You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रिक्षावाला बनून अजित डोभाल सुवर्णमंदिरात घुसले आणि खलिस्तानी अतिरेक्यांची माहिती कशी मिळवली?
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बऱ्याचदा गुप्तचर संस्थेत मोठ्या हुद्द्यावर काम करणारे लोक आपलं आत्मचरित्र लिहिणं टाळतात. लिहिलं तरी ते आपल्या सहकाऱ्यांची नावं उघड करणं नक्कीच टाळतात. पण रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चे माजी प्रमुख अमरजित सिंग दुलत यांचं 'अ लाइफ इन द शॅडोज: अ मेमॉयर' नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालंय. विशेष म्हणजे हे आत्मचरित्र या गोष्टींना अपवाद ठरलंय.
दुलत यांनी या पुस्तकात त्यांचे वरिष्ठ एम.के. नारायणन आणि त्यांचे ज्युनियर अजित डोभाल यांच्या कार्यशैलीवर आपलं मत खुलेपणाने मांडलंय.
दुलत लिहितात, "इंटेलिजन्स ब्युरोच्या दिल्ली मुख्यालयातील डेस्कवर विश्लेषक म्हणून काम करत मी चार वर्षे काढली. त्यानंतर मला नॉर्थ ब्लॉकमध्ये एम के नारायणन यांच्यासोबत रूम शेअर करता आली, हे माझं नशीबच समजतो. त्यावेळी माझे मोठे बॉस ए.के. दवे होते, त्यांच्या नंतर आर के खंडेलवाल होते. नारायणन त्यांना 'कॅंडी' म्हणून हाक मारायचे.
"आपल्या फाईलवर कोणता अधिकारी कशाप्रकारे नोटिंग करतो हे पाहण्याची उत्सुकता दवेंना असायची. ते नेहमीच त्यांच्या सहकाऱ्यांच्या फाईलवरची नोटिंग पाहून खिल्ली उडवायचे आणि म्हणायचे की, यापेक्षा चांगलं नोटिंग एखादा सबइन्स्पेक्टर करत असेल. कधीकधी तर नारायणन सुद्धा दवेंच्या तावडीत सापडायचे. दुसऱ्या बाजूला होते के एन प्रसाद. बाहेरून किती जरी कडक वाटत असले तरी मनाने अतिशय सौम्य होते. आणि तरुणांना माहिती द्यायला नेहमीच तत्पर असायचे."
नारायणन : साम्यवादाचे सर्वांत मोठे तज्ज्ञ
ए. एस. दुलत यांच्या म्हणण्यानुसार, ते नारायणन यांच्याकडे पाहातच गुप्त माहितीचं विश्लेषण करायला शिकले होते. फिल्डवरून माहिती घेऊन येणाऱ्या एखाद्या उत्साही गुप्तचर अधिकाऱ्याच्या रिपोर्टचा टोन डाऊन कसा करायचा हे सुद्धा ते नारायणन यांच्याकडूनच शिकले.
तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते एका पेजवरच लिहून संपलं पाहिजे, हे सुद्धा नारायणन यांनीच शिकवलं.
दुलत लिहितात, "नारायणन यांच्याकडे जेव्हा एखाद्या विषयाची फाईल यायची, तेव्हा ते फाईल ठेऊन घ्यायचे. त्याच्यावर सखोल अभ्यास करून मगच प्रेझेन्टेशन द्यायचे. भारतीय गुप्तचर संस्थेत कम्युनिझमचे सर्वांत मोठे तज्ञ कोण असतील तर ते नारायणन होते. त्यांचा आणि माझा तसा संपर्क कमीच होता, पण मला नेहमीच ते महान वाटायचे. पुढे आर.एन. काव यांच्या यांच्याबद्दलही माझ्या मनात अशीच भावना तयार झाली होती."
वाट बघण्यात तरबेज असलेले नारायणन
काव आणि नारायणन यांच्यात वेगळेपण काय असेल, तर काव नेहमीच शांत असायचे. ते लोकांमध्ये कमी मिसळायचे, कमी बोलायचे. त्यांच्याबद्दलचा एक किस्सा प्रसिद्ध होता की, रॉ च्या प्रमुखपदावर असेपर्यंत त्यांचा फोटो एकाही वृत्तपत्रात एकाही मासिकात छापून आला नव्हता.
