You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'वजनामुळं शूज फाटायचे, कपड्यांनाही लागायचा जास्त खर्च', मग ठरवून 10 महिन्यांत 125 किलो वजन घटवलं
- Author, नदीम अश्रफ
- Role, बीबीसी न्यूज
अफगाणिस्तानच्या जलालाबाद भागात राहणाऱ्या एका तरुणाचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्याच्या मित्रांनी पुढच्या म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणाची तयारी सुरू केली. पण त्याला मात्र तसं करता आलं नाही. त्याचं कारण होतं त्याचं वजन.
कुदरातुल्ला नावाच्या या तरुणाचं वजन एवढं जास्त होतं की, शाळेच्या वर्गामध्ये असलेले बेंच किंवा खुर्चीही त्याच्यासाठी खूप लहान पडत होती.
"एवढं जास्त वजन असताना मला कॉलेजला कसं जाता येईल? हाच विचार मी करत राहायचो. पण नंतर मी असा विचार केला की, कॉलेजला गेलो तरी काय असा फरक पडणार आहे?" असं कुदरातुल्लानं सांगितलं.
मनात अशा प्रकारच्या विचारांचा गोंधळ सुरू होतं त्यावेळी कुदरातुल्लाचं वय होतं तब्बल 216 किलो.
त्यांची उंची 180 सेंटिमीटर होती. पण त्याचवेळी त्याच्या कंबरेचा घेर तब्बल 147 सेंटिमीटर एवढा होता. त्याचा बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स 67 होता.
30 पेक्षा जास्त बीएमआय असलेली व्यक्ती ही लठ्ठ लोकांच्या श्रेणीत असल्याचं समजलं जातं. अफगाणिस्तानातील 8 पैकी एका व्यक्तीचा बीएमआय हा 30 पेक्षा जास्त आहे.
पण वर्षभरापूर्वी कुदरातुल्लानं वजन कमी करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू केले. त्यानंतर अवघ्या 10 महिन्यांमध्ये त्यानं स्वतःचं फिट, अॅक्टिव्ह आणि निरोगी तरुण असं 'ट्रान्सफॉर्मेशन' करून दाखवलं.
वजनामुळं जगणं बनलं होतं कठीण
कुदरातुल्लाचं वजन तो 13-14 वर्षांचा होता तेव्हाच वाढायला सुरुवात झाली होती. ते एवढं वाढत गेलं की, शाळा संपली तोपर्यंत त्याच्या इतर मित्रांच्या तुलनेत त्याचं वजन खूपच जास्त होतं.
"मी जेवढा लठ्ठ होतो, तेवढा लठ्ठ दुसरा कोणताही व्यक्ती मी पाहिला नव्हता. लठ्ठपणामुळं माझं जीवनही तेवढंच खडतर बनलं होतं," असं त्यानं सांगितलं.
इतर लोकांसाठी जी कामं सहज सोपी होती ती माझ्यासाठी मात्र खूप कठीण होती. मला माझी दैनंदिन कामंही नीट करता येत नव्हती, असं त्यानं सांगितलं.
कुदरातुल्लाचं वजन एवढं जास्त होतं की तो गंभीर लठ्ठपणाच्या श्रेणीत आला. त्याचा त्याच्या दैनंदिन जीवनावरही चांगलाच परिणाम व्हायला लागला.
"मला पोहणे, गिर्यारोहण असं काहीही करता येत नव्हतं. इतरांसारखी काम करता येत नव्हती. एवढंच काय पण मला चालणंही कठिण झालं होतं," असं कुदरुल्ला सांगतो.
एका ठिकाणाहून दुसरीकडं जाण्यासाठी त्याला रिक्षाचा वापर करावा लाहत होता. इतरांपेक्षा बसायला जास्त जागा लागत असल्यामुळं त्याला इतरांच्या तुलनेत अधिक पैसेही मोजावे लागत होते.
अंगावर घालण्यासाठी त्याच्या मापाचे कपडे किंवा शूज शोधणंही कुदरातुल्लासाठी कठीण होतं.
"माझे शूजही टिकत नव्हते. माझं वजन सहन करणं त्यांनाही शक्य होत नव्हतं, त्यामुळं ते फाटून जायचे. तसंच माझे कपडेही फाटायचे."
कुदरातुल्ला म्हणाला की, त्याचे कपडे तयार करण्यासाठी जवळपास नऊ मीटर कापड लागायचं. हाही इतरांसाठी एक थट्टेचा विषय बनला होता.
"मी कुठेही बाहेर जात नव्हतो. कारण लोक माझ्या माघारी माझी खिल्ली उडवत असायचे."
जास्त वजनामुळं त्याच्या आरोग्यावर परिणाम व्हायला लागला होता. त्याला मधुमेह झाला. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप वाढलं. तसंच त्याला उच्च रक्तदाबाचा त्रासही सुरू झाला.
"मला झोपताना डोक्याखाली दोन उशा घ्याव्या लागत होत्या. तसंच अनेकदा तर मला बसून झोपावं लागत होतं," असंही कुदरातुल्ला म्हणाला.
त्यानंतर डॉक्टरांनी त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.
