महात्मा बसवेश्वर : महिलांना पुरुषांप्रमाणेच धार्मिक अधिकार मिळावे यासाठी बंड पुकारणारे संत

    • Author, रेणुका कल्पना
    • Role, बीबीसी मराठीसाठी

उडुतंडीच्या आपल्या राजवाड्यात वस्त्रांचा त्याग करून महादेवी निघाली ते जवळपास 700 किमी दूर आजच्या बसवकल्याणला आल्यावरच थांबली. आपल्या लांबसडक, दाट केसांशिवाय अंग झाकण्यासाठी तिला दुसरं काहीही गरजेचं वाटलं नाही.

ती लहान असल्यापासून तिचे आई वडील लिंगायत चळवळीत होते. बसवेश्वरांच्या शिकवणुकीमुळेच बाराव्या शतकातल्या सतानती वातावरणातंही तिचा बालविवाह झाला नव्हता.

म्हणून तर तिच्या पतीनं, म्हणजे राजा कौशिकानं, तिच्या मर्जीविरोधात तिला लैंगिक वासनेनं हात लावला तेव्हा ती तशीच राजवाड्यातून बाहेर पडून थेट बसवेश्वरांच्या अनुभवमंटपात आली.

पण तिच्या नग्नतेकडे पाहून लिंगायत वर्तुळात वाद सुरू झाला. शरणांत स्त्री-पुरूष समानता असली, महिलांना पुजाअर्चेचे, व्यवसाय करण्याचे, ज्ञान घेण्याचे समान हक्क असले तरी असं सगळे कपडेच त्यागून कुणी फिरायचं म्हणजे! कुणालाही ते सहज पटणारं नव्हतं.

अल्लमप्रभुदेव हे दलित शरण अनुभवमंटपाचे अध्यक्ष होते. ते खरंतर अतिशय बंडखोर होते. बसवण्णांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही स्त्री-पुरूष भेदाला विरोध केला होता.

पण त्यांनीही महादेवीला प्रश्न विचारायला सुरूवात केली. भक्ती, अध्यात्म, ज्ञान अशा वेगवेगळ्या विषयावर महादेवी सडेतोड पण शांतपणे बोलली.

"मी कधी पुरूष असतो; तर कधी स्त्री"

'हातानं अंगावरील कपडे, पातळ फेडता येऊ शकतं. पण शरीरातला निर्वाण कसा काढणार?' तिची भूमिका साफ होती. कपडे शरीरावर घालतात; आत्म्यावर नाही, असंच तिचं म्हणणं होतं.

शेवटी बसवण्णा उठले आणि चक्क महादेवीची पाठराखण करू लागले. "मी हे पुरूषाचे कपडे केवळ तुमच्यासाठी घातले आहेत. मी कधी पुरुष असतो, तर कधी स्त्री," ते म्हणाले.

"महादेवीला शिवाच्या नजरेचं वस्त्र लाभलं आहे. तिला इतर वस्त्र आणि दागिन्यांची काय गरज?" बसवण्णांच्या शब्दांनी सगळ्यांचा विरोध मावळला.

अल्लमप्रभुंसोबत झालेल्या वादानं सगळ्यांना महादेवीच्या ज्ञानाची प्रचिती आलीच होती. महादेवीची 'अक्कामहादेवी' झाली.

अक्कामहादेवींसारखं आदरणीय स्थान लिंगायत चळवळीत अनेक स्त्रियांना मिळालेलं दिसतं. बाराव्या शतकाच्या पाटीवर आजच्या स्त्रीमुक्तीची अक्षरं गिरवणाऱ्या बसवेश्वरांच्या शिकवणुकीमुळेच ते शक्य झालं होतं.

आज, 30 एप्रिल, महात्मा बसवेश्वरांची जयंती. कर्नाटकातल्या बागेवाडी या गावात अक्षय तृतीयेच्या दिवशीच त्यांचा जन्म झाला होता.

गावातल्या जुन्या महादेवाच्या मंदिरातल्या नंदीला नवस बोलल्यानं झालेला मुलगा म्हणूनच तर त्यांचं नाव 'बसव' ठेवलं होतं.

