सायकलवरून जगप्रवास करणाऱ्या पहिल्या माणसाने भारताबाबत काय लिहिलंय?

ज्युल्स व्हर्न यांची 'अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज' ही प्रसिद्ध कादंबरी प्रकाशित झाल्याच्या सुमारे दशकभरानंतर एका इंग्लिश पर्यटकानं जगभर प्रवासाचं ध्येय ठरवलं.

पण, व्हर्न यांच्या पुस्तकातील पात्रानं रेल्वे, जहाजं याद्वारे प्रवास केला होता. पण थॉमस स्टिव्हन्स यांना मात्र तसं करायचं नव्हतं. त्यांनी सायकलद्वारे जगभ्रमंती करायचं ठरवलं.

त्यांनी 1884 मध्ये प्रवास सुरूही केला. जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचा हा प्रवास चालला. प्रवासाहून परतल्यानंतर त्यांनी 'अराऊंड द वर्ल्ड ऑन अ सायकल' नावाचं पुस्तकही लिहिलं.

या पुस्तकानं जागतिक स्तरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पुस्तकात त्यांनी उत्तर अमेरिका खंड, युरोप आणि आशियातील प्रवासादरम्यान नेमकं काय पाहिलं, याचं तपशीलवार वर्णन केलं.

पहिला मुक्काम उत्तर अमेरिकेत

स्टिव्हन्स यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. वयाच्या 17 व्या वर्षी 1871 मध्ये ते अमेरिकेत स्थायिक झाले.

ते क्रीडापटू नसले तरी त्यांना सायकलिंगची खूप आवड होती. त्यावेळी सायकलिंग हा उच्चभ्रू लोकांचा छंद समजला जायचा.

अमेरिकन लेखक आणि चित्रपट निर्माते रॉबर्ट आयजनबर्ग यांच्या मते, "स्टिव्हन्स एवढे लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे, ते असे व्यक्ती होते जे जीवनात कायम पुढं जाण्यासाठी प्रेरित आणि उत्साही असायचे."

स्टिव्हन्स यांनी सुरुवातीला उत्तर अमेरिका खंड फिरायचं ठरवलं होतं. पाच महिन्यांत सॅन फ्रान्सिस्को ते बोस्टन असा सायकलप्रवास करून त्यांनी हा टप्पा पूर्ण केला होता.

या प्रवासानंतर तेव्हाच्या एका लोकप्रिय सायकलिंग मासिकानं स्टिव्हन्स यांना प्रायोजकत्व देऊ केलं. त्यामुळं त्यांनी प्रवास जगभर वाढवण्याचा निर्णय घेतला.

एप्रिल 1884 मध्ये ते शिकागोहून इंग्लंडला गेले. युरोप खंड ओलांडल्यानंतर, त्यांनी तुर्की, इराण, भारत, चीन आणि जपानमधून प्रवास केला.

स्टिव्हन्स यांनी प्रवास केला तेव्हा त्यांची सायकल आजच्या सायकलींपेक्षा खूप वेगळी होती.

पेनी फर्थिंग प्रकारची एक वजनदार अशी ती सायकल होती. पुढचं चाक खूप मोठं आणि मागचं चाक खूप लहान होतं.

पेनी म्हणजे मोठ्या आकाराचं ब्रिटिश नाणं तर फर्थिंग म्हणजे लहान आकाराचं नाणं.

प्रवासादरम्यान स्टिव्हन्स हे अंतर्वस्त्र, बंदूक, गरजेच्या वेळी तंबू म्हणून वापरता येणारं पोंचो (एक प्रकारचं पांघरूण) आणि एक टायर एवढं मोजकंच सामान सोबत घेऊन फिरले.

इस्तानबूलमधील आठवणी

स्टिव्हन्स 1885 च्या उन्हाळ्यात इस्तानबूलला पोहोचले. त्यावेळी ते तिथं रमजान महिन्यात गलाटा भागातील हॉटेलमध्ये राहिले. हा शहराचा ऐतिहासिक भाग होता.

इस्तानबूल हे जगातील विविध प्रकारच्या संस्कृतींचा सर्वाधिक मिलाफ असलेलं शहर असल्याचं वर्णन त्यांनी केलं. याठिकाणचे लोक, रस्ते आणि फॅशन यात असलेल्या वैविध्याची त्यांनी नोंद घेतली.

कायम उत्साहानं भरलेल्या या शहरांचं त्यांनी वर्णन करताना त्यांनी कॉफी हाऊसच्या प्रकाशांत न्हाऊन निघालेले रस्ते आणि हाती दिवे घेऊन फिरणारे लोक यांचे दाखले दिले.

