'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

अभिनेत्री प्रिया मराठे हिची कर्करोगाविरोधातली झुंज अपयशी ठरली आहे. अवघ्या 38 व्या वर्षी प्रियाचं निधन झालं आहे. नाटकात तसंच टिव्हीवरील अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये प्रियानं काम केलं होतं.

'चार दिवस सासूचे', 'या सुखांनो या', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', अशा मालिकांत तिनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. 'तुझेच मी गीत गात आहे' ही तिची अखेरची मालिका तर 'अ परफेक्ट मर्डर' हे शेवटचं नाटक ठरलं.

प्रियाला आदरांजली वाहताना अभिनेता सुबोध भावेनी प्रिया त्याची बहीण असल्याचं म्हटलं आहे. प्रियाची परिश्रम घेण्याची तयारी आणि कामावरची तिची श्रद्धा या दोन गोष्टी कौतुकास्पद होत्या असं सुबोध भावेनी म्हटले आहे.

सुबोध भावे म्हणतो, "या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सर च निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली.पण त्या कॅन्सर ने काही तिची पाठ सोडली नाही."

'तू भेटशी नव्याने' या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता. "माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली. तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना," अशा शब्दात सुबोध भावेनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

अभिनेत्री हेमांगी कवी धुमाल यांनी म्हटलं आहे की 'वाटलं होतं बरी होशील..प्रिया.'

हेमांगी यांनी फेसबुक पोस्टवर आदरांजली वाहताना म्हटलं की, दुःख पचवण्याची ताकद मिळावी हे प्रियाच्या कुटुंबीयांना कसं बोलणार?

पुढे हेमांगी म्हणतात, प्रिया अत्यंत गोड, अतिशय सुंदर आणि तितकीच लाघवी होती. जेव्हा ती पडद्यावर यायची तेव्हा तिचं असणं जाणवायचं, आजूबाजूला काही असलं तरी काही फरक पडत नसे.

कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)