मुंज का नाकारली?

या बसवानेच लिंगायत धर्माची स्थापना केली. धर्म कसला! बाराव्या शतकातल्या धर्मसुधारणेच्या आणि समाजसुधारणेच्या एका आंदोलनाचंच ते नाव होतं.

सगळ्यांना लाभतो, सगळ्यांपर्यंत पोहोचतो असा देवळाबाहेरचा देव हातात घेऊन ते असमानेच्या विरोधात बोलत राहिले. मग ती असमानता कामातली असो, जातीतली असो वा स्त्री-पुरूषांमधली.

"बसवेश्वरांनी अनेक पातळीवर सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणेचं काम केलं आहे. पण त्यांचं चरित्र पाहिलं तर त्यांच्या कामाची सुरूवातच महिला स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून झाली असल्याचं दिसून येतं," राजु जुबरे सांगतात.

ते लिंगायत विचारांचे अभ्यासक आणि 'महाराष्ट्र बसव परिषद' या संस्थेचे संचालक आहेत. 'लिंगायत: स्वतंत्र धर्म' या नावाचं त्यांचं पुस्तकंही आहे.

"बहिणीला समान हक्क नाही म्हणून बसवेश्वरांनी मुंज नाकारली होती," जुबरे पुढे सांगत होते.

आजच्या बसवन बागेवाडी या गावात एका ब्राह्मण कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला होता. तोही बारा गावाच्या शेकडो ब्राह्मणांच्या प्रमुख असणाऱ्याच्या घरात. त्यांच्या मुंजीला त्याकाळातली अनेक विद्वान, बडी मंडळी आली होती.

त्यांची मोठी बहिण आक्का नागलांबिका. तिला मात्र हा विधी करण्याचा अधिकार नाही हे त्यांना समजले.

'हा विधी इतकाच महत्त्वाचा असेल तर माझ्या बहिणीवरही तो केला गेला पाहिजे. नाहीतर मीही करून घेणार नाही,' असं म्हणत बसवेश्वरांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिले बंड केले होते.

या बंडानं त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपासून तोडलं. समाजानं जातीबाहेर केलं. म्हणून रागानं कुडलसंगमला आश्रमात शिक्षण घेण्यासाठी ते निघून गेले.

निवृत्त प्राध्यापक आणि ज्येष्ठ बसवेश्वर अभ्यासक डॉ. अशोक मेनकुदळे त्यांच्या 'क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर' या पुस्तकात लिहितात, "कुडलसंगम येथील विद्यार्जनाच्या काळात बसवेश्वरांच्या लक्षात आले की, सर्वच धर्मग्रंथ हे सामान्यतः पुरुष ब्राह्मणांनीच लिहिलेले आहेत."

त्यामुळे स्त्रीजातीने अधिकार उपभोगण्यापेक्षा कर्तव्ये पार पाडण्याचीच जास्त अपेक्षा धर्मग्रंथांनी व्यक्त केलेली आहे. त्यांच्या भावभावना, स्त्रीजातीची वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक-मानसिक जडणघडण यांचा वेगळा असा विचार धर्मग्रंथांनी केलेला नाही. म्हणूनच पुरुषांनी लिहिलेल्या धर्मग्रंथांनी स्त्रीजातीवर अन्याय केलेला आहे."

स्त्री-पुरूषांसाठी समान विधी

पण बसवण्णांनी स्थापन केलेल्या लिंगायत धर्मामध्ये तसं नव्हतं. शिक्षण संपवून मंगळवेढ्याला कोषागार विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असतानाच बसवेश्वर लोकांना एकाच देवाची उपासना करायला सांगत होते.

ज्यांना देऊळ प्रवेश नाकारला गेला होता अशा दलितांना, स्त्रियांच्या हातात त्यांनी देव दिला. सगळ्या जगाचं प्रतिक म्हणून शिवाच्या लिंगाची छोटी प्रतिकृती घेतली आणि मनातल्या इच्छा (इष्ट) त्याला बोलून दाखवता येतात म्हणून त्याला 'इष्टलिंग' म्हटलं.

