NEET : 'माझ्या मुलीला OMR नुसार 695 गुण होते, प्रत्यक्षात 95 मिळाले; हा धक्काच आहे'

विद्यार्थिनी (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विद्यार्थिनी (प्रातिनिधिक फोटो)
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, मुंबई

“वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षेची तयारी व्हावी म्हणून माझ्या मुलीने बाहेरून बारावीची परीक्षा दिली. गेली दोन वर्ष तिने खूप अभ्यास केला. परीक्षेत तिला चांगले गुण मिळाले. नीटच्या निकालाकडून खूप अपेक्षा होत्या.

साधारण 695 गुण मिळतील असं NTA (National Testing Agency) साईटवर अपलोड झालेल्या ओएमआर शीटनुसार अपेक्षित होतं परंतु प्रत्यक्षात निकालपत्रात केवळ 95 गुण मिळाल्याने आम्हाला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला."

पुण्यातील भोर येथे राहणाऱ्या उमा कंक बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होत्या. त्यांची कन्या दीक्षा कंक या विद्यार्थिनीने यंदा नीटची परीक्षा दिली. दिक्षाच्या निकालपत्रातील गुण आणि उत्तरपत्रिकेत (OMR) आन्सर कीनुसार जुळवलेले गुण यात मोठी तफावत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

ही तक्रार करणारी दीक्षा एकमेव नीटची विद्यार्थी नाही. तर महाराष्ट्रासह देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी हीच तक्रार केली आहे. ओएमआर शीटवर (विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका) आन्सर कीनुसार मिळालेले गुण आणि निकालपत्रातील गुण यात खूप मोठा फरक आढळून येत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. हा फरक दिसत असल्याने निकालपत्रातील निकाल पारदर्शक नसल्याची शंका विद्यार्थी आणि पालकांना आहे.

हे प्रकरण नेमकं काय आहे? NEET च्या विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय तक्रारी आहेत? आणि यावर तोडगा निघणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

NEET विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे?

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रान्स टेस्ट म्हणजेच नीट (NEET) या प्रवेश परीक्षेचा निकाल 13 जून रोजी जाहीर झाला.

ही परीक्षा केंद्रीय स्तरावर होत असून देशभरात परीक्षा घेण्याची आणि निकाल जाहीर करण्याची जबाबदारी NTA (नॅशनल टेस्टिंग एजंसी) यांच्याकडे आहे.

परीक्षा पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेली उत्तरपत्रिका म्हणजेच त्यांची ओएमआर शीट आणि आन्सर की म्हणजेच उत्तरतालिका एनटीएच्या साईटवर पाहता येते आणि डाऊनलोडही करता येते. तसंच मेलवरही मिळू शकते.

4 जून 2023 रोजी NTA च्या अधिकृत साईटवर एजंसीने ओएमआर शीट आणि आन्सर की अपलोड केली. विद्यार्थ्यांवनी साईटवरून दोन्ही पेपर्स डाऊनलोड केले. तर काहींनी मेलवर मागवले.

ओएमआर शीट (उत्तरपत्रिका) डाऊनलोड केल्यानंतर विद्यार्थी एनटीएने दिलेली आन्सर की पाहून आपली उत्तरं पडताळून पाहतात. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे संभाव्य गुण कळू शकतात.

NEET परीक्षा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, NEET परीक्षा

13 जून रोजी नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. ओएमआऱ शीट आणि आन्सर कीमुळे विद्यार्थ्यांनी आपल्याला साधारण किती गुण मिळतील याचा अंदाज बांधला होता. परंतु यापैकी अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण न मिळाल्याने ही तफावत का आढळत आहे असा प्रश्न उपस्थित केला.

महत्त्वाचं म्हणजे नीट ( NEET) ही ऑब्जेक्टिव्ह्स स्वरुपाची परीक्षा असते. त्यामुळे विद्यार्थी आन्सर की पाहून सहज गुण मोजून त्यांना साधारण किती गुण मिळणार याचा अंदाज मिळतो. परंतु या गुणांमध्ये आणि नीटच्या अंतिम निकालपत्रात मोठा फरक दिसल्याने विद्यार्थी प्रश्न उपस्थित करत आहेत.

'गुणांमध्ये एवढी तफावत का?'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

उमा कंक यांची कन्या दीक्षा कंकने यंदा पहिल्यांदाच ही परीक्षा दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून दिक्षा NEET परीक्षेची तयारी करत होती. यासाठी तिने बारावीची परीक्षाही बाहेरून (काॅलेजऐवजी थेट बोर्डातून) दिली.

