उपासमारीने जीव सोडणारी मुलं आणि त्यांना जगवण्यासाठी धडपडणारं ‘हे’ हॉस्पिटल

BBC/Imogen Anderson

फोटो स्रोत, BBC/Imogen Anderson

    • Author, योगिता लिमये
    • Role, बीबीसी न्यूज, जलालाबाद

(इशारा : या बातमीतला काही तपशील त्रासदायक असून तुम्हाला विचलित करू शकतात.)

“हे दिवस म्हणजे जणू काही कधीही न संपणारी दु:स्वप्नांची मालिका आहे. माझ्यावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय. स्वतःची मुलं डोळ्यांदेखत मरताना बघावं लागण्यामागची वेदना काय असते, याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही,” असं अमिना सांगत होती.

अमिनानं आपली 6 मुलं गमावली आहेत. तिचं एकही मूल 3 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकलेलं नाही. आताच्या घडीला तिचं आणखी एक बाळ जिवंत राहण्याची धडपड करतंय.

बिबी हजीरा 7 महिन्यांची आहे. पण तिला बघून वाटतं की ती अगदीच नवजात अर्भक आहे. इतकी ती लहान दिसते. अतिशय कुपोषित अवस्थेतील बिबी हजीरा जलालाबाद हॉस्पिटलच्या बेडवर निपचित पडलेली आहे. पूर्व अफगाणिस्तानच्या नंगारहर प्रांतात हे जलालाबाद हॉस्पिटल आहे‌.

“गरिबीमुळे आज माझी मुलं मरायला टेकली आहेत. अन्नाविना कुपोषित झालेल्या माझ्या मुलांना सुका पावाचा तुकडा आणि पाण्याशिवाय दुसरं काही मी देऊ शकत नाही. पोरांना खायला घालायाची माझी ऐपत नाही,” अमिना हे सांगताना अक्षरशः धाय मोकलून रडत होती. आपल्या मुलांना वाचवू न शकण्याची हतबलता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती.

दुर्दैव म्हणजे अमिना ही अशी काही एकमेव अभागी आई नाही. या प्रांतात हजारो पालकांची अशीच हतबल अवस्था आहे. अन्न - पाणी आणि उपचाराविना त्यांची लेकरं त्यांच्या डोळ्यांदेखत हालहाल होऊन मरत आहेत.

हा भयाण शांतात पसरलेल्या हॉस्पिटल वॉर्डातील 7 बेड वर 18 लहान मुलं मरणासन्न अवस्थेत निपचित पडून आहेत.

फोटो स्रोत, BBC/Imogen Anderson

फोटो कॅप्शन, या भयाण शांतता पसरलेल्या हॉस्पिटल वॉर्डातील 7 बेड वर 18 लहान मुलं पडून आहेत.

अफगाणिस्तानमध्ये आजघडीला बिबी हजीरासारखीच तब्बल 32 लाख लहान मुलं उपासमारीने ग्रस्त आहेत. लहान मुलांमधील तीव्र कुपोषणाच्या समस्येनं हा देश पोखरून निघालाय. ही फक्त आजचीच समस्या नाही. मागच्या 40 वर्षांपासून सतत चालणाऱ्या युद्धामुळे हा देश अक्षरशः भरडून निघालय. त्यात भीषण गरिबीची समस्या या आगीत तेल ओतण्याचं काम करते आहे. 3 वर्षांपूर्वी तालिबानने या देशाचा ताबा घेतल्यापासून तर या समस्येनं आणखी उग्र रूप धारण केलंय.

युद्ध, गरिबी आणि भूकबळी ही अफगाणिस्तानसाठी नवी समस्या नसली तरी आजघडीला असणारी परिस्थिती अभूतपूर्व म्हणता येईल इतकी भीषण झालेली आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

32 लाख बालकं अन्नपाण्यावाचून तडफडत आहेत, याची कल्पनाही कोणाला करता येणार नाही. पण परिस्थिती किती भीषण आहे याचा एक अंदाज आपल्या या एका हॉस्पिटलमधील या वॉर्डमध्ये घडणाऱ्या घटनांमधून लावता येईल.

