सर्वात चांगला आंबा कुठला? भारताचा की पाकिस्तानचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नियाज फारुकी आणि तरहब असगर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, दिल्ली आणि मुलतानमधून
भारताचा मलिहाबादी किंवा हापूस आंबा चांगला की पाकिस्तानच्या मुलतानचा आंबा चांगला? परदेशात झडणाऱ्या या चर्चा इथेच थांबत नाहीत बरं का. या चर्चेचा शेवट होतो 'विराट कोहली चांगला की बाबर आझम' यावर दक्षिण आशियातील हे दोन्ही देश खास प्रसिद्ध आहेत आंब्यासाठी.
जगातील चाळीस टक्के आंबा भारतात पिकतो, पण निर्यातीच्या बाबतीत पाकिस्तान आणि भारत जवळपास एकाच पातळीवर आहेत.
हे सगळं बघता फळांचा राजा म्हणवून घेणाऱ्या या आंब्याच्या लागवडीत नेमका कोणता देश आघाडीवर आहे हे जाणून घेण्याच्या भानगडीत पडण्यापूर्वी आम्ही दोन्ही देशातील शेतकऱ्यांशी बोलून घेतलं. त्यांना विचारलं की, त्यांच्या आंब्यामध्ये एवढं काय खास आहे?

फोटो स्रोत, Getty Images
कवी मिर्झा गालिब यांचं आंब्यावर खास प्रेम होतं. त्यांनी एकदा म्हटलं होतं की, आंब्यात फक्त दोन गुण असायला हवेत, एकतर तो गोड असायला हवा आणि दुसरं म्हणजे तो अजिबात कमी पडायला नको.
पण भारताचे 'मँगो मॅन' कलीमुल्ला खान यात भर घालताना म्हणतात, "याच्या भरपूर जाती देखील असायला हव्यात." कारण मलिहाबादमध्ये त्यांचं नाव याचसाठी प्रसिद्ध आहे.
आंब्याच्या विविध जाती निर्माण करणारे कलीमुल्ला खान सांगतात की, चौसा, दशहरी आणि लंगडा या प्रसिद्ध आंब्यांव्यतिरिक्तही इतर जाती आहेत.
यानंतर त्यांनी नावांची गणती सुरू केली. ' हापूस, खासुलखास, गुलाबखास, शमसुल अस्मर, बदरूल अस्मर, महमुदुल अस्मर, अमीन कलान, अमीन खुर्द, सोरखा खलीसपूर, सोरखा मुर्शिदाबाद, सोरखा शहाबाद, कच्चा मीठा, गोल भदैयां, रामकेला, फजरी, हुस्नआरा, रतौल, जर्दालु, बेगमपसंद, गुलाबजामुन..'
दुसरीकडे पाकिस्तानच्या मुलतान शहरातील शेतकरी सोहेल खान बाबर गंमतीने म्हणतात की, लोक मुलतानच्या लोकांशी मैत्री करण्याचं कारणच इथला आंबा आहे.
पण आपण आधी मलिहाबादच्या 'मँगो मॅन' कडून भारतातील आंब्यांविषयी जाणून घेऊया.
तीनशेहून अधिक जाती असलेलं आंब्याचं झाड
अनेक आठवडे वातावरणात चढ उतार असल्यामुळे काळजीत पडलेल्या उत्तरप्रदेशच्या मलिहाबाद येथील 'मँगो मॅन' कलीमुल्ला खान यांच्या जीवाला पावसामुळे गारवा मिळाला.
परंपरेने आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशात यंदा हिवाळ्यातील उष्णता, कडाक्याच्या उन्हाळ्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारठा यामुळे आंब्याच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे.
कलीमुल्ला सांगतात, "1919 मध्ये मलिहाबादमध्ये 1300 प्रकारचे आंबे होते. पण आता कदाचित संपूर्ण उत्तरप्रदेश राज्यात 600 जाती उरल्या असतील आणि कमीही होत चालल्यात "
या बदलांमुळे वयोवृद्ध कलीम खान चिंतेत आहेत. पण त्यांच्या एका एका प्रयोगशील आंब्याच्या झाडाने ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या झाडाविषयी ते म्हणतात, त्यांनी 300 हून अधिक जातींच्या आंब्यांचं उत्पादन केलंय.
हे झाड 120 वर्षांहूनही अधिक जुनं असल्याचं कलीम खान सांगतात. कलीम खान यांनी त्या झाडावर कलमाचे प्रयोग केल्याने जवळपास प्रत्येक फांदीवर विविध प्रकारचे आंबे येतात. ते सांगतात की, "हवामानाचा आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होत असला तरी, या झाडावर यावर्षी 30 हून अधिक जातींचे आंबे आले आहेत "
आणि हे सर्व आंबे एकाच झाडावरचे असून देखील वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे आहेत. या सगळ्यामुळे हे झाड शोभेच्या आणि कृत्रिम झाडासारखं दिसतं. परंतु प्रत्यक्षात मात्र हे झाड लोकांच्या जीभेची चव वाढवण्यासाठी एका व्यक्तीने केलेल्या प्रयोगाचं उदाहरण आहे.
या झाडाच्या मूळ आंब्याचं नावं 'असरारुल मुकर्रर' आहे. कलीम खान सांगतात, हे झाड आहे सोबतच ही बाग आणि जगातील आंब्यांचं महाविद्यालय देखील आहे.
त्यांचे हे प्रयोग येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशी त्यांना आशा आहे.
पण या 'कॉलेज'चे 'प्राचार्य' आता 83 वर्षांचे झालेत आणि सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. पण आजही प्रत्येक क्षणाला त्यांच्या रोपवाटिकेत दूरवरुन आंबाप्रेमी येत असतात आणि त्यांच्या 'आंब्याच्या प्रवासा'बद्दल त्यांना प्रश्न विचारतात.

