You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जातिभेदाच्या नाकावर टिच्चून शोषित महिलांनी कसा उभा केला हक्काचा 'बहिनी दरबार'
- Author, शताली शेडमाके
- Role, बीबीसी मराठी
शोषित, वंचित महिलांच्या एका समूहानं आपल्या हक्कासाठी भांडून न्यायाची वाट ज्या माध्यमातून मोकळी करून घेतली, तो प्रयोग म्हणजे 'बहिनी दरबार'.
अशिक्षित आणि कमी शिकलेल्या या महिलांनी लेखनीची तलवार हाती घेत, या माध्यमातून शेकडो उपेक्षित महिलांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. आज त्यांचा आवाज गाव, तहसील, जिल्हाच नव्हे तर राज्याच्या सीमा ओलांडून ओलांडून देशपातळीवर गाजतोय.
आयुष्यभर साडीच्या पदराआड तोंड लपवून जगणाऱ्या या शोषित महिलांना 'बहिनी दरबार'नं नवीन ओळख कशी मिळवून दिली, ते जाणून घेऊया.
एका घटनेनं घडवली क्रांती
कलसिया देवी नामक दलित महिलेच्या संघर्षातून याची सुरुवात झाली. मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील डभौरा गावानजीकच्या आंबेडकर नगरमध्ये कलसिया देवी राहयच्या.
त्यांना जातीभेदाचा अनुभव येत होता. घरामागे असलेल्या बोअरवेलवरून पाणी भरताना उच्चवर्णीयांकडून त्यांना वारंवार अडवलं जातं होतं. अनेक दिवसांपासून हा त्रास सुरू होता. जातीवरुन टोमणे, शिव्या असं सगळं त्या निमुटपणे सहन करत होत्या.
एकदा पहाटे कलसिया देवी पाणी भरण्यासाठी बोअरवेलवर गेल्या तेव्हा, काही उच्चवर्णीय तिथं आले.
"तुला पाणी नको भरून म्हणून सांगितलं ना, इथे पाणी भरून तू बोअरवेल बाटवलीस" असं म्हणत त्यांनी पाण्याचा हंडा, बादली पायांनी लाथाडून लावली आणि त्यांना हाकललं.
या घटनेनं मात्र कलसिया देवींच्या संयमाया बांध मात्र तुटला. त्यांनी गावातल्याच उषादेवी यांना ही घटना सांगितली.
त्यानंतर कलसिया, उषादेवींसह काही महिला पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास गेल्या. मात्र, पोलिसांनी त्यांचं ऐकूनच घेतलं नाही. दिवसभर पोलीस ठाण्यात बसून शेवटी या महिला घराकडे परतल्या.
दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गेल्या. घडलेली घटना सांगितली आणि कारवाईचं आश्वासन घेऊन परतल्या. पण, आश्वासन कागदावरच राहू नये म्हणून, आपलं म्हणणं कागदावरच उतरवायचं त्यांनी ठरवलं.
त्यानंतर आठवीत शिकत असलेल्या सिलू नामक विद्यार्थिनीकडून संपूर्ण घटनाक्रम कागदावर उतरवून घेतला. नंतर, या हस्तलिखित दहापानी पत्रकाच्या 10 प्रती झेरॉक्स करून गावात, शासकीय कार्यालयात वाटप केल्या.
महिलांच्या या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. रिवासारख्या भागात जिथे महिलांना कायम डोक्यावर पदर घेऊन संस्कृतीच्या नावाखाली समाजाच्या धाकात जगावं लागतं, त्यांनी असं काहीतरी करणं हे लोकांच्या कल्पनाशक्तीच्या पलिकडचं होतं.
या प्रतिसादानंतर महिलांनी एक गट तयार करून हे हस्तलिखित पत्रक नियमितपणे काढायचं ठरवलं आणि त्याला नाव दिलं 'बहिनी दरबार'.
शोषित, उपेक्षित महिलांचं मुखपत्र
'न खींचो कमान, न तलवार निकालो, जब तोप हो मुकाबिल तब अखबार निकालो', अकबर इलाहाबादी यांचा हा शेर 'बहिनी दरबार'साठी अतिशय समर्पक ठरतो.