हॉस्पिटलच्या या वॉर्डमध्ये एकूण 7 बेड्स आहेत. या 7 बेड्सवर 18 आजारी लहान मुलं अक्षरशः कोंबली गेलेली आहेत. आणि ही गर्दी काही फक्त आजची नाही. रोजच इतक्याच संख्येनं इथे मरणासन्न अवस्थेतील लहान मुलं उपचारासाठी दाखल केली जातात. ही बालकं इतकी कुपोषित आणि कृश आहेत की वेदनेमुळे रडायची अथवा ओरडायची सुद्धा त्यांच्यामध्ये ताकद नाही. त्यामुळे या वॉर्डमध्ये एक भयाण शांतता पसरलेली आहे. मरणाची चाहूल देऊ पाहणारी ही शांतता अधूनमधून फक्त पल्स रेटचा मॉनिटर करत असलेल्या बीपमुळे भंग होते.

या लहान मुलांना वेदना कमी व्हावी म्हणून गुंगीचं औषधही दिलं गेलं नाही. ना त्यांना ऑक्सिजन मास्क लावले गेलेत. ही मरणासन्न लहान मुलं अजून तरी जिवंत आहेत. ती झोपीही गेलेली नाहीत आणि पूर्णपणे जागीही नाहीत. फक्त अर्धमेल्या अवस्थेत निपचित पडलेली आहेत. कुठलंही लहान मुलं करेल असा आवाज किंवा हालचाल ते करताना दिसत नाहीत. कारण तितका जीवच त्यांच्याच उरलेला नाही.

बिबी हजीराच्याच बेडवर आणखी एक मुलगी आहे ती म्हणजे सना. सना 3 वर्षांची आहे. जांभळ्या रंगाचा सदरा घातलेली सना आपल्या हातानेच स्वतःचा चेहरा झाकून निपचित पडली आहे. काही महिन्यांपूर्वीच आपल्या बाळाला म्हणजेच सनाच्या लहान बहिणीला जन्म देताना प्रसूतीदरम्यान सनाची आई मरण पावलेली आहे. त्यामुळे तिची काकू लैला सनाचा सांभाळ करते. लैला हळूवारपणे वेदनेनं विव्हळत निपचित पडलेल्या सनाला गोंजारते आहे. तिचा हात आपल्या हातात धरून तिची 7 बोट आम्हाला दाखवते. लैलानं आत्तापर्यंत स्वतःची 7 मुलं उपासमारीमुळे गमावलेली आहेत.

बाजूच्याच बेडवर 3 वर्षांचा इलहाम पडलेला आहे. त्याच्याकडे पाहिलं असता त्याचं वय 3 वर्षांपेक्षा बरंच कमी भासतं इतकी त्याची शरीराची वाढ खुंटलेली आहे. चेहरा अगदी निस्तेज आणि कृश शरीर असहाय्य अवस्थेत पडून आहे. तीन वर्षांपूर्वी त्याची 2 वर्ष वयाची बहिण कुपोषणामुळे मेली.

आणखी एका बेडवर ठेवलेल्या अवघ्या एक वर्षाच्या आस्माकडे तर बघवलंही जात नाही. तिची अवस्था बघून पाहणाऱ्यालाच वेदना होतील. तांबूस पिंगट रंगाचे तिचे डोळे खरं तर भलतेच चमकदार आहेत. त्यात तिच्या लांबलचक पापण्या शोभून दिसल्या असत्या. पण आता ती सताड डोळे उघडे ठेवून फक्त शून्यात बघत बसलीये. तिचे ते डोळेही लुकलुकत नाहीत. तिच्या इवल्याश्या चेहऱ्याचा बहुतांश भाग ऑक्सिजन मास्कने झाकलेला आहे. त्यातून ती कसाबसा श्वास घ्यायचा प्रयत्न करते आहे.

 लहानग्या आस्माचं शरीर सेप्टिक शॉकमध्ये गेलेलं आहे.

फोटो स्रोत, BBC/Imogen Anderson

फोटो कॅप्शन, लहानग्या आस्माचं शरीर सेप्टिक शॉकमध्ये गेलं होतं. काही काळानंतर तिचा मृत्यू झाला.

आस्माच्या बाजूला उभे राहिलेले डॉक्टर सिकंदर घनी सांगतात, “आस्माचा जीव वाचणं आता अवघड आहे. तिचं इवलसं शरीर सेप्टिक शॉकमध्ये गेलेलं आहे.” डॉक्टर घनींना आपली हतबलता लपवणं अवघड जात होतं.

