गब्बरचा असा होणार खात्मा, 50 वर्षांनंतर बदललेल्या क्लायमॅक्ससह प्रदर्शित होणार 'शोले'

    • Author, सुधा जी. टिळक
    • Role, पत्रकार आणि लेखिका

भारतीय चित्रपटाचा इतिहास शोले शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. सुमारे 50 वर्षांपूर्वी हा सिनेमा पडद्यावर झळकला होता.

भारतातील सर्वात प्रसिद्ध, लोकप्रिय हिंदी सिनेमांमध्ये शोलेची गणना केली जाते. हा सिनेमा आता पुन्हा एकदा थिएटरमध्ये येत आहे.

1975 साली रिलीज झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी होते. इटलीतील बोलोंगा मधील इल सिनेमा रित्रोवातो फेस्टिवलमधील या सिनेमाच्या अनकट व्हर्जनच्या वर्ल्ड प्रीमियरमुळं पुन्हा याची चर्चा सुरू झाली आहे.

या प्रीमियरच्या निमित्ताने 'शोले' चित्रपटाचा मूळ शेवट आणि काही हटवलेले प्रसंग पुन्हा चित्रपटात दाखवले जात आहेत. सिनेमाच्या रिलीजच्या वेळी सेन्सॉरच्या आक्षेपामुळे ते काढून टाकण्यात आले होते.

पियाझ्झा मात्झोरच्या प्रसिद्ध ओपन-एअर स्क्रीनवरील स्क्रीनिंगमुळं याची चर्चा होत आहे. ही स्क्रीन युरोपमधील सर्वात मोठ्या स्क्रीन्सपैकी एक मानली जाते.

'शोले'चे डायलॉग लग्नात, भाषणांत सर्वत्र लोकप्रिय!

लेखक सलीम-जावेद यांच्या जोडीनं शोले सिनेमाची पटकथा आणि डायलॉग लिहिले आहेत.

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जया भादुरी, संजीव कुमार आणि गब्बर सिंगची अविस्मरणीय भूमिका करणाऱ्या अमजद खान यांच्यासारख्या कलाकारांमुळे हा सिनेमा अजरामर झाला आहे.

शोले सिनेमानं पाश्चात्य आणि समुराई (जपानी) क्लासिक सिनेमांपासून प्रेरणा घेतली आहे. तरीसुद्धा या सिनेमानं भारतीयांच्या मनात एक जागा निर्माण केली आहे.

204 मिनिटांच्या या सिनेमात चांगुलपणा आणि वाईटपणाचा एक क्लासिक संघर्ष पाहायला मिळतो. ही कथा 'रामगड' या एका काल्पनिक गावावर आधारित आहे.

या सिनेमात दोन छोटे गुन्हेगार जय आणि वीरू (अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र) यांना माजी पोलीस अधिकारी असलेले ठाकूर बलदेव सिंह हे गब्बर सिंग नावाच्या एका कुख्यात डाकूचा खात्मा करण्यासाठी कामावर ठेवतात.

गब्बर सिंग ही व्यक्तिरेखा भारतीय सिनेमातील आतापर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध खलनायकांपैकी एक ठरली आहे.

जेव्हा हा सिनेमा पहिल्यांदा रिलीज झाला होता. त्यावेळी मुंबईतील दीड हजार आसन क्षमता असलेल्या मिनर्व्हा थिएटरमध्ये तो सलग पाच वर्षे तळ ठोकून होता.

नंतर 'बीबीसी इंडिया'च्या ऑनलाइन पोलमध्ये या सिनेमाला 'फिल्म ऑफ द मिलेनियम' म्हणून निवडण्यात आले. तर ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटच्या पोलमध्ये या सिनेमाला 'महान भारतीय सिनेमा'चा दर्जा देण्यात आला.

आर.डी बर्मन यांचं जबरदस्त संगीत आणि टाळ्या मिळवणारे सिनेमातील डायलॉग यामुळे तब्बल पाच लाख रेकॉर्ड्स आणि कॅसेट त्याकाळी विकले गेले.

हा सिनेमा भारतातील एक सांस्कृतिक घटना पण आहे. यातील संवादांचा वापर लग्न सोहळे आणि राजकीय भाषणांमध्येही मोठ्या प्रमाणात केला गेला. अनेक जाहिरातींमध्येही विनोदी शैलीने यातील डायलॉग्जचा वापर करण्यात आला.

या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासमवेत छोट्या गुंडाची भूमिका साकारणारे धर्मेंद्र यांनी 'शोले'बद्दल नुकतंच मोठं वक्तव्य केलं. "'शोले' हा जगातील आठवं आश्चर्य" असल्याचं वर्णन त्यांनी केलं.

