बंदिस्त उत्तर कोरियातला बौद्ध धर्म, मुस्काटदाबी आणि तिथली बौद्ध पौर्णिमा

- Author, रिचर्ड किमी
- Role, बीबीसी कोरिया
आज तथागत गौतम बुद्ध यांची जयंती अर्थात बुद्ध पौर्णमा आहे. भारतात वैशाख पौर्णिमेला उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. जगभरात स्थानिक वेळ आणि पारंपरिक प्रथेनुसार बुद्ध जयंती साजरी केली जाते. उत्तर कोरिया दक्षिण कोरिया, म्यानमार, जपान, चीन, थायलॅंड, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, तैवान, श्रीलंका, नेपाळ, भूतान या देशांत बौद्ध धर्मीयांचे प्रमाण लक्षणीय आहे.
एका देशातील बौद्ध धर्मीय दुसऱ्या देशात असलेल्या बौद्ध धर्मातील पवित्र स्थळांना भेट देतात. पण उत्तर कोरियात असलेल्या बौद्ध विहारांना क्वचितच कुणी भेट देत असेल. पण आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने एक बौद्ध भिक्खूंची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांनी उत्तर कोरियातील बौद्ध विहारांना 100 हून अधिक वेळा भेट दिली आहे.
बीबीसी कोरियातील प्रतिनिधीने लिहिलेल्या या लेखातून तुम्हाला त्यांची ओळख आम्ही आज करुन देणार आहोत.
उत्तर कोरियात विहार आहेत का?
उत्तर कोरियात मंदिरं किंवा विहार आणि साधू किंवा भिक्खू आहेत का? इथल्या रहिवाशांच्या मते तर, त्यांनी कधी या देशात मंदिरं अथवा पुजारी पाहिलेच नाहीत.
आमच्या देशात प्रत्येकाला धर्म निवडण्याचा आणि उपासनेचा अधिकार आहे, असा दावा उत्तर कोरियाकडून केला जातो. पण प्रत्यक्षात मात्र इथे धर्माची मुस्कटदाबीच केली जाते.
विशेषतः ख्रिश्चन आणि कॅथलिक धर्मचा दु:स्वास केला जातो. तुलनेनं बौद्ध धर्माविषयी थोडीफार आत्मीयता दिसून येते.
गेल्या 30 वर्षात धर्मप्रसाराच्या कार्यासाठी 100 पेक्षा जास्त वेळा उत्तर कोरियाची वारी करून आलेले महान बौद्ध भिक्खू बिओप्टा आम्हाला याबाबत सांगत होते. बिओप्टा हे दक्षिण कोरियात राहतात.
उत्तर आणि दक्षिण कोरियातील बौद्ध समुदायात संवाद आणि सामंजस्य घडवून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियात एकूण 60 बौद्ध विहार आणि 300 पेक्षा जास्त बौद्ध भिक्खू आहेत. इतकंच नव्हे तर यातील जवळपास 30 भिक्खूंना स्वतः भेटल्याचंही ते सांगतात.
बिओप्टा हे उत्तर कोरियात प्रचलित असलेल्या बौद्ध धर्माचे अभ्यासक आणि निष्णात धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध आहेत.
कोरियाचं उत्तर आणि दक्षिण कोरियात विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र उत्तर कोरियाला 1989 साली भेट देणारे ते पहिले बौद्ध धर्मगुरू होते.

बिओप्टा यांनी उत्तर कोरियाचे तत्कालीन सर्वेसर्वा किम द्वितीय ( किम जॉंग उन यांचे आजोबा) यांचीही दोन वेळा भेट घेतली आहे. उत्तर कोरियात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 30 वर्षांपासून ते वेळोवेळी इथल्या स्थानिक बौद्ध मंदिरांना भेट देत आले आहेत.
प्योंगयांग, किसोंग, गिमगंगसन पर्वत आणि मोहोयांगसन पर्वतातील बौद्ध विहारांमध्ये त्यांचं येणं आता नेहमीचं झालं आहे.
सोल प्रांतात सिओंगबूक गू येथील एका विहारात ते राहतात.
त्यांच्या या निवासात उत्तर कोरियातील मंदिराना त्यांनी दिलेल्या भेटींची कित्येक छायाचित्रे टांगलेली आहेत.
