You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कबीर बेदी : वादग्रस्त रिलेशनशिप, चार लग्नं, इटलीतलं स्टारडम ते हॉलिवूड, कसा होता प्रवास?
"आमच्या काळात आम्ही बंडखोर होतो. मी आणि प्रोतिमा लग्नाच्या आधीच एकत्र राहत होतो. ते माझं पहिलं रिलेशन होतं. यामुळं त्याकाळी खूप खळबळ माजली होती, स्कँडल झालं होतं. आमच्या एकत्र राहण्यावर बरंच लिहिलं बोललं गेलं."
ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी सांगत होते. त्यांचं स्वतःचं आयुष्यही एखाद्या सिनेमासारखंच आहे.
वैयक्तिक आयुष्यातले नातेसंबंध, चार लग्नं तर दुसरीकडे व्यावसायिक आयुष्यातले चढउतार, परदेशात मिळालेलं प्रेम आणि यश. त्यांनी जाहिरातींमध्येही काम केलं. रंगभूमीवरही सक्रिय राहिले.
या सगळ्या प्रवासाबद्दल कबीर बेदी यांनी 'कहानी ज़िंदगी की'मध्ये इरफान यांच्यासोबत मोकळेपणाने गप्पा मारल्या.
आई-वडिलांचा वैचारिक वारसा
कबीर बेदींचा जन्म हा 1946 साली लाहौरमध्ये शीख कुटुंबात झाला.
त्यांचे वडील, बाबा प्यारे लाल बेदी हे ट्रेड युनियन नेते, तत्त्वज्ञ आणि लेखक होते. त्यांची आई फ्रिडा बेदी या ब्रिटिश होत्या.
त्यांच्याबद्दल बोलताना कबीर बेदी यांनी म्हटलं की, "माझ्या आईचा जन्म इंग्लंडमधला. ती स्कॉलरशिपवर ऑक्सफर्डमध्ये शिकण्यासाठी आली आणि एका भारतीय तरुणाच्या, माझ्या वडिलांच्या प्रेमात पडली. तेही तिथे स्कॉलरशिपवर आले होते.
दोघांचे विचार वेगळे होते, पण दोघांमध्येही करुणा, सहानुभूती या गोष्टी समान होत्या. जग बदलण्याची भावना दोघांत होती. पण त्यांचे मार्ग वेगळे होते."
चांगली नोकरी मिळण्याची शक्यता असताना ती संधी नाकारून या दोघांनी समाजासाठी स्वतःला झोकून दिल्याचं कबीर बेदींनी सांगतात.
"त्यांनी आयुष्य स्वातंत्र्यलढ्याला वाहिलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना राजकारणात जाण्याची संधी होती. त्यांचे मित्र हरकिशन सिंह सुरजित, इंदरकुमार गुजराल राजकारणात गेले होते.
मात्र त्यांनी ते नाकारलं. नंतर त्यांना काही आध्यात्मिक अनुभव आले. माझी आई बर्माला गेली. तिथून ती बौद्ध धर्माकडे वळली. भिक्खू बनली, तिनं जगभरात बौद्ध धर्माचा प्रचार केला."
त्यांच्याकडून मी सहनशक्ती, इतरांचा आदर, सर्व धर्मांप्रती सन्मान या गोष्टी शिकलो. पण मी त्यांच्या मार्गाने गेलो नाही. माझा मार्ग वेगळा होता, मी अभिनेता होतो, असं कबीर बेदी सांगतात.
लग्न, रिलेशनशिप आणि कबीर बेदी
कबीर बेदी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे विशेषतः त्यांच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत राहिले. त्यांच्या आणि प्रोतिमा बेदी यांच्या नात्याने लग्न, नातेसंबंधांबद्दलच्या मध्यमवर्गीय धारणांना धक्का दिला होता.
स्टोरीज आय मस्ट टेल या आत्मचरित्रात त्यांनी प्रोतिमा यांच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहणं, लग्न ते ओपन रिलेशनशिपबद्दल सविस्तर लिहिलंही आहे.