तर दुसरीकडे, "या सिनेमाच्या शुटिंगचा अनुभव अविस्मरणीय होता. त्यावेळी हा सिनेमा एक ऐतिहासिक भारतीय सिनेमा बनेल असं वाटलं नव्हतं," अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली.

आणीबाणीमुळे कडक सेन्सॉरशिपला सामोरं जावं लागलं

"शोले चित्रपटाची ही नवीन आवृत्ती सर्वात विश्वासार्ह आहे, ज्यात चित्रपटाचा मूळ शेवट आणि पूर्वी कधीही न पाहिलेल्या (हटवलेले) दृश्यांचा यात समावेश आहे," असं फिल्म हेरिटेज फाऊंडेशनचे शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनी म्हटलं आहे.

या सिनेमाच्या मूळ आवृत्तीत ठाकूर (संजीव कुमार) आपल्या खिळे लावलेल्या बुटाने गब्बर सिंगला चिरडतात, त्यामुळे त्याचा मृत्यू होतो.

परंतु, सेन्सॉर बोर्डानं या दृश्यावर आक्षेप नोंदवला होता. एक माजी पोलिस अधिकारी कायदा आपल्या हातात घेऊ शकतो, या विचारांशी ते सहमत नव्हते. चित्रपटात हिंसाही जास्त प्रमाणात असल्याचं त्यांचं मत होतं.

या सिनेमात गब्बर सिंगने ठाकूरच्या कुटुंबातील जवळपास सर्वांचीच हत्या केली आहे आणि ठाकूरचे दोन्ही हातही कापले आहेत.

हा चित्रपट आणीबाणीच्या काळात रिलीज झाल्यामुळे त्याला अत्यंत कडक सेन्सॉरचा सामना करावा लागला होता.

सेन्सॉरची समजूत काढण्यात अपयशी ठरल्यानंतर निर्माता जी.पी सिप्पी यांना सिनेमाचा शेवट पुन्हा एकदा चित्रित करावा लागला. त्यासाठी कलाकार आणि क्रू सदस्यांना दक्षिण भारतातील रामनगर येथील ओबडधोबड डोंगरावर पुन्हा न्यावं लागलं.

याच जागेवर सिनेमातील काल्पनिक 'रामगड' गाव दाखवण्यात आलं आहे. पुन्हा सर्व जुळवाजुळव केल्यानंतर सिनेमाचा एक सौम्य शेवट पुन्हा चित्रित करण्यात आला. ज्यात गब्बर सिंहला मारलं जात नाही तर पकडलं जातं, असं दाखवण्यात आलं. त्यानंतर अखेरीस या सिनेमाला सेन्सॉरकडून मंजुरी मिळाली.

मुंबईच्या गोदामापासून ब्रिटनपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा

मागील तीन वर्षांत या चित्रपटातील जुन्या दृश्यांना जोडणं सोपं नव्हतं. त्याची 70 एमएमची मूळ प्रिंट जतन केलेली नव्हती आणि कॅमेरा निगेटिव्ह खूप खराब स्थितीत होते.

परंतु, 2022 मध्ये रमेश सिप्पी यांचा मुलगा शहजाद सिप्पी यांनी 'फिल्म हेरिटेज फाउंडेशन'शी संपर्क करून या सिनेमाची नवीन आवृत्ती तयार करण्याचा प्रस्ताव दिला.

त्यांनी सांगितलं की, मुंबईतील एका गोदामात चित्रपटांशी संबंधित अनेक वस्तू ठेवलेल्या होत्या. सुरुवातीला ही गोष्ट जुगारासारखी वाटत होती, पण नंतर ती एका चमत्कारासारखी ठरली.

या गोदामात कोणतंही लेबल नसलेल्या डब्यांमध्ये 'शोले'चा मूळ 35 एमएम कॅमेरा आणि साऊंड निगेटिव्ह ठेवण्यात आले होते.

सिप्पी फिल्मसने फाऊंडेशनला ब्रिटनमध्ये सुरक्षितरित्या ठेवलेल्या अतिरिक्त रिळांचीही माहिती दिली. ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटच्या सहकार्यानं टीमला त्यांच्या आर्काइव्हपर्यंत जाता आलं.

हे रिळ इटलीच्या बोलोनीमधील 'इल सिनेमा रित्रोवातो' या ठिकाणी काळजीपूर्वक पाठवण्यात आले. ही जागा जुन्या चित्रपटांच्या दुरुस्तीसाठी जगभरातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे.

मूळ 70 एमएम प्रिंट नष्ट झाली असूनही आणि निगेटिव्ह खूप खराब अवस्थेत असतानाही, आर्काइविस्टनी मुंबई आणि ब्रिटनमधून काही साहित्य मिळवले आणि ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट व इटलीच्या 'इल इमेजिन रित्रोवातो' या संस्थेच्या सहकार्यानं चित्रपट पुन्हा तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

या प्रयत्नात चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापरण्यात आलेल्या मूळ कॅमेऱ्याचाही शोध लागला.

