केतकी चितळे : 'सनातन धर्माला मारणे तेही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश' #5मोठ्याबातम्या

 केतकी चितळे

फोटो स्रोत, FACEBOOK/KETAKI CHITALE

फोटो कॅप्शन, केतकी चितळे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. केतकी चितळे : 'सनातन धर्माला मारणे तेही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश'

अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा उल्लेख होता. ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिनं ती डिलीट केली आहे. मात्र पोस्ट डिलीट केल्यानंतरही ती चर्चेत आली आहे. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.

केतकीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती.

त्यात तिनं लिहिलं होतं, “समिती कुठली, कशासाठी निर्माण करण्याचा विचार आला असेल? याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. सनातन धर्माला मारणे, तेही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश.

स्वघोषित मावळे तर तसंही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीरच नव्हे तर घोर अपमान आहे."

“पण आम्ही स्वघोषित असल्याने काहीही करायला मोकळे आहोत.”

पुढे ती म्हणते, “एक मेसेज मिळताच किक मारुन अशुद्ध मराठीत (महाराजांना सहा भाषा अस्खलित येत असत. इकडे मातृ-पितृ भाषेची बोंब असो) आरडाओरडा सुरू.

सनातनी हिंदू मारला जात आहे. मालवणी ऑर्लिम, मुंबईमध्ये मुसलमान किंवा क्रिस्ती आहेत. सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वत: अनुभवली आहे.”

2.'ज्या मराठा समाजाला हिणवलं...', छत्रपती संभाजीराजेंनी केली संजय राऊतांची कानउघाडणी

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे मोठं वादंग उठलं आहे.

महाविकास आघाडीच्या मोर्चा दाखवताना संजय राऊतांना मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ शेअर केला. यावरुन छत्रपती संभाजीराजे यांनी संजय राऊत यांची कानउघाडणी केली आहे.

साम टीव्हीनं ही बातमी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

छत्रपती संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “संजय राऊत, ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता.

आज नसलेली ताकद दाखवण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा.”

3. अमेरिका, चीनसारखा विकास झाला तर हा भारताचा विकास नाही - मोहन भागवत

“भारताच्या विकासाचा विचार धर्म आणि जीवनावर आधारित आहे. जर अमेरिका, चीनसारखा व्हायचा प्रयत्न करत असेल तर हा भारताचा विकास नाही. भारताचा विकास हा धर्म, संस्कृती आणि भारतीय विचारसरणीनुसार व्हायला हवा,” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.

एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

मोहन भागवत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहन भागवत

भागवत पुढे म्हणाले, “दोन हातांनी कमवा, हजार हातांनी वाटा. ही आपल्या देशाची दृष्टी आहे. भारताचा विकास भारताच्या स्वभावानुसार होईल. शरीर, मन आणि बुद्धी ही पाश्चात्य विचारसरणी आहे. तन, मन आणि बुद्धीने धर्म एकत्र ठेवणे हा भारताचा विचार आहे. भारत हा धर्म आणि जीवनाचा देश आहे.”

4. महाराष्ट्रात लम्पीमुळे 28 हजार जनावरांचा मृत्यू

राज्यात लम्पी त्वचारोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या 28 हजारांवर पोहोचली आहे. गेल्या 17 दिवसांत 4.689 जनावरांचा मृत्यू झाला.

लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 17 डिसेंबरअखेर राज्यातील 35 जिल्ह्यांतील 4051 केंद्रांमध्ये लम्पी रोगाचा संसर्ग झाला आहे.

बाधित गावांतील एकूण 3,93,337 बाधित पशुधनापैकी 3,16,504 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. बाधितांपैकी 27,851 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

लम्पी व्हायरस

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC

पशुसंवर्धन विभागाने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील लम्पी त्वचारोगाची साथ नियंत्रणात आल्याचे जाहीर केले होते.

मृत्युदरातही घट होत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, गेल्या महिनाभरापासून राज्यात रोज सरासरी 300 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू होताना दिसत आहे.

5. ग्रामपंचायत निवडणूक:राज्यामध्ये 74% मतदानाचा प्राथमिक अंदाज

राज्यभरात रविवारी 7,135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 74% मतदान झाले आहे. यामध्ये सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.

सर्व ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल आणि निकाल लागेल.

दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)