नारायणन मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्यात अनेक तास घालवायचे. तेच काव मात्र थेट कृतीवर विश्वास ठेवायचे. काव स्वतःच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवणारे ऑपरेशन मॅन होते. दोघांच्या कामाच्या शैलीमध्ये कमालीचा फरक होता. मात्र, दोघेही भारतीय गुप्तचर संस्थेत काम करणारे खास लोक होते.
दुलत लिहितात, "जर नारायणन यांना तुम्ही आवडत असाल, तर त्यांना तुमची प्रत्येक गोष्ट आवडेल. पण जर तुम्ही त्यांना आवडत नसाल तर मात्र तुमच्या त्रासाला काहीच अंत नाही असं तुम्ही समजून जायला हवं. त्यावेळी ते असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होते, पण ते खूपच प्रसिद्ध होते."
"एखाद्या विषयाची अतिरिक्त माहिती असेल तरीही निर्णय घेताना कोणतीही घाई करायचे नाहीत. कधी कधी तर एखादी फाईल वाचून काढायला त्यांना एखादा दिवस ते महिने लागायचे. त्यामुळे त्यांचं विश्लेषण नेहमीच उच्च दर्जाचं असायचं.
एखादया निष्कर्षाप्रत जाण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार करणं चांगलं असतं हे मला नारायणन यांच्याकडून शिकायला मिळालं. इंटेलिजेन्स हा नेहमीच वाट बघण्याचा खेळ असतो. आतापर्यंत मी ज्या कोणत्या गुप्तचर अधिकाऱ्याला भेटलोय, त्यात या खेळात नारायणन यांच्या इतका पारंगत तर मी कोणीच पाहिला नाही."
नारायणन आशियातील सर्वोत्तम गुप्तचर अधिकारी असल्याचं मलिक यांचं म्हणणं होतं.
नारायणन यांची नजर नेहमीच तीक्ष्ण असायची. ते दुलत यांच्यापेक्षा खूप वरिष्ठ असले तरी त्यांना त्यांचे बॉस आर के खंडेलवाल तितकेसे आवडत नव्हते.
त्यांना त्यांच्या प्रसिद्धीचा अंदाज होत आणि त्यांची सतत स्तुती केली जावी अशी त्यांची इच्छा होती. आणि विशेष म्हणजे त्यांना स्तुतीची कमतरता कधी जाणवलीच नाही. 'माय इयर्स विथ नेहरू' हे पुस्तक लिहिणारे गुप्तचर प्रमुख बीएन मलिक यांनी नारायणन यांना आशियातील सर्वोत्तम गुप्तचर अधिकारी म्हटलंय.
ए.के. दुलत लिहितात, "आठवड्याची बैठक दर शुक्रवारी व्हायची. या बैठकीला नारायणन संबोधित करायचे, ते जेव्हा बोलायला सुरुवात करायचे तेव्हा मिटिंग रूममध्ये पिनड्रॉप सायलंस असायचा. कुठल्या विभागात काय चाललंय याची त्यांना माहिती असायची.
प्रत्येक माहितीसाठी त्यांच्या विसंबून राहावं लागलं की त्यांना आनंद व्हायचा. शिवाय एखाद्या विषयाची माहिती द्यायची असेल तर त्यांना पहिल्यांदा बोलवलं जावं अशी त्यांची इच्छा असायची."
"यामध्ये ते एफबीआयचे माजी प्रमुख एडगर हूवर यांच्यासारखे होते. ज्या व्यक्तीला ते भेटलेत त्या प्रत्येक व्यक्तीची फाईल त्यांच्याजवळ असायची आणि ते याचसाठी प्रसिद्ध होते. दिल्लीतील सत्तेच्या गल्ल्यांमध्ये कसं चालायचं हे त्यांच्याशिवाय कोणालाच चांगलं माहिती नसावं."