या नावामागची कहाणी सांगताना 'बहिनी दरबार'च्या सहसंस्थापक संपादक उषादेवी सांगतात, "कलसियाबरोबर घडलेली घटना 2007 सालची आहे. एकतर महिला ती मागास, दलित जातीतली, साडीच्या पदराआड तोंड लपवून जगत आलेली. आमचं म्हणणं कोण ऐकून घेणार होतं? म्हणून आम्हीच आमचा आवाज व्हायचं ठरवलं. पण हे करायचं कसं? हा मोठा प्रश्न आमच्यापुढे होता.
त्यावेळी आम्ही, दलित, आदिवासी, बहुजन अशा मिळून 10 महिला होतो आणि आमच्यातील बहुसंख्य महिला अशिक्षितच होत्या. तरीही आम्ही कलसिया देवींसह आणखी एक-दोन महिलांबरोबर घडलेली घटना लिखीत स्वरुपात सर्वांपर्यंत पोहोचवायचं ठरवलं आणि कामाला लागलो."
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लेखणीहुन अधिक धारदार तलवार नाही, हे या अशिक्षित महिलांना कळालं होतं. त्यांनी त्याचा उपयोग करायचं ठरवलं.
दलित आणि आदिवासी महिलांच्या या गटाला उच्चवर्णीय व्यवस्थेशी दोन हात करणं म्हणजे आपल्या अंगावर थेट संकट ओढावून घेण्यासारखं होतं. तरीही त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला.
3 जानेवारी 2008 रोजी 'बहिनी दरबार'चा पहिला हस्तलिखित अंक निघाला आणि तेव्हापासून आजतागायत दर महिन्याला या महिला हे हस्तलिखित पत्रक काढतात.
त्याच्या झेरॉक्स प्रति काढून विविध कार्यालय, शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत अशा ठिकाणी वितरित करतात. वितरणाचं कामही या महिलाच करतात.
याबाबत बोलताना उषा देवी सांगतात, "महिलांचा आवाज म्हणून बहिनी हे नाव ठरलंच होतं आणि आमच्या बघेली भाषेत बैठक किंवा एकत्र जमून चर्चा होत असेल तर त्याला दरबार असं म्हणतात. म्हणून आम्ही याचं नाव 'बहिनी दरबार' असं ठेवलं.
महिलांनी महिलांच्या हक्कासाठी काढलेलं महिलांचं मुखपत्र!
आज हे पत्रक आमच्यासारख्या शेकडो महिलांची ओळख बनलंय, याचा आनंद वाटतो. एखाद्या समस्येचं जोपर्यंत निवारण होत नाही, तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करतो."
लेखनीतून मांडली संघर्षाची कथा
पत्रकारितेच्या व्याख्येत त्या फिट तर बसत नाहीत. पण म्हणून त्यांचा अस्तित्वासाठीचा संघर्ष आणि त्यासाठी केलेला हा प्रयोग कमीही ठरत नाही.
यातील बहुतांश महिला दलित, आदिवासी समुहातील होत्या. त्यांना शिक्षणाचा फार गंधही नव्हता. सुसभ्य म्हणवल्या जाणाऱ्या पण वर्णव्यवस्थेचा भडीमार असलेल्या समाजात शोषित, अशिक्षित आणि अतिशय गरीब घरातून आलेल्या या महिलांना आपण सुरु केलेल्या या मोहिमेचं पुढे काय होईल, याची कल्पना नव्हती.
पण, व्यवस्थेला आव्हान देतानाच सुरू झालेला त्रास, अपमान, चारित्र्यावर उडालेले शिंतोडे तर कुणाला झालेली मारहाण या सगळ्यांना सामोरं जावं लागल्याचं, 'बहिनी दरबार'च्या महिलांनी सांगितलं.
मात्र, बदल घडण्यास सुरुवातही झाली होती. पहिल्यांदा पत्रक काढून ते एक-दोन कार्यालयात पाठवल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली.