कलीम खान आंब्याविषयीच्या आपल्या पहिल्या प्रयोगाबद्दल सांगतात की, हा प्रयोग अयशस्वी झाला होता. ज्या ठिकाणी त्यांनी हे पहिलं झाड लावलं होतं ती जागा आजही रिकामीच आहे. एक प्रकारे त्या जागेला कलंकच लागलाय.
पाकिस्तानचा आंबा गोड तर भारताचा आंबा रसाळ
कलीम खान यांच्या रोपवाटिकेत पाकिस्तानमध्ये आढळणाऱ्या आंब्याच्या जाती देखील आहेत. यात अन्वर रतौल, चौसा आणि लंगडा प्रसिद्ध आंब्यांच्या जाती आहेत.
ते सांगतात की, पाकिस्तानच्या सिंधडी आंब्याची प्रशंसा ऐकून त्यांनी ती जात पाकिस्तानातून मागवून आपल्या बागेत लावली.
पण दोन्ही देशांमधील संबंध सामान्य लोकांसाठी तरी सामान्य नाहीयेत. त्यामुळे ती आंब्याची जात नक्की सिंधडी आहे की नाही हे तपासून पाहणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं.
यासाठी त्यांनी लोकांना फोन केले, त्यांच्याकडून माहिती मागवली, इंटरनेटवर अभ्यास केला आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहून खातरजमा केली की, हा आंबा दिसतो कसा किंवा त्याची चव कशी असते.
कलीम खान यांचा मुलगा नाझिम सांगतात, "ही आमच्या प्रतिष्ठेची बाब आहे. यात आम्ही चूक करू शकत नाही."
परंतु हवामानातील बदल, घातक रसायने आणि महागाई या कारणांबरोबरच पिढ्यानपिढ्या कमी होत चाललेले फळबागांचे क्षेत्र, इतर देशांशी स्पर्धा वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला कमाईचे अन्य मार्ग स्वीकारण्यास भाग पडतं.
नाझिम सांगतात, आंब्यासाठी सदैव समर्पणाची गरज असते, पण कमाई होतेच असं नाही. नव्या पिढीला हे आवडत नाही.
ते म्हणतात की, पाकिस्तानचा आंबा गोडव्याच्या बाबतीत चांगला आहे पण भारताचा आंबा रसाळ आणि सुगंधी आहे.
पाकिस्तानी आंब्याची वैशिष्ट्ये काय आहेत?
पाकिस्तानी आंब्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याची माहिती घ्यायला थेट मुलतानला गेलं पाहिजे.
मुलतान आंबा संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ अब्दुल गफ्फार ग्रेवाल यांच्या मते, पाकिस्तानी आंबे जगभरातील आंब्यांपेक्षा चविष्ट आणि रंगाने देखील वेगळे आहेत.
ते सांगतात, "भारत आणि पाकिस्तानात समान जाती आढळत जरी असल्या तरी पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत अनेक नव्या जातींची निर्मिती केली आहे. जसं की, सेंसेशन किंवा चिनाब गोल्ड. पण भारतात आजही जुन्या जातींवरच प्रयोग केले जात आहेत."
ते पुढे सांगतात की, पाकिस्तानात आंब्याच्या सुमारे 200 जाती आढळतात, तर व्यावसायिक वापरासाठी फक्त दहा प्रकारच्या जातींचं उत्पादन घेतलं जातं.
ते सांगतात की, पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध या दोनच राज्यात आंब्यांचं उत्पादन होतं. पाकिस्तानातील 70 टक्के आंबे पंजाबमधून येतात आणि 30 टक्के आंबे सिंधमधून येतात.
"पंजाबमध्ये 470 किलोमीटर क्षेत्रावर आंब्याच उत्पादन घेतलं जातं. यात रहिमयार खान, मुलतान आणि बहावलपूरच्या आसपासच्या भागांचा समावेश आहे."
पाकिस्तानी शेतकरी आंबा लागवडीत कोणते नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहेत?
सोहेल खान बाबर हे मुलतानचे रहिवासी असून वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते आपल्या आंब्याच्या बागा जपत आलेत. हे काम करता करता आज पन्नास वर्ष लोटली.
ते सांगतात "आंब्याच्या बागेची काळजी घेणं म्हणजे स्वतःच्या लेकराची काळजी घेण्यासारखं आहे. झाडावरचे आंबे काढणं ही देखील एक कला आहे. आंबा थोडा जरी जोराने आपटला तरी काळा पडतो."
सोहेल यांच्या बागेत दहा ते पंधरा प्रकारचे आंबे असून यात चौसा, अन्वर रतौल, सिंधडी व्यतिरिक्त इतरही आंब्यांचा समावेश आहे.
त्यांच्या बागेत अशी अनेक झाडं आहेत जी चाळीस वर्षे जुनी आहेत. मोठ्या झालेल्या आंब्यांच्या झाडांची देखील त्यांनी छाटणी केली आहे. पण त्यांनी हे पाऊल का उचललं?
यावर ते सांगतात, त्यांनी आता यूएचडी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय.
"पूर्वी एखादं आंब्याचं झाड वाढायला आणि फळ धरायला जवळपास पाच ते सहा वर्षे लागायची. पण आता त्याच आंब्याचं झाड तुम्हाला तीन वर्षांत मोठ्या झालेल्या झाडासारखं आंब्याचं उत्पादन देतं. शिवाय ही झाडं ही आकारने लहान आहेत."
नवीन आणि आधुनिक पद्धतीने आंब्याचं उत्पादन घेणारे सोहेल खान हा एकमेव शेतकरी नाहीयेत.
गुलाम कादिर हे जलालपूर पीरवालाचे रहिवासी आहेत. त्यांची खासियत म्हणजे ते कमीत कमी खतांचा आणि रसायनांचा वापर करून आंब्याचं उत्पादन काढतात.

