उद्धव ठाकरे: 'देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेनी'

देशाची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेनी होत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखलं पाहिजे, त्यासाठी जे-जे लोक एकत्र येऊ शकतील त्यांनी सोबत यायला हवं.
राज्य हे केंद्राचे गुलाम नाहीत, हे राज्यघटनेत आहे. राज्य आणि केंद्राचं नातं कसं हवं?
वाट्टेल ते करून आम्हाला सत्ता हवी अशी मनोवृत्ती केंद्राची झाली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रकाश आंबेडकर आणि माझं राजकीय व्यासपीठ वेगळं असलं तरी आमचं वैचारिक व्यासपीठ एकच आहे, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
मनुस्मृती हे विष आहे - प्रकाश आंबेडकर
मनुस्मृती हे असं विष आहे, जे प्राशन केल्यामुळे मनुष्याचाही नाश होतो आणि देशाचाही नाश होतो असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते.
शिवसेना- (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एका सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र आले.

"मनुस्मृती हे विष आहे असं प्रबोधनकारांनी म्हटलं होतं. देशाच्या गुलामगिरीचं कारण हे मनुस्मृतीमध्ये आहे असं त्यांनी मह्टलं होतं. त्यांनी मनुस्मृतीला पाॅयजन म्हटलंय. हा गुलामीचा इतिहास असं वर्णन करतो. मी म्हणतो गुलामी फक्त एकाच वर्गाची होती बाकी त्यात केवळ भरडले गेले. राजेशाही क्षत्रियांची होती. यात केवळ शिवाजी महाराज अपवाद होते," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
"सध्या धार्मिक दडपशाहीचे वातावरण सर्वत्र दिसत आहे. पण आपल्या राज्यातील संतांची परंपरा याला अपवाद आहे. त्यांनी सुरू केलेली वारी ही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे. वारीत जाणारा माणूस हा त्या दडपशाहीचा बळी ठरणार नाही," असं आंबेडकर म्हणाले.
देशात दोन परंपरा आहेत एक म्हणजे वैदिक आणि दुसरी संत परंपरा, वैदिक परंपरेत दडपशाही आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रत्येकाने ठरवावे लागेल की तुम्हाला हुकूमशाही हवी की लोकशाही, असा सवाल आंबेडकरांनी विचारला. ते म्हणाले, प्रत्येक मतदाराने हा विचार करावा की ते लोकशाहीच्या बाजूने आहोत की हुकूमशाहीच्या बाजूने हा विचार करावा.
प्रत्येक व्यक्तीने प्रबोधनकारांचे साहित्य वाचावे असे आवाहन आंबेडकर म्हणाले.











