You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेली 'अँटी एजिंग ट्रिटमेंट' काय असते?
वयाच्या फक्त 42 व्या वर्षी अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
त्यांच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की शेफाली जरीवाला अँटी-एजिंग गोळ्यांसह इतरही औषधं घेत होत्या. बहुधा या गोळ्या उपाशीपोटी घेतल्यामुळे त्यांचा रक्तदाब अचानक कमी झाला होता.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं एका पोलीस अधिकाऱ्याचा संदर्भ देत म्हटलं आहे की 27 जूनच्या दुपारी शेफाली यांनी एक इंजेक्शन घेतलं होतं. ते इंजेक्शन बहुधा अँटी-एजिंग ट्रिटमेंटशी संबंधित होतं.
पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, "त्यांचा रक्तदाब वेगानं खाली आला आणि त्या थरथरू लागल्या , कंप जाणवू लागला. त्यानंतर शेफाली यांच्या कुटुंबीयांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं."
शेफाली जरीवाला यांना 27 जूनच्या रात्री अंधेरीतील बेलेव्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
रात्री एक वाजता पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी (पोस्ट मॉर्टम) कूपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "अंबोली पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात शेफाली यांचे पती आणि आई-वडिलांसह त्यांच्या घरात काम करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. हे सर्वजण त्यावेळेस घरातच होते."
"अर्थात आतापर्यंत कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही. तपासाचा भाग म्हणून पोलिसांची एक टीम फॉरेन्सिक तज्ज्ञांसह त्यांच्या घरी गेली होती आणि त्यांनी अनेक गोष्टींचे नमुने गोळा केले आहेत. यात शेफाली यांची औषधं आणि इंजेक्शनचाही समावेश आहे."
शेफाली जरीवाला यांच्या मृत्यूनंतर, वयानुसार शरीरात होणारे बदल किंवा वृद्धत्वाकडील वाटचाल थांबवणाऱ्या, अँटी एजिंग ट्रिटमेंटचे कोणकोणते धोके असतात, याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री काय म्हणाल्या?
शेफाली जरीवाला यांच्या मृत्यूनंतर अभिनेत्री मल्लिका शेरावत यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी चाहत्यांना एक 'निरोगी जीवनशैली'चा अवलंब करण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्या म्हणाल्या, "मी कोणताही फिल्टर वापरलेला नाही, कोणताही मेकअप केलेला नाही. इतकंच काय, केस देखील विंचरलेले नाहीत. मी तुम्हा सर्वांना हा व्हीडिओ शेअर करते आहे."
"कारण, आपण सर्वांनी एकत्रपणे बोटॉक्स, आर्टिफिशियल कॉस्मेटिक फिलर्सचा वापर करू नये आणि एक चांगली निरोगी जीवनशैली अवलंबली पाहिजे."
तर अभिनेत्री करीना कपूरनंदेखील एका मुलाखतीत सांगितलं की 'मी बोटॉक्सच्या विरोधात आहे.'
अर्थात, करीना फक्त वाढत्या वयामुळे अभिनेत्रींसमोरी आव्हानांमध्ये वाढ होते, याबद्दल बोलत होती. करीनाला विचारण्यात आलं की तीसुद्धा सुरकुत्या, वय वाढण्यास घाबरते का?
त्यावर करीनानं उत्तर दिलं, "मी बोटॉक्सच्या विरोधात आहे. मात्र आपण स्वत:ची काळजी घेतली पाहिजे या मताची मी आहे. त्याचा अर्थ निरोगी राहणं, छान वाटणं आणि नॅचरल थेरेपी. ते स्वत:चं आणि माझ्या प्रतिभेचं रक्षण करण्याबद्दल देखील आहे. कारण तेच माझं शस्त्रं आहे."
"याचा अर्थ, तुम्ही सुट्ट्या घ्याव्या, कुटुंब आणि मित्रांबरोबर वेळ घालवावा. सेटवर करता त्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं. इंजेक्शन आणि शस्त्रक्रियेमध्ये गुंतून पडू नये."
या दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या वक्तव्यात शेफाली जरीवाला यांचा उल्लेख केला नाही. मात्र शेफाली यांच्या मृत्यूनंतर या दोन अभिनेत्रींची वक्तव्यं आलेली असल्यामुळे, त्याला याच मुद्द्याशी जोडून पाहिलं जातं आहे.
अँटी एजिंग ट्रिटमेंट काय असते?
जसजसं आपलं वय वाढतं, तसतसं चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा देखील दिसू लागतात. चेहऱ्याची त्वचा देखील हळूहळू ढिली होऊ लागते, लोंबायला लागते. मात्र हे रोखण्यासाठी हल्ली कॉस्मेटिक सर्जरी, इंजेक्टेबल फिलर्स, बोटॉक्स इत्यादींचा वापर वाढला आहे.
अँटी एजिंग ट्रिटमेंट...काही औषधांमध्ये औषधी घटकाबरोबर काही अशा संयुगांचं मिश्रण असतं की ज्यामुळे वय वाढल्यामुळे होणाऱ्या परिणामाचा वेग कमी करण्यास मदत होते.
या सर्वांमध्ये बोटॉक्स हे सर्वाधिक प्रचलित आहे. ते एक पॉवरफुल इंजेक्शन असतं. ते आपल्या स्नायूंना फार छोट्या भागात शिथिल करतं. कपाळावरील आठ्या किंवा डोळ्यांजवळ दिसणाऱ्या रेषा किंवा सुरकुत्या, नाकाजवळ दिसणाऱ्या रेषा कमी करण्यासाठी बोटॉक्सचा वापर केला जाऊ शकतो.
फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशननं (एफडीए) 20 वर्षांहून अधिक काळापूर्वी कॉस्मेटिक प्रक्रियांमध्ये याचा वापर करण्यास मंजूरी दिली होती.
डॉक्टर देबराज शोम, द ॲस्थेटिक क्लिनिक्सचे सीनियर कॉस्मेटिक सर्जन आहेत.
डॉक्टर शोम यांनी द लल्लनटॉप या हिंदी न्यूज वेबसाईटला सांगितलं की डर्मल फिलर्स इंजेक्शन असतात. ती त्वचेच्या आत दिली जातात. आपल्या त्वचेच्या पेशी ज्या घटकापासून बनलेल्या असतात त्याच घटकापासून हे बनलेले असतात.
त्यांनी सांगितलं की वय वाढत गेल्यावर त्वचेमधील कोलेजनचं प्रमाण कमी होऊ लागतं. मात्र फिलर्सच्या मदतीनं त्वचेमध्ये कोलेजन पुन्हा टाकलं जातं. त्यामुळे चेहरा तरुण, टवटवीत दिसू लागतो.
तर अँटी एजिंगसाठी अनेकजण ग्लूटाथियोन इंजेक्शनचा देखील वापर करतात. हे एक अँटीऑक्सिडंट असतं. ते आपल्या शरीरातील पेशींची झालेली हानी किंवा झीज रोखण्याचं काम करतं. बहुतांशवेळा ग्लूटाथियोन इंट्राव्हेनस इंजेक्शन आणि गोळ्यांद्वारे घेतलं जातं.
डॉक्टर अंजू झा, कैलाश हॉस्पिटलच्या डर्मेटोलॉजी विभागातील सीनियर कन्सल्टंट आहेत.
डॉक्टर अंजू झा सांगतात, "आपल्या शरीरात ग्लूटाथियोन आधीपासूनच असतं. मात्र वाढत्या वयाबरोबर शरीरात ग्लूटाथियोनची निर्मिती कमी प्रमाणात होऊ लागते. त्यामुळे ते बाहेरून घेतलं जातं. असंही मानलं जातं की ग्लूटाथियोन घेणाऱ्यांच्या त्वचेचा रंग थोडा उजळतो."
"इंट्राव्हेनस ग्लूटाथियोन घेतल्यास त्याचे अधिक फायदे होत असल्याचं मानलं जातं. मात्र याचे दुष्परिणाम देखील होतात. याला एफडीएची मंजूरी नाही."