“आधी जेव्हा कोरिया हा एकसंध देश होता तेव्हा एकट्या उत्तर कोरियात जवळपास 540 मंदिरं होती. 1600 भिक्खू आणि 3 लाख 80 हजार बौद्ध धर्माचे उपासक होते. कोरियन युद्धानंतर उत्तर आणि दक्षिण कोरिया असं या खंडाचं विभाजन झालं. यानंतर उत्तरेकडील जवळपास ही सगळी मंदिरं नष्ट केली गेली. कालांतरानं उत्तर कोरियानं सारिओनमधील सिओंगबुलसा, हवांग आणि माऊंट मिहोयांगमधील बोहयेंसा मंदिरांची पुनर्बांधणी केली,” असं धर्मगुरू बिओप्टा यांनी सांगितलं.
लांब केसांचे विवाहित धर्मगुरू आणि भिक्खू
धर्मगुरू बिओप्टा यांच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियातील भिक्खू आणि त्यांच्या चालीरिती दक्षिण कोरियापेक्षा वेगळ्या आहेत. उत्तर कोरियातील भिक्खू हे तुलेनेनं अधिक कडवट आणि पारंपरिक आहेत. तर दक्षिण कोरियातील बौद्ध भिक्खू हे थोडेसे आधुनिक म्हणूनच प्रयोगशीलही आहेत.
दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेकडील भिक्खूंची संख्या नगण्य असल्यांनं त्यांनी त्यांच्या जुन्या परंपरा व चालीरिती कायम ठेवल्या आहेत. या दोन देशांमधील बौद्ध परंपरांमधला सर्वात मोठा फरक आहे तो इथल्या भिक्खूंच्या वस्त्रांमध्ये. दक्षिणेतील भिक्खू हे केशवपन केलेले तर उत्तरेकडील भिक्खू हे लांब केसांची रचना असलेले असतात.
बिओप्टा सांगतात की, "दोन्हीकडील भिक्खूंच्या वेशभूषेतही बरंच अंतर आहे. दक्षिण कोरियातील भिक्खू प्रामुख्याने केशरी वस्त्र परिधान करतात तर उत्तर कोरियातील भिक्खूंंनी लाल रंगाचं वस्त्र गुंडाळलेलं असतं. बिओप्टा यांनी बोहयोंगसा मंदिरातील उत्तर कोरियन भिक्खूंचा एक फोटोही काढून ठेवलेला आहे. त्यात लांब केसांचे भिक्खू लाल वस्त्र गुंडाळलेले दिसून येतात.

उत्तर कोरियातील ही सर्व मंदिरं किंवा विहारे आणि भिक्खूंचं व्यवस्थापन जोसिओन बौद्ध फेडरेशनतर्फे केलं जातं. 26 डिसेंबर, 1946 रोजी या जोसिओन बौद्ध फेडरेशनची स्थापना झाली होती. ही संस्था डेमोक्रॅटिक फ्रंट फॉर द फादरलॅन्ड युनिफिकेशन या राजकीय संघटनेचं आपत्य होती.
नावाप्रमाणेच दक्षिण कोरियाला विरोध हाच त्यांचा एकमेव अजेंडा होता. त्यामुळंच पुढं जाऊन जोसिओन बौद्ध फेडरेशनवर धर्माच्या नावानं राजकीय हालचाली करण्याचे आरोप केले गेले.
मे 1988 ला माऊंट मोहयांग पर्वतावरील बोहयोंगसा मंदिरात जोसिओन बौद्ध फेडरेशननं त्यांची पहिली धर्मपरिषद भरवली होती. त्यानंतर आजतागायत ते देशभरातील कित्येक बौद्ध विहारांमध्ये बुद्ध पौर्णिमेला धार्मिक उत्सव साजरा करत असतात.
2000 च्या दशकापर्यंत उत्तर आणि दक्षिण कोरियातील बौद्ध धर्माचे उपासक एकमेकांच्या संपर्कात होते. 2000 च्या दशकात या दोन देशांमधील राजकीय तणाव वाढू लागला तसा हा परस्परसंवाद आणि देवाणघेवाणही खंंडित झाली.
उत्तर कोरियात विद्ध्वंस झालेल्या माऊंट गूमगॅंग पर्वतावरील सिंगेसा मंदिराची पुर्नस्थापना दक्षिण कोरियातील धर्मगुरूंनी केली होती. तसंच युद्धात पाडल्या गेलेल्या गेसोंंगमधील योंगतोगसा मंदिराची पुनर्बांधणी चोओंटे घराण्यानं पुढाकार घेतल्यावरच झाली होती.
