'शिक्षक बाहेर बसून पोहे खात होते, तितक्यात अचानक छत कोसळलं आणि मुलं त्याखाली दबली गेली'

    • Author, मोहर सिंह मीणा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी जयपूरहून

राजस्थानमधील झालावाडमध्ये सरकारी शाळेची इमारत कोसळून सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेनं मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.

या घटनेनंतर मृत मुलांच्या अंत्यसंस्कारात सायकल आणि मोटारसायकलचे टायर जाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

छतावरून दगड आणि तुकडे पडत असल्याची तक्रार करूनही शिक्षकांनी दुर्लक्ष केलं, असा आरोप यापूर्वी जखमी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी केला होता.

दरम्यान, झालावाडचे जिल्हाधिकारी अजय सिंह राठोड यांनी 'बीबीसी हिंदी'शी बोलताना अंत्यसंस्कारात टायर वापरण्यात आल्याचे आरोप फेटाळले आहेत.

शाळेची इमारत कोसळल्याच्या घटनेबाबत त्यांनी सध्या चौकशी सुरू आहे आणि कोणताही हलगर्जीपणा आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

या घटनेनंतर अनेक शिक्षक आणि पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे, तर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका अभियंत्याची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

निलंबित शिक्षकांनीही 'बीबीसी'शी बोलताना आपली बाजू मांडली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

झालावाड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनोहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपलोदी गावात शुक्रवारी (25 जुलै) सकाळी एका सरकारी शाळेच्या दोन खोल्या अचानक कोसळल्या.

या दुर्घटनेत तिघा मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर चार मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. शनिवारी (26 जुलै) सकाळी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सातही मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, या मुलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सायकल आणि मोटरसायकलच्या टायरांचा वापर करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत लिहिलं की, "गरिबीची शिक्षा म्हणजे काय? शाळेत शिकायला जा आणि छत कोसळून मरण येऊ द्या? मरणानंतरही चितेसाठी लाकडं नाहीत, तर मग रबरी टायर जाळा? कधी कधी, काही बोलावंसं वाटतच नाही, फक्त मन खूप उदास होतं."

अंत्यसंस्कारासाठी टायर वापरण्याच्या आरोपावर झालावाडचे जिल्हाधिकारी अजय सिंह राठोड यांनी 'बीबीसी हिंदी'ला सांगितलं, "असं काही झालेलं नाही. आम्ही लाकूड आणि इतर आवश्यक सामान उपलब्ध करून दिलं होतं. तिथं तीन स्मशानभूमी होत्या. एका ठिकाणी चार मुलांचे अंत्यसंस्कार झाले, मी स्वतः तिथं उपस्थित होतो. दुसऱ्या ठिकाणी दोन आणि तिसऱ्या ठिकाणी एका मुलाचा अंत्यसंस्कार झाला. प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते."

ते पुढं म्हणाले, "या भागात पावसाळ्यात लोक चितेच्याजवळ टायर ठेवतात, कारण पावसामुळे लाकूड ओले होतात. पण मी स्वतः त्यांना समजावून सांगितलं आणि सर्व टायर तिथून काढून टाकले होते."

मात्र, अंत्यसंस्कारावेळी टायर वापरण्यात आल्याचे काही फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. या प्रश्नावर सरपंच प्रतिनिधी म्हणाले, "तिथं मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. कोणीतरी सायकलचे एक-दोन टायर टाकले असावेत, जे नंतर तिथून काढण्यात आले."

या दुर्घटनेत जखमी झालेले 11 विद्यार्थी अजूनही जिल्हा मुख्यालयाच्या एसआरजी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मृत आणि जखमी मुलांमध्ये बहुतांश मुलं भिल्ल आदिवासी आणि दलित कुटुंबांतील आहेत.

झालावाडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिषेक चारण यांनी 'बीबीसी हिंदी'शी बोलताना सांगितलं की, शुक्रवारी उशिरापर्यंत मृतदेहांचे पोस्टमार्टम झाले, त्यामुळे शनिवारी सकाळी सातही मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचं खरं कारण समजू शकेल, असं जिल्हाधिकारी अजयसिंह राठोड यांनी सांगितलं.

पीडित मुलांच्या पालकांचं मत काय?

