पुण्यातील नवले ब्रीजवरील भीषण अपघातात 30 गाड्यांचा चुराडा नेमका कसा झाला?

नवले ब्रीजचा अपघात
    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, पुणे

पुणे-बेंगलुरू हायवेवरच्या नवले ब्रीजवर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. एक भरधाव ट्रक समोरच्या गाड्यांना धडक देत पुढे गेला.

यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार 30 पेक्षा जास्त गाड्यांचं नुकसान झालं आहे. रविवारी रात्री सव्वाआठ ते साडेआठच्या दरम्यान हा अपघात घडला.

यामध्ये 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

स्थानिकांच्या साहाय्याने पीएमआरडीए, अग्निशमन दल आणि पोलिसांनी बचाव कार्य केलं. ज्या गाड्यांना धडक बसली त्यातील लोकांना बाहेर काढण्यात आलं.

भरधाव ट्रकच्या धडकेत अनेक मोठ्या चारचाकी गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. नवले ब्रीज हा अपघातांचा स्पॉटच मानला जातो. या पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे.

रविवारी रात्री नेमकं काय झालं?

बीबीसीमराठीला एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहीतीनुसार नवले ब्रीजवर वाहतूक कोंडीमुळे गाड्या थांबून होत्या. अशातच तो ट्रक गाड्यांना धडक देत आला.

कात्रज वरून मुंबईला जाणारे एका गाडीचे चालक पांडूरंग यांनी ही माहिती दिली.

“समोर अर्ध्या तासाचं ट्रॅफिक होतं. माझी गाडी थांबून फारतर दहा सेकंद झाले असतील. तेवढ्यात मागून एक ट्रक गाड्या ठोकत येत असल्याचं पाहीलं. गाड्या ठोकतच तो पुढे गेला. मागे 15-20 गाड्या त्याने ठोकलेल्या पाहिल्या. नंतर तो पुढे गेल्यावर काही माहीती नाही.

माझ्या गाडीत प्रवासी होते. मी तिथेच थांबलो. मी गाडी बाजूला घेतली. त्यामुळे मी पण वाचलो आणि प्रवासी पण वाचले. माझ्या गाडीतल्या कुणालाच काही झालं नाही. ट्रकने थांबलेल्या गाड्यांना धडक दिली. त्यानंतर त्या एकमेकांवर आदळल्या,” असं पांडूरंग यांनी सांगितलं.

नवले ब्रीजचा अपघात

पुणे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिलेल्या माहीतीनुसार एक ट्रक खूप वेगाने आला गाड्यांना धडक दिली.

“प्राथमिक माहीतीनुसार या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तो वेगाने खाली आला पण याबद्दल तपास सुरु आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. 6 जण जखमी आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे,” असं सुहेल शर्मा यांनी सांगतिलं.

ट्रकच्या धडकेत किती गाड्यांचं नुकसान झालं?

ज्या ट्रकच्या धडकेमुळे हा अपघात झाला त्याचं पासिंग आंध्र प्रदेशचं आहे. पुणे अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार या ट्रकच्या धडकेमध्ये एकूण 48 वाहनांचं नुकसान झालं आहे.

मात्र पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी 24 गाड्यांचे नुकसान झाल्याचं सांगितलं. ज्या गाड्यांना धडक बसली त्यांचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं चित्र होतं. स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढलं.

नवले ब्रीजचा अपघात

“ट्रकने धडक दिल्यावर मी 5 मिनिटांत त्या घटनास्थळी पोहोचलो आणि गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली. सर्व प्रकार अचानक झाल्याने अनेक जण गोंधळलेल्या अवस्थेत होते. नुकसान झालेल्या गाड्या मी मोजल्या. तो आकडा 40 पेक्षाही जास्त होता,” असं घटनास्थळी उपस्थित असलेल्या शशिकांत म्हारणुर यांनी बीबीसीला सांगितलं.

“मी गेले काही वर्षं नऱ्हे भागात राहतोय आणि एवढ्या कालावधीत 4-5 भीषण अपघात तर घडलेच आहेत. कधी कुणी गंभीर जखमी झालं तर कुणाचे प्राण गेलेत,” शशिकांत म्हारणुर यांनी पुढे सांगितलं.

नवले ब्रीजवर सातत्याने अपघात का होतात?

साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना, नवीन कात्रज बोगदा ओलांडल्यावर अनेक अपघात होतात. हायवेवरील नवले ब्रीज चौक, भुमकर नगर हे स्पॉट अपघातांसाठी कुप्रसिद्ध आहेत.

बोगदा ओलांडल्यावर उतार असल्याने गाडी न्यूट्रलवर टाकल्यामुळे नियंत्रण गेल्याने अपघात झाल्याच्या घटना झालेल्या आहेत.

या केसमध्येही असंच काहीसं कारण असावं असा अंदाज रिलायन्सचे इन्फ्रास्ट्रकचरचे रिजनल हेड अमित भाटीया यांनी वर्तवला. ते खेड-शिवापूर आणि आनेवाडी टोल प्लाझाचे मॅनेजरही होते.

नवले ब्रीजचा अपघात

“आता जी माहीती मिळाली आहे त्यानुसार तो ट्रक न्यूट्रल केला होता. यामुळे ब्रेक योग्यप्रकारे लागले नाहीत. यामुळे हा अपघात झाला. मागच्या सहा महिन्यातल्या हा पहिला मेजर अपघात आहे. एनएचआयच्या एका फाउंडेशन मार्फत इथलं ऑडिट झालं आहे. त्यांच्या शिफारसीनुसार आम्ही इथे रंबल स्ट्रीप लावली आहे. स्पीड कॅमेरा पण लावले आहेत. बोर्डवर पण लिहिलं आहे की गाडी न्यूट्रलवर टाकू नका,” असं अमित भाटीया यांनी सांगितलं.

या घटनेनंतर सोमवारी नॅशनल हायवे ऍथोरिटी ऑफ इंडीयाची बैठक होणार असून त्यामध्ये उपाययोजनांवर विचार केला जाईल, अशी माहिती अमित भाटीया यांनी दिली.

अपघातानंतर वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर तेल गळती झाली. बचाव कार्य सुरु असताना वाहतूक बंद करण्यात आली होती. तेल गळती झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्ता स्वच्छ करुन मग वाहतूक सुरळीत करण्याचं काम रविवारी रात्री ऊशिरापर्यंत सुरु होतं. पुणे अग्निशमन दल आणि पीएमआरडीए अग्निशमन दल यांचे जवान हे काम करत होते. 

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)