पुणे व्हायरल व्हीडिओ : मुली नशेत आहेत दिसल्यावर मदत करणं महत्त्वाचं की व्हीडिओ व्हायरल करणं?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, PUNEET BARNALA/BBC

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, मुक्ता चैतन्य
    • Role, लेखिका

व्यसन कुणीही केलं तरी ते वाईटच. पण बाई ते करताना दिसली की समाज म्हणून आपण चवताळतो.

वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी गुटख्याचे तोबरे भरणारे मुलगे, रस्त्यात कुठेही दारु पिऊन पडलेले तरुण, गर्दुले...भकाभका सिगारेटी ओढणारे सर्व वयोगटातले पुरुष आपल्याला चालतात.

त्यांना व्यसनं करताना बघण्याची सवय आपल्याला लागलेली आहे. त्यांच्या व्यसनांशी जुळवून घेत कुटुंब म्हणून जगण्याची सवय आपल्याला लागलेली आहे किंवा असं म्हणूया की तेच अपेक्षित आहे.

पण समजा एखादी तरुणी कुठल्याशा टपरीच्या जवळ सिगारेट ओढताना दिसली, एखादी बाई एखाद्या हॉटेलात एकटीच दारू पीत जेवताना दिसली की समाज म्हणून आपण अशक्य अस्वस्थ होतो.

आपली संस्कृती बुडणार, आपली कुटुंब व्यवस्था रसातळाला जाणार, पार चिंधड्या उडणार इथपर्यंत आपण जाऊन पोचतो. पुन्हा या सगळ्याला स्त्री शिक्षण, स्त्रीचे आर्थिक सबलीकरण यांचा तडका असतोच.

‘पोरींना शिक्षणासाठी घराबाहेर ठेवलं आणि बघा त्या कशा वागतात? याचसाठी आईबाप कष्ट करतात का?’

‘मुली शिकल्या आणि जास्तच शहाणपणा करायला लागल्या.’

‘मुलींनी पैसे कमवायला सुरुवात केल्यामुळे हे सगळं घडतंय.’

- वगैरे संस्कारी चर्चा सुरु.

पोरगा सिगारेट, दारु, पुड्या रिचवतो तेव्हा नाही पडत हे प्रश्न. तेव्हा संस्कृती बुडतेय का, कुटुंब व्यवस्थेची लक्तरं होतायेत की नाही हे बघण्याची तसदीही कुणी घेत नाही.

वेताळ टेकडी, पुणे

फोटो स्रोत, bbc

फोटो कॅप्शन, वेताळ टेकडी, पुणे

हे लिहिण्याचं कारण पुण्यातल्या वेताळ टेकडीवर घडलेली घटना आणि त्यानंतर त्या घटनेतील मुलींचा व्हायरल झालेला व्हीडिओ वेताळ टेकडीवर नशेत असलेल्या मुलींचा व्हीडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला होता.

हा व्हीडिओ शेअर करताना त्या मुलींचे चेहरे ‘ब्लर’ केले गेले नाहीत. व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला.

सोशल मीडियावरून तो WhatsApp वरही वाऱ्यासारखा पसरला आणि त्यानंतर त्यावर ज्या प्रतिक्रिया यायला लागल्या त्या अत्यंत खेदजनक होत्या. मुळात इथे काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

मुलींऐवजी मुलगे असते तर?

समजा वेताळ टेकडीवर मुलींऐवजी मुलगे नशेत असते तर? असाच व्हीडिओ निघाला असता का? असाच व्हायरल झाला असता? अशी सगळ्यांनी संस्कारांची, कुटुंब व्यवस्थेची, लग्न व्यवस्थेची, नात्यांची काळजी करणाऱ्या पोस्ट्स आणि कॉमेंट्स केल्या असत्या का?

मुलींनी काहीही केलं की ते चटकन व्हायरल होतं कारण बाईच्या जगण्याकडे सगळ्यांचं बारीक लक्ष असतं.

मुलगे चुकतात तशाच मुलीही चुकू शकतात ही शक्यताच आपण लक्षात घेत नाही. व्हायरल झालेली प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठी व्हायरल होत नसते हेही अनेकांना जाणवत नाही. 'बघा या मुली' - हे सांगण्याची जी काही चढाओढ या प्रकरणाच्या निमित्ताने दिसली ती थकवणारी होती.

वेताळ टेकडी

फोटो स्रोत, bbc

मुली नशेत आहेत असं दिसल्यावर त्यांना तातडीने मदत मिळवून, त्या सुरक्षित होतील हे बघणं जास्त महत्वाचं होतं की व्हीडिओ व्हायरल करणं? नुसती मदत मिळवून देऊन थांबता येऊ शकत नाही का? जनजागरूकतेसाठी या प्रसंगाविषयी लिहिताना त्यांचा कुठलाही फोटो आणि व्हीडिओ टाळता येऊ शकला नसता का?

