इंडसइंड बँकेच्या ठेवीदारांना RBI ने काय सांगितले, काय आहे संपूर्ण प्रकरण?

इंडसइंड बँक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंडसइंड बँक

भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेबद्दल उपस्थित केलेल्या चिंतांवर निवेदन जारी केलं आहे.

रिझर्व्ह बँकेनं इंडसइंड बँकेच्या ठेवीदारांना सांगितलं की, इंडसइंड बँकेकडे पुरेसं भांडवल आहे आणि बँकेची आर्थिक स्थिती स्थिर आहे.

आरबीआयनं शनिवारी (15 मार्च) एक निवेदन जारी करून ठेवीदारांना बँकेबद्दलच्या चर्चांवर लक्ष देऊ नका असं आवाहन केलं आहे. तसेच बँकेचे आर्थिक आरोग्य चांगले असून रिझर्व्ह बँक त्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचंही नमूद केलं.

इंडसइंड बँकेनं सोमवारी (10 मार्च) स्टॉक एक्सचेंजला अकाउंटिंगमधील अनियमिततेबद्दल माहिती दिली होती. यानंतर, बँकेच्या ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि बँकेच्या शेअर्सच्या किमती सुमारे 27 टक्क्यांनी घसरल्याचं वृत्त आहे.

आरबीआयनं नेमकं काय म्हटलं आणि त्याचा अर्थ काय?

15 मार्चला जारी केलेल्या निवेदनात आरबीआयनं म्हटलं की, इंडसइंड बँकेबाबत अंदाज वर्तवला जात आहे आणि अफवा पसरवल्या जात आहेत.

निवेदनात, आरबीआयने इंडसइंड बँकेच्या आर्थिक आरोग्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे आणि म्हटले, "इंडसइंड बँकेकडे पुरेसे भांडवल आहे आणि तिची आर्थिक स्थिती समाधानकारक आहे."

"31 डिसेंबर 204 रोजी संपलेल्या तिमाहीचं ऑडिटर्सने परीक्षण केलं आहे. त्यानुसार, भांडवली पर्याप्तता गुणोत्तर (कॅपिटल एडिक्वेसी रेशो) 16.46 टक्के आहे. बँकिंग मानकांनुसार हे समाधानकारक आहे."

चांगले भांडवली पर्याप्तता गुणोत्तर असण्याचा निर्देशांक म्हणजे बँक तिच्या कामकाजादरम्यान दिलेल्या कर्जांशी आणि कामकाजाशी संबंधित जोखीम हाताळण्यास सक्षम आहे.

सोप्या शब्दांत सांगायचे तर, बँक कोणताही संभाव्य तोटा सहन करू शकते. तसेच बँक ठेवीदारांचे पैसे बुडण्यापासून वाचवू शकते आणि बँकेवरील कर्जही परत करू शकते.

आरबीआय

फोटो स्रोत, RBI

आरबीआयनं म्हटलं आहे की, इंडसइंड बँकेचा प्रोव्हिजन कव्हरेज रेशो देखील 70.20 टक्के आहे. 9 मार्च 2025 रोजी बँकेचा लिक्विडीटी कव्हरेज रेशो 113 टक्के होता. आरबीआयच्या नियमांनुसार तो 100 टक्के असावा लागतो.

प्रोव्हिजन कव्हर रेशो अंतर्गत, बँका एनपीएमुळे (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स) होणारे नुकसान भरून काढण्यासाठी एक विशिष्ट रक्कम बाजूला ठेवतात. बँकेचा प्रोव्हिजन कव्हर रेशो 70.20 टक्के असेल, तर तो चांगला मानला जातो.

लिक्विडिटी कव्हरेज रेशो हे असं गुणोत्तर आहे जे बँकेकडे तत्काळ पेमेंटसाठी किती पैसे (लिक्विड अॅसेट) आहेत हे सांगते. यावरून बँकेची कमी वेळात पैसे देण्याची क्षमता दिसून येते. उदाहरणार्थ 30 दिवसांसाठी कॅश आउटफ्लो क्षमता किती आहे हे पाहिलं जातं.

आरबीआयचे निवेदन

फोटो स्रोत, RBI

आरबीआयनं इंडसइंड बँकेच्या आर्थिक आरोग्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण दिलं. आरबीआयनं म्हटलं की, सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या स्पष्टीकरणावरुन असं दिसून येतं की बँकेनं तिच्या विद्यमान प्रणालींचा व्यापक आढावा घेण्यासाठी बाहेरच्या लेखापरीक्षकांना (ऑडिटर्स) नियुक्त केलं आहे.