त्यांनी ट्राम किंवा फेरींमध्ये असलेल्या महिला बुरखे हटवून ठरवून दिलेल्या विशिष्ट भागांत धुम्रपान करत असल्याचंही लिहिलं होतं.

शहरात फिरण्यासाठी एक गाइडही स्टिव्हन्स यांनी तयार केलं होतं. त्यांनी केलेल्या प्रवासानुसार ते होतं.

या गाइडमध्ये प्रवासासाठी दुपारी फिरताना पुरातन वस्तू संग्रहालय, हागिया सोफिया मशीद, कॉस्च्युम म्युझियम, 1001 स्तंभ, सुलतान महमूदची कबर, जगप्रसिद्ध ग्रँड बाजार, कबूतर मशीद, गलाटा टॉवर आणि सुलतान सुलेमान पहिला यांची कबर पाहण्यासाठीच्या सूचना आहेत.

त्यांच्या लेखनात सुफी नृत्यासंबंधीच्या विधी आणि शहरातील सधन कुटुंबांच्या निवासस्थानांबद्दलही उल्लेख आहे. रमजान दरम्यानच्या दौऱ्यात त्यांना ऑटोमन साम्राज्यातील स्थापत्य कला आणि मशिदीच्या मिनारांमध्ये उत्सव काळात लावल्या जाणाऱ्या दिव्यांचं प्रचंड कौतुक वाटलं.

स्टिव्हन्स यांनी फिरताना तत्कालीन सुलतान अब्दुल हमीद दुसरे यांच्या सैन्याची रेजिमेंटही पाहिली होती. तुर्कीच्या इतिहासातील सर्वात विभाजनवादी व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता.

"सुलतानचा चेहरा पाहण्याची माझी इच्छा पूर्ण झाली पण ती फक्त झलक होती," असं ते म्हणाले.

तुर्कीच्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये समावेश असलेल्या इझमितच्या आखाताबद्दल लिहिताना, "संध्याकाळी पांढऱ्या रंगानं मझवलेली गावं किती सुंदर दिसतात," असं म्हटलं आहे.

मध्य अनातोलिया भागात फिरताना त्यांना भटक्या कुर्दिश समुदायाची एक छावणी दिसली. त्यांच्या उदारतेनं ते खूप प्रभावित झाले.

या समुदायाच्या प्रमुखाचं वर्णन त्यांनी, "हुक्का ओढणारा एक प्रतिष्ठित शेख" असं केलं. त्यांना दिलेलं अन्न आणि न विचारता त्यांच्या झोपण्यासाठी केलेली व्यवस्था याबाबतही त्यांनी लिहिलं आहे.

तुर्कीच्या विविधतेबाबत स्टिव्हन्स यांनी मांडलेल्या मतांनुसार एका आर्मेनियन धर्मगुरूनं त्यांना बायबलही भेट दिली होती.

पूर्वेकडील प्रवास

इराणच्या तेहरानमध्ये त्यांनी काही काळ घालवला. तेव्हा स्टिव्हन्स यांनी शाह नासेर अल-दीन यांचा पाहुणचार घेतला.

तेहरानच्या उपनगरांत बाह्य भागांमध्ये झोरास्ट्रीय टॉवर्स ऑफ सायलेन्सचं कौतुक करण्यासाठीही ते थांबले होते. हे एक असं प्राचीन स्थळ आहे, जिथं मृतदेह गिधाडांनी खाण्यासाठी सोडले जात असे. कारण त्यांना दफन केल्याने माती दूषित होते.

झोरास्ट्रियन्सचा हा जुना इतिहास असून हे टॉवर्स आता एका प्राचीन धर्माचे अवशेष म्हणून उभे आहेत.

इराणनंतर, स्टिव्हन्स अफगाणिस्तानला निघाले. पण त्या देशात त्यांना प्रवेश करता आला नाही. नंतर कॅस्पियन समुद्र ओलांडून ते जहाजानं बाकूला गेले. आज ती अझरबैजानची राजधानी आहे. नंतर तिथून रेल्वेनं आजच्या जॉर्जियातील बटुमीला पोहोचले.

त्यानंतर स्टिव्हन्स जहाजानं भारताच्या कोलकाता तेव्हाचे (कलकत्ता) शहरात पोहोचले.

