महिलांच्या उपचारासाठी कोट्यवधींची संपत्ती दान; 100 वर्षीय डॉ. के. लक्ष्मीबाईंची गोष्ट

    • Author, सुब्रत कुमार पती
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
    • Reporting from, ब्रह्मपूर, ओडिशा येथून

वयाचं शतक पूर्ण झाल्यावर जिथं माणसं थकतात, किंवा केवळ आपल्या भूतकाळातील आठवणीत रमलेले असतात, अशा वेळी ओडिशातील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. के. लक्ष्मीबाई यांनी भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.

कदाचित यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही, परंतु ओडिशातील ब्रह्मपूरच्या डॉ. के. लक्ष्मीबाई यांनी महिलांचे आरोग्य अधिक सुधारण्याच्या उद्देशाने आपली सर्व संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी केवळ हा निर्णयच घेतला नाही, तर त्यासाठी स्वतःचे राहते घरदेखील विकले. घर विकून आलेली 3 कोटी 40 लाख रुपयांची सर्व रक्कम त्यांनी 'अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था' (AIIMS), भुवनेश्वर शाखेला दान केली आहे."

डॉ. लक्ष्मीबाई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, "ओडिशामध्ये अनेक महिलांना कर्करोगाची लागण होते, परंतु त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी मी काय करू शकते, असा विचार मी केला. म्हणूनच मी माझे घर विकले आणि एम्स (AIIMS) भुवनेश्वरमध्ये 'महिला कर्करोग उपचार केंद्र' उभारण्यासाठी सर्व पैसे देऊन टाकले."

या निधीमुळे ओडिशामधील महिला आरोग्य सुविधेला, विशेषतः महिलांमधील कर्करोग उपचार आणि संशोधनाला मोठी बळकटी मिळेल.

एम्स भुवनेश्वरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप परिडा म्हणाले की, "ही रक्कम कर्करोगग्रस्त महिला रुग्णांचे उपचार, संशोधन, प्रशिक्षण आणि सामुदायिक आरोग्य सेवांसाठी खर्च केली जाईल. याशिवाय, महिलांमध्ये कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि 'सर्वायकल कॅन्सर' (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) यावरील लसीकरणासाठी या पैशांचा वापर केला जाईल."

त्यांनी पुढे असेही सांगितले की, "या रकमेतून एक कायमस्वरूपी निधी तयार केला जाईल. या निधीच्या मुदत ठेवीवर मिळणारे व्याज केवळ याच उद्देशासाठी खर्च केले जाईल."

तसे पाहिले तर, डॉ. लक्ष्मीबाई यांनी भुवनेश्वरच्या एम्सला दान देण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. आपल्या आयुष्यभराच्या कमाईचा विनियोग कसा करावा, की जेणेकरून समाजाला दीर्घकाळ फायदा होईल, याचा त्या बराच काळ विचार करत होत्या.

त्यांच्या कुटुंबात आता कोणीही नाही. त्यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे आपली संपत्ती आरोग्य सेवांसाठी दान करणे त्यांना सर्वात योग्य वाटले.

एम्ससारख्या संस्थेचीच निवड त्यांनी का केली? यावर डॉ. लक्ष्मीबाई म्हणतात की, ही संस्था केवळ ओडिशाच नव्हे, तर शेजारील राज्यांतील लाखो रुग्णांसाठी एक प्रमुख 'रेफरल सेंटर' (मोठे उपचार केंद्र) आहे.

कोण आहेत डॉ. के. लक्ष्मीबाई?

डॉ. के. लक्ष्मीबाई या 100 वर्षांच्या आहेत. त्या ओडिशातील ब्रह्मपूर शहरात राहतात. त्यांचे पती डॉ. प्रकाश राव हे देखील पेशाने डॉक्टर होते, 30 वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले आहे.

सध्या त्या आपल्या घरी एकट्याच राहतात. त्यांचे काही नातेवाईक परदेशात स्थायिक आहेत, ते अधूनमधून त्यांना भेटायला येतात. मात्र, वाढत्या वयाची तमा न बाळगता त्यांनी स्वतःला कामात व्यग्र ठेवले आहे.

डॉ. के. लक्ष्मीबाई 100 वर्षांच्या असूनही अत्यंत सुदृढ आयुष्य जगत आहेत. त्या स्वतः चालू-फिरू शकतात आणि आपली कामे स्वतः करण्यास सक्षम आहेत. मात्र, घरामध्ये स्वयंपाक आणि इतर कामांसाठी एक महिला सहाय्यक आहे, जी त्यांची काळजी देखील घेते.

त्यांचे हस्ताक्षर आजही खूप सुंदर आहे आणि त्या आपल्या ओळखीच्या लोकांना पत्र लिहिण्यासाठी त्याचा वापर करतात. त्या पुस्तके वाचतात आणि आपला बराचसा वेळ पूजा-अर्चनेत व्यतीत करतात.

जवळपास दररोज त्यांचे जुने विद्यार्थी त्यांना भेटायला येतात. त्या त्यांच्याशी देश-विदेशातील विविध मुद्द्यांवर चर्चा करतात. स्थानिक सामाजिक कार्यकर्तेही त्यांची भेट घेत असतात. डॉ. लक्ष्मी अनेक स्वयंसेवी संस्थांना (NGO) मार्गदर्शन करतात आणि वेळोवेळी त्यांना आर्थिक मदतही करत आल्या आहेत.