इतक्या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीतही तिथल्या खोलीत एक निरव शांतता परसलेली होती. तिथल्या परिचारिका आणि आया मुलांची सुश्रुषा करण्यात व्यस्त होत्या. सगळेच कार्यमग्न दिसत होते. पण अचानक सगळं थांबलं. सगळ्यांचे चेहरे एकसाथ पडले आणि मुद्रा गंभीर झाली.

आस्माची आई नसीबा धाय मोकलून रडू लागली. कसाबसा तिने आपला पदर पुसला. खाली वाकत आपल्या मुलीचं चुंबन घ्यायला सरसावली. आपल्या मुलीला होणारी वेदना आता त्या आईला पाहवत नव्हती.

“असं वाटतंय की माझ्या मुलीचा जीव हळूहळू तिच्या शरीरातून निघून जात आहे. तिला असं वेदनेनं विव्हळताना बघणं मला आता सहन होत नाही,” नसीबा रडवेल्या सुरात बोलत होती. नसीबानं आधीचं तिची 3 मुलं आजारपणात गमावली आहेत. “माझा नवरा रोजंदारीचं काम करतो. ज्या दिवशी काम मिळेल त्या दिवशीच फक्त आम्हाला खायला मिळतं. नाहीतर उपाशीच झोपावं लागतं,” नसीबा सांगत होती.

डॉक्टर घनी यांनी आम्हाला आस्माची प्रकृती गंभीर असून कुठल्याही क्षणी तिला आता हृदयविकाराचा झटका येईल, असं सांगितलं. आम्ही ती खोली सोडली. काही वेळातच संदेश आला की आस्मा मेली.

या एका रूग्णालयात मागच्या सहा महिन्यात 700 लहान मुलांचा मृत्यू झालाय. म्हणजे सरसरी रोज 3 लहान मुलं इथे जीव सोडत आहेत. तालिबान सरकारच्या आरोग्य विभागाची ही अधिकृत आकडेवारी आहे. हा आकडा चक्रावणारा आहे. पण जागतिक बँक आणि युनिसेफ पुरवत असलेल्या निधीमुळे सुरू असलेलं हे रुग्णालय नसतं तर हा आकडा आणखी कितीतरी पटीने जास्त असला असता.

2021 च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजेच तालिबाननं सत्ता हस्तगत करण्यापूर्वी जी काही परकीय मदत यायची ती सरळ सरकारी तिजोरीत जमा व्हायची. सरकार मग सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये हा निधी गुंतवत असे.

पण तालिबाननं सत्ता हस्तगत केल्यानंतर पाश्चात्त्य जगानं अफगाणिस्तानवर आर्थिक निर्बंध लागले. त्यामुळे अफगाणिस्तानला पोहोचवली जाणारी मदत व रसद थांबली. इथून अफगाणिस्तानमधली आरोग्यसेवा कोसळायला सुरुवात झाली. नाही म्हणायला काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी मदत म्हणून थोडा पुढाकार घेत निधी पुरवला. पण तो अगदी तोकडा आणि तात्पुरत्या स्वरूपाचा होता.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

जगात आजघडीला इतक्या सगळ्या उलथापालथी होत आहेत की अफगाणिस्तानकडे कोणाचं लक्षही जात नाही. अफगाणिस्तानला पुरवली जाणारी मदत व निधी फार कमी केला गेलाय. त्यात तालिबान सत्तेत आल्यामुळे विशेषतः महिलांवर निर्बंध लादण्याच्या त्यांच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय देणगीदार आता अफगाणिस्तानला मदत पुरवण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे मदतकार्यासाठी पुरवला जाणारा परकीय निधीचा रोख थंडावला आहे.

“गरिबी आणि कुपोषणाची समस्या तर आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे. सततच्या पूर आणि हवामान बदलासारख्या आपत्तींमुळे अफगाणिस्तानची स्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. आंतरराष्ट्रीय देणगीदारांनी अशा कठीण समयी खरं तर मदतीचा ओघ वाढवला‌ पाहिजे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत राजकीय आणि वैचारिक मतभेद मदतीच्या आड येता कामा नयेत,” अशी अपेक्षा तालिबान सरकारचे प्रवक्ते हमब्दुल्ला फितरत यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केली.