प्रोतिमा बेदी यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर कबीर यांनी तीन वेळा लग्नं केली.
अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे त्यांचे आणि प्रोतिमा बेदींचं नातं तुटलं. पण परवीन यांच्यासोबतचं नातंही फारकाळ टिकलं नाही.
प्रोतिमानंतर त्यांनी ब्रिटीश वंशाच्या फॅशन डिझायनर सुझन हम्फ्रीज यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर त्यांनी टीव्ही आणि रेडिओ निवेदिका निकी रिड्ससोबत विवाह केला. त्यानंतर परवीन दोसांज त्यांच्या आयुष्यात आल्या.
"प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझं कोणतंही नातं हे वन नाइट स्टँड नव्हतं. माझं पहिलं लग्न सात वर्षं टिकलं. दुसरं लग्न सात-आठ वर्षं टिकलं. तिसरं लग्न पंधरा वर्षं टिकलं.
परवीन (दोसांज) आणि मी गेल्या एकोणीस वर्षांपासून सोबत आहोत. आमच्या लग्नाला केवळ नऊच वर्षं झाली आहेत. मात्र त्याआधी दहा वर्षं आम्ही एकमेकांसोबत होतो. ही सगळी नाती शॉर्ट टर्म नव्हती ना..."
वेगळे झालो तरी नात्यांमध्ये कडवटपणा आला नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
"माझे संबंध सर्वांसोबत चांगले होते, दीर्घकाळ राहिले. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझी प्रत्येक एक्स-वाईफसोबतही मैत्री टिकून राहिली. माझ्या पुस्तकात एक फोटो आहे. त्यामध्ये प्रोतिमा आणि निकी ख्रिसमस डिनरसाठी एकत्र बसलेल्या दिसतात."
बीटल्स आणि बंडखोरी
कबीर बेदी जेव्हा 19 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी प्रसिद्ध रॉक बँड 'द बिटल्स'चा इंटरव्ह्यू केला होता. त्यावेळी ते आकाशवाणीसाठी फ्रीलान्सिंग करत होते.
'द बिटल्स' यांच्यासोबतची भेट स्वप्नवत असल्याचं कबीर बेदी सांगतात. 'द बीटल्स'च्या संगीताने जग बदलल्याचं कबीर बेदींचं म्हणणं आहे.
"बिटल्ससोबत मी जो इंटरव्ह्यू केला होता, तो एका अर्थाने प्रतिकात्मक होता. तो त्यावेळी जगातील सर्वांत प्रसिद्ध म्युझिक बँड होता. पण ते केवळ संगीतकार नव्हते.
बदलत्या जगाचं प्रतीक होते, बंडखोरीचं प्रतीक होते. आम्हीही आमच्या काळातले बंडखोर होतोच. त्यांनी संगीतातली माझी अभिरुची बदलली. बदलत्या काळाचं प्रतीक बनले. मी त्यांना आजतागयत त्यांना मानतो."
कबीर बेदी यांनी बिटल्सचा मोठ्या मुश्किलीने मिळवलेला इंटरव्ह्यू आकाशवाणीने जतन करून ठेवला नाही. अवघ्या तीन दिवसांतच त्याच्या टेप इरेझ केल्या गेल्या.
या अनुभवानंतर त्यांनी आकाशवाणी आणि दिल्लीचा निरोप घेतला. ते मुंबईला आले.
बॉलिवूडमधलं अपयश ते इटलीतलं स्टारडम
कबीर बेदी यांची अभिनयातील सुरुवात रंगभूमीवरून झाली. ऑथेल्लो, तुघलक, विजय तेंडुलकरांच्या गिधाडेचं इंग्रजी रुपांतर असलेलं 'व्हल्चर्स' अशा नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या.
त्यानंतर 1971 मध्ये हलचल या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलं. त्यानंतर त्यांना एकापाठोपाठ चित्रपट मिळाले. सीमा, सजा, अनोखा दान, मंझिले और भी है, डाकू, हरफन मौला अशा चित्रपटांतून त्यांना म्हणावं ते यश मिळालं नाही.
