You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात बँक खात्यांमध्ये वारसांनी न घेतलेले 75,000 कोटींहून जास्त पैसे, ते कसे काढायचे? जाणून घ्या
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
तुमच्या एखाद्या जुन्या बँक खात्यात असलेले पैसे तुम्ही विसरलायत का?
हे विचारण्याचं कारण म्हणजे अशा ठेवींचे पैसे ठेवीदारांना परत मिळावेत यासाठी आरबीआयने मोहीम सुरू केलीय.
भारतामध्ये अशी लाखो खाती आहेत, ज्यांमधले पैसे ठेवीदारांनी वा त्यांच्या वारसांनी घेतलेले नाहीत. कोणत्या ठेवींना अनक्लेम्ड डिपॉझिट्स म्हटलं जातं?
एखादं खातं तुम्ही बराच काळ वापरलं नाहीत, तर त्यातल्या पैशांचं काय होतं? आणि ते पैसे परत कसे मिळवायचे? जाणून घेऊयात.
बँकेतलं तुमचं खातं तुम्ही साधारणपणे 2 वर्षं वापरलं नाही, तर त्याला Dormant Account म्हटलं जातं. यापुढे 2 - 10 वर्षं खातं तसंच पडून राहिलं, तर त्याला निष्क्रिय खातं - inoperative account म्हणतात.
बँकांमधले जे बचत म्हणजे Savings Account वा Current Accounts 10 वर्षांपर्यंत ऑपरेट केले जात नाहीत किंवा ज्या मुदत ठेवी (Term Deposits) त्यांच्या मॅच्युरिटीच्या तारखेनंतरच्या पुढच्या 10 वर्षांमध्ये क्लेम केल्या जात नाहीत - त्यांना Unclaimed Deposits जाहीर केलं जातं.
अशा सगळ्या खात्यांमधला - ठेवींमधला निधी बँका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या Depositor Education and Awareness Fund (DEA) ला ट्रान्सफर करतात. ऑगस्ट 2025 पर्यंत बँकांनी 75,000 कोटींपेक्षा जास्त अनक्लेम्ड डिपॉझिट्सचे पैसे रिझर्व्ह बँकच्या या फंडात ट्रान्सफर केले आहेत.
पण मग या DEA मध्ये पैसे ट्रान्सफर झाले, म्हणजे तुमचे पैसे गेले का? तर तसं नाही. ठेवीदारांना हे पैसे मिळवता येतात.
अनेकदा एखादं सेव्हिंग्स किंवा करंट अकाऊंट वापरणं बंद झालं किंवा मुदत पूर्ण झालेली FD क्लेम करायची राहिली तर पैसे असेच राहतात. अनेक प्रकरणांमध्ये कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर घरच्यांना बँक खात्याबद्दल, ठेवीबद्दल माहिती नसेल तरीही असं होऊ शकतं.
बँक खातेदार, ठेवीदार स्वतः अशा दावा न केलेल्या ठेवींचे पैसे परत मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. किंवा निधन झालेल्या ठेवीदारांचे नॉमिनीज किंवा कायदेशीर वारसही ही प्रक्रिया करू शकतात.
यासाठी रिझर्व्ह बँकेने उद्गम - UDGAM - Unclaimed Deposits - Gateway to Accelerated Information नावाचं पोर्टल ऑगस्ट 2023 मध्ये सुरू केलंय.
देशातल्या खासगी आणि सरकारी अशा 30 बँका या पोर्टलवर आहेत. त्यांची यादीही तुम्ही होमपेजवरच पाहू शकता. देशातल्या एकूण अनक्लेम्ड डिपॉझिट्सपैकी 90% या बँकांमध्येच असल्याचं RBI ने म्हटलंय. या एका प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करून तुम्ही तुमची अनक्लेम्ड डिपॉझिट्स शोधू शकता.
UDGAM पोर्टलवर अगदी पहिल्यांदा तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर देऊन लॉगिन तयार करावं लागेल. त्यानंतर पासवर्ड आणि मोबाईलवर येणाऱ्या OTP च्या मदतीने तुम्ही लॉगिन करू शकता.
यानंतर येणाऱ्या सर्च पोर्टलमध्ये Individual कॅटेगरी निवडून खातेधारकाचं, बँकेचं नाव टाकून तुम्हाला ठेवी शोधता येतील.
इथे तुम्हाला ठेवींचे तपशील मिळतील. ते घेऊन तुम्हाला तुमच्या त्या बँकेकडे जायचं आहे. बँकेत जाताना KYC साठी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, NREGA कार्ड आदि. सोबत असायला हवेत.
त्यानंतर, तुम्हाला बँकेला अर्ज द्यावा लागेल जो तुमच्या बँकेच्या वेबसाईटवरूनही डाऊनलोड करता येईल, शिवाय Address proof, लेटेस्ट फोटो या गोष्टीही व्हेरिफिकेशनसाठी लागेल.
जर तुम्ही कायदेशीर वारस वा नॉमिनी म्हणून क्लेम करणार असाल, तर तुम्हाला ते सिद्ध करणारी कागदपत्रं बँकेला द्यावी लागतील.
हा क्लेम दाखल केलात, त्याची पडताळणी झाली की त्यानंतर बँक तुम्हाला तुमच्या ठेवीचे पैसे व्याजासकट परत करेल.
बरं मग साधारण किती काळात तुम्ही तुमचे पैसे क्लेम करायला हवेत, असा काही नियम आहे का - तर नाही. तुम्हाला ज्यावेळी लक्षात येईल, तेव्हा पैसे क्लेम करा असं रिझर्व्ह बँक म्हणतेय.
डिसेंबर 2025 अखेरपर्यंत यासाठी RBI कडून विशेष शिबिरांचं आयोजनही केलं जातंय. पण त्यानंतरही तुम्ही तुमच्या अनक्लेम्ड डिपॉझिट्सचे पैसे परत मिळवू शकता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)