'दिवस संपतो पण काम सुरुच राहतं', महिलांचे दिवसातले 5 तास जातात घरकामात, असा होतो परिणाम

    • Author, शताली शेडमाके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"माझ्या लग्नाला 5 वर्षं झालीत, तेव्हापासून आजपर्यंतचा असा एकही दिवस आठवत नाही ज्यादिवशी मी निवांत बसले असेन. काम कधी संपतच नाही, पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत दगदग सुरुच असते. प्रचंड थकवा येतो पण नाईलाज आहे."

कोल्हापूरच्या श्वेता (बदललेलं नाव) त्यांचा अनुभव सांगत होत्या.

श्वेता शासकीय सेवेत अधिकारी आहेत. सात वर्षांपूर्वी त्या शासकीय सेवेत रुजू झाल्या. स्वत:च्या पायावर उभं होऊन आयुष्याची नवी पहाट पहाणाऱ्या श्वेता यांचं आयुष्य लग्नानंतर पार बदलून गेलंय.

दररोज सकाळी उठून आवराआवर करा, मग नाश्ता-जेवणाची तयारी, नवऱ्याचा आणि आपला डबा भरुन ऑफिसकडे धावत सुटायंच.

संध्याकाळी साडेसहा-सातपर्यंत घरी आल्यावर पुन्हा स्वयंपाकाला लागायंच. सर्वांची जेवणं उरकल्यावर सर्व आवरुन ठेवायंच, यात रात्रीचे 10-11 वाजतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा हेच रुटीन. यात दोन वर्षांआधी मुल झाल्यानंतर जबाबदारी आणखी वाढल्याचं श्वेता सांगत होत्या.

पण फक्त श्वेता यांचं नव्हे तर अनेक महिलांची स्थिती अशीच असल्याचं पाहायला मिळतं. पहाटे उठून दिवसभर राबायचं यातच तिचा संपूर्ण वेळ जातो. स्वत:साठीचा वेळ कसा काढावा याचा विचार करायलाही वेळ मिळत नाही, अशी भावना बहुतांश महिलांनी व्यक्त केली.

कोणत्या कामात आपला किती वेळ खर्च होतो, यावर नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त वेळ बिनपगारी घरगुती कामे करावी लागतात, असे दिसून आले आहे.

केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MOSPI) वेळेच्या वापराबाबत केलेल्या सर्वेक्षणातील (Time Use Survey) आकडेवारीनुसार महिलांचे दिवसातील साधारण 5 तास घरकामात जातात. तर, पुरुष दररोज फक्त 88 मिनिटे घरकामात घालवतात.

घरातील कामे जसं की स्वयंपाक, मुलांची तयारी, अभ्यास, कुटुंबीयांची/घरातील ज्येष्ठांची काळजी, स्वच्छता, इत्यादी कामे महिलांना करावी लागतात.

महिलांना त्यासाठी आर्थिक मोबदला मिळत नाही, त्याला विनामोबदल्याचं काम किंवा अनपेड वर्क असं म्हणतात.

टीयूएसचं सर्वेक्षण काय सांगतं?

केंद्रीय सांख्यिकी तसेच कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 2024 (जानेवारी-डिसेंबर) साली टीयूएस म्हणजे भारतीयांच्या वेळेच्या वापराबाबत सर्वेक्षण केलं.

सर्वेक्षणात सहा वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील अशा एकूण 4 लाख 54 हजार 192 लोकांनी सहभाग घेतला. त्यांना विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांच्या आधारे सदर माहिती संकलित करण्यात आली.

'टीयूएस'च्या आकडेवारीनुसार महिला दररोज घरकामात 4 तास 49 (289) मिनिटे) घालवतात. तर, पुरुष घरकामात फक्त 88 मिनिटे देतात. म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत महिला 3 तास 21 मिनिटे घरकामासाठी जास्त देतात.

त्यात कुटुंबाची काळजी घेण्यासाठी महिला दिवसातील जवळपास 137 मिनिटे देतात तर पुरुष फक्त 75 मिनिटे देतात. 15 ते 59 वयोगटातील महिलांचा या प्रकारच्या विनावेतन कामात सर्वाधिक वाटा आहे.