डाॅक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या दिक्षाला नीट परीक्षेचा निकाल तिला अपेक्षित असाच लागेल असा विश्वास होता. याचं कारण म्हणजे तिने आपली ओएमआर शीट आणि उत्तरतालिका जुळवून पाहिली, यानुसार तिला साधारण 695 गुण मिळत होते. परंतु नीटचा निकाल जाहीर झाल्यावर निकालपत्रात मात्र तिला 95 गुण मिळाले आहेत.

दिक्षाची आई उमा कंक म्हणाल्या, “नॅशनल टेस्टिंग एजंसीला आम्ही कित्येक मेल केले आहेत. माझ्या मुलीला नीट परीक्षेत मिळालेले गुण आणि आम्हाला तिच्या लॉग इनवर दिसलेल्या ओएमआर शीटचा स्कोअर यात खूप मोठं अंतर आहे. ओएमआर शीट सुरुवातीला डाऊनलोड होत नव्हती त्यामुळे आम्ही त्याचा स्क्रिनशॉट काढला. यावर तिला 695 गुण आहेत. पण तिला प्रत्यक्षात निकालपत्रात दिलेले गुण 95 आहेत.”

यानंतर दीक्षाला ईमेलवर ओएमआर शीट मिळाली. यात तिला 95 गुण दिलेत. परंतु NTA साईटवरील ओएमआर तपासल्यास त्यावर 695 गुण आहेत, असा दावा उमा कंक यांनी केला.

दीक्षा कंक या विद्यार्थिनीने केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. या पत्रात तिने म्हटलं आहे की, ‘मला मिळालेल्या ओएमआर शीटमध्ये आणि तिने स्क्रिनशॉट काढलेल्या ओएमआर शीटमध्येमध्ये मोठी तफावत आहे. मला जास्तीत जास्त गुण मिळण्याची खात्री असताना माझ्या गुणांमध्ये आश्चर्यकारक फरक असल्याचे दिसून येत आहे.’

विद्यार्थी (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विद्यार्थी (प्रातिनिधिक फोटो)

‘मला आणि माझ्या कुटुंबाला याचा धक्का बसला असून माझ्या पुढील शिक्षणावर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.’ असंही या पत्रात म्हटलं आहे.

दिक्षाची आई सांगते, "आम्ही NTA या एजंसीला कित्येक मेल केले आहेत. परंतु आमच्या तक्रारीची दखल ते घेत नाहीत. नेमका काय घोळ झाला आहे की दुसरी काही तांत्रिक समस्या आहे हे सुद्धा आम्हाला कळू शकत नाहीय. या प्रकारामुळे माझी मुलगी अत्यंत मानसिक तणावातून जात आहे."

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्वीट केलं आहे. दिक्षा कंक हीच्या नीट परीक्षेच्या निकालात त्रुटी आढळल्याची तक्रार असून एनटीए आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी याची तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

हा अनुभव येत असलेली दिक्षा ही एकमेव विद्यार्थी नाही. कोल्हापूरमध्ये राहणा-या एका विद्यार्थिनीलाही हाच अनुभव येत आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर विद्यार्थिनीचे वडील म्हणाले, "माझ्या मुलीचा हा दुसरा अटेम्प्ट होता. गेल्यावर्षी सुद्धा आम्ही हीच तक्रार केली होती. या प्रकरणी आम्ही कोर्टात गेलो. पण यावेळी पुन्हा आमचा हाच अनुभव आहे. ओएमआरनुसार गुण मोजल्यास 670 गुणांची अपेक्षा होती पण निकालात 105 गुण मिळाले आहेत."

तर सोशल मीडियावर देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. प्रणव धनवटे या विद्यार्थ्याने ट्वीट केलं आहे की," ओएमआर उत्तरपत्रिकेत अन्सर कीनुसार मला 681 गुण मिळाले आहेत. पण निकालपत्रात 177 गुण आहेत."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

रियास्का दास या विद्यार्थिनीचीही अशीच तक्रार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत तिने मदतीची मागणी केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये ती लिहिते, "मी माझी OMR शीट तपासली आहे. मला 627 गुण मिळतात. परंतु निकालपत्रात मला केवळ 226 गुण दिले आहेत. माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कृपया या प्रकरणाची दखल घ्या."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 3

हे काही विद्यार्थ्यांचे ट्वीट आहेत. असे अनेक विद्यार्थी आणि पालक समाज माध्यमांवर या संदर्भात चर्चा करत आहेत. तसंच NTA यांच्या ट्वीटरवर हँडलला टॅग करून अनेक विद्यार्थी या प्रकरणात त्यांनी दखल घ्यावी अशी मागणी करत आहेत.