मागच्या तीन वर्षात आम्ही अफगाणिस्तान मधील विविध आरोग्य केंद्रांना भेट दिली आहे. इथली परिस्थिती वरचेवर आणखी बिकट होत चालली आहे. आरोग्य केंद्राला दिलेल्या प्रत्येक भेटीत आम्ही तिथे लहान मुलं मोठ्या संख्येनं मरताना पाहिली.

पण वेळीच जर योग्य उपचार मिळाले तर या मुलांचा जीव वाचू शकतो, हेही आम्ही पाहिलं. बिबी हजीराला जेव्हा पहिल्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिची प्रकृती अतिशय खालावलेली होती. आता तिची प्रकृती बऱ्यापैकी सुधारलेली असून तिला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्जदेखील मिळाल्याची गोड बातमी डॉक्टर घनी यांनी आम्हाला नंतर फोनवर दिली.

“जर पुरेशी औषधं, सोई सुविधा आणि मनुष्यबळ मिळालं तर आम्ही मोठ्या प्रमाणात या मुलांचा जीव वाचवू शकतो. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कामाप्रती निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही सातत्यानं काम करत आहोत. पण आणखी वेगाने आणि प्रभावी काम करून जास्तीत जास्त मुलांचा जीव वाचवणं हाच आमचा उद्देश आहे. कारण मला सुद्धा मुलं आहेत. जेव्हा एखादं मुलं मरतं तेव्हा आम्हाला सुद्धा वेदना होतात. त्या पालकांच्या मनाला किती वेदना होत असतील हे मी समजू शकतो. त्यामुळे या मुलांना वाचवण्यासाठी आम्ही दिवस - रात्र एक करत आहोत,” डॉक्टर घनी आम्हाला पोटतिडकीने सांगत होते.

6 महिन्यांची उमराह हॉस्पिटलमध्ये आईसोबत असताना काढलेला फोटो. दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, BBC/Imogen Anderson

फोटो कॅप्शन, 6 महिन्यांची उमराह हॉस्पिटलमध्ये आईसोबत असताना काढलेला फोटो. दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला.

कुपोषण अथवा उपासमार हे या लहान मुलांच्या मृत्यूचं एकमेव कारण नाही. टाळता येण्यासारखे आणि उपचाराने बरे होऊ शकणाऱ्या आजारांमुळेही अफगाणिस्तानमधील लहान मुलं मारली जात आहेत.

जलालाबाद रूग्णालयातील कुपोषित बालकांच्या वार्डला लागूनच अतिदक्षता विभाग आहे. या अतिदक्षता विभागात सहा महिन्यांची उमराह न्यूमोनियावर उपचार घेत आहे. रुग्णसेविका सलाईन लावायला जाते तेव्हा उमराह मोठा हंबरडा फोडताना ऐकू आली. बाजूलाच तिची आई नसरीन बसलेली आहे. आपल्या मुलीला वेदनेनं विव्हळताना बघून आईलाही अश्रू आवरत नाहीत.

“तिच्या जागी मी मेले तर बरं होईल, अशी प्रार्थना मी देवाला करते. मला फार भीती वाटते आहे,” नसरीन आमच्याशी बोलताना म्हणाली. दोन दिवसांनी आम्ही पुन्हा रुग्णालयाला भेट दिली असता उमराहचा मृत्यू झालेला होता.

आता हे वृत्तांन फक्त जे रूग्णालयात दाखल होऊ शकले त्यांचं आहे. रूग्णालयापर्यंत पोहचू न शकणाऱ्यांची संख्या यापेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे. रूग्णांचा ओढा आणि रुग्णालयाची क्षमता याचं गुणोत्तर इतकं व्यस्त आहे की 5 आजारी बालकांपैकी (ज्यांच्यावर तातडीनं उपचार होणं अत्यावश्यक आहे) फक्त एकालाच दाखला मिळू शकतो. बाकीच्या 4 बालकांवर उपचारदेखील केले जाऊ शकत नाहीत.