गेल्या तीन वर्षांत त्यांनी आपल्या बागेत सेंद्रिय पद्धतीने आंब्याचं उत्पादन घेतल्याचा दावा केलाय.
त्यांनी सांगितलं की, ते खतांचा आणि पाण्याचा जास्त वापर करत नाहीत. "पूर्वी झाडाला जास्त पाणी दिलं की ते पाणी झाडाच्या बुंध्यात साठायचं आणि झाडं जास्त पाणी शोषून घ्यायचं. त्यामुळे फळांवरही वाईट परिणाम व्हायचा. काही ठिकाणी पाण्यामुळे बुरशी देखील लागायची."
"आता आम्ही झाडाभोवती मातीने एक गोल बनवतो, ज्यामुळे बुंध्यात अजिबात पाणी जमा होत नाही. त्यामुळे फळही खराब होत नाही."
पाकिस्तानची 'मँगो डिप्लोमसी'
आजकाल पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ त्यांच्या बहुतांश परदेश दौऱ्यांमध्ये इतर देशांच्या प्रमुखांना आंबे देताना दिसतात. शिवाय ते म्हणतात, 'मी तुमच्यासाठी पाकिस्तानातून उत्तम आंबे आणलेत.'
त्यांच्या या वागण्याला बरेचसे लोक 'मँगो डिप्लोमसी' असं नाव देतायत.

फोटो स्रोत, Getty Images
इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी आंब्यांची भेट देणारे शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पहिलेच पंतप्रधान आहेत का?
तसं बघायला गेलं तर 1968 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्र्यांनी चीन दौऱ्यात अध्यक्ष माओ यांना पाकिस्तानी आंबे भेट दिले होते. ही भेट इतिहासात असाधारण ठरल्याचं चीनच्या अध्यक्षांनी म्हटलं होतं.
झालं असं होतं की, त्याकाळात चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीची चळवळ सुरू होती आणि माओ यांनी हे फळ स्वतः खाण्याऐवजी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवलं.

फोटो स्रोत, Getty Images
चीनला आंब्याची ओळख करून देणारा पाकिस्तान आता या फळाच्या उत्पादनात चीनच्याही मागे आहे. भारत हा जगातील सर्वात आघाडीचा आंबा उत्पादक देश आहे. यात चीन चौथ्या क्रमांकावर तर पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे.
आंब्याच्या बागेचे मालक गुलाम कादीर हे त्यांच्या बागेतील बहुतांश आंबे निर्यात करतात. ते सांगतात की, पाकिस्तानमध्ये मिळणारा
सर्वात उत्तम आंबा पाकिस्तानात मिळतच नाही, तो बाहेर निर्यात केला जातो. त्याची किंमतही पाकिस्तानात मिळणाऱ्या आंब्यांपेक्षा जास्त आहे.
" इरण, संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान, चीन आणि युरोपमध्ये आमचा आंबा सर्वाधिक विकला जातो."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