ही आकडेवारी मोबदला न मिळणाऱ्या कामाची आहे.

महिलांचं लग्नाआधी आणि लग्नानंतरचं आयुष्य बघितल्यास त्यात पुरुषांच्या तुलनेत बराच बदल दिसून येतो.

लग्नानंतर कुटुंबातील सदस्यांच्या जबाबदाऱ्या, काळजीचा भार पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या खांद्यावर जास्त लादला जातो, असं या आकडेवारीतून दिसून येतं.

'दिवस संपतो पण काम नाही'

आज बऱ्याच नोकरदार महिलांचं आयुष्य श्वेता यांच्यासारखंच झालंय. ऑफिसमधलं आठ ते नऊ तासांचं काम आटोपत घरी परतून पुन्हा घरकामाला लागायचं. यात त्यांच्या आवडीनिवडी, स्वत:साठीचा वेळ, आरोग्याची काळजी सगळं मागे पडत जातं.

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या जयंती त्यांचा अनुभव सांगताना म्हणाल्या की, "मला दोन मुलं आहेत. मी दररोज पहाटे पाच-साडेपाच दरम्यान उठते. त्यानंतर आवरुन सहापर्यंत किचनमध्ये जाऊन नाश्ता आणि डब्याची तयारी करावी लागते. त्यानंतर मुलांना स्कूलबसमध्ये बसवून मग आपली तयारी करा. या सर्वात दोन-अडीच तास जातात. त्यानंतर ऑफिसची वेळ असते.

सध्या माझं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे बरेचदा ऑफिसच्या मिटींग आणि घरातील कामांचं नियोजन करताना धावपळ होते. संध्याकाळी ऑफिसनंतर मग पुन्हा मुलांचा अभ्यास त्यानंतर स्वयंपाक मग रात्रीचं जेवण करून आवराआवर करतपर्यंत रात्रीचे साडेदहा वाजतात. प्रचंड थकवा येतो."

जयंती पुढे म्हणाल्या, "मुलं लहान होती तेव्हा जास्त त्रास होता. तेव्हा कामही घरुन नव्हतं. त्यामुळे ऑफिसला येण्या-जाण्यात दोन तास जायचे. घर, ऑफिस अशी तारेवरची करसत होती.

सुट्टीच्या दिवशी आराम करावा म्हटलं तर जी उर्वरित कामे असायची ती करावी लागायची. बऱ्याचदा मनात नोकरी सोडण्याचा विचार आला कारण मुलं, घर आणि ऑफिस यात वेळ कसा निघून जायचा कळतचं नव्हतं. तब्येतीवरही बराच परिणाम झाला होता."

"आता मुलं जरा मोठी झालीत, आणि माझंही वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने कामातून थोडा वेळ मिळतो. पण, माझ्यासारख्या अनेक महिला ज्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची स्थितीही सारखीच आहे," असं जयंती सांगत होत्या.

कामाच्या वाढत्या ताणाबाबत बोलताना श्वेता म्हणाल्या की, "फक्त स्वयंपाकच तर करायचाय त्यात काय एवढं, असं जेव्हा घरातील लोकं बोलून दाखवतात तेव्हा आणखी वाईट वाटतं. आपल्या कामाची दखल नाही, कौतुकाचे दोन शब्दही नाही.

या घरकामाचं कोणतंही मोल आम्हाला मिळत नाही. शिवाय मी शासकीय पदावर नोकरी करत असूनही माझ्या पगारावर माझा पूर्ण अधिकार नाही. मी कमावलेल्या पैशांचं नियोजनही माझे पतीच करतात."

या कामाचं ओझं आयुष्यभर महिलांच्याच खांद्यावरून का वाहिलं जातं? असा प्रश्नही श्वेता यांनी बोलताना उपस्थित केला.

कोणत्या कामात सरासरी किती वेळ खर्च होतो?

महिलांचा बराच वेळ घरकाम, कुटुंबीयांवर खर्च होत असेल तर पुरुषांचा वेळ कसा आणि कुठे खर्च होतो?