हे लेखापरीक्षक बँक ज्या अकाउंटिंगच्या चुकीबद्दल बोलत आहे त्याचा बँक खात्यांवर किती परिणाम झाला आहे हे शोधून काढतील.

आरबीआयने इंडसइंड बँकेच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाला आर्थिक वर्षाच्या चालू तिमाहीत (आर्थिक वर्ष 2024-25 च्या शेवटच्या तिमाहीत) चूक दुरुस्त करण्यासाठी सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

त्याआधी बँकेला सर्व भागधारकांना याबद्दल माहिती द्यावी लागेल. आरबीआयनं म्हटलं आहे की, सध्या ठेवीदारांनी बँकेबद्दल सुरू असलेल्या तर्कवितर्कांकडे लक्ष देऊ नये.

लाल रेष
लाल रेष

इंडसइंड बँकेत नेमकं काय घडलं?

इंडसइंड बँकेनं सोमवारी (10 मार्चला) स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितलं होतं की, त्यांच्या परकीय चलन डेरिव्हेटिव्ह्ज पोर्टफोलिओमध्ये अकाउंटिंगच्या त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे त्यांच्या कमाईत आणि निव्वळ संपत्तीत घट होऊ शकते.

इंडसइंड बँकेला त्यांच्या अंतर्गत पुनरावलोकनात असं आढळून आलं की, या अनियमिततेमुळं डिसेंबर 2024 मध्ये त्यांची निव्वळ संपत्ती 2.35 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

विश्लेषकांच्या अंदाज होता की, संपत्तीतील घट होण्याची रक्कम 2100 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. याचा अर्थ बँकेच्या एकूण मालमत्तेत इतक्या मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते.

बँकेने ही माहिती सार्वजनिक केल्यानंतरच ठेवीदार आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण होऊ लागली. ठेवीदारांना असे वाटू लागले की, बँक अडचणीत येऊ शकते आणि त्यांचे पैसे बुडू शकतात.

बँकेने स्टॉक एक्सचेंजला याबद्दल माहिती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

सांकेतिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

या काळात बँकेचे शेअर्स 27 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 649 रुपयांवर आले. नोव्हेंबर 2020 नंतर या स्टॉकमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण होती. असं असलं तरी नंतर हे शेअर्स सावरले आणि 672 रुपयांवर पोहोचले.

मंगळवारी (11 मार्च) इतक्या मोठ्या घसरणीनंतर इंडसइंड बँकेचे बाजार भांडवल सुमारे 19,000 कोटी रुपयांनी कमी झाले.

या आठवड्यात इंडसइंड बँकेचे सीईओ सुमंत कठपालिया यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे.

कठपालिया म्हणाले, "मला खात्री आहे की पुढील दोन ते तीन तिमाहीत बँक प्रगतीकडे वाटचाल करण्यास सुरुवात करेल."

"मी सहमत आहे की, काही उलथापालथ झाली आहे आणि त्याचा आमच्यावर परिणाम झाला आहे. मात्र, ती एकेकाळची बाब आहे. आम्ही कधीही गुंतवणूकदारांपासून काहीही लपवलेलं नाही. आम्ही पूर्णपणे पारदर्शक आहोत."

शेअर्सच्या घसरणीबद्दल गुंतवणूकदारांनी काय म्हटलं?

इंडसइंड बँकेच्या शेअर्सच्या घसरणीवर लोकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिषेक अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलं, "इंडसइंड बँकेचे शेअर्स बऱ्याच काळापासून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी नुकसानकारक ठरले आहेत."

"10 वर्षे उलटून गेली, पैसे परत मिळाले नाहीत, पैसे गेले आहेत. दरम्यान, बँकेतील प्रमोटर्सचा हिस्साही कमी झाला आहे. हा असा स्टॉक नाही जो तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू इच्छिता," असंही अग्रवाल यांनी म्हटलं.

प्रिया नावाच्या एका युजरनं लिहिलं, "इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून मला 10 वर्षे झाली आहेत. परतफेड म्हणून एक पैसाही मिळाला नाही."

आफताबनं लिहिलं, "त्याचे शेअर्समध्ये 55 टक्क्यांनी घट झाली आहे. आपण वाळूच्या जमिनीवर घर बनवत आहोत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)