You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
थर्मल कॅमेऱ्यात दिसला दिल्लीतील उष्णतेचा कहर, सर्वाधिक परिणाम गरीब महिलांवर
- Author, सुमेधा पाल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जून महिन्यात सूर्य आग ओकत असताना दुपारच्या वेळी कमला स्टोव्हवर जेवण बनवत होत्या. त्या पूर्व दिल्लीच्या सुंदर नगर परिसरातील एक झोपडपट्टीत 10 बाय 12 आकाराच्या खोलीत राहतात.
कमला यांना दिल्लीत ज्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे, ते थर्मल कॅमेऱ्यानं टिपलं आहे. या द्वारे रंगाच्या माध्यमातून तापमान मोजलं जातं.
थर्मल कॅमेऱ्यानं टिपलेल्या फोटांमध्ये कमला यांच्या शरीराचे आणि त्यांच्या घराच्या भिंतीचे तापमान गडद लाल आणि पिवळ्या रंगात दिसत आहे. म्हणजे ते तापमान 50 अंश सेल्सियसपेक्षा जास्त होते.
कमला सांगतात की, "मला स्वयंपाक करण्यासाठी दररोज चार तास लागतात. स्टोव्ह व्यवस्थित सुरू राहावा म्हणून पंखा बंद ठेवावा लागतो. अशा परिस्थितीत मला श्वास घ्यायला त्रास होतो आणि चक्करही येते. पण, महिलांकडे दुसरा पर्याय काय आहे? स्वयंपाक बनवणे त्यांची जबाबदारी आहे."
या आठवड्यात दिल्लीसह उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत उष्णतेमुळे निर्माण होणारे धोकेही वाढले आहेत.
ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी या विषयावरील थिंक टँक काऊन्सिलने मे महिन्यात एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. त्यात असं दिसून आलं की, भारतातील 57 टक्के जिल्हे तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. देशातील जवळपास 76 टक्के या जिल्ह्यांत राहतात.
या रिपोर्टनुसार, तीव्र उष्णतेचा सर्वाधिक धोका असणाऱ्या 10 राज्यांपैकी दिल्ली एक आहे.
या अभ्यासामधून असंही समोर आलं की, गरीबांवर याचा सर्वाधिक परिणाम होतोय. यामध्ये वृद्ध, लहान मुलं, झोपडपट्टीतील नागरिक आणि दीर्घकाळ घराबाहेर राहणाऱ्या नागरिकांचा समावेश होतो.
दिल्लीत उष्णतेची लाट आहे. त्यामुळे बीबीसीनं दिल्लीतील चार रहिवाशांवर होणारे उष्णतेचे परिणाम समजून घेण्यासाठी थर्मल कॅमेऱ्यांचा वापर केला.
या कॅमेऱ्यानं टिपलेल्या छायाचित्रांमधून असं दिसून आलं की, कमला यांच्यासारखे लोक जे एसी नसलेल्या आणि कोंडलेल्या खोलीत राहतात त्यांना कडक उन्हाचा सर्वाधिक त्रास होतो.
या तीव्र उष्णतेमुळे कमला यांनी मुलांना शहराबाहेर पाठवले असून त्याचा त्यांना पश्चाताप होतोय.
त्या म्हणतात, "माझ्या घरात जागा नाही. वरच्या मजल्यावर थेट ऊन येत असल्यानं प्रचंड उष्णता असते. यामुळे मला माझ्या मुलांना गावी पाठवावं लागतं. कारण, कडक उन्हाळ्यात या घरात राहणं शक्य नाही."
कमला यांच्या घरात थर्मल इमेजिंग कॅमेऱ्यांनी टिपलेले गडद पिवळे आणि नारिंग रंग हे त्यांना होत असलेल्या त्रासाचे पुरावे आहेत.
त्यांच्या घराबाहेरील परिस्थिती आणखी वाईट आहे. कमला यांच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणारे पवन कुमार सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यावर फिरून समोसे विकतात.
ते म्हणतात, "मी दररोज माझा संपूर्ण सेटअप आणि गरम तेल खांद्यावर घेऊन जातो. मला शक्य होईल तितके समोसे विकून घर चालवावं लागतं. याशिवाय दुसरा उपायही नाही."
हातगाडीवर भाजीपाल विकणाऱ्या बेबी यांनीही असाच अनुभव सांगितला.
