You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू; 'कांटा लगा' गाणं ते 'बिग बॉस', 'असा' होता प्रवास
'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा 27 जूनला संध्याकाळी मुंबईत मृत्यू झाला. ती 42 वर्षांची होती. शेफालीच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शेफाली मुंबई अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहत होती. अभिनेत्रीच्या अचानक मृत्यूने विविध चर्चांना उधाण आलंय.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, फॉरेन्सिक टीमदेखील तपासासाठी शेफालीच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे.
शेफालीच्या मृत्यूची बातमी कळताच टीव्ही आणि चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त केलं आणि तिला आदरांजली दिली.
'कांटा लगा'नंतर आली प्रसिद्धीच्या झोतात
शेफालीच्या करिअरची सुरुवात एका म्युझिक व्हीडिओतून झाली. त्यावेळी ती इंजीनिअरिंग करत होती. शेफालीचे वडील चार्टर्ड अकाउंटंट, तर आई स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होती.
'कांटा लगा' गाण्याच्या रिमेक व्हर्जनमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली शेफाली नंतर 'कांटा लगा' म्हणूनच ओळखली जाऊ लागली. ही ओळख अखेरपर्यंत तिच्या सोबत राहिली. अनेक मुलाखतीत बोलताना तिने या ओळखीचा आपल्याला अभिमान वाटतो, असंही सांगितलं होतं.
टीव्ही अभिनेता पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये पारसने तिला प्रश्न विचारला होता, "लोकं तुला कायम 'कांटा लगा गर्ल' म्हणूनच हाक देतात. या नावाचा, ओळखीचा तुला कंटाळा येत नाही का?"
यावर उत्तर देताना शेफालीनं म्हटलं होतं की, याचा कंटाळा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ती म्हणाली होती, "एक कलाकार स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी किती मेहनत घेतो. कोणी 'अँग्री यंग मॅन' म्हणून ओळखला जातो, तर कुणी 'किंग खान' म्हणून. माझ्या तर पहिल्याच प्रोजेक्टनं मला ती ओळख दिली."
"मला वाटतं की, संपूर्ण जगात एकच 'कांटा लगा गर्ल' असू शकते आणि ती मी आहे. मला हे नाव खूप आवडतं आणि अखेरपर्यंत लोकांनी मला 'कांटा लगा गर्ल' म्हणूनच ओळखावं," असं ती म्हणाली होती.
'कांटा लगा' व्हीडिओनंतर शेफालीने अनेक म्युझिक व्हीडिओजमध्ये काम केले. ती 'मुझसे शादी करोगी' यासारख्या काही चित्रपटांमध्येही दिसली होती.
शेफालीने 2019-20 मध्ये रिॲलिटी शो 'बिग बॉस'च्या 13 व्या सीझनमध्येही सहभाग घेतला होता. या सीझनमध्ये तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लादेखील होता. चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूपच आवडली होती.
तिने 'नच बलिये'सारख्या डान्स रिॲलिटी शोजमध्येही सहभाग घेतला होता. या शोमध्ये ती पराग त्यागीसोबत झळकली होती.
शेफालीने अनेक मुलाखतींमधून किशोरवयात झालेल्या एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार या आजाराबाबतचे अनुभवही सांगितले होते.
तिला 15 व्या वर्षी पहिल्यांदा या आजाराचा झटका आला होता आणि त्यानंतर जवळपास एक दशक ती या आजारावर उपचार घेत होती, असंही तिनं सांगितलं होतं.
या आजारामुळं आपला आत्मविश्वास ढासळला होता, पण योगा आणि फिटनेसद्वारे यातून बाहेर पडता आलं, असंही तिनं नमूद केलं होतं.
टीव्ही आणि चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींकडून आदरांजली
शेफालीच्या अचानक एक्झिटमुळं चाहत्यांसह चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींनाही धक्का बसला. टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंतांनी शेफालीच्या मृत्यूवर सहवेदना व्यक्त केल्या.
गायक मीका सिंगनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत लिहिलं, "या बातमीनं मोठा धक्का बसलाय. आमची लाडकी स्टार आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण शेफाली आज आपल्यात नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाही. तुझे स्मितहास्य, निराळी शैली, जिद्द आणि कामासाठीच्या प्रेमासाठी तू कामय लक्षात राहशील. ओम शांती."
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) शेफालीला आदरांजली अर्पण करताना लिहिलं की, "शेफालीच्या निधनाच्या बातमीवर मला अजूनही विश्वास बसत नाहीये. ती खूप लवकर गेली. शेफालीचे पती आणि कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे."
याव्यतिरिक्त अली गोनी, राहुल वैद्य, करिश्मा तन्ना, गुरु रंधावा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट करून शेफालीच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत आदरांजली व्यक्त केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)