पोलिसांसह काही अधिकाऱ्यांनी येऊन कलसिया देवींचं म्हणणं ऐकून घेतलं, तसंच त्या राहत असलेल्या भागात दुसरी बोअरवेल लावून देण्याची हमी दिली.
हा या महिलांचा पहिला विजय होता. त्यांनी 'बहिनी दरबार' सुरू ठेवायचं ठरवलं आणि दर महिन्याला हे पत्रक निघू लागलं. पत्रक वितरित करतानाच इतर महिलांशी बोलून त्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या.
दिवसेंदिवस महिलांचा सहभाग वाढू लागला. प्रत्येकीची वेगळी समस्या होती, त्यांनी आपलं म्हणणं या पत्रकाच्या माध्यमातून सांगायला सुरुवात केली.
हे हस्तलिखित पत्रक रिवा भागात बोलल्या जाणाऱ्या बघेली भाषेत काढलं जातं. याची टॅगलाईन आहे, 'आँखन देखी, कानन सुनी, हाँथन लिखी' वंचितन के खातिर - बहिनी दरबार.
म्हणजेच, 'जे डोळ्यांनी बघितलं, कानांनी ऐकलं तेच हातांनी कागदावर उतरवलं - वंचितांसाठीचं 'बहिनी दरबार'
या पत्रकाच्या माध्यमातून महिलांनी कौटुंबिक हिंसा, अत्याचार, बालविवाह, हुंडाप्रथा, जातपात, अस्पृष्यतेसारख्या अनेक घटनांना वाचा फोडली.
गावा-गावात पत्रकाचं वितरण करतानाच यात नेमकं काय लिहिलयं हे निरक्षर लोकांना कळावं यासाठी लोकांना एका ठिकाणी गोळा करून पत्रकाचं सामूहिक वाचन सुरू केलं. आज हे पत्रक शेकडो महिलांचं मुखपत्र चौथ्या स्तंभाच्या रुपानं खंबीरपणे त्यांचं म्हणणं मांडत आहे.
'आधी उभंही करत नव्हते, आज मानानं खुर्ची देतात'
'बहिनी दरबार'मधल्या प्रत्येक महिलेचा एक वेगळा संघर्ष आहे. काही कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी तर कोणावर अस्पृष्यतेचा ठपका तर कोणी गावातील वर्चस्ववाद्यांच्या जाचाला बळी पडलेली. प्रत्येकीकडे काही ना काही सांगण्यासारखं आहेच.
कलसिया देवी त्यांचा अनुभव सांगताना म्हणाल्या, "आमचं पत्रक निघाल्यानंतर लोकांनी खूप नावं ठेवली, हिणवलं तरीही आम्ही पत्रक काढायचं सुरुच ठेवलं. जिथं कधीकाळी आमची दखल घेतली गेली नव्हती, न ऐकता आम्हाला हाकलून दिलं होतं, आज तेच सन्मानानं बसायला खुर्ची देतात.
आमच्या समस्यांना शांततेनं ऐकून घेतात. अनेक समस्यांना आम्ही या पत्रकाच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. शासनानं माझ्या घरापासून जवळच दुसरी बोअरवेल खोदून दिली असून आता आम्ही तिथून पाणी भरतो."
मी अशिक्षित होते, परंतु माझ्या मुलांना शिक्षित केलं. आज ते सगळे स्वतःच्या पायावर उभे आहेत, असं त्या अभिमानानं सांगत होत्या.
आणखी एक सदस्य रिता बौद्ध अनुभव सांगताना म्हणाल्या, "मी 2016 साली 'बहिनी दरबार'शी जुळले.
माझा नवरा, सासरचे मला त्रास द्यायचे, मारहाण करून घराबाहेर काढून द्यायचे. हे सगळं कोणाकडे बोलताही येत नव्हतं, माझ्या तीन मुलांचा प्रश्न समोर होता.
अशा स्थितीत मी 'बहिनी दरबार'च्या संपर्कात आले. त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि मदत केली. मी आज आपल्या तीन मुलांसह वेगळी राहते. एका सामाजिक संस्थेसोबत काम करतेय.