दुपारच्या वेळी थर्मल कॅमेऱ्यानं टिपलेल्या फोटोमध्ये त्या गडद लाल आणि चमकदार पिवळ्या रंगात दिसतात. या कॅमेऱ्यानं त्यांच्या सभोवतालचं तापमान 53 अंश सेल्सियल नोंदवलं. त्यांचे कपडे घामानं भिजलेले होते आणि त्या चेहऱ्यावरील घाम पुसत होत्या.
बेबी म्हणतात, "खूप जास्त ऊन असतं तेव्हा काम करावं लागू नये यासाठी मी सकाळी लवकर काम सुरू करते. पण, त्यामुळे फार काही फरक पडत नाही. मला उदरनिर्वाहासाठी बाहेर पडावंच लागतं त्याशिवाय दुसरा पर्याय नाही."
कडक उन्हात काम केल्यानं सतत डोकेदुखी आणि शुगर कमी होण्याचा त्रास नेहमी होतो, असं त्या सांगतात.
बेबी आणि पवन हे असंघटीत क्षेत्रात काम करतात. राजधानीच्या 80 टक्के कामगारांचं ते प्रतिनिधित्व करतात.
वर्कर्स कलेक्टिव्ह फॉर क्लायमेट जस्टीस साऊथ एशिया आणि ग्रीनपीस इंडिया यांनी तयार केलेल्या 'लेबरींग थ्रू द क्लायमेट क्रायसिस' असं शीर्षक असलेल्या अहवालात असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या उष्णतेशी संबंधित समस्या अधोरेखीत केल्या आहेत.
त्यानुसार तापमानात एक अंश सेल्यियस वाढ झाल्यास असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे उत्पन्न 19 टक्क्यांनी कमी होते. कडक्याच्या उन्हात एकतर स्वतःला सुरक्षित ठेवा किंवा उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडा, या दोनपैकी एका गोष्टीची निवड करावी लागते.
या उष्णतेचा फक्त त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होतोय असं नाही, तर कामगारांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतात असंही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
या अहवालानुसार, "आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. वारंवार शौचालयात जावं लागू नये, यासाठी पाणी पिणे टाळणाऱ्या घरगुती कामगारांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. अचानक आलेल्या पावासामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांचं सामानाचं नुकसान होतं.
उत्पन्न कमी झाल्यामुळे बरेच लोक कर्जबाजारी होतात. खराब हवामानाचा परिणाम सर्वांवर सारखाच होतो असं नाही."
असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या वस्तावाच्या अगदी उलट मध्य दिल्लीतील वातानुकूलित कार्यालयात पायल बसते.
थर्मल कॅमेऱ्यानं टिपलेल्या फोटोमध्ये त्यांच्या सभोवतलाचे तापमान गडद जांभळ्या आणि निळ्या रंगात दिसते. यावरून कॉर्पोरेट ऑफिसमधलं तापमान थंड असल्याचं दिसतं.
पायल म्हणतात, "आम्ही वातानुकूलित कार्यालयात काम करतो आणि आरामदायी गाड्यांमध्ये घरी जातो. त्यामुळे आम्हाला उष्णतेची झळ पोहोचत नाही. शहरातील अनेक कामगारांकडे ही सुविधा नाही. त्यांचा उष्णतेच्या बाबतचा अनुभव आमच्यापेक्षा वेगळा आहे."
ग्रीनपीस इंडियानं आयोजित केलेल्या फोकस ग्रुप चर्चेतून असं दिसून आलं की फक्त वाढतं तापमानच नाही, तर कामाच्या ठिकाणची वाईट परिस्थिती देखील कामगारांच्या संकटात भर घालत आहे.
वाढत्या तापमानाशिवाय वेळेआधी मॉन्सूनचं आगमन हे देखील अचानक खराब हवामानामुळे घडणाऱ्या घटनांबद्दल चिंता वाढवत आहे.
भावरीन कंढारी सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
अचानक खराब होणाऱ्या वातावरणाच्या परिणामांचा उल्लेख करत त्या म्हणतात की, "भारतीय शहरं हवामान बदलांच्या बाबतीत अधिकाअधिक असुरक्षित होत आहेत. यामुळे असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना धोका निर्माण झाला आहे.
हवामानाच्या परिणामांमधून लवकरात लवकर सावरण्याची किंवा ते कमी करण्याची क्षमता नसल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम उपेक्षित लोकसंख्येवर म्हणजेच कामगारावर होतो.
जोपर्यंत सामाजिक न्यायाचे पैलूंना हवामान नियोजनासोबत जोडलं जात तोपर्यंत आपल्याला फारशी प्रगती दिसणार नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.