कुठे रस्त्यात अपघात झाला तरी मदत नंतर आणि फोटो आणि व्हीडिओ असं का? आपण कळत नकळत व्हायरल व्ह्यूजच्या, लाईक्स आणि कॉमेंट्सच्या प्रेमात इतके प्रचंड पडलेलो असतो की कशातून हे व्ह्यूज येतायेत, काय व्हायरल होतंय, त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचं भान सुटलंय का? खूप प्रश्न आहेत ज्यांचा विचार व्हायला हवा.

प्रायव्हसीचे काय?

कुणाच्या अपरोक्ष त्या व्यक्तीचे फोटो आणि व्हीडिओ काढणं, ते सोशल मीडियावर पोस्ट करणं. त्यात चेहरे ब्लर न करता समोरच्या व्यक्तीची ओळख खुली करणं यापैकी कुठलीही गोष्ट नैतिकतेला धरुन नाही. कायद्याच्या चौकटीतही गुन्हा आहे.

दारू पिऊन झिंगून पडण्याला आपण अनैतिक समजत असू तर एखाद्याचे त्याच्या परवानगी शिवाय फोटो आणि व्हीडिओ काढणंही तितकंच अनैतिक आहे हे समजून घेतलं पाहिजे. मुद्दा फक्त पुण्यात घडलेल्या घटनेचा नाहीये.

एरव्ही पण कुणाचेही फोटो आणि व्हीडिओ काढताना त्या व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे.

'शेरेन्टिंग' म्हणून एक प्रकार आहे, ज्यात पालक मुलांचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शेअर करतात. शेअरिंग आणि पेरेंटिंग या दोन शब्दांना मिळून 'शेरेन्टिंग' हा शब्द तयार झालेला आहे.

स्वतःच्या मुलांचे फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असताना सुद्धा तिथं मुलांची परवानगी घेणं आवश्यक आहे. कारण आपण मुलांचे डिजिटल फूटप्रिंट्स तयार करत असतो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, ANJARABENSTEIN/GETTY IMAGES

अशावेळी कुठले फोटो आणि व्हीडिओ सायबरच्या जगात म्हणजे इंटरनेटवर असले पाहिजे, कुठले नको हे ठरवण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे. इतर कुणालाही नाही.

पुण्याच्या केसमध्ये किंवा अशा कुठल्याही केसमध्ये जिथे दुसऱ्या व्यक्तीचे परस्पर फोटो-व्हीडिओ घेतले जातात, आपण त्या व्यक्तीचं डिजिटल फूटप्रिंट तयार केलेलं आहे.

इतर कुणाचं तरी डिजिटल फूटप्रिंट तयार करण्याचा अधिकार फोटो-व्हीडिओ काढणाऱ्याला कुणी दिला? इतरांच्या मुलांचे असे डिजिटल फूटप्रिंट्स तयार करणं नैतिकतेला धरुन आहे का? विचार होणं आवश्यक आहे.

एकदा ऑनलाईन, कायम ऑनलाईन

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डिजिटल फूटप्रिंट बरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा असा एखादा फोटो आणि व्हीडिओ शेअर करतो, त्यात चेहरा ब्लर करत नाही तेव्हा ती एक ‘डिजिटल आठवण’ तयार होते.

जी डिजिटल जगात कायम स्वरूपी साठवली जाते. वृत्तपत्रात, टीव्ही चॅनलवर जेव्हा असा एखादा चेहरा झळकतो, तो चेहरा त्या घटनेचा चेहरा बनून जातो. मग त्या संदर्भात भविष्यात कधीही कुठलीही घटना घडली की तेच चेहरे पुन्हा पुन्हा झळकायला लागतात.

डिजिटल जगाचा हा शाप आहे. इथे कुठलीही गोष्ट विसरून जाता येत नाही. आता विचार करा, पुण्याच्या घटनेत ज्या मुलींचे व्हिडीओ चेहरे ब्लर न करता वापरले गेले आहेत, त्याचा कोण कसा आणि किती वेळा वापर करेल यावर कुणाचे बंधन असू शकते का? भविष्यात पाच दहा वर्षांनी तो व्हिडीओ परत वर येऊन व्हायरल होणार नाही याची खात्री कुणी देऊ शकतं का?

मुली आणि नशा असा विषय निघेल तेव्हा माध्यमे तो व्हीडिओ, त्यातल्या क्लिप्स, त्याचे स्क्रीनशॉट्स लेखात, पुरवण्यांमध्ये, व्हीडिओ आणि रील्समध्ये वापरणार नाहीत याची गॅरंटी कुणी घेऊ शकतं का? मुलगा असो नाहीतर मुलगी, झाली असेल चूक, पण म्हणून त्याची शिक्षा त्यांनी आयुष्यभर भोगायची? का?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, getty images

कारण कुणाला तरी संस्कृती रक्षणाची उबळ आली होती, कुणाला तरी तमाम पालकांना जागं करून सोडायची इच्छा झाली? हे करताना आपण त्या मुलींचं आयुष्य पणाला लावतोय याचा साधा विचार मनात येऊ नये?

