आता महिलांनी खाली मान घालून जगणं बंद केलं आहे, तुम्हीदेखील महिलांवरील अत्याचार बंद करा - ब्लॉग

    • Author, नसिरूद्दीन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

2024 या वर्षानं जाता-जाता माझ्यासमोर समाजाची दोन चित्रं उभी केली आहेत.

यातील पहिलं चित्र आहे, फ्रान्सच्या जीजेल पेलीको यांचं. त्यांनी त्यांचा माजी पती आणि इतर 50 पुरुषांविरोधातील सामूहिक बलात्काराचा खटला जिंकला. इतकंच नाही, तर प्रसार माध्यमांना जीजेल यांनी सांगितलं की, स्वत:ची ओळख न लपवता लैंगिक अत्याचार, हिंसाचाराच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याच्या त्यांच्या निर्णयाचा त्यांना कधीही पश्चाताप वाटणार नाही.

जीजेल यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या खटल्याच्या सुनावणीच्या सुरुवातीला म्हणाल्या होत्या, "मी जर आणखी काही दिवस हे सर्व सहन करू शकले, तरी खूप असेल."

प्रत्यक्षात, या सर्व कायदेशीर लढ्याला त्यांनी साडेतीन महिने सातत्यानं तोंड दिलं आणि अखेर त्यांनी खटला जिंकला.

दुसरं चित्र आहे, एका कार्यक्रमात कवी कुमार विश्वास यांचं खोचक वक्तव्यं. ते म्हणाले होते, "आपल्या मुलांकडून सीताजींच्या बहिणींची, भगवान रामाच्या भावांची नावं पाठ करून घ्या. एक इशारा देतो आहे. ज्याच्या लक्षात येईल, त्यानं टाळ्या वाजवाव्यात. तुमच्या मुलांना रामायण ऐकवा. गीता शिकवा. नाहीतर असं व्हायचं की, तुमच्या घरांचं नाव तर रामायण असेल, मात्र तुमच्या घरच्या श्री लक्ष्मीला दुसरंच कोणी घेऊन जाईल."

त्यांच्या या वक्तव्यामुळे एक-दोन दिवस मोठा वाद झाला. त्यावर प्रतिक्रिया आल्या. मग त्यानंतर आपण सर्व पुन्हा दुसऱ्या कशात तरी व्यग्र झालो.

असं असलं तरी, कुमार विश्वास यांच्यासारख्या वक्तव्यांबद्दल थोडं शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. जीजेल पेलीको सारख्या महिलांचं मन आणि धाडस समजून घेण्याची गरज आहे.

हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की, प्रत्यक्षात ही दोन्ही प्रकरणं, एकाच प्रकारच्या मानसिकतेशी संबंधित आहेत.

ती मानसिकता या प्रश्नांशी जोडलेली आहे की, महिला किंवा मुली म्हणजे काय भोगवस्तू आहेत का, ज्यांना दुसऱ्या कोणाला देता येतं? त्यांना कोणीही, कुठेही, त्यांच्या इच्छेविरुद्ध घेऊन जाऊ शकतं का? मुलींवर निंयत्रण असण्यासाठी किंवा मालकी हक्क असण्यासाठी मुली म्हणजे काय आई-वडील किंवा कुटुंबाची मालमत्ता आहेत का? मुलींच्या शरीर-मनाचा मालक एखादा पुरुष असेल का? मुली, महिलांना स्वतंत्र व्यक्तिमत्वं नसतं का?

कवीचा इशारा समजण्यात कोणाला अडचण आली?

नेमकं काय झालं पाहा. कुमार विश्वास यांचा मुद्दा, इशारा त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या लक्षात आला आणि त्यांनी टाळ्या देखील वाजवल्या.

इतकंच नाही, तर हा इशारा विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मीडियावर देखील लोकांना देखील चांगलाच समजला.

कोणी त्याची बातमी केली तर कोणी त्याच्या बाजूनं आणखी काही जोडलं, तर काहींना त्याचा राग आला.

मात्र त्या इशाऱ्याने परिणाम केला. कारण, कुमार विश्वास यांनी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा यांच्याकडे सूचक इशारा केला, हे सर्वांच्याच लक्षात आलं होतं.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या घराचं नाव 'रामायण' आहे. सोनाक्षीचं लग्न ज्यांच्याशी झालं, त्यांचं नाव जहीर इकबाल आहे.

