झुबीन गर्गच्या मृत्यूनंतर 38,000 गाणी आणि संगिताच्या मालकीचा प्रश्न का उपस्थित झाला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अभिषेक डे
- Role, बीबीसी न्यूज, गुवाहाटी
विशाल कलिता यांच्या आसाममधील घराचं रुपांतर एका खासगी संग्रहालयात झालं आहे. कारण आहे त्यांच्याकडे असलेला म्युझिक कॅसेट्सचा संग्रह.
गेल्या एक दशकाहून अधिक काळ, 30 वर्षांचे विशाल देशभरात प्रवास करत आहेत आणि जुन्या टेप्स विकत घेत आहेत. त्या सर्व त्यांनी गुवाहाटीमधील त्यांच्या घरात काळजीपूर्वक जतन केल्या आहेत.
गेल्या महिन्यात त्यांचा हा संग्रह सर्वसामान्य लोकांसाठी खुला झाला. या संग्रहात जगभरातील संगीतकारांच्या शेकडो सीडी आणि दुर्मिळ पोस्टर्सदेखील आहेत.
मात्र आसाममधीलच झुबीन गर्ग या गायक आणि संगीतकाराची डिस्कोग्राफी (गीतांची यादी, ज्यात ते गाणं कधी प्रदर्शित झालं, संगीत कोणी दिलं इत्यादी यादी असते) त्या संग्रहाला भेट देण्यासाठी बहुतांश लोक येत आहेत.
विशाल कलिता यांच्याकडे असलेला गर्ग यांच्या गाण्यांचा संग्रह
झुबीन गर्ग हे आसाममधील एक अत्यंत प्रभावशाली सांस्कृतिक व्यक्तिमत्व होतं, ते आयकॉन होते. त्यांचा जनमानसावर मोठा प्रभाव होता. गेल्या महिन्यात सिंगापूरमध्ये झुबीन गर्ग यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला, ते दु:खी झाले.
विशाल कलिता यांच्या संग्रहात झुबीन गर्ग यांच्या जवळपास 38,000 गाण्यांचा समावेश आहे. यात अशीही गाणी आहेत जी आज इतरत्र कुठेही सापडत नाहीत, असं विशाल यांचं म्हणणं आहे.
16 सप्टेंबरला झुबीन गर्ग यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच, गर्ग यांनी विशाल कलिता यांच्या घराला भेट दिली होती. ते म्हणाले होते की, कलिता यांच्या संग्रहामुळे त्यांना त्यांच्या काही 'विस्मृतीत' गेलेल्या निर्मितींची आठवण झाली.

फोटो स्रोत, Abhishek Dey
विशाल कलिता आता गर्ग यांच्या चाहत्यांच्या आणि मित्रांच्या प्रचंड नेटवर्कचा भाग झाले आहेत. हे नेटवर्क आता ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांचं काम अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला रॉयल्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
"यातील काही कॅसेट खूपच जुन्या आहेत आणि त्या खराब होऊ शकतात. मला त्यांना पुन्हा लोकांसमोर आणायच्या आहेत," असं ते म्हणतात.
त्यांना तसं करता येईल का?
झुबीन गर्ग यांची अनेक गाणी ऑलनाइन स्वरुपात अपलोड करता येत नाहीत. कारण या गाण्यांचे कॉपीराईट्स म्हणजे मालकी हक्क कोणाकडे आहेत याबद्दल पुरेशी स्पष्टता नाही. निर्माते, वितरक आणि संगीताच्या गुंतागुंतीच्या नेटवर्कमध्ये ते मालकी हक्क विखुरलेले आहेत.
हा फक्त झुबीन गर्ग यांच्यापुरताच प्रश्न नाही. संगीताची मालकी हा जगभरात प्रदीर्घकाळापासून चर्चेत असलेला विषय आहे.
उदाहरणार्थ, 14 वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेल्या टेलर स्विफ्ट यांना त्यांच्या संगीताचे मालकी अधिकार मिळवण्यासाठी त्यांचे अल्बम पुन्हा रेकॉर्ड करावे लागले. तर इतर अनेक संगीतकारांनी त्यांच्या कामावर पूर्ण किंवा अंशत: नियंत्रण ठेवण्यासाठी स्वत:च्या नावानं ते आणले आहेत.
भारतातदेखील संगीताच्या मालकीहक्कांबद्दल वाद आणि तणाव आहे. संगीतकार आणि निर्मात्यांच्या बाजूनं किंवा त्यांना अनुकूल असणाऱ्या कंत्राटांमुळे हा तणाव निर्माण झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
झुबीन गर्ग यांच्या निधनानंतर लगेचच त्यांच्या चाहत्यांना या गुंतागुंतीच्या विश्वाची एक झलक पाहायला मिळाली. त्यांच्या अनेक चाहत्यांनी गर्ग यांचं मायाबिनी रतिर बुकुत हे सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणं जेव्हा लोकप्रिय संगीत स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर शोधण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांना ते गाण तिथून गायब असल्याचं आढळलं. नंतर एका युजरनं ते गाणं अपलोड केलं, मात्र एका आठवड्याच्या आत परवान्याच्या समस्यांमुळे ते गाणं तिथून हटवण्यात आलं.