तर, पुरुष रोजगार आणि संबंधित कामावर महिलांपेक्षा जवळपास 132 मिनिटे जास्त वेळ खर्च करतात.

म्हणजे जर दिवसभरात महिला कामासाठी साधारणपणे 341 मिनिटं देत असतील तर पुरुष 473 मिनिटे खर्च करतात.

याशिवाय स्वयंसेवा, प्रशिक्षणासारखी कामे ज्यात पगाराव्यतिरिक्त मानधन किंवा मोबदला मिळेल अशा कामांमध्ये पुरुष दररोज जवळपास 139 घालवतात तर महिला 108 मिनिटे घालवतात.

2019 च्या आकडेवारीनुसार महिला दररोज 333 मिनिटे ऑफिसच्या कामासाठी देत होत्या तर पुरुष 459 मिनिटे घालवत होते.

परंतु, 2024 मध्ये ऑफिसच्या वेळेत वाढ होऊन महिलांचा कामासाठीचा वेळ 341 मिनिटे तर पुरुषांचा वेळ वाढून 473 मिनिटे झालाय.

शहरी विरुद्ध ग्रामीण भागातील महिलांची स्थिती

या सर्वेक्षणात शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या वेळेच्या वापराविषयीची माहिती संकलित करण्यात आली.

त्यानुसार, शहरी महिला अभ्यास, शिक्षण, सामाजिकता आणि मनोरंजन यावर जास्त वेळ घालवतात. तर ग्रामीण भागातील महिलांचा जास्त वेळ कोणत्या ना कोणत्या कामातच जास्त खर्च होतो.

तर, शहरातील महिलांच्या तुलनेत ग्रामीण महिलांचा जास्त वेळ दैनंदिन घरघुती कामांमध्ये जातो.

मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम

याबाबत बोलताना मानसशास्त्रज्ञ आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम संस्थेचे समुपदेशन विभागप्रमुख डॉ. स्वप्निल पांगे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला.

"कामाच्या ताणाचा महिलांच्या शरीरासह मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. एखादी महिला आजारी जरी असेल तरी तब्येतीकडे दुर्लक्ष करून ती पहाटे उठून मुलांचा शाळेचा डबा तयार करून त्यांची तयारी करते. ही आपली जबाबदारी आहे, अशी त्यामागची भावना असते.

पण, असं करताना आपल्या आरोग्याकडे आपणंच कानाडोळा करतोय, याकडे तिचं दुर्लक्ष होतं. हे करत असताना घरच्यांकडून कामातील चुका काढणं, दखल न घेणं किंवा कामाचं कौतुक होत नसेल, हवा तसा प्रतिसाद, मोबदला मिळत नसेल तर त्यातून घुसमट होऊन नैराश्यही येऊ शकतं."

डॉ. पांगे पुढे म्हणाले की, "बऱ्याचदा स्त्रिया हे माझं कर्तव्य आहे. मी हे केलं नाही तर लोकं काय म्हणतील, कुटुंबीय काय म्हणतील या भावनेतूनही स्वत:वर कामाचं अतिरिक्त ओझं लादून घेतात. हे दीर्घकाळ सुरू राहिलं तर त्याचा मानसिक आरोग्यासह हार्मोन्सवरही परिणाम होतो.

परिणामी आरोग्याचं चक्र ढासळू लागतं. शारीरिक आणि मानसिक चक्र फार गुंतागुंतीचं आहे, यातील एकाचं संतुलन बिघडलं की, त्याचा तसा परिणामही दिसू लागतो.

यावर उपाय काय? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. पांगे म्हणाले, "कामातील सहभाग आणि संतुलन हे दोन महत्वाचे भाग आहेत. कुटुंबीयांसह मिळून घरातील कामाची विभागणी करुन घ्यायला हवी, आवश्यक असल्यास मदतनीसदेखील ठेवता येईल.

दडपण, नैराश्याची चिन्हं वेळीच ओळखायला हवी. त्यासाठी कुटुंबीयांशी संवाद साधता येईल, आणि व्यक्त होणं कठीण वाटत असेल तर मानसोपचातज्ज्ञाची मदत घ्यायला हवी. आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी योग्य खबरदारी घेणं महत्वाचं आहे."

