'त्या क्षणी मी मरत आहे असंच मला वाटलं'; बंगळुरूतील चेंगराचेंगरीविषयी प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बंगळुरूहून बीबीसी हिंदीसाठी
तिथे काही फॅन्स होते, तर काही फक्त 'मौजमजे'साठी गेले होते. मात्र, दोन्ही प्रकारचे लोक चेंगराचेंगरीचे बळी ठरले. त्यामुळे आनंदाचा हा क्षण केवळ मृतांच्या कुटुंबीयांसाठीच नाही, तर इतरांसाठीही एक भयावह अनुभव ठरला.
शामिली नावाची एक मुलगी तिथे आपली बहीण आणि मित्रमैत्रिणींसोबत फक्त मजा करण्यासाठी गेली होती. तिने सांगितलं, "मी इथे फक्त मजा करायला आले होते. मी तर फॅनही नाही."
पण तिच्या या फक्त मजेसाठीच्या प्रवासानं तिला थेट रुग्णालयात पोहोचवलं. रुग्णालयात ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (आरसीबी) टी-शर्टवर होती, ज्यावर विराट आणि नंबर 18 लिहिलेलं होतं.
रुग्णालयात आपल्या बेडवरून तिने बीबीसी हिंदीला सांगितलं, "मी माझी बहीण आणि मित्रमैत्रिणींना सतत सांगत होते की इथून चला, कारण खूप ढकलाढकली, धक्काबुक्की होत होती."
"अचानक मला लक्षात आलं की, मी जमिनीवर पडले आहे. त्यानंतर लोकांच्या गर्दीत मी चिरडले गेले. त्या क्षणी मी मरत आहे, असंच मला वाटलं."
स्टेडियमच्या आजूबाजूच्या भागात जे लोक आले होते, त्यांच्यापेक्षा शामिलीचं प्रकरण थोडं वेगळं होतं. कारण आरसीबीची टीम क्रिकेट स्टेडियमजवळून जाणार होती आणि परत येऊन त्याच स्टेडियममध्ये ती प्रवेश करणार होती.
या गर्दीने भरलेल्या चिन्नास्वामी स्टेडियममध्येच त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता 30 ते 35 हजार प्रेक्षकांची आहे, मात्र एक लाखापेक्षा जास्त लोक येणार नाहीत, असा पोलिसांचा अंदाज होता.
परंतु, पोलीस अधिकाऱ्यांच्याच अंदाजापेक्षा गर्दी दुप्पट झाली होती. एका अंदाजानुसार या गर्दीने तीन लाखांचा आकडाही ओलांडला होता.
मात्र, राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तेथे 2 लाख लोकांची गर्दी जमली होती, असं म्हटलं.
एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, स्टेडियम आणि विधानसौंधच्या (विधानसभा) आजूबाजूला जमलेला जमाव 'बेभान' झाला होता.
विधानसौंधमध्ये राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आयपीएल जिंकणाऱ्या आरसीबी संघाच्या खेळाडूंना सन्मानित केलं होतं.
अनियंत्रित जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज
शामिलीने सांगितलं, "नंतर मी अचानक बेशुद्ध पडले. लोकांनी माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि मला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी स्टेडियमच्या सहा नंबर गेटजवळच्या फुटपाथवर बसले, पण माझ्या पोटात असह्य वेदना होत होत्या."
पोटात असह्य वेदना होत असल्यामुळे शामिलीला रुग्णालयात दाखल करावं लागलं.
"डॉक्टरांनी स्कॅन करून काळजी करण्यासारखं काही नाही, या फक्त स्नायूंमधल्या वेदना आहेत, असं सांगितलं. पण मला भीती वाटतं आहे," असं ती म्हणाली.
तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. शामिलीप्रमाणेच आणखी एक युवकही रुग्णालयात दाखल आहे, जो बंगळुरूमध्ये इंजिनिअरिंग करत आहे.
हनीफ मोहम्मद नावाच्या या तरुणानं बीबीसी हिंदीला सांगितलं, "मी उभा राहून गर्दी पाहत होतो. माझा स्टेडियममध्ये जाण्याचा विचार नव्हता. कारण माझ्याकडे पास किंवा तिकीटही नव्हतं."
"पण अचानक सगळीकडून लोक धावत येताना दिसले आणि पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज सुरू केला. ते ना जमिनीवर लाठी मारत होते ना पायांवर. अचानक एका पोलिसानं माझ्या डोक्यावर लाठी मारली. हे सगळं स्टेडियमच्या मेन गेटसमोर घडत होतं."