"गर्ग यांची शेकडो गाणी आहेत, ज्यांचा मालकी हक्क नेमका कोणाकडे आहे हे शोधणं कठीण आहे किंवा त्याबद्दल वाद तरी आहे," असं मानस बरुआ यांनी बीबीसीला सांगितलं. ते चित्रपट निर्माते आहेत आणि गर्ग यांचे मित्र आहेत.
भारतातील कॉपीराईटचे कायदे आणि स्थिती
भारतात कॉपीराईट ॲक्ट, 1957 या कायद्यानं संगीताच्या मालकी हक्कांचं नियमन होतं. यात गीत, संगीत रचना आणि ध्वनी रेकॉर्डिंग यासाठी स्वतंत्र कॉपीराईट्स आहेत, असं बौद्धिक संपदा हक्कांशी संबंधित दिल्लीतील वकील नील मेसन म्हणतात.
गीत आणि संगीताचे 'पहिले मालकी हक्क' किंवा 'पहिले मालक' 'लेखक' असतात. म्हणजेच अनुक्रमे गीतकार आणि संगीतकारांना ते अधिकार असतात. मात्र जेव्हा ध्वनी रेकॉर्डिंगचा विषय येतो, 'तेव्हा त्याचा निर्माता हा मालक ठरतो', म्हणजेच निर्मात्याकडे त्याचे मालकी हक्क असतात, असं मेसन म्हणतात.
हे हक्क असणारे मालक त्यांचे मालकी हक्क हस्तांतरित करू शकतात किंवा तिसऱ्या पक्षाला पूर्णपणे किंवा विभागून परवान्याच्या माध्यमातून हे अधिकार देऊ शकतात. यामुळे जर नीट कागदोपत्री प्रक्रिया झालेली नसेल, तर अनेकदा गुंतागुंतीचं आणि नेमकी स्पष्टता नसलेलं नेटवर्क तयार होऊ शकतं.
झुबीन गर्ग यांची कारकीर्द 33 वर्षांची होती. 52 वर्षांच्या झुबीन गर्ग यांनी 40 हून अधिक भाषांमध्ये आणि बोलीभाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्या काही गाण्यांची मालकी त्यांच्याकडेच आहे. तर 1990 च्या दशकातील आणि 2000 दशकातील अनेक गाण्यांचे मालकी हक्क निर्माते आणि वितरकांकडे आहेत. या गाण्यांसाठी गर्ग यांना रॉयल्टी मिळते.
निर्मात्यांनी या गाण्यांचे कॉपीराईट्स वितरकांना हस्तांतरित केले आहेत, असं बरुआ म्हणतात.
ते म्हणतात, "अनेक दशकं, कोणतेही पैसे न घेता कॉपीराईट्स हस्तांतरित केले जात होते. कॅसेट आणि सीडीशिवाय या गाण्यांच्या निर्मात्यांना त्या संगीतातून पैसे कमावण्याचा इतर कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे ते वितरकांवरच अवलंबून होते."
संगीत क्षेत्रातील आर्थिक संधी आणि मालकी हक्क
मात्र खासगी रेडिओ स्टेशन संगीताचे मालकी हक्क मोठ्या रकमा मोजून विकत घेऊ लागल्यानंतर संगीताशी निगडीत आर्थिक उत्पन्नाच्या नवीन शक्यता खुल्या झाल्या. ऑनलाइन स्ट्रिमिंगमुळे त्यात अनेक पटीनं वाढ झाली.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील संगीताच्या मालकी हक्क किंवा परवान्याशी संबंधित व्यवस्था बरीच विकसित झाली आहे. आता यात लक्ष रॉयल्टीवरून मालकीहक्कावर केंद्रित होतं आहे, असं संगीतविषयक पत्रकार अनुराग तगत म्हणतात.
ते म्हणतात, "ऑनलाइन स्ट्रिमिंग क्रांतीमुळे मालकी हक्क आणि त्यातून भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या आर्थिक संधींचं महत्त्व अधिक स्पष्ट झालं आहे."
गर्ग यांच्या बाबतीत, त्यांच्या असंख्य गाण्यांच्या मालकी हक्काच्या बाबतीत अनिश्चितता किंवा वाद आहेत. त्यांची काही गाणी ऑनलाइन सापडू शकतात. ती काही युजर्सकडून अपलोड केली जातात आणि वारंवार काढूनही टाकली जातात.
तसंच गर्ग यांच्या अनेक जुन्या गाण्यांचं डिजिटायझेशन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे ती गाणी नष्ट होण्याचा धोका आहे.
गर्ग यांची गाणी जतन करण्याचे प्रयत्न

फोटो स्रोत, Getty Images
श्यामंतक गौतम आसामी चित्रपटांचे निर्माते आहेत, तसंच गर्ग यांचे सहकारी आहेत. गर्ग यांनी लिहिलेल्या, गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची यादी तयार करण्यासाठी त्यांनी एक टीम नियुक्त केली आहे.