सध्या झालावाडमधील एसआरजी रुग्णालयात 11 मुलांवर उपचार सुरू असून यापैकी तीन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.

अकरा वर्षांची अनुराधा आपल्या दोन मोठ्या बहिणी पायल आणि सुनीता यांच्यासोबत याच शाळेत शिकते. सहावीत शिकणाऱ्या अनुराधाच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे, तर तिची मोठी बहीण पायलचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

अनुराधाचे नातेवाईक संदीप यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात तीन मुलांची प्रकृती खूप गंभीर आहे.

या अपघातात जखमी झालेला रघुवीर भिल यांचा मुलगा बादलवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो तिसरीत शिकतो. रघुवीर यांचे मामा रामगोपाल यांनी 'बीबीसी'ला फोनवर सांगितलं, "बादलच्या कमरेखाली आणि गुडघ्याजवळ दुखापत झाली आहे. तो ना उठू शकतो, ना बसू शकतो."

रघुवीर यांनी आरोप केला की, "सुमारे दीड वर्षापूर्वी आम्ही शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व्हावी म्हणून तक्रार केली होती. पण काहीच झालं नाही."

मुलांनी शिक्षकांना छताबद्दल सांगितलं होतं का?

एसआरजी रुग्णालयात भरती असलेली राजू नावाची मुलगी पाचवीत शिकते. अपघातात राजूच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झालं आहे, असं तिची आई गायत्री भिल यांनी सांगितलं.

गायत्रीबाई म्हणाल्या, "राजूनं सांगितलं की, सर्व मुलं वर्गात होते, तेव्हा छतावरून दगड खाली पडायला लागले. काही मुलं पळून गेली, पण काही जाऊ शकली नाहीत. तितक्यात संपूर्ण छत कोसळलं."

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एका विद्यार्थ्यानं आरोप केला की, "आम्ही बाहेर साफसफाई करत होतो. मुलं आत बसलेली होती. त्यांनी सांगितलं की 'दीदी, छतावरून छोटी छोटी दगडं पडत आहेत'. पण दीदी म्हणाल्या 'काही पडत नाही , तुम्ही बसून राहा' आणि त्यांनी धमकावून सगळ्यांना तिथे, तसंच बसवलं."

त्या विद्यार्थ्यानं पुढं सांगितलं, "शिक्षक बाहेर बसून पोहे खात होते. आम्ही बाहेर होतो, तितक्यात अचानक छत कोसळलं आणि मुलं त्याखाली दबली गेली."

वर्षा नावाच्या एका दुसऱ्या विद्यार्थिनीनेही माध्यमांशी बोलताना आरोप केला की, "आम्ही दीदीला सांगितलं, पण त्यांनी आम्हाला धमकावून परत बसवलं. थोड्याच वेळात दरवाजाजवळ बसलेली काही मुलं पळून गेली, पण जे आत होते ते छताखाली दबले गेले. शिक्षक बाहेर बसून नाश्ता करत होते."

आरोपांबाबत शिक्षकांनी काय सांगितलं?

या दुर्घटनेनंतर झालावाडचे जिल्हा शिक्षणाधिकारी नरसो मीना यांनी शाळेतील पाच शिक्षकांना निलंबित केलं.

यातील पाचपैकी दोन शिक्षकांनी 'बीबीसी'शी फोनवर बोलताना त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळले आहेत.

निलंबित शिक्षक जावेद अहमद म्हणाले, "ही फारच दुःखद घटना आहे. ज्या मुलांना आपण शिकवलं, त्यांच्यासोबत असं घडणं, हा कुठल्याही शिक्षकासाठी आयुष्यातला सगळ्यात दुःखद क्षण असेल."

ते पुढे म्हणाले, "शाळेची वेळ सकाळी साडेसातची आहे. त्या वेळी वर्गांचे कुलूपच उघडले जात होते. काही लोक आरोप करत आहेत की, शिक्षक नाश्ता करत होते, पण तसं काही झालेलं नाही. जिथे प्रार्थना होते ते मैदान पावसामुळे ओलं झालं होतं, म्हणून आम्ही मुलांना त्याच खोल्यांमध्ये प्रार्थनेसाठी बसवतो."