भारतातील प्रवासाबाबतच्या त्यांच्या लेखनात ताजमहालाचे खूप कौतुक पाहायला मिळते. याठिकाणच्या उकाड्याबाबत तक्रार केली असली तरी त्यांनी आतापर्यंतच्या प्रवासात भारतातली ठिकाणं आणि रंग त्यांना सर्वाधिक आवडल्याचं म्हटलं.

तिथून ते हाँगकाँगला आणि नंतर चीनला गेले. जपानमधील योकोहामा हे त्यांच्या या प्रवासातील शेवटचं ठिकाण होतं.

याठिकाणी भेटलेल्या लोकांचं वर्णन स्टिव्हन्स यांनी 'सुसंस्कृत' आणि 'आनंदी' असं केलं. "इतर कोणत्याही राष्ट्राच्या तुलनेत ते आनंदानं जगण्याची समस्या सोडवण्याच्या अधिक जवळ पोहोचले आहेत," असं त्यांनी म्हटलं.

याठिकाणच्या मुलांच्या शिक्षणावरील प्रेमानंही ते आश्चर्यचकित झाले.

स्टिव्हन्स यांनी 1886 मध्ये इथंच प्रवास पूर्ण केला. एकूण दोन वर्षे आणि आठ महिने त्यांचा हा प्रवास चालला.

त्यांनी स्वतः केलेल्या नोंदीनुसार त्यांनी 13,500 मैल (22,000 किमी) सायकल चालवली. त्यामुळं सायकलनं जगभर प्रवास करणारे पहिला व्यक्ती असं त्यांना म्हटलं जातं. या प्रवासाच्या नोंदी त्यांनी सुरुवातीला एका मासिकात आणि 1887 मध्ये पुस्तकरुपात प्रकाशित केल्या.

'प्राच्यवादाचा परिणाम'

स्टिव्हन्स यांनी त्यांना भेटलेले लोक आणि समुदायांबाबत वर्णन करताना त्या काळात वापरले जाणारे काही विशिष्ट शब्दही वापरले आहेत. 'अर्ध-सुसंस्कृत', 'घाणेरडे' आणि 'अज्ञानी' असे त्यातले काही शब्द आहेत.

तुर्कीमधील शिवासमधील प्रवासाबाबत त्यांनी लिहिलं की, "सरासरी आर्मेनियन गावकऱ्याच्या मनाची वैशिष्ट्यपूर्ण स्थिती ही खोल, दाट अज्ञान आणि नैतिक उदासीनता अशी असते."

तुर्की लेखक आयदान सेलिक स्टिव्हन्स यांनी तुर्कीमध्ये केलेल्या प्रवासाचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, त्या काळातील अनेक प्रवाशांप्रमाणं स्टिव्हन्सही 'प्राच्यविद्यावादी' होते.

'प्राच्यविद्यावादी' म्हणजे असे अभ्यासक किंवा लेखक हे विशिष्ट लोकांना आणि प्रामुख्यानं पूर्वेकडील संस्कृती आणि लोकांना एका रुढीवादी दृष्टिकोनातून पाहतात.

मात्र, लेखक, रॉबर्ट आयजनबर्ग यांच्या मते, स्टिव्हन्स यांचा प्रवास जसजसा पुढं सरकत गेला तसतसा त्यांचा दृष्टिकोन बदलू लागला. "अर्थातच त्यांची मतं एका विशिष्ट सांस्कृतिक दृष्टिकोनातून आलेली आहेत. पण जेव्हा ते ताजमहालला पोहोचले आणि खरंच त्यांचं कौतुक केलं तेव्हा ते एवढे प्रभावित झाले की, इतर कशाशीही त्यांनी त्याची तुलना केली नाही. एवढे मंत्रमुग्ध ते झाले होते."

सायकलवरून जगप्रवास करणारे पहिले व्यक्ती असल्यानं इंग्लंड आणि अमेरिकेत त्यावेळी स्टिव्हन्सच्या कथा खूप लोकप्रिय झाल्या. त्यांच्या कथांवरून अमेरिकन लोकांचा जगाकडं पाहण्याचा दृष्टीकोन कसा असतो हे समजलं, असं अभ्यासक म्हणतात.

स्टिव्हन्स यांचं जीवन तरुण अमेरिकन व्हिल्यम सॅचलेबेन आणि थॉमस ऍलन यांच्यासाठी प्रेरणादायी ठरलं. ते सायकलनं इस्तानबूलला गेले होते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेलिक यांच्या मते, स्टिव्हन्स यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान हे दुचाकी प्रवासाच्या लोकप्रियतेतील योगदान ठरलं. त्याचं वर्णन त्यांनी 'सायकल क्रांती' असंही केलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.