व्हीडिओ पहिल्यांदा टाकणाऱ्यांच्या मनात तर हा सगळा विचार आलाच नाही पण रिपोस्ट करणाऱ्या हजारो माणसांच्या मनातही तो येऊ नये? आपण किती प्रचंड प्रमाणात माध्यम अशिक्षित आहोत हेच यावरुन परत एकदा सिद्ध झालं आहे.

तुमचा हेतू काय आहे याला इथे महत्व नाहीये, कृती आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम काय आहेत हे बघणं अत्यावश्यक आहे. कृती आणि परिणाम यांचा परस्पर संबंध लक्षात न घेता एखादी गोष्ट करणं अविवेकी असतं. आणि मुलांच्या संदर्भात त्यांच्या फोटो व्हिडीओ त्यांच्या परवानगीशिवाय, अपरोक्ष काढणं, त्यांच्या प्राव्हसीचं उल्लंघन आहे आणि व्हायरल करणं अविवेकी आहे.

जाब नक्की कुणाला विचारताय?

या संपूर्ण विषयातला अजून एक महत्वाचा घटक म्हणजे, नशील्या पदार्थांची उपलब्धता. शाळकरी मुलांच्या बॅग्समध्ये गुटख्याची आणि सिगारेटची पाकिटं सापडतात, शाळा कॉलेजमधून व्हेपिंगचे प्रमाण प्रचंड आहे. झपाट्याने वाढते आहे. कुठल्याही शहरातल्या कुठल्याही नाक्यावर ड्रग्स सहज उपलब्ध होतात इतकी गंभीर परिस्थिती आपल्या समाजाची का झालीये याचा विचार करायला नको का?

मुलांना इतक्या सहजपणे हे सगळं उपलब्ध होतं याचा अर्थ त्यांच्या भवतालात हे सगळं सहज उपलब्ध आहे आणि त्यावर अंकुश ठेवण्यात प्रशासन आणि पोलीस कमालीचे कमी पडतायेत. ड्रग्स, सिगारेट, दारू, गुटखा, पॉर्न, गेमिंग, ऑनलाईन जुगार, सोशल मीडिया...व्यसनं वाढत चालली आहेत. सगळी मुलं यात अडकतील असं नाहीये, पण त्यांना या सगळ्याचं सहज एक्सपोजर त्यांच्या परिसरात आहे हेच काळजी करावं इतपत गंभीर नाहीये का?

चेन स्मोकर, रोज दारू नाहीतर गुटखा खाणारे पालक, सतत WhatsApp बघण्यात मश्गूल असलेले आजी आजोबा, OTT वर सतत काहीतरी बघत बसलेले, सतत सोशल मीडियावर असणारे मोठे...ड्रग्स ते सोशल मीडिया मुलांना दिसतंय काय? त्यांच्या वर्तनाबद्दल बोलताना एकदा मोठ्यांनी स्वतःकडे बघायला नको का?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, getty images

मुलांपर्यंत दारू, सिगारेट, ड्रग्ज या गोष्टी पोचणार नाहीत, यासाठी आपण काय करतोय हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. मुलांनी या गोष्टी केल्या तर त्यांना जाब विचारण्याआधी, त्यांना सहज उपलब्धता कशी काय होते हा प्रश्न उपस्थित करायला नको का? या गोष्टींवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांना जाब विचारायला नको का?

विविध वयोगटातल्या मुलांपर्यंत अमली पदार्थ पोचणार नाहीत हे बघणं मोठ्यांची जबाबदारी आहे, मुलांची नाही! आणि याबाबत मोठ्यांचं जग प्रचंड अपयशी ठरलेलं आहे.

स्वतःचं अपयश झाकण्यासाठी मुलं कशी बिघडलेली आहेत, कशी दारु पितात, सिगरेटी फुंकतात, काही संस्कार राहिलेले नाहीत वैगरेंच्या चर्चांना ऊत येतो.

मुलामुलींच्या माथी त्या सगळ्याचं खापर फुटतं आणि पालक पुन्हा त्यांच्या सिगारेटचे झुरके घ्यायला, गुटख्याच्या पुड्या गालफडात कोंबायला मोकळ्या हवेत जातात.

आजीआजोबा सगळं ग्यान वाटप झाल्यावर whatsapp विद्यापीठात शिरतात आणि अमली पदार्थांची नशा न करणारे मोठे डिजिटल ड्रॅगची सुई टोचून घेऊन स्वतःत मश्गुल होतात. आपली मुलं या अशा भवतालात वावरत आहेत. वाढत आहेत आणि हेच फक्त सत्य आहे.

(मुक्ता चैतन्य या 'सायबर मैत्र' या संस्थेच्या संस्थापिका आहेत.)