सुरुवातीला जेव्हा मी घरातून बाहेर पडले. तेव्हा लोकांनी खूप नावं ठेवली, चारित्र्यावर संशय घेतला, शिवीगाळ केली.
पण 'बहिनी दरबार'ने माझी साथ सोडली नाही. यानंतर मी गावांगावात जाऊन माझ्यासारख्या शोषित महिलांना भेटून विश्वासात घेऊन चर्चा करायला लागले. त्यांची व्यथा शासनदरबारी मांडली. काल जी लोकं टोमणे मारायची ती आज आदरानं बोलतात."
असाच एक अनुभव आहे रीवा जिल्ह्याच्या कोटामध्ये राहणाऱ्या जन्मावती यांचा. त्या 2013 साली 'बहिनी दरबार'शी जुळल्या.
आपला अनुभव सांगताना जन्मावती म्हणाल्या, "एका गावात मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या 32 मजुरांना मजुरी मिळाली नव्हती. ते वारंवार मागणी करत होते पण त्यांचं कोणी ऐकूनच घेत नव्हतं.
मी 'बहिनी दरबार'पर्यंत हा मुद्दा नेला आणि त्याबाबत पत्रकात लिहिलं. हे समोर आल्यानंतर तिथल्या काही दबंग लोकांनी माझ्यावर खूप दबाव टाकला होता. तेव्हा खूप भीती वाटली होती, पण 'बहिनी दरबार'नं साथ दिली.
माझ्या गावातही आम्हा लोकांना महिन्याचं जे राशन मिळायचं ते देखील अर्धच देत होते. याबाबतही मी लिहुन काढलं तेव्हा सरपंच, सचिव यांनी का लिहिलं म्हणून खूप छळलं होतं.
परंतु, आम्ही हे दोन्ही प्रकरण लावून धरले आणि आमच्या प्रयत्नांना यश आलं. मजुरांना मजुरीही मिळाली आणि आम्हाला राशनही मिळू लागलं."
आज मी दुसऱ्या संस्थेबरोबर काम करत असले तरी 'बहिनी दरबार'च्या बैठकीला उपस्थित राहते. या मंचानं मला नवीन ओळख मिळालीय, असं जन्मावती सांगत होत्या.
संघटनातून सामाजिक चळवळ
आज 'बहिनी दरबार'मधील महिला सदस्यांची संख्या 1000 च्या वर आहे. यातील महिला त्यांच्या गावात तसेच आसपासच्या भागात जाऊन आढावा घेत असतात. त्यानंतर, दर महिन्याला बैठक घेऊन 1 ते 10 तारखेदरम्यान हे पत्रक काढलं जातं.
त्यानंतर झेरॉक्स कॉपी असलेल्या जवळपास 3000 प्रति रीवा भागातील शासकीय कार्यालयं, गावांत आणि विविध संस्थांपासून तर पोलीस ठाण्यापर्यंत सर्वत्र महिलांच्या माध्यमातून पाठवल्या जातात.
बघेली भाषेतल्या या पत्रकात समस्यांव्यतिरिक्त शिक्षण, रोजगार, आरोग्य, विविध शासकीय योजनांसह संविधानातील महिलांचे हक्क, सामाजिक न्यायाशी निगडीत महत्वपूर्ण माहितीदेखील दिली जाते.
याशिवाय गावातील विविध समस्यांच्या समाधानातही या महिला सक्रिय भूमिका बजावत आहेत.
महिलांचे राशन कार्ड तसेच आर्थिक हक्क मिळवून देण्याच्या दृष्टीनंही 'बहिनी दरबार' काम करतोय. तसेच, एक संस्थेच्या माध्यमातून मुली-महिलांना शिक्षणाचे धडेही दिले जातात.
'बहिनी दरबार'चं कुठलंही रजिस्ट्रेशन नाही. हा महिलांचा एक स्वतंत्र आणि स्वयंचलित गट आहे, त्यांना कुठलं फंडिंगही नाही, त्या स्वखर्चानं पत्रकाच्या प्रति झेरॉक्स करून वितरित करतात.