'महिला भिक्खूच दिसत नाही'
धर्मगुरू बिओप्टा सांगतात की,"जवळपास सर्व उत्तर कोरियन भिक्खू हे विवाहित आहेत. बहुतांश भिक्खू इतर नागरिकांप्रमाणे केस वाढवून नेहमीच्या कपड्यांमध्ये वावरतात. बौद्ध भिक्खूंनी मुंडन करून ठरलेली वस्त्रंच फक्त परिधान करावीत, असा सल्ला मी त्यांना वेळोवेळी दिलेला आहे.
ठराविक भिक्खूंनी माझा सल्ला ऐकून त्याची अंमलबजावणी देखील सुरू केलेली आहे. नुकतीच मी भिक्खूंसाठी 200 वस्त्रं उत्तर कोरियात पाठवली आहेत.
बौद्ध मंदिर, विहार आणि भिक्खूंच्या बाबतीत उत्तर व दक्षिण कोरियामध्ये काही प्रमाणात समानता आढळून येत असली तरी एक ठळक फरक बिओप्टांना उत्तर कोरियात गेल्यावर जाणवला.
ते म्हणजे उत्तर कोरियात महिला भिक्खूंच नसल्याचे त्यांना जाणवले.
“मी आजतागायत उत्तर कोरियातील शेकडो बौद्ध विहारांना भेट दिलेली आहे. पण एकदाही महिला भिक्खू माझ्या नजरेस पडली नाही. मला वाटतं इथल्या त्या ठिकाणच्या राजकीय प्रभावाचा हा परिणाम आहे."
"धार्मिक क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी महिलांवर एका अर्थानं अघोषित बंदीच लागू केलेली दिसते,” बिओप्टो नाराजीच्या सुरात सांगत होते.
मूळात उत्तर कोरियाला धर्माचा दुःस्वास आहे. धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य इथे मर्यादित आहे. हे सगळे भिक्खू म्हणजे उत्तर कोरियानं निर्माण केलेला दिखावा असून प्रत्यक्षात हे भिक्खू सत्ताधारी डाव्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. म्हणूनच या भिक्खूंना धार्मिक विधी आणि प्रथा परंपरांचं पुरेसं ज्ञान नाही, असा आरोपदेखील काही जणांकडून केला जातो.

दक्षिण कोरियाच्या सरकारनं यासंबंधी उत्तर कोरियातील मानवाधिकाराच्या उल्लंघनाची श्वतेपत्रिकाच प्रसिद्ध केली होती. या श्वतेपत्रिकेतील दाव्यानुसार हे भिक्खू खरंच मंदिरात धार्मिक विधी पार पाडणारे उपासक आहेत, यावर उत्तर कोरियातील नागरिकांचाच विश्वास नाही.
सरकारंही या बौद्ध मंदिरांकडं धार्मिक स्थळ म्हणून नव्हे तर ऐतिहासिक वास्तू आणि वारसा म्हणूनच पाहत असल्याची कुजबुज लोकांमध्ये सुरू असते.
उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात पलायन केलेल्या एका पीडितेची साक्षही या श्वेतपत्रिकेत नोंदवलेली आहे. त्यानुसार जे काही धार्मिक उत्सव इथे साजरे केले जातात त्यामागचा सरकारचा उद्देश जगासमोर उत्तर कोरियाची खोटी उदारमतवादी प्रतिमा उभा करणे, हा असल्याचं म्हटलं गेलंय.
प्रत्यक्षात इथलं सरकार धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी नव्हे तर धर्माच्या मुस्कटदाबीसाठी काम करत असल्याचा आरोपही यातून करण्यात आलाय.
या सगळ्या वादावर प्रतिक्रिया देताना बिओप्टा म्हणतात, "हे उत्तर कोरियातील भिक्खू आमच्या तुलनेत फारच मवाळ आहेत. ते पार पाडत असलेले धार्मिक विधीसुद्धा फक्त दाखवण्यापुरते असतात. या देशासाठी ही मंंदिरं म्हणजे सांस्कृतिक वारसा आहेत."
"धर्माची त्यात काही विशेष भूमिका नाही. हे भिक्खू म्हणजे हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सरकारनं नेमलेले सैनिक आहेत. त्यामुळे धार्मिक कट्टरतेचा लवलेशही त्यांच्यात दिसत नाही. एका सामान्य संसारिक व्यक्तीप्रमाणेच ते आयुष्य जगतात. रोजच्या कामासाठी कार्यालयात जात असल्याप्रमाणे ते मंदिरात जातात. त्यांच्या धार्मिक अस्मिता अगदीच बोथट असलेल्या पाहायला मिळतात,” बिओप्टा सांगतात.