पुरुषांना 100 टक्के बदलण्याची गरज

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा याबाबत म्हणाल्या की, "स्त्री काही मशीन नसते. तिलाही थकवा येतो. तिच्या कामाचंही मोल आहे, त्याची दखल घेतली गेली पाहिजे.

यासह हाऊसवाईफ ही संकल्पना बदलण्याचीही गरज आहे. ती होममेकर आहे, गुड मॅनेजर आहे त्यामुळे हाऊसवाईफ ऐवजी होममेकर, गुड मॅनेजर ही संकल्पना रुजवायला हवी.

पुढे त्या म्हणाल्या, "मुळात घर हे सगळ्यांचं मिळून असतं. त्यात स्त्री-पुरुष दोघंही राहतात, त्यामुळे घरकामाची जबाबदारीही दोघांची असायला हवी. त्यात समतोल हवा, पण तसं होताना दिसत नाही.

घरकाम तिचं आणि बाहेरून कमावुन आणायची जबाबदारी त्याची, असा समज आहे. पण अशी विभागणी केली कुणी? आता तर दोघंही कमावतात, त्यामुळे घरकामातील काही हिस्सा पुरुषानेही उचलायला हवा."

काळासह सामाजिक मानसिकताही बदलायला हवी, असं मतही खिंवसरा यांनी मांडलं. महिलांना थोडंफार बदलण्याची गरज आहे आणि पुरुषांना 100 टक्के बदलण्याची गरज आहे. पुरुषांनाही घरकामात हातभार लावायची सवय लावण्याची गरज आहे", असं त्या म्हणाल्या.

'कामात समानता हवी'

डॉ. दीपिका सिंह या महिला व बालविकास विभागाशी निगडीत स्वयंसेवी संस्थेत प्रोग्राम कोऑर्डिनेटर आहेत. त्या सांगतात, "महिला मग त्या शहरातील असो वा ग्रामीण भागातल्या आपल्या कामाची दखल घेतली जावी असं प्रत्येकाला वाटणं सहाजिकच आहे.

भारतीय संस्कृतीत पुरुषांनी घरचं काम करणं किंवा त्यात हातभार लावणं हे सर्वमान्य नाही. ही महिलांची कामे असल्याचा समज त्यामागे असतो. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात हा दृष्टीकोन जास्त पाहायला मिळतो."

पुढे बोलताना दीपिका म्हणाल्या, "समान अधिकार असावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं, पण अधिकारांची ही देवाणघेवाण समजून घेणं जरा कठीण आहे. या गोष्टी रुळण्यासाठी अजून वेळ लागेल आणि त्यासाठी तसे प्रयत्नही करावे लागतील.

कुटुंबीयांशीही संवाद साधून त्यांना पटवून द्यावं लागेल. कामाची, अधिकाराची ही देवाणघेवाण समजणं कठीण आहे पण या रुढीवादी विचारांना बदलण्याची इच्छा आणि प्रयत्न सुरू ठेवायला हवे, हळूहळू का होईना पण परिस्थिती बदलेल."

कामातील समानतेमुळे बदल घडून येईल, असं जयंती यांनाही वाटतं. त्या म्हणतात, "भारतीय संस्कृतीत कामाचं विभाजनही लिंगआधारित आहे. ठराविक काम महिलांची तर ठराविक पुरुषांची असं पाहायला मिळतं. पण, आज नोकरी असो वा व्यवसाय महिला-पुरुष दोन्ही समान पातळीवर काम करताहेत.

महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. हिच समानता घरातही दिसायला हवी. घरातील कामेही महिला-पुरुष अशी विभागणी न करता ती जबाबदारी दोघांनी मिळून पार पाडली तर त्यात नक्की बदल होईल. बऱ्याच ठिकाणी ती दिसूनही येते.

पुरुष महिलांच्या कामात आवश्यक ती मदत करतात, पण याचं प्रमाण फार कमी आहे. त्यात वाढ झाली तर दोघांच्या नात्यातही त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. असं म्हणायला हरकत नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.