नारायणन यांची राजीव गांधींशी असलेली जवळीक
गांधी घराण्याचा नारायणन यांच्यावर खूप विश्वास होता. त्यामुळे गुप्त माहितीच्या जगात ते नेहमीच प्रासंगिक राहिले आहेत. खासकरून राजीव गांधी गुप्त माहितीसाठी नारायणन यांच्यावर अवलंबून असत. त्यांना अंदाज होता की, गुप्त माहितीच्या जोरावर परराष्ट्र धोरण प्रभावित करता येऊ शकतं. म्हणूनच गुप्त महिती जाणून घेण्याची आवड राजीव गांधींना लागली होती.
दुलत लिहितात, "नारायणन यांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला मला आवडायचं. रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या बैठकीत नारायणन यांना कॉफी आणि चॉकलेट्स सर्व्ह केले जायचे."
"दिल्लीमध्ये परदेशी दूतावासांमध्ये कोणती खलबतं सुरू आहेत हे जाणून घेण्यासाठी राजीव गांधी नेहमीच उत्सुक असायचे. एकदा तर अरुण सिंग आणि अरुण नेहरू इंटेलिजन्स ब्युरोच्या टीमसोबत फिल्डवर गेले होते."
"नारायणन यांनी मला एकदा सांगितलं होतं की, त्यांनी कोणतीतरी गुप्त माहिती राजीव गांधींना सांगितली होती. या माहितीचा स्रोत सांगा म्हणून राजीव गांधी नारायणन यांच्या मागेच लागले होते. पण नारायणन म्हणाले, की सर, माहिती देणं माझं काम आहे, पण त्या माहितीचा स्रोत विचारण्याचा हक्क तुम्हाला नाहीये."
जेव्हा राजेश पायलट यांना काश्मीरचं इंचार्ज बनविण्यात आलं तेव्हा काश्मीरची ग्राउंड रिअॅलिटी जाणून घेण्यासाठी ते नारायणन यांच्याकडे जात असत.
अजित डोभाल यांनी नवाझ शरीफांशी संपर्क साधला होता
नारायणन यांच्याच कारकीर्दीत अजित डोभाल पुढे आले. अजित सगळ्यांच्या नजरेत तेव्हा भरले जेव्हा त्यांना ईशान्येतील मिझोराममध्ये पाठवलं होतं.
सत्तरच्या दशकात ऐजवालचे जिल्हा मॅजिस्ट्रेट म्हणून काम करणारे आणि नंतर भारताचे गृहसचिव झालेले व्ही.के. दुग्गल सांगतात की, त्या काळात डोभाल मिझोराममध्ये फील्डमन म्हणून काम करायचे. भूमिगत झालेल्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध असायचे.
डोभाल यांनी 2006 मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, "एकदा मी लालडेंगाच्या मिझो नॅशनल फ्रंट बंडखोरांना माझ्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र होती. पण तरीही मीच त्यांना तुम्ही सुरक्षित आहात असं आश्वासन दिलं होतं. माझ्या पत्नीने त्यांच्यासाठी डुकराचं मांस बनवलं होतं. तिने यापूर्वी कधीही डुकराच्या मांसाचा स्वयंपाक बनवला नव्हता."
या तपशिलावरून समजतं की, कोणतंही काम सांगितलं तरी डोभाल अजिबात मागे हटणाऱ्यातले नव्हते.
1982 ते 1985 दरम्यान कराची मध्ये भारताचे कौन्सुल जनरल राहिलेले जी. पार्थसारथी सांगतात की, "नवाझ शरीफ यांच्याशी संपर्क करणारे पाहिले डोवालच होते. आणि याच काळात शरीफ पाकिस्तानच्या राजकारणात पुढे येत होते.
1982 मध्ये जेव्हा भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला तेव्हा डोभाल यांच्या सांगण्यावरूनच नवाझ शरीफ यांनी त्यांच्या घराच्या लॉनमध्ये भारतीय संघाला मेजवानी दिली होती."
'ऑपरेशन ब्लॅक थंडर'मध्ये डोभाल यांची भूमिका
1988 मध्ये पार पडलेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडर-2 मुळे डोभाल आणखीनच प्रसिद्ध झाले. त्यांच्या चरित्रकारांचं म्हणणं आहे की, जेव्हा अतिरेकी सुवर्ण मंदिरात घुसले, तेव्हा डोभाल सुद्धा अंडर कव्हरच्या रुपात सुवर्ण मंदिरात घुसले होते.
‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अजित डोभाल यांच्या चरित्रात यतीश यादव यांनी लिहिलं होतं की, "1988 मध्ये सुवर्ण मंदिरांच्या आसपास एक रिक्षावाला असायचा जो खलिस्तानी कट्टरतावाद्यांच्या बाजूने असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्या रिक्षाचालकाने या खलिस्तान्यांना पटवून दिलं होतं की, तो आयएसआय या संघटनेचा सदस्य असून त्यांना मदत करण्यासाठी त्याला पाठवण्यात आलंय."
"ऑपरेशन ब्लॅक थंडर सुरू होण्याआधी दोन दिवस हा रिक्षाचालक सुवर्ण मंदिरात घुसला आणि तिथून महत्त्वाची माहिती घेऊन बाहेर आला. मंदिरात एकूण किती अतिरेकी आहेत याची माहिती घेऊन तो रिक्षाचालक आला होता."
हा रिक्षाचालक दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः अजित डोभाल होते. काश्मीरचा मुद्दा येतो तेव्हा माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी संपर्क ठेवणारे सुद्धा अजित डोभालच होते.
दुलत लिहितात, "डोभाल काश्मीरमध्ये लक्ष घालत असताना मी कधीच त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. कारण मला माहीत होतं की, तो एकमेव असा व्यक्ती आहे जो रिजल्ट देतो. डोभाल माझ्यापेक्षा चांगले गुप्तहेर होते, कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन एकदम निर्लिप्त होता. त्यामुळे त्यांच्यासाठी निर्णय घेणं खूप सोपं असायचं."
अपहरणकर्त्यांशी चर्चा करायला डोभाल यांनी कंदाहार गाठलं
दुलत पुढे लिहितात, "1999 मध्ये भारतीय विमानाचं अपहरण करून विमान कंदाहारला नेण्यात आलं. त्यावेळी ब्रजेश मिश्रा यांनी मला आणि श्यामल दत्ता यांना वाटाघाटी करण्यासाठी माणसं पाठवायला सांगितली. माझ्या नजरेत हे काम करण्यासाठी योग्य माणसं होती सी.डी. सहाय आणि आनंद आर्नी.
कारण ते दोघेही ऑपरेशनल ऑफिसर होते आणि अफगाणिस्तानविषयी त्यांना चांगली माहिती होती. पण श्यामल दत्ता म्हणाले की, इंटेलिजन्स ब्युरोमधलं कोणी जर हे काम चांगल्या पद्धतीने पार पाडू शकत असेल तर ते आहेत अजित डोभाल आणि नहचल संधू."
"शेवटी या दोघांनाही कंदाहारला पाठवण्यात आलं. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत असलेले विवेक काटजूही त्यांच्यासोबत गेले. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की, सीडी सहाय यांच्याऐवजी डोभाल मला कंधारची माहिती देत होते. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही लवकर निर्णय घ्या, इथे खूप प्रेशर आहे. पुढे काय घडेल सांगता येत नाही."
लालकृष्ण अडवाणी यांनी नाही म्हटलं नाही, पण अतिरेक्यांसोबत चर्चा करावी या बाजूने ते नव्हते.
अडवाणींचा माणूस असल्याने डोभाल यांचंही तेच मत असावं. प्रवाशांच्या बदल्यात अतिरेक्यांची सुटका करावी या गोष्टीला आणखीन एका नेत्याचा विरोध होता, ते म्हणजे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला.
अतिरेक्यांच्या सुटकेला फारुख अब्दुल्लांचा विरोध
ए. एस. दुलत यांचं दुसरं पुस्तक 'काश्मीर द वाजपेयी इयर्स' मध्ये ते लिहितात की, फारुख अब्दुल्ला यांनी अतिरेक्यांना सोडण्यास नकार दिला तेव्हा त्यांचं मन वळविण्यासाठी दुलत यांना श्रीनगरला पाठवण्यात आलं.