“बुद्ध जयंतीला एकदा मी माऊंट मोहयांगमधील बोहयोंगसा मंदिराला भेट दिली. तेव्हा तिथलं वातावरण आणि लोकांचा वावर बघून हा धामिक उत्सव कमी, सरकारी कार्यक्रमच जास्त असल्याची भावना माझ्या मनात आली,’’ असं ते सांगत होते.
उत्तर कोरियाला पाठिंबा - नूडल उत्पादनाचा धडाका
1992 साली धर्मगुरू बिओप्टांनी उत्तर आणि दक्षिण कोरियातील वाढता तणाव व हिंसा कमी करण्यासाठीसुद्धा एक बौद्ध संघटना स्थापन केली.
या संघटनेंतर्गत या दोन देशांनी एकमेकांविरोधात लढण्यापेक्षा एकमेकांच्या सोबतीने आव्हांनांचा सामना करावा, यासाठी प्रयत्न केले गेले. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही देशांना भेडसावत असलेल्या अन्नटंचाईच्या समस्येवर सामाईक तोडगा काढला गेला.
याशिवाय बिओप्टांनी 1997 ला साऊथ ह्वांग प्रांतात गोअमगॅंग नूडल्स फॅक्टरची तर 2006 साली प्योंगयांगला गूमगॅंग ब्रेड फॅक्टरीची स्थापना केली. उत्तर कोरियातील स्थानिक लोकांना याची फार मदत झाली.
"1998 सालापासून दर महिन्याला आम्ही तब्बल 60 टन अन्न दक्षिण कोरियातील इंचोअन बंदरातून उत्तर कोरियातील नाम्पो बंदराकडे पाठवतो. यातून रोज सात हजार लोकांच्या जेवणाची सोय केली जाते,’’ असं बिओप्टा सांगत होते.
पण 2010 ला दक्षिण कोरियाच्या सरकारने उत्तर कोरियावर निर्बंध लादल्यामुळे आता उत्तर कोरियाला जाणं बिओप्टांना शक्य होत नाही. या दोन देशांमधील तणाव लवकरच निवळून संंवाद पुन्हा होईल.
जेणेकरून मला पुन्हा उत्तर कोरियात जाता येईल. अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कारण उत्तर कोरियातील मंदिर आणि एकूणात बौद्ध धर्माचं पुनरुत्थान करणं हा माझा उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“दोन्ही देश उपासमारीसारख्या गंभीर समस्यांनी त्रस्त असताना राजकीय आणि लष्करी वाद वाढवून त्यात संसाधनं खर्ची घालणं कोणालाही परवडणारं नाही. उलट आपापसातील वाद विसरून या समान शत्रूचा पाडाव या दोन देशांनी एकत्र येऊन केला पाहिजे. गोअमगॅंग नूडल फॅक्टरी सारखे परस्पर सहकार्यावर आधारित प्रकल्प पुन्हा सुरू झाले पाहिजेत,” असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
बिओप्टा यांनी 1965 साली सोंगनिसान पर्वतातील बिओपजुसा विहारात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी डोंग्गुक विद्यापीठातून भारतीय तत्त्वज्ञानात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. 1996 साली तत्त्वज्ञान याच विषयात क्लेटन विद्यापीठातून डॉक्टरेटही मिळवली.
पुढे जाऊन त्यांनी व्हिएतनाम युद्धात सुद्धा भाग घेतला. जगभरातील जवळपास प्रत्येक देशात अंदाजे 10 नवे बुद्धविहार त्यांनी उभारले आहेत. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी व्हाईट हाऊस आर्मीची देखील स्थापना केलेली आहे.
इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीत बिओप्टांनी अनेक महत्त्वपूर्ण पदं भूषवली. जोगयो घराण्याच्या निगराणी खात्यापासून इनहे विहाराच्या मठाधिपती, डोंग्गुक विद्यापीठाच्या जिओंग्गक केंद्राचे प्रमुख, जोगयो घराण्याच्या मंत्री परिषदेत सदस्य ते थेट इनहे मठाचे सर्वेसर्वा अशा सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी इमाने इतबारे पार पाडल्या. या अभूतपूर्व कामगिरीमुळेच त्यांना सर्वश्रेष्ठ बौद्ध भिक्खू म्हणून नावाजलं जातं.