रूग्णालयात रूग्णांची गर्दी इतकी आहे की आस्मा मेल्यानंतर अक्षरशः पुढच्या क्षणाला आलिया नावाची अवघ्या 3 महिन्यांची अर्भक बालिका तिच्या जागी दाखल करावी लागली. आस्मा नुकतीच मेली होती. आस्मा मेल्याचा धक्काही नीट बसलेला नसताना तिचा मृतदेह हलवून बेडवरील तिच्या अर्ध्या जागेवर आलियाला दाखल करावं लागलं. तातडीने उपचारांची गरज असलेल्या अती गंभीर रूग्णांचा लोंढा सतत येऊन धडकत राहतो. त्यामुळे मेलेल्यांसाठी दु:ख करून घेण्याचाही वेळ इथे कोणाला मिळत नाही. पटकन मृतदेह बाजूला करत नवीन रूग्णाला जागा रिकामी करून देण्याची तयारी सुरू होते.

एकूण 5 प्रांतासाठी जलालाबाद हे इथलं एकमेव रुग्णालय आहे. तालिबान सरकारच्या आकडेवारीनुसार इथे 50 लाख लोक राहतात. एवढ्या लोकांसाठी एक रुग्णालय उपलब्ध आहे. त्यात भर म्हणजे मागच्याच वर्षी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या 7 लाख निर्वासितांची परत अफगाणिस्तानात हकालपट्टी करण्यात आली‌. यातले बहुतांश निर्वासित इथल्याच नंगारहर भागात आश्रयाला आलेले आहेत.

रुग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसराची आम्ही पाहणी केली. संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिकृत आकडेवारीनुसार अफगाणिस्तान मधील 5 वर्षांखालील 45 % लहान मुलं ही कुपोषित आहेत. हा झाला आकडेवारीचा भाग. प्रत्यक्षात आम्ही इथल्या वसाहतींमध्ये गेलो असता जमिनीवरील परिस्थिती या कागदांवरील भयाण आकडेवरीपेक्षाही बिकट होती. अफगानिस्तामधील जवळपास अर्ध्या मुलांची उंची व वजन चिंताजनक म्हणता येईल इतकं कमी आहे. उपासमारीमुळे या मुलांची वाढ खुंटली आहे.

रोबिनाला 2 वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव मोहम्मद. ज्या वयात मुलं चालायला लागतात तिथे हा चिमुकला मोहम्मद 2 वर्ष पूर्ण झाल्यावरही अजून स्वतःच्या पायांवर उभाही राहू शकत नाही. उंची आणि बांध्यावरूनही तो 2 वर्षांपेक्षा बराच लहान भासतो.

रोबिनाला भीती आहे की आपला मुलगा मोहम्मद हा कधीच चालू शकणार नाही.

फोटो स्रोत, BBC/Imogen Anderson

फोटो कॅप्शन, रोबिनाला भीती आहे की आपला मुलगा मोहम्मद हा कधीच चालू शकणार नाही.

“पुढच्या तीन ते सहा महिन्यात मोहम्मदला चांगले वैद्यकीय उपचार मिळाले तर सगळं काही ठीक होईल असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. पण आम्ही इथे त्याच्यासाठी खायला अन्न आणून देऊ शकत नाही. उपचारासाठी पैसे कुठून आणू?” आर्त स्वरात रोबिनानं केलेल्या सवालाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं.

मागच्याच वर्षी तिला आणि तिच्या कुटुंबाला पाकिस्तान मधून माघारी परतावं लागलं. आता ते शेख मिसरी भागातील एका दुष्काळी व भणंग वस्तीत राहतात. जलालाबाद रुग्णालयापासून जवळच त्यांचं दगडवीटांचं कच्चं घर आहे.

“माझा मुलगा कायमचा विकलांग होईल आणि तो कधीच स्वतःच्या पायांवर चालू शकणार नाही या भीतीने माझा जीव खालीवर होतो,” रोबिना सांगते.

“पाकिस्तानमध्ये असतानाही आमचं आयुष्य खडतरच होतं. पण तिथे किमान हाताला काम होतं. माझा नवरा रोजंदारीवर कामाला जातो. इथे अफगाणिस्तानात कामंच मिळत नाही. पाकिस्तानमध्ये असतो तर कदाचित आमच्या मुलावर उपचार करू शकलो असतो,” रोबिना आपली हतबलता आमच्या जवळ मांडत होती.

शेख मिसरी भागातली बहुतांश घरं ही माती, दगड व विटांनी बांधलेली कच्च्या स्वरूपाची आहेत.

फोटो स्रोत, BBC/Imogen Anderson

फोटो कॅप्शन, शेख मिसरी भागातली बहुतांश घरं ही माती, दगड व विटांनी बांधलेली कच्च्या स्वरूपाची आहेत.

उपासमारीमुळे शरीराची अपरिमित हानी होते. फार काळ पुरेसं अन्न आणि आवश्यक उपचार मिळाले नाहीत तर कायमचं अपंगत्व येऊ शकतं. त्यानंतर मग कशाचाही फायदा होत नाही. शरीराचं झालेलं नुकसान कुठल्याही उपचारानं भरून निघू शकत नाही, असं युनिसेफचा एक अहवाल सांगतो.

“अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे आधीच बारा वाजलेले आहेत. ही लहान मुलं म्हणजे उद्याचा अफगाणिस्तानचं भविष्य असणार आहेत. अफगाणिस्तानचं वर्तमान तर आज सगळ्यांसमोरच आहे. पण ही लहान मुलंही उद्या जाऊन विकलांग झाली तर भविष्यही अंधकारमय होऊन जाईल,” डॉक्टर घनींनी या शब्दात परिस्थितीची तीव्रता समजावून सांगितली.

अजूनही जर उपचार आणि चांगला आहार मिळाला तर मोहम्मद कायमचा अपंग होण्यापासून वाचू शकतो.

लहान मुलांना पोषण आहार पुरवणाऱ्या अनेक योजना आधी अफगाणिस्तानात राबवल्या जायच्या. परकीय मदतीमुळे या योजना चालू शकल्या. पण गेल्या काही काळात इथल्या राजकीय परिस्थितीमुळे ही मदत थांबवली गेलेली आहे. त्यामुळे या योजनाही हळूहळू बंद पडत आहेत. लहान मुलांना पोषण आहार पुरवायला पुरेसा निधीच उपलब्ध नाही.

फोटो कॅप्शन : सरदार गुल सांगतात की अन्नाची पाकिटे जी वाटली गेली त्यामुळे छोटा मुलगा मुजिबला फार मदत झाली. (मुजिब त्यांच्या मांडीवर बसलेला आहे.)

फोटो स्रोत, BBC/Imogen Anderson

फोटो कॅप्शन, सरदार गुल सांगतात की अन्नाची पाकिटे जी वाटली गेली त्यामुळे छोटा मुलगा मुजिबला फार मदत झाली. (मुजिब त्यांच्या मांडीवर बसलेला आहे.)

शेख मिसरीतीलच आणखी एका अरूंद गल्लीत आम्ही कुषोषणग्रस्त मुलांच्या घरी भेटी दिल्या. त्यांच्या पालक व कुटुंबीयांशी गप्पा मारल्या.

सरदार गुल यांना दोन मुलं आहेत. 3 वर्षांचा उमर आणि 8 महिन्यांचा मुजिब. दोघेही कुपोषित आहेत. कृश अवस्थेतील आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन सरदार गुल बसले होते. छोटा मुजिब मांडीवर तर मोठा उमर बाजूला बसला होता.

“महिनाभरापूर्वी मुजिबचं वजन घटून 3 किलो पेक्षा कमी झालं होतं. सुदैवाने एका सेवा भावी संस्थेत नाव नोंदवण्यात यश मिळालं आणि त्यांनी चालवलेल्या मदतकार्यात वाटली जाणारी अन्नाची पाकिटे मिळायला लागली. त्यामुळे उमरची तब्येत सुधारली,” असं सरदार गुल यांनी सांगितलं.

मुजिबचं वजन आता वाढून 6 किलो झालेलं आहे. वयाच्या मानानं अपेक्षित वजनपेक्षा कमीच असलं तरी किमान आधीसारखं धोकादायक पातळीपर्यंत घटलेलं नाही, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे.

अफगाणिस्तानला वेळीच जर मदतीचा हात पुढे केला गेला तर लाखो मुलांचं मरण आणि अपंगत्व टाळता येऊ शकेल. मुजिबसारखी उदाहरणं याचा पुरावा आहेत. गरज आहे ती फक्त मदतकार्याचा आंतरराष्ट्रीय ओघ पुन्हा सुरू होण्याची.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)