मुली, महिला म्हणजे वस्तू असतात का?

'श्री लक्ष्मी' चा शब्दाचा इशारा तर घरातील मुलीकडेच आहे.

त्यामुळे ही गोष्ट अगदी स्पष्ट झाली पाहिजे की, मुली किंवा कोणतीही महिला म्हणजे वस्तू नसते.

एखाद्या वस्तूप्रमाणे त्यांची खरेदी-विक्री केली जाऊ शकत नाही. त्यांची देवाण-घेवाण होऊ शकत नाही.

वयात आलेल्या किंवा कायद्यानं सज्ञान असलेल्या मुलीच्या आयुष्याच्या निर्णयांबद्दल तिच्याशीच बोलणं होऊ शकतं, तिच्या कुटुंबियांशी नाही.

मुलगी आई-वडिलांची मालमत्ता असते का?

कवी जेव्हा 'श्री लक्ष्मी'ला इतर कोणी 'घेऊन जाण्याचा' इशारा देतात, तेव्हा त्यातून त्यांची सुप्त इच्छा दिसून येते की आई-वडिलांनी त्यांच्या मुलींना स्वत:च्या ताब्यात ठेवावं, नियंत्रणाखाली ठेवावं.

मग त्यांनी तिच्याशी कसंही वागलं तरी चालेल. मुलीला स्वत:च्या इच्छेनुरुप अजिबात जगू देऊ नये.

त्यामुळे आपल्या सर्वांच्या मनात काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत.

आई-वडिलांनी मुलीला जन्म दिला आहे, म्हणून त्या त्यांची मालमत्ता होत नाहीत. अर्थात आई-वडिलांचं जसं मुलांच्या आयुष्यावर नियंत्रण असतं, तसं मुलींवर नसतं. आज आपल्या समाजाचं स्वरुप ज्या प्रकारचं आहे, त्यात तर मुलींच्या प्रत्येक श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

मुलीला तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही का?

अनेकांचं असं मत असतं की, महिलेला स्वतंत्र व्यक्तिमत्व नसतं, तिला स्वत:चं स्थान नसतं. त्यांना वाटतं की, मुलींचा, महिलांचा जन्मच मूळी त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जावं, अधिकार गाजवला जावा म्हणून होतो. वडील, भाऊ, पती, मुलगा आणि इतर कोणताही पुरुष त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो, त्यांच्यावर ताबा ठेवू शकतो.

म्हणूनच तर आपलं घर-कुटुंब, समाज, मुलींच्या आयुष्याबद्दल कायम निर्णय घेत असतो. आपले निर्णय मान्य करणं तिला भाग पाडत असतो.

जन्मानं प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते. महिला देखील माणूस असतात. त्यामुळेच त्यासुद्धा स्वतंत्र व्यक्ती असतात. आपल्या आयुष्याबद्दल निर्णय त्या स्वत: घेऊ शकतात.

पुरुषांनी घेतलेले निर्णय देखील चांगले किंवा वाईट असतात. त्याचप्रमाणे महिलांनी घेतलेले निर्णय देखील बरे-वाईट असू शकतात. त्यामुळेच कायद्यानं सज्ञान झाल्यानंतर त्या कोणाला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडणार, कोणाबरोबर आयुष्य घालवणार, या गोष्टीचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार देखील त्यांचाच आहे. हा त्यांच्या प्रायव्हसीचा मुद्दा देखील आहे.

आपल्या आवडीचा जोडीदार निवडणं हा गुन्हा आहे का?

आवड आणि निवड - हे दोन शब्द, कोणत्याही माणसाच्या अधिकाराशी जोडलेले आहेत.

लग्नासारख्या महत्त्वाच्या मुद्द्याबाबत आवड आणि निवडच्या अधिकाराचा वापर करणं, हे देखील याच्याशीच निगडीत आहे.

याबाबतीत जितका अधिकार मुलांना आहे, तितकाच अधिकार मुलींना देखील आहे. सोनाक्षी सिन्हा ही काही पहिलीच मुलगी नाही, जिच्या पसंतीबद्दल, जोडीदाराबद्दल उघडपणे चर्चा होते आहे.

काही महिन्यांआधी अभिनेत्री स्वरा भास्करच्या बाबतीत देखील असंच झालं होतं.

दोघांच्या बाबतीतील समान धागा म्हणजे, दोघींचेही जोडीदार त्यांच्या धर्माचे नाहीत. त्यांची आवड आणि निवड धर्माच्या चौकटीपलीकडची आहे.

