काही व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. बीबीसीनं व्हेरिफाय केलेल्या एका व्हिडिओत सीसीटीव्ही स्क्रिनच्या माध्यमातून तुरुंगातील डझनभर कारागृहांवर पाळत ठेवण्यात येत असल्याचं दिसून आलं आहे.
सीरियात 2011 मध्ये जेव्हा गृहयुद्धाला सुरुवात झाली तेव्हा व्हाईट बिल्डिंगमधील कैद्यांना हलवण्यात आले. ही इमारत रिकामी करण्यात आली. त्याऐवजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्याविरोधात निषेध मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या राजकीय कैद्यांना/ आंदोलकांना इथे कैदेत ठेवलं गेलं, असं अॅम्नेस्टी इंटरनॅशनलनं आपल्या 2017 च्या अहवालात तुरुंगातील एका माजी सुरक्षा रक्षकाच्या हवाल्यानं म्हटलं.
2011 नंतर सेडनाया हे सीरियातील एक प्रमुख राजकीय तुरुंग झाल्याचं एका माजी अधिकाऱ्यानं 'अॅम्नेस्टी'ला सांगितलं.
रेड बिल्डिंगमध्ये ठेवलेल्या कैद्यांचा अतोनात छळ करण्यात येत होता. इथल्या कैद्यांना वारंवार मारहाण व्हायची आणि त्यांच्यावर बलात्कारही व्हायचा. त्यांना अन्न आणि औषधंही दिली जात नसत, असं एका माजी कैद्यानं 'अॅम्नेस्टी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
व्हाईट बिल्डिंगच्या तळघरात एक 'फाशीची खोली' आहे. या खोलीत रेड बिल्डिंगमधील कैद्यांना फाशी दिली जात होती.
जेवणाच्या वेळी रेड बिल्डिंगमधील फाशीची शिक्षा देण्यात येणाऱ्या कैद्यांच्या नावांची यादी दिली जायची. त्यानंतर ज्यांचे नाव या यादीत असेल त्यांना या तळघरात आणलं जायचं. कधी-कधी एकाच वेळी 100-100 कैदीही असत. या सर्वांना इथे छळ करुन मारले जात.
'अॅम्नेस्टी'शी बोलताना एका कैद्याने सांगितले की, रेड बिल्डिंगमधील कैद्यांना या इमारतीत साधारणपणे मध्यरात्री 3 च्या सुमारास हलवले जात.
डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत या कैद्यांना व्हाईट बिल्डिंगच्या तळघरातील फाशीच्या 'त्या' खोलीत उभे केले जात. त्या खोलीत एक मीटर उंचीची एकाचवेळी 10 जणांना फाशी देता येईल अशी व्यवस्था केलेली होती.
2012 मध्ये या खोलीचा विस्तार करण्यात आला. एकाच वेळी 20 जणांना फाशी देता येईल अशी तरतूद करण्यात आली. असद राजवट कोसळल्यानंतर बंडखोर गटाने व्हिडिओ शेअर केला असून त्यात सेडनाया तुरुंगातील सुमारे डझनभर फास असलेल्या खोल्या आढळून आल्या आहेत.
'अॅम्नेस्टी'च्या अहवालानुसार 2011 ते 2018 या काळात फाशी देऊन किंवा अमानूष छळामुळे, वैद्यकीय सुविधांअभावी किंवा उपासमारीमुळे सुमारे 30 हजार जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. या तुरुंगातून सुटका झालेल्या कैद्यांच्या म्हणण्यानुसार 2018 ते 2021 दरम्यान किमान 500 कैद्यांना फाशी देण्यात आली होती, असं 'द असोसिएशन ऑफ द मिसिंग अँड डिटेनीज इन सेडनाया प्रिझन'नं (एएमडीएसपी) 2022 मध्ये म्हटलं आहे.
हत्या केलेल्या कैद्यांचा मृतदेह नष्ट करण्यासाठी या कारागृहातच एक दहनभूमी (दहनगृह) बांधण्यात आलं होतं, असा दावा अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटनं 2017 मध्ये केला होता. समोर आलेल्या तुरुंगाच्या फोटोमध्ये व्हाईट बिल्डिंगच्या बाजूला एक छोटासा विभाग दिसतो. ती दहनभूमी असल्याचं सांगितलं जातं.
सेडनाया तुरुंगातील सामूहिक हत्या लपवण्यासाठी असद सरकारच्या अधिकाऱ्यांनी ही दहनभूमी बांधल्याचं स्टेट डिपार्टमेंटनं म्हटलं होतं.
एका छोट्या इमारतीचं दहनगृहामध्ये रुपांतर केल्याचं अमेरिकेनं जारी केलेल्या सॅटेलाइट फोटोत दिसतं. या इमारतीच्या छतावरील वितळलेल्या बर्फावरुन या दाव्याला दुजोरा मिळत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका दिवसाला किमान 50 जणांची फाशी देऊन हत्या केली जात असत असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.
कारागृहाला कडक सुरक्षा व्यवस्था
कारागृहाला भक्कम तटबंदी आणि अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती.
एएमडीएसपीच्या अहवालानुसार, तुरुंगाच्या बाहेर गस्तीसाठी 200 सैनिकांची तुकडी, तर लष्करी गुप्तचर विभागातील अतिरिक्त 250 सैनिकांवर अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती.
सीरियन लष्कराच्या थर्ड डिव्हिजनच्या 21 व्या ब्रिगेडकडं तुरुंगाच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. ही ब्रिगेड त्यांच्या प्रामाणिकपणासाठी ओळखली जात. या सैनिकांना थेट राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे अधिकारी आदेश देत असत.
असद राजवट कोसळल्यापासून नागरिकांनी आपल्या आप्तेष्ठांना शोधण्यासाठी या तुरुंगाकडे धाव घेतली आहे. परंतु, नागरिकांनी कारागृहात येणं टाळावं असं आवाहन करण्यात येत आहे.
व्हाइट हेल्मेट्स नावाच्या सीरियन नागरी संरक्षण गटानं एक फोटो प्रसारित केला असून यात तुरुंगाच्या बाहेरील बाजूस काटेरी तारांनी वेढलेल्या उंचच्या उंच भिंती दिसत आहेत. त्याबरोबर गार्ड टॉवरही दिसत आहे.
विविध आंतरराष्ट्रीय संघटनांकडून ज्या ज्या वेळी सेडनाया तुरुंगातील अमानूष छळाबाबत आरोप करण्यात आले. त्या त्या वेळी असद राजवटीनं त्यांच्यावरील आरोप हे 'निराधार' आणि 'तथ्यहीन' असल्याचं म्हणत आरोप फेटाळले होते.
"ज्या कुटुंबांना त्यांचे नातेवाईक सेडनाया तुरुंगात होते, असा संशय आहे. त्यांना या असद राजवटीच्या पतनानंतर आपल्या प्रियजनांचे धागेदोरे सापडण्यासाठी काही काळ जावा लागेल," असं 'अॅम्नेस्टी'नं म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)