घरातूनच मिळाली प्रेरणा
कुदरातुल्लाचा मोठा भाऊ हेवाद खानही लठ्ठ होता. पण त्यानंतर 110 किलोवरून त्याचं वजन 70 किलोपर्यंत कमी केलं होतं.
त्यामुळं आपणही वजन कमी करू शकतो असा विचार कुदरातुल्लाच्या मनात आला.
त्यानं एका जिमची मेंबरशीप घेतली. एक ट्रेनर लावला. त्यानं कुदरातुल्लाला एक डाएट प्लान दिला. त्यानुसार त्यानं तेलकट पदार्थ, भात, कोल्ड्रींक्स आणि मांस खाणं पूर्णपणे बंद केलं.
अंड्याचा पांढरा भाग, उकडलेलं चिकन ब्रेस्ट, मासे आणि बार्लीचा ब्रेड असा आहार तो घेऊ लागला.
"सुरुवातीला मला आहार कमी करणं कठिण गेलं. कारण मी खूप जास्त खात होतो. पण मी डाएट प्लॅन फॉलो केला. हळूहळू मला त्याची सवय झाली."
"या दरम्यान मी खूप जास्त पाणी प्यायला लागलो होतो."
कुदरातुल्ला दिवसातले पाच तास जिममध्ये घालवायचा. लवकरच त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर दिसायला लागले. त्याला कपडे सैल व्हायला सुरुवात झाली होती.
कुदरातुल्ला 10 महिन्यांत 216 किलोवरून 91 किलोपर्यंत पोहोचला. त्याचं अर्ध्याहून अधिक वजन कमी झालं होतं. तो रोज जवळपास 400 ग्रॅम वजन कमी करत होता.
त्याच्या कंबरेचा आकार आता 86 सेंटिमीटर झाला होता. तर त्याचा बीएममआय 29 होता. म्हणजे अजूनही उंचीच्या तुलनेत त्याचं वजन जास्त होता. पण लठ्ठपणाच्या श्रेणीतून मात्र तो बाहेर आला होता.
लठ्ठपणाची समस्या
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात आठपैकी एक व्यक्ती ही लठ्ठ आहे. त्यामुळं टाईप 2 मधुमेह आणि हृदयरोगाचे धोके वाढतात.
लठ्ठपणाचा परिणाम हाडांचे आरोग्य आणि प्रजनन क्षमतेवरही होऊ शकतो. तसंच त्यामुळं काही प्रकारच्या कॅन्सरचाही धोका वाढू शकतो.
लठ्ठपणामुळं लोकांच्या झोपण्याची किंवा हालचालींची क्षमता कमी झाल्यानं त्यांच्या जीवनाच्या एकूण गुणवत्तेवरही परिणाम होतो.
पण, युकेमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसतर्फे लोकांना जेवण टाळू नये आणि आठवड्याला एक किलोपेक्षा जास्त वजन कमी करू नये असा सल्ला दिला जातो.
युकेमध्ये राहणारे डॉ. इब्राहिम दलिली यांच्या मते, कुदरातुल्लाचं वजन खूप जास्त होतं. त्यामुळं अशा लोकांना दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी कमी कॅलरींचं सेवन करणं फायद्याचं ठरतं."
"जास्त वजनाचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळं त्याच्यासाठी वजन कमी करणं हे जवळपास अनिवार्य होतं."
"कुदरातुल्लानं त्याला पुरेसं प्रोटिन, कॅलरीज आणि व्हिटामीन मिळेल असं डाएट फॉलो केलं होतं. त्यामुळं त्याचं डाएट आणि व्यायाम यामुळं त्याची वजन घटण्याची प्रक्रिया वेगानं झाली," असं दलिली म्हणाले.
आत्मविश्वास अन् आत्मसन्मानही वाढला
कुदरातुल्लानं घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्याचा त्याला झालेला फायदा यानं त्याचे सहा भावंडं आणि आईवडील अत्यंत आनंदी आहेत.
"मी आता कुटुंबासाठी एक पूर्णपणे वेगळा व्यक्ती आहे. मला अत्यंत कमी वयात अनेक आजार झाल्यामुळं त्यांना फार काळजी वाटत होती"
"पण आता ते खूप आनंदी आहेत."
कुदरातुल्ला जीवनातील लहान लहान गोष्टींमध्ये आता आनंद शोधत आहे.
आता तो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू शकतो. अगदी आरामात रिक्षात बसू शकतो एवढंच काय पण क्रिकेटही खेळू शकतो.
"आता माझं जीवन इतर सामान्य लोकांप्रमाणे झालं आहे. त्यामुळं मी आनंदी आहे. आता माझ्या मापाचे शूज शोधणं ही समस्या राहिलेली नाही."
त्याला नर्सिंगचं शिक्षण घेण्याची इच्छा आहे. तसंच नांगरहारमध्ये व्यवसाय करणाऱ्या वडिलांना हातभार लावायचा आहे.
महाविद्यालयात जाण्यापूर्वी आता कुदरातुल्लाला त्याचं कपाट पूर्णपणे रिकामं करायचं असून ते पूर्ण नवीन कपड्यांनी भरून टाकायचं आहे.
"माझे सगळे जुने कपडे आता निरुपयोगी आहेत. ते कोणाला येणार पण नाहीत," असं कुदरातुल्ला आनंदाने म्हणाला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.