आपला समाज मुली आणि महिलांकडे जात, धर्म, समुदायाची ओळख म्हणून पाहतो.

म्हणूनच समाज त्यांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवू इच्छितो. त्यामुळेच मुली जेव्हा इतर जातीच्या, धर्माच्या किंवा समुदायाच्या मुलाशी लग्न करतात तेव्हा पुरुषी समाजाला ही गोष्ट अजिबात सहन होत नाही.

या प्रकरणात प्रत्येक जात, धर्म किंवा समुदाय यांचा पुरुषी विचार एकच आहे. असा विचार असणारा वर उल्लेख केलेला कवी हा काही एकटाच पुरुष नाही.

ही मानसिकता लक्षात घेणं आणि महिलांच्या आयुष्यावरील पुरुषांचं नियंत्रण, त्यांचा पहारा नष्ट करणं महत्त्वाचं आणि गरजेचं आहे.

एखाद्या कट-कारस्थानातून प्रेम जन्माला येत नाही. कट-कारस्थानांच्या पलीकडे एक जग आहे. त्या जगात प्रेम जन्माला येतं, फुलतं.

तन-मन महिलेचं, मग मालक कोण?

पुरुषी समाज मुलीला वस्तू समजू लागताच, तो तिच्या तन-मनाचा मालक होतो.

त्यामुळेच मग तिचं मत, स्वातंत्र्य, सहमती, तिची इच्छा-अनिच्छा या सर्व गोष्टींना काहीही अर्थ राहत नाही.

पुरुषी समाजाला वाटतं की, महिला त्याच्यासाठीच आहे आणि त्याचीच आहे. त्यामुळेच तर एखादा पुरुष असा अत्याचार, गुन्हा करण्यास धजावतो की ज्यात तो स्वत:च त्याच्या पत्नीवर बलात्कार करत नाही, तर इतर पुरुषांना देखील बलात्कार करण्यास सांगतो.

जर तन-मन महिलेचं आहे, तर मग त्याची मालक देखील तीच आहे, याबद्दल पुरुषांना कोणतीही शंका असता कामा नये.

जीजेल पेलीको असो की सोनाक्षी सिन्हा, महिला आता स्वत:चं अस्तित्वं, स्वतंत्र जगणं, आत्मबोधाचा स्वर शोधत आहेत. अनेक महिला तर त्यात यशस्वी देखील झाल्या आहेत.

स्वतःवर झालेल्या बलात्कार, लैंगिक हिंसाचाराविरोधात लढण्याचं जीजेल यांचं अद्भूत धाडस असो की सोनाक्षी सिन्हा किंवा स्वरा भास्कर यांचा स्वत:च्या मर्जीनं लग्न करण्याचा घेतलेला निर्णय असो, या सर्वांचा सर्व प्रकारचा विरोध, दररोज होणारं ट्रोलिंग, अपमानास्पद टीका, कॉमेंट्स यांच्यासमोर खंबीरपणं, हिंमतीनं उभं राहणं - या सर्व गोष्टींमधून एकच बाब समोर येते ती म्हणजे महिलेमध्ये एक जबरदस्त ताकद, शक्ती आहे.

अनेकदा महिलांनाच स्वत:मधील या ताकदीची, शक्तीची जाणीव नसते.

याच शक्तीमुळे ती डोंगर चढते, पृथ्वीला गवसणी घालते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अफाट कामगिरी करून दाखवते. तिनं स्वत:च्या या ताकदीवर, स्वत:वर आणखी विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. आत्मविश्वासानं उभं राहण्याची आवश्यकता आहे.

महिलांनी एकदा का या ताकदीनं समाजात वावरायला सुरुवात केली की, मग फ्रान्समधील पुरुष असोत की भारतीय असोत, ते महिलांना स्वत:ची मालमत्ता, वस्तू समजण्याचा उर्मटपणा सोडून देतील. ते महिलांना सन्मान देतील, त्यांच्याशी आदरानं वागतील. त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व स्वीकारतील.

आता महिला मान खाली घालून पुरुषांची मालमत्ता होण्यास नकार देत आहेत. त्यामुळे पुरुषांनी त्यांना मालमत्ता, वस्तू समजून त्यांचं शोषण करणं बंद करावं.

ही मतं लेखिकेची वैयक्तिक आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)