या संदर्भात आम्ही NTA ला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एनटीएला मेलवरही आम्ही या विषयाची माहिती देत त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अद्याप त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाल्यानंतर या बातमीमध्ये त्याची माहिती दिली जाईल.

'कोर्टात दाद मागणार'

आॅल इंडिया जेईई नीट स्टुडंट असोसिएशन या संघटनेकडून नॅशनल टेस्टिंग एजंसीने (NTA) विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेण्याची मागणी केली आहे.

नीट (NEET) निकालात देशातील अनेक विद्यार्थ्यांना विसंगती दिसून येत असून याची दखल NTA ने घ्यावी असं पत्र नॅशनल टेस्टिंग एजंसीला पाठवलं आहे.

या पत्रानुसार, 7 मे 2023 रोजी NEET 2023 ही परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी निकालात विसंगती असल्याची तक्रार केली आहे.

4 जून रोजी NTA च्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या ओएमआर शीटनुसार नीट परीक्षेचा त्यांचा अपेक्षित स्कोअर म्हणजेच गुण आणि 13 जून रोजी NTA ने जाहीर केलेला नीटचा निकाल यात मोठी तफावत आढळून येत असल्याचा काही विद्यार्थी आणि पालकांचा आरोप आहे.

या पत्रात असंही म्हटलं आहे की, काही विद्यार्थ्यांना ब्लँक ओएमआर शीट मिळाल्याची तक्रार आहे तर काही मुलांनुसार, मिळालेल्या ओएमआर शीटवर सही आणि हस्ताक्षर मूळ काॅपीपेक्षा वेगळं आहे. तसंच काही विद्यार्थ्यांनी ओएमआरची काॅपी मेलवर मिळाली नसल्याचंही म्हटलं आहे.

नीट परीक्षा (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नीट परीक्षा (प्रातिनिधिक फोटो)

आॅल इंडिया जेईई-नीट स्टुडंट असोसिएशनचे (AIJNA) राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वनाथ कुमार सांगतात, "2022 मध्येही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यावर्षी आम्ही नॅशनल टेस्टिंग एजंसीला या प्रकरणी संपर्क साधणार आहे. तसंच या प्रकरणी आम्ही लवकरच कोर्टात दाद मागणार आहोत."

'तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता'

या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या वकील तन्वी दुबे यांच्याकडेही अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या सर्व तक्रारी एकत्र करत त्याची पडताळणी करण्याचं काम सध्या तन्वी यांच्याकडून सुरू आहे. याबाबत एनटीएने तात्काळ पारदर्शकता दाखवावी अशी त्यांची मागणी आहे.

तन्वी दुबे सांगतात, "गुणांमध्ये तफावत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तसंच अनेकांना ओएमआर शीट मिळालेल्या नाहीत. तर काहींचं म्हणणं आहे की ओएमआर शीटवरील त्यांची सही मॅच होत नाहीय, हस्ताक्षर त्यांचं नाहीय. मी विद्यार्थ्यांना हे सुद्धा सांगत आहे की ही प्रकरणं एक तांत्रिक ग्लीच असू शकतात. जोपर्यंत ओएमआर आणि त्याची कार्बन काॅपी मिळत नाही तोपर्यंत यात काही गैरप्रकार आहे असं आपण स्पष्ट म्हणू शकत नाही,"

त्या पुढे सांगतात,"अशा विद्यार्थ्यांकडून त्यांचे ओएमआर शीट पाहून पुन्हा गुण तपासणी करुन त्यानंतर एनटीए अधिका-यांशी संपर्क साधून पुढचं पाऊल ठरवायला हवं. मी संघटनेला हाच सल्ला दिला आहे. लाखो विद्यार्थ्यांची एकाचवेळी परीक्षा घेताना तांत्रिक बाबींमुळे असं झालेलं असू शकतं. पण याची दखल निश्चितच एनटीएने घ्यायला हवी."

"परीक्षा या पारदर्शक असायला हव्यात असं सुप्रीम कोर्टाने यापूर्वी सांगितलं आहेत. यामुळे एनटीएकडे किमान तक्रारींचं निवारण करण्यासाठी एखादी यंत्रणा असायला हवी. विद्यार्थी, पालक त्यांच्या कार्यालयात जात आहेत, मेल करत आहेत पण त्यांना प्रतिसाद मिळत नाही. आता वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, एकदा मेरीट लिस्ट लागली की तक्रारदार विद्यार्थ्यांना पुन्हा आपल्या जागेवर दावा करता येणार नाही," असंही तन्वी दुबे यांनी सांगितलं.

हे ही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)