हनीफने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्याला लाठी लागल्यानं तो पुढे जाऊ शकला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
विजयपुरा येथे राहणाऱ्या या युवकानं सांगितलं, "माझ्या डोक्यातून वाहत असलेले रक्त मी पोलिसांना दाखवलं. यानंतर मला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. ही बाह्य जखम आहे. परंतु काही दिवस घरी आराम करण्याची गरज आहे, असं डॉक्टरांनी मला सांगितलं.''
हनिफप्रमाणेच कॉमर्सच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी मनोजही रॅली जवळून जाताना पाहण्यासाठी उभा होता.
गर्दी वाढताच धक्काबुक्की सुरू झाली. त्याचवेळी स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर लावलेले पोलीस बॅरिकेड त्याच्या पायावर पडले. तो म्हणाला, "मी बॅरिकेडजवळ होतो. गर्दीमुळे तो बॅरिकेड माझ्या उजव्या पायावर पडला."
तो आपले पूर्ण नाव सांगत नव्हता. कारण तो तिथे गेला आणि जखमी झाला हे त्याच्या कुटुंबाला कळू नये, असं त्याला वाटत होतं.
'मृतांच्या नातेवाईकांशी पोलीस संपर्क साधू शकले नाहीत'
या काही घटना फक्त तरुण लोकं जखमी झाल्याच्या होत्या. मात्र बुधवारी (4 जून) झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला हे कोणालाच माहिती नाही.
त्यांच्या वयाचा विचार करता असं दिसतंय की, काहींना एवढ्या मोठ्या गर्दीत धोक्याची जाणीवही नसेल.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका सरकारी डॉक्टरनं बीबीसी हिंदीला सांगितलं, "सगळ्यात लहान मूल 13 वर्षांचं होतं. एवढं लहान मूल अशा गर्दीत काय करत होतं हे समजणं कठीण आहे."
या रुग्णालयात आलेले इतर पाच लोक 17, 20, 25, 27 आणि 33 वर्षांचे होते.

फोटो स्रोत, Getty Images
रुग्णालय आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या एका युवतीच्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, इतर मृतांच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधता आलेला नाही.
ड्यूटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलं, "मृत्यू झालेल्या लोकांमध्ये कोणीही बंगळूरूचा नाही. हे सर्व कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील किंवा शेजारच्या राज्यांतील आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून आले होते."
"आम्ही अद्याप दोन-चार जणांच्या नातेवाईकांशीही संपर्क साधू शकलेलो नाही. मरण पावलेल्या लोकांचे फोन एकतर हरवले आहेत किंवा त्यांची चोरी झाली आहे," असं पोलीस कर्मचाऱ्यानं म्हटलं.
रुग्णालयातील एका डॉक्टरनं सांगितलं की, मृतांपैकी बहुतेक लोकांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या लोकांचा मृत्यू गुदमरल्यानं किंवा बरगड्या तुटल्यामुळं झाला होता. चेंगराचेंगरी जिथे झाली होती, तिथंपर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचणंही कठीण होतं. कारण रस्त्यांवर प्रचंड गर्दी होती.
'गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कोणतीही तयारी नव्हती'
पण जेव्हा चिन्नास्वामी स्टेडियमच्या आसपासच्या रस्त्यांवर पूर्णतः गोंधळ माजलेला होता आणि जनजीवन ठप्प झालं होतं. तेव्हा राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांच्या हस्ते विधानसौंधच्या जिन्यावर सत्कार स्वीकारल्यानंतर आरसीबी संघ स्टेडियममध्ये दाखल झाला होता.
एका तरुणानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "ते विजयाच्या आनंदात स्टेडियममध्ये चारही बाजूंनी धावत होते. स्टेडियमच्या बाहेर काय घडलंय, याची माहिती आतमध्ये कोणालाच नव्हती."

फोटो स्रोत, Getty Images
आनंदाच्या प्रसंगाचे दुःखात रूपांतर झाले, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं. त्यांनी या संपूर्ण घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकानं आम्हाला सांगितलं, "साधारणपणे असे सत्कार समारंभ परिस्थिती नियंत्रणात असलेल्या वातावरणात आयोजित केले जातात."
"हे स्टेडियम किंवा इतर कोणतेही ठिकाण असू शकतं. परिस्थिती नियंत्रणात ठेवणं आवश्यक होतं. पण या घटनेकडे बघता इथं तशी तयारी नव्हती असं दिसतं.''
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