सर्वात उल्लेखनीय म्हणजे, जेव्हा शोले पहिल्यांदा पडद्यावर आला तेव्हा त्याची सुरूवात चांगली झाली नव्हती. सुरूवातीला चित्रपटाचे रिव्ह्यूही चांगले नव्हते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर याचा परिणाम झाला होता. याची सुरूवातीची कमाई चांगली नव्हती. त्यात 70 एमएमची प्रिंट कस्टम्समुळे उशिराने रिलीज झाली.

'इंडिया टुडे' मासिकानं या चित्रपटाचं वर्णन 'बुझे हुए अंगारे' असं केलं होतं.

'फिल्मफेअर'चे विक्रम सिंह यांनी 'शोले'वर टीका केली होती. त्यांनी लिहिलं होतं की, या चित्रपटाची मुख्य अडचण म्हणजे, "हा भारतीय पार्श्वभूमीवर एक पाश्चात्य चित्रपट लादण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे. हा चित्रपट पाश्चात्य चित्रपटांची नक्कल केलेला आहे. ना धड तो इकडचा आहे ना तिकडचा."

चित्रपटाच्या सुरूवातीच्या स्क्रीनिंगवेळी दर्शक शांत बसलेले दिसले. कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य नव्हतं की डोळ्यात अश्रू नव्हते ना कोणी टाळ्या वाजवल्या.

चित्रपट लेखिका अनुपमा चोप्रा आपलं पुस्तक 'शोले: द मेकिंग ऑफ अ क्लासिक' मध्ये लिहितात, प्रेक्षकांनी 'फक्त मौन' धारण केलं होतं.

परंतु, आठवड्याच्या शेवटी शोले पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी जमू लागली होती. पण, प्रेक्षकांना हा सिनेमा किती आवडला आहे, हे काही समजत नव्हतं.

नंतरच्या काही आठवड्यांमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा आवडू लागला आणि लोकांमध्ये यावर चर्चा झडू लागल्या.

अनुपमा चोप्रा लिहितात, "या सिनेमातील दृश्यं अद्भूत होते आणि आवाजाचा परिणाम ही चमत्कारिक होता. सिनेमा तिसऱ्या आठवड्यात येईपर्यंत त्याचे डायलॉग्ज प्रेक्षकांच्या तोंडपाठ झाले होते. याचाच अर्थ काही प्रेक्षक दुसऱ्यांदा हा सिनेमा पाहण्यासाठी परत येत होते."

सिनेमा रिलीज होऊन एक महिना झाल्यानंतर पॉलिडोरने (म्युझिक समूह) 48 मिनिटांच्या डायलॉग रेकॉर्ड रिलीज केल्या. त्यानंतर 'शोले'ची परिस्थिती आणखी बदलली.

आता सिनेमातील पात्रं प्रसिद्ध झाली होती आणि गब्बर सिंग 'खरंच भीतीदायक, पण अत्यंत लोकप्रिय' खलनायक बनला. हा सिनेमा भारतातील एक सांस्कृतिक घटना म्हणून उदयास आला.

परदेशी समीक्षकांनी या चित्रपटाला भारताची पहिली 'करी वेस्टर्न' (भारतीय स्टाईलची वेस्टर्न फिल्म) म्हटलं.

शोले पाच वर्षांहून अधिक काळ थिएटरमध्ये चालला. तीन वेळा नियमित शोमध्ये आणि दोन वेळा मुंबईच्या मिनर्व्हा थिएटरमध्ये मॅटिनी शो म्हणून प्रदर्शित झाला.

240 व्या आठवड्यातही या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होते.शोले एप्रिल 2015 मध्ये पाकिस्तानी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आणि 40 वर्षे जुना सिनेमा असूनही, त्याने शाहरुख खानचा 2002 मधील हिट सिनेमा देवदासला मागं टाकलं.

चित्रपट वितरक श्याम श्रॉफ यांनी अनुपमा चोप्रांशी बोलताना म्हटलं होतं की, "जसं ब्रिटिश साम्राज्याबद्दल म्हटलं जातं होतं की, तिथं कधीही सूर्य मावळत नाही, त्याचप्रमाणं 'शोले'चा सूर्यही कधी मावळणार नाही."

'शोले' रिलीज होऊन 50 वर्षे झाली तरी आजही तो इतका लोकप्रिय का आहे?

अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत याचं सोपं पण सखोल असं उत्तर दिलं, "वाईटावर चांगुलपणाचा विजय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तीन तासांत मिळणारा काव्यात्मक न्याय (पोएटिक जस्टिस), जो तुम्हाला आणि मला संपूर्ण आयुष्यात मिळणार नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)