सिनेमांची चुकलेली निवड हे त्यामागचं महत्त्वाचं कारण ठरलं. आपल्या टाइपास या पुस्तकात प्रोतिमा बेदी यांनी तसंच 'स्टोरीज आय मस्ट टेल'मध्ये कबीर बेदी यांनीही हिंदी फिल्म इंडस्ट्रीत मनासारख्या किंवा योग्य भूमिका न मिळाल्याचं म्हटलं आहे. ते त्याकाळी हिंदी सिनेमातील हिरोंच्या मुख्य फळीत स्थान मिळवू शकले नाहीत.
मात्र, युरोपमध्ये विशेषतः इटलीमध्ये त्यांना प्रचंड स्टारडम मिळालं. तिथे त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत असे.
इटलीतील त्यांच्या या लोकप्रियतेचं कारण होती 'संदोकन' नावाची एक सीरिज.
ही सीरिज एमिलिओ सलगारी यांच्या 'संदोकन' या पुस्तकावर आधारित होती. ही ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील एका पायरटची गोष्ट होती. या रोलसाठी बऱ्याच आशियाई कलाकारांच्या ऑडिशन झाल्या होत्या. त्यातून कबीर बेदींची निवड झाली आणि त्यांचं आयुष्यच बदललं.
"मी बॉलिवूडनंतर इटलीला गेलो, तेव्हा माझ्या सीरिजला प्रचंड यश मिळालं होतं. ज्यापद्धतीचं प्रेम मला इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीत मिळालं. त्यामुळे मला तर बीटल्ससारखंट वाटलं."
"संदोकनने युरोपमध्ये टेलिव्हिजनचे रेकॉर्ड मोडले. अचानक मला जे स्टारडम मला मिळालं, ते कल्पनेच्या पलिकडचं होतं. मी केवळ अशा यशाची स्वप्नं पाहत होतो आणि ते सत्य झालं होतं.
कबीर बेदी जेव्हा रोममध्ये जायचे तेव्हा चाहत्यांची प्रचंड गर्दी व्हायची. एकदा ते आणि परवानी बाबी रोमला गेले होते, तेव्हा ते थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर प्रचंड गर्दी उसळली होती.
त्या हॉटेलमध्ये त्यावेळेचा प्रसिद्ध गायक टॉम जोन्सही थांबला होता. त्याला आधी वाटलं की ही गर्दी आपल्यासाठी आहे. पण नंतर कळलं की, हा प्रचंड जनसमुदाय संदोकनला पाहायला आला आहे. त्यानंतर त्याने तिथून चेक आउटच केलं.
युरोपमधून हॉलिवूडमध्ये
सध्याच्या काळात हिंदी फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांना आपण हॉलिवूडच्या प्रॉजेक्ट्समध्ये पाहिलं आहे. पण कबीर बेदी यांनी त्याकाळी ह़ॉलिवूडच्या प्रॉजेक्टमध्ये काम केलं होतं.
त्यातला सर्वांत महत्त्वाचा सिनेमा म्हणजे 'ऑक्टोपसी' हा जेम्स बाँडपट. यामध्ये रॉजर मूर यांनी बाँडची भूमिका केली होती. त्याचबरोबर 'बोल्ड अँड ब्युटिफूल' सारख्या चर्चित सीरिजमध्येही त्यांनी वर्षभर काम केलं होतं.
मात्र, हॉलिवूडपेक्षाही आपल्याला जास्त यश हे युरोपमध्ये मिळाल्याचं कबीर बेदींनी म्हटलं होतं.
"हॉलिवूडमध्ये त्यावेळी भारतीय कलाकारांना डोळ्यांसमोर ठेवून भूमिका लिहिल्या जात नव्हत्या. हीच माझी सर्वांत मोठी अडचण होती. मला भूमिकाच मिळत नव्हत्या. मिळणार तरी कशा, जर तशा व्यक्तिरेखा लिहिल्याच जात नव्हत्या."
