You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लिंगायत समुदाय नेमका काय आहे? वीरशैव आणि लिंगायत यांच्यात काय फरक आहे?
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
संत बसवेश्वरांनी 12 व्या शतकात लिंगायत धर्माची स्थापना केली.
अनेकदा लिंगायत आणि वीरशैव हा एकच समुदाय आहे असं लोकांना वाटतं.
या सर्व गोष्टींची पार्श्वभूमी लक्षात घेऊन लिंगायत समुदाय म्हणजे नेमकं काय? त्याची स्थापना केव्हा झाली आणि या समुदायाचं तत्त्वज्ञान काय आहे? याविषयी बीबीसी मराठीनं घेतलेला आढावा.
'हिस्टरी अँड फिलॉसॉफी ऑफ लिंगायत रिलीजन' या पुस्तकामध्ये प्रा. एम. आर. साखरे यांनी म्हटलं आहे की लिंगायत धर्म हा 12 व्या शतकात स्थापन झाला. या धर्माचे संस्थापक 'बसव' यांच्या साधी राहणी आणि उच्चविचारसरणीमुळेच हा धर्म लोकप्रिय झाला, असं मत ते व्यक्त करतात.
'मानवाचं धार्मिक जीवन हे त्याच्या सामाजिक कल्याणाशी जोडलं गेलेलं असतं त्यामुळे बसवण्णांनी धार्मिक सुधारणांबरोबरच सामाजिक सुधारणांना महत्त्व दिलं,' असा संदर्भ साखरे यांनी त्यांच्या पुस्तकात दिला आहे.
लिंगायतांचं ठळक वैशिष्ट्यं म्हणजे ते गळ्यात लिंग धारण करतात. हे लिंग शिवाचं म्हणजेच सत्याचं प्रतीक आहे, अशी त्यांची आस्था असते.
स्त्री असो वा पुरुष हे लिंग सर्वांना धारण करता येतं. सर्व जण समान आहेत हा लिंगायत धर्माचा आधार आहे. त्यानुसार सर्वांनाच हे लिंग धारण करता येतं.
साखरे त्यांच्या पुस्तकात सांगतात की हिंदू धर्मानुसार असलेल्या अनेक मान्यतांना लिंगायतांचा विरोध आहे. "बसवेश्वरांनी ब्राह्मणांच्या वर्चस्वशाहीला विरोध केला. हिंदू पुरोहित स्वतःच्या स्वार्थासाठी खालच्या वर्गाचं शोषण करत त्याविरोधात बसव समोर आले," असं साखरे सांगतात. त्यामुळे लिंगायत धर्म हा हिंदूंचे रीतीरिवाज मानत नाही असं ते पुढे सांगतात.
वीरशैव आणि लिंगायत यांच्यातला फरक
कर्नाटकातील अभ्यासक आणि लेखक डी. पी. प्रकाश सांगतात, "लिंगायत हे बसवण्णाच्या विचारधारेनुसार वागणारे लोक आहेत तर वीरशैव हे प्रामुख्याने शिवभक्त असतात पण त्याचबरोबर इतर देवी-देवतांवर त्यांचा विश्वास असतो. हिंदू सणांचं ते पालन करतात.
मुख्य फरक हाच आहे की वीरशैव हे स्थिर लिंगाची ( ज्या ठिकाणी शिवलिंगाची विधिवत प्रतिष्ठापना झाली आहे) त्याची पूजा करतात. तर लिंगायत हे आपल्या गळ्यातील लिंगाची पूजा करतात. पूजेच्या वेळी ते आपल्या गळ्यात धारण केलेलं लिंग आपल्या तळहातांवर ठेवतात आणि प्रार्थना करतात. ईश्वराच्या आराधनेसाठी मध्यस्थाची गरज नाही अशी लिंगायतांची मान्यता आहे." हा फरक ते समजावून सांगतात.
'वेदप्रामाण्य नाकारलं'
"मंदिरात जाणं, अभिषेक करणं, होम हवन यासारख्या कर्मकांडांना बसवेश्वरांचा विरोध होता. जर तुम्ही एखाद्या हिंदूला विचाराल की तुमचा गुरू कोण आहे तर त्याचं उत्तर तो ज्या गुरूंना मानतो त्यांचं नाव सांगून देईल, पण हाच प्रश्न तुम्ही जर लिंगायताला विचाराल तर तो बसवेश्वरांचेच नाव सांगेन," असं डी. पी. प्रकाश सांगतात. बसववेश्वरांनी वेदप्रामाण्य नाकारलं होतं.