"गर्ग यांच्या किमान 1,033 गाण्यांची आतापर्यंत आयपीआरएसवर (इंडियन परफॉर्मिंग राईट सोसायटी) नोंदणी झाली आहे. आम्ही त्यांच्या आणखी गाण्यांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहोत," असं गौतम बीबीसीला म्हणाले.
आयपीआरएस ही सरकारची एकमेव अधिकृत संस्था आहे जी संगीताची रॉयल्टी गोळा करते आणि वितरित करते. आयपीआरएसचं म्हणणं आहे की, निर्माते किंवा त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या कामाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी पैसे किंवा मोबदला दिला जाईल याची आम्ही खातरजमा करत आहोत.
गर्ग यांची गाणी आणि मालकी हक्क
"डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये वेगानं वाढ झाल्यामुळे, परवान्याचे विविध मॉडेल, अनेक भागधारक आणि संगीताच्या वापरामुळे, संगीताच्या मालकीहक्काचा माग ठेवणं आणखी गुंतागुंतीचं झालं आहे," असं आयपीआरएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश निगम बीबीसीला म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, गर्ग यांच्या ज्या गाण्यांची नोंदणी त्यांच्याकडे झाली आहे त्यांच्या "मालकी हक्कांचं संरक्षण त्यांच्या मृत्यूनंतर 60 वर्षे केलं जाईल."
हा एक उत्तम उपक्रम आहे. तो अनेक वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता, असं बॉलीवूडचे लोकप्रिय गायक शान यांनी बीबीसीला सांगितलं.
ते म्हणाले, "प्रादेशिक पातळीवर संगीताचे मालकी हक्क ठरवण्यासाठी वितरकांचा माग ठेवणं हे एक आव्हानात्मक काम आहे. मात्र जर ते एक टीम म्हणून तसं करू शकत असतील, तर ते अतिशय उत्तमच आहे."
गर्ग यांच्या गाण्यांचे सर्व निर्माते आसाममधील आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण नव्हतं, असं गौतम म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, खरं आव्हान त्यानंतरच सुरू होतं.
बरुआ म्हणाले, "वितरकांमध्ये परवाने कसे हस्तांतरित होत गेले हे ठरवण्यासाठी आम्ही एक साखळी तयार करत आहोत. गर्ग यांच्या बाबतीत त्यांच्या गाण्यांचे शेवटचे परवाने ज्यांच्याकडे होते किंवा मालकी हक्क ज्यांच्याकडे होते, अशा वितरकांचा एकतर मृत्यू झाला आहे किंवा त्यांचा व्यवसाय बंद पडला आहे."
गर्ग यांच्या प्रकरणामुळे मालकी हक्कांचे प्रश्न सोडवण्याची संधी
गर्ग यांचं प्रकरण म्हणजे अनेक भारतीय गायकांच्या संगीत क्षेत्रातील प्रचंड कामासाठी आणि त्यांच्या कामाच्या मालकी हक्क आणि मोबदल्याशी निगडीत समस्यांसाठी उघडलेली एक खिडकी आहे.
उदाहरणार्थ, एस पी बालसुब्रमण्यम यांनी 40,000 हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांचा दिग्गज संगीतकार इलायाराजा यांच्याबरोबर कायदेशीर वाद झाला होता. लता मंगेशकर यांनी 30,000 हून अधिक गाणी गायली आहेत. कलाकारांच्या रॉयल्टीच्या त्या जोरदार समर्थक होत्या. या मुद्द्यावरून त्यांचे चित्रपट उद्योगातील निर्माते आणि सहकारी कलाकारांबरोबर मतभेद झाले होते.
गर्ग आणि भारतातील त्यांच्या अनेक समकालीन कलाकारांनी त्यांच्या संगीत कंपन्या सुरू करण्याच्या अनेक दशकांच्या आधी दिग्गज भारतीय गायक के जे येसुदास यांनी तसं केलं होतं. 1980 मध्ये त्यांनी ते केलं होतं. यामागची मध्यवर्ती कल्पना तीच होती. त्यांच्या निर्मितीवर, कलाकृतीवर अधिक नियंत्रण मिळवणं.
दरम्यान, गुवाहाटीमध्ये कलिता नवीन जपानी तंत्रज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. गर्ग यांचे जे टेप्स किंवा गाणी ऑनलाइन सापडत नाहीत, त्यांचं डिजिटायझेशन करण्यासाठी त्यांना या तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे.
"मला या दुर्मिळ टेप्सचं सर्वोत्तम दर्जामध्ये डिजिटायझेशन करायचं आहे. झुबीन गर्ग त्यांच्या संगीतातून जिवंत राहतील. त्यांचा एक चाहता म्हणून मी त्यांच्यासाठी एवढंच करू शकतो," असं कलिता म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