हॉलिवूडमध्ये भारतीय कलाकारांसाठी व्यक्तिरेखा लिहिल्या जात नसल्याचं पाहून कबीर बेदींनी त्यांच्या एजंटला सांगितलं की, मी परदेशी व्यक्तिरेखा साकारायलाही तयार आहे. तशा भूमिका पाहायला त्यांनी सांगितलं.
त्यानंतर त्यांनी स्पॅनिश, इटालियन, रशियन व्यक्तिरेखा साकारल्या. विशेषतः त्यांनी इटलीमध्ये सलग काम केलं.
ते सांगतात की, मी माझ्या एजंटला म्हटलं होतं की, मी भारतीय आहे असा विचारच करू नको. मला कोणत्या तरी परदेशी व्यक्तिरेखेसाठी कास्ट केलं तरी चालेल."
बॉन्डपट 'ऑक्टोपसी' आणि त्यात काम करण्याचा अनुभव
कबीर बेदींनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या 'ऑक्टोपसी' या बाँडपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.
या अनुभवाबद्दल बोसताना ते म्हणतात, "मी सर्वांत आधी एक भारतीय अभिनेता आहे. उदयपूरचा लेक पॅलेस हे या सिनेमाच्या शूटिंगचं मुख्य लोकेशन होतं. मला तर स्वर्गच दोन बोटं उरला होता.
शूटिंग पाहायला येणारे लोक मला ओळखायचे आणि मला आवाज द्यायचे. एखाद्या भारतीय अभिनेत्यासाठी हे क्षण भावूक करणारे असतात."
याच सिनेमाने आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिल्याचं ते सांगतात.
त्यांनी म्हटलं की, जेम्स बॉन्डचे जगभरात फॅन क्लब आहे. तुम्हाला जगभरात सगळीकडे बोलावतात. कारण जेम्स बॉन्डचं नेटवर्कही मोठं आहे. या सिनेमानं मला इंटरनॅशनल स्टार बनवलं आणि आंतरराष्ट्रीय फॅन्स दिले.
'मी उद्ध्वस्त झालो होतो'
युरोप-हॉलिवूडमध्ये मिळालेल्या या यशानंतर कबीर बेदींच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली होती.
90 च्या दशकात त्यांच्या मुलाने सिद्धार्थने (प्रोतिमा आणि कबीर यांचा मुलगा) आत्महत्या केली. त्याला स्क्रिझोफ्रेनिया होता. हा तोच काळ होता जेव्हा शेअर मार्केटमधले त्यांचे सगळे पैसेही बुडाले होते.
या सगळ्या काळाबद्दल बोलताना ते म्हणतात की, "मी उद्धवस्त झालो होतो. आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या. माझ्या सगळ्या गुंतवणुकींमध्ये प्रचंड नुकसान झालं होतं. त्याच काळात माझ्या मुलाचंही निधन झालं. 1990 च्या दशकाच्या शेवटचा तो काळ खूप कठीण होता.
मला काही समजत नव्हतं. मी ऑडिशनला जायचो, पण काय बोलतोय हेही समजत नव्हतं. मला काम मिळेनासं झालं, संधीही गेल्या, आणि परिस्थिती हळूहळू आणखी वाईट होत गेली."
यातून बाहेर पडायचं तर आपल्यालाच हाचपाय हलवावे लागतील, आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवावं लागेल हा विचार करून त्यांनी प्रयत्न करायला सुरूवात केली.
"माझ्या मनात आलं की आता काहीतरी करायलाच हवं, कारण जर असंच सुरू राहिलं, तर मी रस्त्यावर येईन."
त्यांनी विचार केला, स्वतःची ताकद ओळखली आणि पुन्हा स्वतःला उभं केलं. त्यांनी हॉलीवूड सोडलं, इंग्लंडला गेले आणि हळूहळू एकेक प्रोजेक्ट स्वीकारत आपलं आयुष्य पुन्हा उभं केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)