हे उपचार किती सुरक्षित असतात?
या फिलर्स किंवा ग्लूटाथियोन इंजेक्शनमुळे एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो का?
डॉक्टर ऋषि पराशर, दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये डर्मेटोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत.
द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना डॉक्टर पराशर म्हणाले, "एखाद-दुसरा अपवाद वगळता, याप्रकारचे इंजेक्शन सुरक्षित असल्याचं आतापर्यंत आढळून आलं आहे. मात्र यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हे इंजेक्शन नोंदणीकृत डर्मेटोलॉजिस्टच्या देखरेखीखाली घेतले पाहिजेत."
याच बातमी असंही म्हटलं आहे की यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शननं (सीडीसी) एप्रिल 2024 मध्ये एक इशारा देत म्हटलं होतं की 25 ते 59 वर्षे वयाच्या 22 महिलांमध्ये बोटॉक्सच्या हानिकारक रिॲक्शन आढळून आल्या आहेत. त्यानंतर बोटॉक्सच्या धोक्यांवरील चर्चा वाढली होती.
यातील 11 महिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. सहा महिलांच्या बाबतीत, बोटॉक्सद्वारे देण्यात आलेले टॉक्सिन्स शरीरात पसरून नर्व्हस सिस्टम म्हणजे मज्जासंस्थेपर्यंत पोहोचले होते. अशा परिस्थितीत मृत्यूदेखील होऊ शकतो.
यावर डॉक्टर पराशर म्हणाले, "या सर्व महिलांनी विनापरवाना किंवा प्रशिक्षित नसलेल्या लोकांकडून अशा ठिकाणी इंजेक्शन घेतलं होतं, जे हेल्थकेअर सेंटरदेखील नव्हतं."
या औषधांमुळे असणाऱ्या धोक्यांबद्दल डॉक्टर अंजू झा म्हणतात, "ग्लूटाथियोनचे काही दुष्परिणाम असल्याचं दिसून आल्यामुळे एफडीएनं याला मंजूरी दिलेली नाही. यामुळे काही रुग्णांना अॅनाफालॅक्सिस होऊ शकतं."
"इंजेक्टेबल औषधांनी स्टीव्हन जॉनसन सारखे आजार होऊ शकतात. हे आजार औषधांची रिॲक्शन झाल्यामुळे होतात. यात मृत्यू होण्याचाही धोका असतो. मात्र हे खूपच दुर्मिळ असतं."
त्या म्हणतात की, जे लोक स्किन लाइटनिंग करण्यासाठी किंवा त्चचा गोरी होण्यासाठी या औषधांचा वापर करतात, त्यांच्यावर याचा परिणाम तोपर्यंतच होतो, जोपर्यंत ते औषधं घेत असतात. याचा परिणाम कायमस्वरुपी राहत नाही.
डॉक्टर अंजू म्हणतात, "तुम्ही किती प्रमाणात औषधं घेत आहात, तुम्ही ती घ्यायला हवीत की नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला आधीच काही समस्या किंवा त्रास असल्यास या औषधांमुळे तो आणखी वाढू शकतो. या सर्व गोष्टींसाठी चांगल्या डर्मेटोलॉजिस्टचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे."
डॉक्टर अंजू पुढे म्हणतात, "या औषधांमुळे ह्रदयविकाराचा झटका येऊ शकत नाही. मात्र अनेकवेळा जास्त प्रमाणात डोस घेतल्यामुळे त्याचा यकृत, मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. अशाप्रकारचे अप्रत्यक्ष दुष्परिणाम होऊ शकतात."
"त्यामुळेच, कोणत्या स्नायूत इंजेक्शन द्यायचं आहे आणि ते किती प्रमाणात द्यायचं आहे, हे माहित असलेल्या तज्ज्ञांनीच हा उपचार करणं आवश्यक असतं."
"याचा वापर स्वत:हून करू नये, एखाद्या पार्लरमध्ये करू नये, अगदी ज्या डॉक्टरला याबद्दल माहिती नसेल त्यांच्याकडून देखील हा उपचार करून घेऊ नये."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन