लोकांना क्रूर पद्धतीने शिक्षा करणाऱ्या ‘इस्लामिक स्टेट’ संघटनेचं नेमकं काय सुरू आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फ्रँक गार्डनर
- Role, बीबीसी संरक्षण प्रतिनिधी
इस्लामिक स्टेट या कट्टरतावादी संघटनेने दहा वर्षांपूर्वी त्यांच्या नेत्याची घोषणा केली होती.
आयएसचा संस्थापक अबू बकर अल बगदादीने मोसूल येथील नूरी मशीद येथे संपूर्ण जगासमोर ही घोषणा केली होती.
आयसिसच्या लोकांना अरबी भाषेत 'दाएश' असंही म्हणतात. आयएसने सीरिया,इराकच्या बऱ्याच मोठ्या भागावर ताबा मिळवलेला होता. तिथे त्यांनी शरिया कायदा लागू केला होता.
ही संघटना कायम लोकांना क्रूर पद्धतीने शिक्षा करायची, हत्या करायची. इतकंच नाही तर त्याचं ऑनलाईन रेकॉर्डिंगही पोस्ट करायची.
सुरुवातीच्या पाच वर्षांत अनेक संभाव्य जिहादी लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात हे लोक यशस्वी ठरले. आयएसने एक आदर्शवादी इस्लामिक जग स्थापन करण्याचं वचन दिलं होतं.
इथलं आयुष्य तेव्हा संपूर्णपणे हिंसाचाराने भरलेलं होतं. शहरातल्या चौकात रेलिंगवर कापलेलं शिर टांगलेलं दिसायचं. गस्त घालणाऱ्या पोलिसांकडून छळ सुरू असायचा. इतकंच नाही तर अमेरिका नेतृत्व करत असलेला एक गट आयएसच्या काही भागांवर सातत्याने बॉम्बहल्ला करायचा.
या गटात 70 पेक्षा अधिक देश होते. त्यांनी 2019 मध्ये पूर्व सीरियातील बागूज मधून आयएसचा नायनाट केला होता.
आयएस आणि त्याच्या प्रमुखाला या गटाने उद्धवस्त केलं असलं तरी आयएसची विचारसरणी तशीच टिकून होती.
अशा परिस्थितीत प्रश्न आहे की आजकाल कुठे आहे आणि काय करत आहे?

आयएसची परिस्थिती बिकट
लंडनमधील व्हाईट हॉल येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की आयएसचा पूर्णपणे पाडाव केला जाऊ शकत नाही.
संघटनेचं विस्कळीत नेतृत्व जरी सीरियात तयार झालं असलं तरी या संघटनेने अनेक खंडांमध्ये विस्तार केला आहे.
आयएसच्या नावावर अनेक हल्ले आता सहारा वाळवंटाच्या दक्षिण प्रदेशात केले जात आहेत. युरोप आणि मध्य पूर्वेत आयएसची आयएस खोरासान ही सगळ्यात धोकादायक मानली गेलेली शाखा आहे.
यावर्षी आयएस-खोरासान या संस्थेला रशियाची राजधानी मॉस्को आणि इराणमधील शहर केरमान येथे मोठ्या प्रमाणावर झालेल्या हल्ल्यांसाठी दोषी ठरवलं आहे.
आयएस-खोरासान प्रांत, अफगाणिस्तान आणि उत्तर पाकिस्तानात आहे. इथे बसून ही लोक अफगाणिस्तानातील सत्तारुढ तालिबानविरुद्ध लढत आहेत.
ही बाब जरा विचित्र आहे कारण तालिबानने अफगाणिस्तानात शरिया कायदा लागू केला आहे. तिथे महिलांना नोकरी आणि मुलींना उच्च शिक्षण घ्यायला मज्जाव करण्यात आला आहे.
तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये दगडफेक करून मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तरीही आयएस आणि तालिबान एकमेकांचे कट्टर वैरी आहेत.

20 वर्षांपर्यंत बंडखोरीच्या भूमिकेत असलेल्या तालिबान्यांच्या खांद्यावर आता एक देश चालवण्याची जबाबदारी आली आहे.
जेव्हा इस्लामिक स्टेटने सीरिया आणि इराकवर मोठ्या प्रमाणावर ताबा मिळवला होता, तेव्हा ते अशा लोकांना आपल्याकडे सहज आकर्षित करू शकत होते जे फ्लाईटने आधी तुर्किये, (तुर्की) तिथून बसने सीमेपर्यंत आणि तिथून सीरियात येणं सोपं समजत होते.
अशा पद्धतीने आयएस संस्थेत सहभागी होणाऱ्या बहुतांश लोकांना सैन्याचा अनुभव आणि सीरियामध्ये चालू असणाऱ्या गृहयुद्धाची समज नव्हती.
छोटे मोठे गुन्हे आणि अंमली पदार्थांच्या कारभाराशी निगडीत असे अनेक लोक होते. त्यात पश्चिम लंडनचे चार लोक होते. या लोकांचं कैदेत ठेवणाऱ्यांनी 'बीटल्स' असं नामकरण केलं. या लोकांनी पाश्चिमात्य देशातील कर्मचारी आणि पत्रकारांना छळलं.
यापैकी एकाचा मृत्यूचा झाला आहे आणि अन्य दोघंजण तुरुंगात आहेत. दोन लोक सध्या अमेरिकेतील सुपर मॅक्स तुरुंगात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहेत.
इस्लामिक स्टेट अजूनही ऑनलाईन पद्धतीने हल्ले करत आहेत. सध्या दोन पद्धतीने हे काम सुरू आहे.
गाझामध्ये इस्रायलने जो हल्ला केला आहे त्याचा सूड घेण्याची आणि उत्तर सीरियामध्ये आयएसच्या महिला आणि मुलांना कैदेत ठेवण्याचा सूड घेण्याची मागणी करत आहे.
आफ्रिकेकडे वाटचाल
अल कायदासारखंच आयएस सुद्धा दुरावस्था, निराशा, आणि ढिसाळ प्रशासन व्यवस्थेच्या बळावर समोर येत आहे.
आफ्रिकेच्या काही भागात तीन प्रकारचे समुदाय मोठ्या प्रमाणावर आहेत. गेल्या काही वर्षांत साहेल भागातील देशात, विशेषत: माळी, नीजेर आणि बुर्किना फासो भागात सैन्याने सत्तापालट केला आहे. त्यामुळे या भागात अस्थिरता वाढली आहे.
फ्रांस, अमेरिका आणि युरोपियन महासंघाचे सैनिक अशा प्रकाराच्या कट्टरतावाद्यांचा धोका टाळण्यासाठी स्थानिक सरकारांची मदत घेत होते, मात्र त्यांचा नायनाट करण्यात आला. रशियन सैन्याने हे काम मोठ्या प्रमाणावर केलं आहे. आयएसच्या आफ्रिकेत पाच शाखा आहेत. त्याला प्रांत असं म्हटलं जातं. त्या पश्चिम आफ्रिका, लेक चाड मधील भाग, कांगो आणि उत्तर मोझाम्बिक येथे पसरल्या आहेत.
इथेही आयएस आणि अल कायदा एकमेकांशी लढत आहेत आणि एकमेकांविरुद्ध कायम चकमकी होत असतात.

आयएसचा दावा आहे की, ते त्यांच्या नियंत्रणातील क्षेत्रांचा विस्तार करत आहे. ज्यांच्याविरोधात हे लोक लढत आहे त्यांच्या सरकारपेक्षा हे लोक अधिक शक्तिशाली दिसतात.
आयएस साधारणत: घातपाताचा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे दूरवरच्या प्रदेशातील अनेक सैनिक किंवा स्थानिक लोक मारले जातात.
आंतरराष्ट्रीय कट्टरतावादी संघटनांसाठी अफ्रिका भौगोलिकदृष्ट्या तितका सोयीचा झाला नाही, जितका सीरिया 10 वर्षांपूर्वी होता.
ज्या पद्धतीने स्वयंसेवक सीरियामध्ये पोहोचायचे त्या पद्धतीने इथे पोहोचू शकत नाहीत, कारण तिथे तुर्किये-सीरियाची सीमा होती आणि त्याआधी उत्तर पश्चिम पाकिस्तानातील आदिवासी भाग येत असे.
मात्र आयएसच्या शाखांमध्ये अजूनही खूप लोक आहेत. त्यात बहुतांश युवक, स्थानिक पुरुष आहेत. या लोकांना पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत.
आफ्रिकेत होणारे छोटे मात्र अत्यंत हिंसक संघर्ष भलेही युरोपाच्या किनाऱ्यापासून हजारो मैल दूर अंतरावर होत असतील, तरीही जिहादचा धोका जसाजसा वाढेल तसेतसे लोक आपला देश सोडून युरोपात सुरक्षित आयुष्याच्या आशेने बहुसंख्येने जातील.
युरोपवर निशाणा
2010 च्या दशकात आयएसच्या कारवाया एकदम जोरावर होत्या. युरोपात मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात तो सक्षम होता.
अशाच प्रकारचा एक हल्ला त्यांनी पॅरिसमध्ये एका कॉन्सर्ट हॉलवर केला होता. त्यात 130 लोक मारले गेले.
हल्ला करणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिलं होतं आणि त्यांना सीरियाला पाठवलं होतं. त्यांनी अगदी आरामात सर्व सीमा ओलांडल्या. त्यांनी बाल्कन मधून क्लाशननिकोव्ह सारखे स्वयंचलित हत्यारं मिळवण्यातही कोणतीही अडचण आली नाही.
तेव्हापासून आतापर्यंत युरोपातील शहरांवर हल्ल्यानंतर पोलीस दल आणि संरक्षण संस्था यांच्यात गुप्त माहितीची देवाणघेणाण अधिक परिणामकारक पद्धतीने होत आहे.

फोटो स्रोत, REUTERS
ब्रिटनच्या अधिकाऱ्यांच्या मते आयएस किंवा अल-कायदा या संस्थांसाठी 2005 मध्ये लंडनमध्ये झालेला बॉम्बहल्ला किंवा 2015 मध्ये झालेला बटाक्लन हल्ला करणं आता कठीण होणार आहे. ते करूच शकत नाही असंही नाही हेही एक मत अधिकारी व्यक्त करतात.
यापेक्षा ऑनलाईन जिहादला बळी पडून कट्टरतावादाकडे जाणाऱ्या लोकांबद्दल जास्त चिंता आहे.
युकेमध्ये काऊंटर टेररिझम, आणि संरक्षण संस्था एमआय-6 चा जास्तीत जास्त वेळ अल -कायदा किंवा आयएसचे हल्ले आणि कट यांचा सामना करण्यातच जात आहे.
युरोप अजूनही त्यांच्या निशाण्यावर आहे. यावर्षी रशियाची राजधानी मॉस्को येथे हल्ला झाला. त्यात 140 पेक्षा अधिक लोक मारले गेले. याचा अर्थ शत्रूचं थोडं दुर्लक्ष झालं की आयएस लगेच हल्ला करू शकतं.
नेतृत्वाच्या मुद्दयावरून आव्हान
इस्लामिक स्टेटचा ऑनलाईन प्रचार आणि प्रसार आधीसारखा प्रभावी राहिलेला नाही.
मात्र द्वेष आणि सूड घेण्याची भावना निर्माण करणारं उत्तम साहित्य तयार करून देणारे ग्राफिक डिझायनर्स आणि वेब डिझायनर्सला नोकरी देण्यास ते अजूनही सक्षम आहेत.
नुकताच आयएसने एक व्हीडिओ जारी केला होता. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक व्यक्ती अरबी भाषेत संदेश देत होता. अशा परिस्थितीत ओळख पटण्याचाही धोका नसतोच.

फोटो स्रोत, Getty Images
2019 मध्ये अबू बकर अल बगदादीच्या मृत्यूनंतर ओळखीचा धोका ही आयएसच्या नेतृत्वासाठी मोठी अडचण झाली आहे.
ऑनलाईन विश्वात फारशी उपस्थिती नसेल तर लोक संघटनेपासून दूर जातात.
त्याउलट कट्टरतावादी नेत्यांचं आयुष्य फार मोठं नसतं. एकदा त्यांना ओळखू लागले, तर त्यांचा ठावठिकाणा हा त्यांच्यासाठी मोठा अडचणीचा ठरतो.
सध्या इस्लामिक संघटनेचा नेता कोण आहे याबद्दल काहीही माहिती नाही.