त्यांचा जन्म 5 डिसेंबर 1926 रोजी झाला होता. हा असा काळ होता जेव्हा भारतात महिलांचे उच्च शिक्षण सहज उपलब्ध नव्हते. असे असूनही त्यांनी कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले आणि नंतर मद्रास मेडिकल कॉलेजमधून स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

निवृत्तीनंतरही सक्रिय

सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर डॉ. लक्ष्मी यांनी आपल्या कारकिर्दीतील बहुतांश काळ ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये व्यतीत केला. त्यांनी ब्रह्मपूर येथील एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्राध्यापिका म्हणून अनेक वर्षे काम केले आणि 1986 मध्ये त्या निवृत्त झाल्या.

आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी असंख्य महिलांवर उपचार केले आणि हजारो बाळंतपणे यशस्वीरित्या पार पाडली.

त्या सांगतात की, एक डॉक्टर म्हणून त्यांनी हे जवळून पाहिले आहे की, माहिती आणि जागरूकतेचा अभाव, सामाजिक संकोच आणि आर्थिक समस्यांमुळे महिला गंभीर आजारांना बळी पडतात.

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही डॉ. लक्ष्मीबाई समाजामध्ये मिसळत राहिल्या. त्या आरोग्य शिबिरे, समुपदेशन कार्यक्रम आणि महिला आरोग्याशी संबंधित विषयांवरील चर्चांमध्ये सक्रिय होत्या. वय वाढल्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा नक्कीच आल्या, पण त्यांचा सामाजिक ओढा कधीच कमी झाला नाही.

1969 मध्ये त्यांच्या विद्यार्थिनी राहिलेल्या डॉ. पी. भारती आता डॉ. लक्ष्मी यांच्या शेजारीच राहतात. त्या जवळपास दररोज त्यांना भेटायला येतात.

त्यांनी बीबीसीला सांगितले की, "डॉ. लक्ष्मीबाई या ओडिशातील पहिल्या लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. त्यांनी अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना लॅप्रोस्कोपिक सर्जरी शिकवली आहे. त्यांचे कित्येक विद्यार्थी आज अत्यंत यशस्वी आहेत."

डॉ. भारती यांच्या म्हणण्यानुसार, त्या नेहमीच लोकांच्या मदतीला धावून येतात. त्यांनी सांगितले की, "आपल्या आयुष्यात त्यांनी जे काही कमावले ते सर्व त्यांनी दान केले आहे. ब्रह्मपूरमध्ये अल्पवयीन मुलींच्या कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी देखील त्यांनी 3 लाख रुपये दान दिले होते."

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडूनही कौतुक

राहते घर विकले, मग आता डॉ. लक्ष्मी राहतात तरी कुठे?

त्या त्याच घरात राहतात. खरं तर, त्यांनी आपले घर एका स्थानिक व्यक्तीला विकले आहे. विक्रीच्या या करारानुसार, जोपर्यंत डॉ. लक्ष्मी हयात आहेत, तोपर्यंत त्या या दोन मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहू शकतात. घराच्या तळमजल्याचा वापर नवीन घरमालक एका खाजगी रुग्णालयासाठी करत आहेत.

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर डॉ. लक्ष्मी यांना सरकारकडून दरमहा पेन्शन मिळते. 'ओल्ड पेन्शन स्कीम'नुसार, 100 वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तींची पेन्शन दुप्पट होते; याचा लाभही त्यांना मिळत आहे.

साधेपणाने जीवन जगण्यावर विश्वास असणाऱ्या डॉ. लक्ष्मी या ही पेन्शनची रक्कम देखील पूर्णपणे खर्च करत नाहीत. या पैशातून जी काही बचत होते, ती सुद्धा त्या वेळोवेळी दान करत असतात.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ. लक्ष्मी यांच्या या प्रेरणादायी पावलाचे विशेष कौतुक केले आहे.

गेल्या 5 डिसेंबर रोजी त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना राष्ट्रपतींनी लिहिले की, "मला हे जाणून आनंद झाला की, अलीकडेच आपण आपल्या बचतीतून एम्स (AIIMS) भुवनेश्वरमध्ये 'स्त्री-रोग कर्करोग' (गायनॅकोलॉजिकल ऑन्कोलॉजी) अभ्यासक्रम सुरू करण्याच्या उदात्त हेतूने भरीव दान दिले आहे.

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून, मी आपल्या या विचारशील योगदानाचे मनापासून कौतुक करते. मला विश्वास आहे की, आपल्यासारख्या उदार नागरिकांचा सहभाग इतरांनाही पुढे येण्यासाठी आणि सरकारी उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल."

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुढे लिहिले की, "मला असे वाटते की, आपण आपल्या जवळपास चार दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सदैव मुलींच्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केले आहे. आपले जीवन या गोष्टीचे एक उत्तम उदाहरण आहे की, शिक्षण एखाद्या व्यक्तीला कशा प्रकारे लाभान्वित करू शकते आणि ती व्यक्ती पुढे जाऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकते."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)