"वैदिक धर्मव्यवस्थेला आव्हान म्हणूनच लिंगायत धर्म समोर आला होता. सर्वांना समान अधिकार हा या धर्माचा मूल आधार आहे. महात्मा बसवेश्वरांनी महिलांना समान हक्क दिले होते. त्याचबरोबर महिला 'स्कॉलरशिप' किंवा धर्माचं विशेष ज्ञान असलेल्या महिलांची मोठी परंपरा लिंगायतांना लाभलेली आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे," असं डॉ. गोविंद धस्के सांगतात. डॉ. धस्के हे लिंगायत युवा या वेबसाइटचे संपादक आहेत तसंच ते संशोधक आहेत.
'वेगळा धर्म नाही तर प्रोटेस्टंटसारखा पंथ'
लिंगायत हा वेगळा धर्म असल्याचा दावा काही अभ्यासक करत असले तरी काही अभ्यासकांच्या मते लिंगायत हा धर्म नाही.
डॉ. चिन्मया चिगाटेरी सांगतात, "त्या वेळी समाजाचं शोषण होत असे. या अन्यायाचा प्रतिकार म्हणून बसवेश्वरांनी त्यांचं तत्त्वज्ञान मांडलं. बसवेश्वर सांगत की मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यासाठी कुण्या मध्यस्थाची गरज नाही. तुम्ही स्वतः पूजा करण्यास सक्षम आहात."
"आज जरी लिंगायताचं स्वरूप हे वेगळ्या धर्मासारखं असलं तरी सुरुवात मात्र वेगळ्या धर्मासारखी झालेली नाही. हा फक्त एक वेगळा दृष्टिकोन होता. तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही प्रोटेस्टंट हिंदू सारखे आहोत. आम्ही रूढवादी व्यवस्था मानत नाही पण त्याला पर्यायी धर्म आहे असं देखील आम्ही म्हणत नाही," असं चिगाटेरी सांगतात.
लिंगायत समाजाचा राजकीय प्रभाव
लिंगायत समाज हा प्रामुख्याने कर्नाटकामध्ये आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील त्यांचं मोठं प्रमाण आहे. कर्नाटकमध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 18 टक्के लिंगायत आहेत. त्यामुळे कर्नाटकमधल्या प्रभावी जातींमध्ये त्यांची गणना होते.
लिंगायतांचा राजकीय प्रभाव कसा आहे याबाबत पत्रकार इमरान कुरैशी यांनी आपल्या लेखात मांडलं आहे. ते सांगतात, सामाजिक रूपाचा विचार केला तर लिंगायत हे उत्तर कर्नाटकात प्रभावी आहेत. 80 च्या दशकात लिंगायतांनी तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडेंना समर्थन दिलं होतं. तर त्यानंतर 1989मध्ये वीरेंद्र पाटील यांना समर्थन दिलं होतं. म्हणजे लिंगायत ज्यांच्या बाजूने त्यांचा मुख्यमंत्री असं अलिखित समीकरण होतं.
मठांचा प्रभाव
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका मठाधिशाने केलेलं विधान चांगलं गाजलं होतं. धर्मपीठ हे नेहमी विधानसभा वा संसदपेक्षा श्रेष्ठ असतं असं हुबळीचे मूरसावीर मठाचे प्रमुख राजयोगेंद्र स्वामी यांनी म्हटलं होतं.
कर्नाटकातले मठ ज्या उमेदवाराला समर्थन देतात त्यावर त्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून असतं असं म्हटलं जातं. त्या विशिष्ट मठाचे हजारो भक्त असतात आणि मठाधिश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ज्या उमेदवाराला आशीर्वाद देतात त्याच्यापाठीमागेच हे भक्त उभे असतात. अर्थात ही गोष्ट कर्नाटकतले धार्मिक नेते मान्य करत नाहीत.
"कर्नाटकचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर हे समजणं आवश्यक आहे की मठांचा इथल्या राजकारणावर प्रभाव आहे. कारण त्यांचा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर आणि विचारांवर प्रभाव आहे. त्यामुळे ज्यांना निवडणूक लढवायची आहे असे उमेदवार किंवा निवडणुकांनंतर आलेली सरकारंसुद्धा या मठांचं लांगुलचालन करतात.
जरी धर्म आणि राजकारण या म्हणायला वेगवेगळ्या गोष्टी असल्या, तरीही प्रत्यक्षात ते तसं कधीही नसतं. म्हणूनच इथल्या राजकारणात मठ महत्त्वाची भूमिका बजावतात," असं धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणारे डॉ हरिश रामस्वामी यांनी बीबीसी मराठीला एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)