'लव्ह जिहाद करतो काय' असं म्हणत पुण्यात विद्यार्थ्याला धमकी? नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्याला 'लव्ह जिहाद करतो काय', असं म्हणत धमकावण्यात आलं आहे.
इतकंच नाही तर या विद्यार्थ्याच्या पालकांना फोन करुन तुमच्या मुलाची अॅडमिशन रद्द करा आणि त्याला परत घेऊन जा असंही सांगण्यात आलं आहे.
याबाबत विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीवरुन आता पुणे पोलीस तपास करत आहेत.
जुनैद जमादार हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातला विद्यार्थी पहिल्यांदाच घरापासून लांब रहायला आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्किल डेव्हलपमेंट विभागात तो रिटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे.
एक वर्ष शिक्षण झालं की पुढे इंटर्नशिप आणि त्यानंतर प्लेसमेंट मिळणार असल्याने त्याने या कोर्सची निवड केली, असं तो सांगतो.
गावाकडे दोन बहिणी शेती करतात, तर वडील वाहन चालवण्याचा व्यवसाय करतात.
आपल्याला लवकर काम धंदा सुरू करता यावा, म्हणून स्किल डेव्हलपमेंट कोर्सची निवड केल्याचं जुनैद सांगतो.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हॅास्टेलमध्ये राहणारा जुनैद दररोजच आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत रिफेक्टरीमध्ये जेवायला जात असतो.
7 एप्रिलला मात्र तो जेवण करून परत येत असताना गाडीवरुन आलेल्या काही जणांनी आपल्याला आणि आपल्या मित्र मैत्रीणींना अडवल्याचं त्याचं म्हणणं आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना जुनैद म्हणाला, रोजसारखंच आम्ही जेवून हॅास्टेलला चाललो होतो. गाडीवरून आलेल्या 4 जणांनी आम्हांला थांबवलं आणि आमचं आधार कार्ड मागितलं. माझ्या मित्रमैत्रिणींपैकी मी एकटाच मुस्लिम होतो.
तो पुढं सांगतो, "माझ्या मैत्रिणींना ते लोक म्हणाले की, तुम्ही याच्यासोबत का राहता? माझ्या मित्राला म्हणाले तू हिंदू आहेस तर मुस्लिम मुलाला का पाठिंबा देत आहे?
मला म्हणाले तुला लव्ह जिहाद करायचे आहे का. मग माझ्या मैत्रीणींना जायला सांगितलं. मित्र मात्र सोबत थांबला. त्यानंतर त्यांनी मारहाण केली
पण हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही. तर जुनैदला सांगून त्याच्या वडिलांना फोन करुन त्याला माघारी न्या असंही सांगण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. याबरोबरच आपल्याला शिवीगाळ करुन मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हणले आहे. चतुश्रुंगी पोलिस स्टेशन मध्ये त्याने दिलेल्या तक्रारीवरुन आता पोलिसांनी 4 जणांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 143, 147,
149, 323,504 यानुसार आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1959 च्या कलम 37(1) आणि 135
अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, "या विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने काही राजकीय कार्यकर्त्यांसोबत येऊन तक्रार दाखल केली आहे. आम्ही पुरावे तपासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतोय.”
पण पुणे विद्यापीठातली अशा प्रकारची ही पहिली घटना नसल्याचा दावा NSUI या विद्यार्थी
संघटनेकडून करण्यात येतो आहे.
NSUIचा सचिव अक्षय कांबळेने बीबीसी मराठीशी बोलताना यापूर्वीदेखील अनेक विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने त्यांच्या धर्मावरुन टार्गेट केलं जात असल्याचा दावा केला आहे. विशेषत: जी जोडपी आहेत त्यांना असे अनुभव आल्याचा त्याचा आरोप आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना अक्षय म्हणाला, "या प्रकरणात थेट धमकी देण्यात आली. पालकांना फोन करण्यात आला. मुलाला घेऊन जा असंही सांगण्यात आलं. तो घाबरला होता. मुंबईहून त्याचे नातेवाईक पोहोचल्यावर अखेर त्याने तक्रार दाखल केली. पण यापूर्वी देखील अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठात अशाच पद्धतीने टार्गेट करण्यात आले आहे. यातल्या काही प्रकरणांमध्ये आम्ही थेट हस्तक्षेप केला आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
हा प्रकार करणारे लोक हे विश्व हिंदू परिषदेशी संबंधित असल्याचा दावा आता करण्यात येतो आहे.
पण संबंधित मंडळी ही बाहेरूनच आली होती असंही आता सांगण्यात येत आहे. विद्यापीठात सक्रिय
असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी विद्यापीठ प्रशासनालाच
जबाबदार धरले आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना ABVPचा प्रदेश मंत्री शुभंकर बाचल म्हणाला, “ हा विद्यार्थी पुणे विद्यापीठात शिकायला असून त्याला संबंधित मुलीसोबत अनेकदा पाहिले आहे. तो काही संघटनांच्या रडारवर होता. त्या संघटनांनी हा प्रकार केला आहे. यात आमचा काही संबंध नाही. मात्र विद्यापीठाने या प्रकारांमध्ये अपेक्षित भूमिका घेतली नाही. यापूर्वी देखील जेव्हा कारवाईची मागणी केली जाते आहे तेव्हा कारवाई होत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. विद्यापीठ प्रशासन बोटचेपी भूमिका घेत असल्याने कॅम्पसमध्ये कायद्याचा धाक राहिला नाही.”
दरम्यान, या प्रकरणात विद्यापीठाने आता चौकशी समिती नेमली होती. त्यानंतर याच्या मुळाशी असा काही प्रकार नसल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना पुणे विद्यापाठीचे रजिस्ट्रार डॉ. विजय खरे म्हणाले, "आम्ही फॅक्ट फाइंडिंग
कमिटी नेमली. त्याचा रिपोर्ट आला. संबंधित मुलांची पूर्वी मारामारी झाली तेव्हा हा विद्यार्थी तिथे होता. त्याचा वचपा काढण्यासाठी हा प्रकार झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातला गेल्या वर्षभरातला हा पहिला प्रकार नाही. काही महिन्यांपूर्वी
विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांच्या वादातून मारामारीपर्यंत प्रकार गेला होता. यानंतर ललित कला केंद्रात नाटकावरुन झालेला वादही ताजा आहे.
यानंतर काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या उमेदवारी वरुन सुरु झालेला व्हॉट्स अपवरचा वाद थेट मारामारीपर्यंत गेला होता. त्यानंतर गेल्याच आठवड्यात कौशल्य विकास केंद्रातच मारामारी झाली होती. त्यापाठोपाठ हा प्रकार घडला आहे.
याविषयी बोलताना खरेंनी विद्यापीठाची सुरक्षा वाढवण्याचा आणि कोण येतंय जातंय याची तपासणी
करणार असल्याचा मानस असल्याचे स्पष्ट केलं आहे.