दुलत लिहितात, "फारूख यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, की तुम्ही पुन्हा आलात? तुम्ही रुबैय्या सईदच्या अपहरणाच्या वेळीही आला होता. मी म्हणालो, 'सर, तेव्हा मी तुमच्यासोबत होतो, पण यावेळी मी भारत सरकारसोबत आहे. त्यावेळी मी तुमच्या वतीने भारत सरकारशी बोलत होतो, आता मी भारत सरकारच्या वतीने तुमच्याकडे आलोय."
"फारूख म्हणाले की, मसूद अझहर आणि उमर शेख या दोन पाकिस्तान्यांसोबत तुम्हाला हवं ते करा, पण मी काश्मिरी मुश्ताक अहमद जरगरला सोडणार नाही. त्याने काश्मिरी लोकांचा जीव घेतलाय."
त्यानंतर फारुख शेख दुलत यांना घेऊन काश्मीरचे राज्यपाल गॅरी सक्सेना यांच्याकडे गेले. त्यांनी सक्सेना यांना सांगितलं की, "मी अतिरेक्यांना सोडण्याच्या निर्णयात सामील होऊ शकत नाही आणि तसं मी ‘रॉ’च्या प्रमुखाला सांगितलंय. मी राजीनामा द्यायला इथं आलोय."
गॅरी सक्सेना यांनी ब्लॅक लेबल स्कॉचची बाटली काढली आणि फारुखला म्हणाले, "डॉक्टर साहेब, तुम्ही फायटर आहात. तुम्ही इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहात."
यावर फारुख म्हणाले की, "अतिरेक्यांना सोडून हे लोक किती मोठी चूक करतायत यांचं यांना माहीत नाही."
गॅरी सक्सेना म्हणाले, "तुमचं 100 टक्के बरोबर आहे, पण सध्या कोणताही पर्याय नाहीये. दिल्लीत देखील यावर चर्चा झाली असेल. आणि त्यांना जर वाटत असेल की, याशिवाय आपल्याकडे कोणता मार्ग नाहीये तर आपण त्यांना साथ दयायला हवी. दुसऱ्या दिवशी मसूद अजहर आणि जरगर यांना रॉच्या गल्फस्ट्रीम विमानात बसवून श्रीनगरहून दिल्लीला आणण्यात आलं."
डोभाल करिअरच्या शिखरावर...
कंदाहार अपहरणातील अतिरेक्यांना सोडण्यामागे मुख्य कारण होतं, भारत सरकारने निर्णय घ्यायला लावलेला वेळ...
दुलत लिहितात की, "डोभाल सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून तिथं घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची माहिती देत होते. त्यांनी सांगितलं की, इथं राहणं अवघड होत चाललंय. ते अतिरेकी धमकी देत होते की, जर तुम्हाला तडजोड करायची नसेल तर इथून निघून जा. मला सुरुवाती पासूनच माहिती होतं की, डोभाल त्यांच्या करिअर मध्ये पीकवर जाणार. त्यामुळे या कामगिरीसाठी डोभाल यांच्यापेक्षा दुसरं कोणी योग्य ठरलंच नसतं."
"जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदासाठी हरदीप पुरी यांचं नाव चर्चेत होतं. पण अरुण जेटली सोडले तर भाजपमध्ये त्यांना समर्थन देईल असं दुसरं कोणीच नव्हतं. शेवटी नरेंद्र मोदींनी अजित डोभाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला."
"2004 साली पंतप्रधान कार्यालय सोडताना नारायणन यांनी मला विचारलं की आता काश्मीर कोण पाहणार? त्यावेळी मी क्षणाचाही विलंब न लावता अजित डोभाल यांचं नाव घेतलं होतं. तेव्हा नारायणन म्हणाले की, डोभाल काश्मीर पाहणार नाहीत कारण ते इंटेलिजन्स ब्युरोचे डायरेक्टर बनणार आहेत."
विशेष म्हणजे अजित डोभाल काँग्रेसच्या कार्यकाळातच इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख झाले होते.
जेएन दीक्षित यांच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेले एम. के. नारायणन उघडपणे म्हणायचे की, "जेव्हा मला एखाद्या ठिकाणी मवाळ भूमिका घ्यावी लागणार असते तेव्हा मी अमरजित सिंग दुलतला बोलावतो, पण हेच जर मला बडगा उगरावा लागणार असेल तर मला डोभालला बोलवावं लागतं."