एका पत्रकासाठी 20 रुपये हीच त्यांची जमापूंजी, पुढच्या महिन्यात निघणाऱ्या पत्रकासाठी कामी येते. महिला वेळातवेळ काढून दर महिन्याला होणाऱ्या बैठकीत सहभागी होतात, आणि आपलं योगदान देतात.
प्रत्येक समस्येचं समाधान होतंच असं नाही. पण काहीच होणार नाही म्हणत टाळण्यापेक्षा प्रयत्न करून पाहण्यात काय वाईट आहे, असं रीता आपली भावना व्यक्त करताना म्हणाल्या.
'प्रत्येक महिलेनं हक्कासाठी आवाज उठवावा'
आपल्या उद्देशाबाबत सांगताना उषादेवी म्हणतात, "देशभरात कितीतरी महिला आहेत, ज्यांच्यावर रोज अत्याचार होतात. घर, समाज, रुढींच्या बेडीत अडकलेल्या लाखो महिलांना स्वत:चा आवाजच नाही. जोपर्यंत त्या स्वत:साठी उभं होत नाही, तोपर्यंत बदल घडणार नाही.
'बहिनी दरबार' आज अनेक शोषित, वंचित, उपेक्षित महिलांची ओळख बनलाय. या मोहिमेत अधिकाधिक महिला जुळाव्यात, त्यांनी आपलं म्हणणं जगापुढे मांडावं आणि आपली लढाई जिंकावी हाच आमचा उद्देश्य आहे.
आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात प्रत्येक महिलेनं आवाज उठवायलाच हवा. तुम्हाला न्याय मिळेल. आज नाही तर उद्या मिळेल पण न्याय मिळणार, हे नक्की! हे आम्ही आमच्या अनुभवातून सांगतोय.
'बहिनी दरबार'मधील महिलांसाठी आम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घेतो, त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करतो. आतातर अनेक सुशिक्षित मुलीही आमच्यासोबत जुळल्या आहेत. त्या अशिक्षित महिलांना शिक्षणासाठी मदत करतात."
'बहिनी दरबार' फार मोठं नाही, पण स्थानिक पातळीवर त्यांचं काम वंचितांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरत आहे.
यात अनेक नवीन महिला जुळल्या तर काहींनी दरबार सोडलंही परंतु, त्यांचं काम कधीच थांबलं नाही.
कोणत्याही आर्थिक सहकार्याविना स्वखर्चानं इतकी मोठी ताकद उभी करून व्यवस्थेला व्यवहारात बसवण्याचं काम त्यांनी केलं. आज काही संस्था, शासकीय कार्यालय, पोलीस त्यांच्या पाठीशी उभे आहेत.
हे कुटुंब वाढत आहे, पुढे जात आहे. कलसिया, जन्मावतीसारख्या अनेक महिलांना आपल्या पायावर उभं राहण्याची ताकत या पत्रकानं दिली.
रीवासारख्या कट्टर वर्णव्यवस्थेने ठासून भरलेल्या भागात त्यांनी क्रांतीची मशाल पेटवली. स्थानिक पातळीवरच्या छोट्याशा उपक्रमानं देशभरात आपलं नाव केलंय.
एका विद्रोहातून सुरू झालेली 'बहिनी दरबार' नावाची ही क्रांती आज कित्येक उपेक्षित महिला-पुरुषांच्या हक्काचं व्यासपीठ बनली आहे. 1000 महिलांच्या या कुटुंबाचं कार्य स्थानिक पातळीवर निरंतर सुरू आहे.
या महिलांनी आपल्या प्रयत्नातून संघर्षाचा इतिहास लिहिला. दहा महिलांपासून सुरू झालेला प्रवास, आपल्या लेखणीसह डोळ्यापुढे एकच उद्देश घेऊन पुढे चाललाय - वंचित, शोषितांचा आवाज बनणे.
हा दरबार त्या महिलांचा आहे, ज्यांच्या वेदना आता फक्त कागदावरच नाहीत, तर समाजातील बदलाच्या रुपानं नोंदवल्या जात आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.