जावेद अहमद त्या क्षणाबाबत सांगताना म्हणाले, "मी प्रार्थना करण्यासाठी वर्गात गेलो, तेव्हा बघितलं की तिथे फार थोडी मुलं होती. विचारलं तर मुलांनी सांगितलं की बाकीची मुलं मैदानात आहेत. मी बाहेर मुलांना बोलवायला निघालो आणि तेवढ्यात काही सेकंदांतच खोल्या जोरात कोसळल्या."

दुसरे निलंबित शिक्षक बद्री प्रसाद यांनी 'बीबीसी'शी फोनवर बोलताना सांगितलं, "घटनेच्या वेळी मी शाळेतच नव्हतो. माझी दुसरीकडे ड्युटी होती, म्हणून मी बाहेर होतो. घटना घडल्यावर मी सकाळी नऊ वाजता शाळेत पोहोचलो."

रविवारी (27 जुलै) शिक्षणमंत्री मदन दिलावर यांच्या निर्देशानंतर शासन सचिव (शिक्षण) कृष्ण कुणाल यांनी झालावाडचे प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी नरसो मीना, मुख्य ब्लॉक शिक्षाधिकारी प्रमोद कुमार बालसोरिया आणि इतर तिघांसह एकूण पाच अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.

त्याचबरोबर, मनोहर ठाण्यातील कनिष्ठ अभियंता जे कंत्राटी पद्धतीने काम करत होते. त्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

खोल्यांची अवस्था आधीपासूनच खराब होती का?

'बीबीसी'ने जिल्हाधिकारी अजयसिंह राठोड यांना विचारलं की, जेव्हा या शाळेचं नाव धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हतं, तर मग दुर्घटना कशी झाली?

कारण राठोड यांनी या इमारतीचं नाव मोडकळीस आलेल्या इमारतींच्या यादीन नसल्याचं म्हटलं होतं.

राठोड यांनी सांगितलं की, ज्या शाळा धोकादायक स्थितीत आहेत, अशा शाळांची यादी त्यांना जिल्हा शिक्षणधिकाऱ्यांकडून मिळते. आणि त्या यादीत या शाळेचं नाव नव्हतं.

जिल्हाधिकारी म्हणाले, "शाळेत काही बिघाड दिसत असेल तर ती माहिती देण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षकांची होती. परंतु, कालही शाळेचा स्टाफ काहीच अडचण नव्हती, असं म्हणत होता."

स्थानिक ग्रामस्थ सांगतात की, शाळेची अवस्था खूपच खराब होती आणि याच कारणामुळे सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांनी या विरोधात आंदोलनही केलं होतं.

या आरोपावर अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिषेक चारण यांनी 'बीबीसी'शी बोलताना सांगितलं, "स्थानिक एसडीओंकडून आमच्याकडे अशा प्रकारची कुठलीही माहिती आलेली नाही. आमच्या नोंदीनुसार 2022-23 मध्ये या शाळेच्या छतांचं वॉटरप्रूफिंग करण्यात आलं होतं. आणि यासाठी एक लाख रुपये खर्च करण्यात आले होते."

इमारत किती जुनी होती?

स्थानिक मनपसर ग्रामपंचायतीच्या सरपंच भगवती बाईंचे पती रामप्रसाद यांनी सरपंच प्रतिनिधी म्हणून सांगितलं की, संपूर्ण पंचायतमध्ये ही पहिली ते आठवीपर्यंतची एकमेव सरकारी शाळा आहे, इथे 72 मुलं शिकत होती.

ही शाळा 1988 मध्ये सुरू झाल्याचे रामप्रसाद यांनी सांगितलं.

त्यांचा दावा आहे की, सातत्यानं पावसामुळे खोल्यांच्या तळाशी जमीन दाबली गेली, ज्यामुळे भिंत आणि छताचे तुकडे कोसळले.

राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना दहा-दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला कंत्राटावर चौथ्या श्रेणीची नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी अजयसिंह राठोड यांनी 'बीबीसी'ला सांगितलं, "सरकारने आमच्याकडून जखमींना मदत देण्यासाठी प्रस्ताव मागितला आहे. गंभीर आणि अंशतः जखमींनाही मदत मिळणार आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.