इष्टलिंग गळ्यात घालतो तो लिंगायत! त्यात पुढे काही जात, उपजात नाही.

लिंगायत धर्म स्वीकारलेल्याने कधीही, कुठेही इष्टलिंग तळहातावर घेऊन त्याची पूजा करायची. म्हणजे कोणालाही दक्षिणा न देता, सोवळंओवळं न पाळता हवं तेव्हा देवाला चक्क हातच लावायचा.

"जे विधी, जे मंत्र पुरूषांसाठी; तेच महिलांसाठी. वेगळं असं काही नाही," राजू जुबरे सांगतात.

"महत्त्वाचं म्हणजे, बसवेश्वरांच्या लिंगायत धर्मात महिलांनाही धर्मग्रंथ लिहिण्याचा अधिकार होता. त्यांनी लिहिलेलं साहित्य धर्माची वचनं म्हणून संबोधलं गेलं," ते पुढे म्हणाले.

लिंगायत धर्मात स्त्री गरदोर असताना गर्भावर आठव्या महिन्यातच काही संस्कार केले जातात, असंही ते सांगत होते. पोटातलं बाळ मुलगी की मुलगा याची पर्वा केली जात नाही.

मासिक पाळीचा विटाळही नाकारला

"महिलांना धर्मविधीत नाकारण्याची सगळ्यात महत्त्वाचं कारणं दिलं जातं की ती मासिक पाळीमुळे विटाळते. त्यामुळेच स्त्रीला क्षुद्र, अपवित्र म्हटलं गेलं. पण बसवण्णांनी ते नाकारलं," राजू जुबरे सांगत होते.

बसवण्णांनी नाकारलेल्या पाच सुतकांमध्ये जातीच्या, जन्म-मृत्यूच्या सुतकासोबतच मासिक पाळीच्या सूतकाचाही समावेश होता. मासिक पाळीशिवाय जन्म होत नसेल तर त्याला विटाळ आणि अपवित्र कसं म्हणायचं असं बसवेश्वरांचं एक वचन उपलब्ध असल्याचं जुबरे पुढे सांगत होते.

मासिक पाळीच्या रक्तावरच गर्भ वाढतो, त्यात अशुद्ध, अपवित्र असं काहीही नसतं हे आधुनिक विज्ञानानं सांगितलेलं सत्य बसवेश्वरांना बाराव्या शतकातच उमगलं होतं.

मुळातच, स्त्री आणि पुरूष असं काही वेगळं नसतंच अशी शिकवण लिंगायत चळवळीत होती. दाढी मिशा वाढल्या तर त्या देहाला पुरूष म्हटलं जातं आणि स्तन वाढले तर त्या देहाला स्त्री म्हटलं जातं.

'देहात असलेला आत्मा तो स्त्री नव्हे तर पुरुषही नव्हे रामनाथा', असं दासिमय्या नावाच्या एका शरणाचं वचन उपलब्ध आहे.

'त्याहीपुढे, ज्ञानाला कुठे लिंग असतं. मग हा भेद नेमका कशासाठी? असाही प्रश्न लिंगायत चळवळ त्या काळच्या व्यवस्थेला करत होती', असंही जुबरे पुढे सांगतात.

बसवण्णा मंगळवेढ्याच्या राजा बिज्जळाकडे कोषागार मंत्री म्हणून काम करत होते. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर राजा बिज्जळाला अचानकपणे त्यांच्या मामेभावाचं आजच्या बसवकल्याणचं राज्य मिळालं.

त्यामुळे बसवेश्वरांचीही बढती झाली आणि ते कल्याणच्या मोठ्या राज्यांत महामंत्री झाले.

कल्याणला येताच त्यांनी लिंगायतांसाठी अनुभवमंटप नावाचं एक व्यासपीठ सुरू केलं. एकमेकांसोबत वैचारिक चर्चा करता याव्यात म्हणून हे व्यासपीठ होतं.

तामिळनाडूपासून अफगणिस्तानपर्यंत वेगवेगळ्या जातीचे अनेक साधक या व्यासपीठाशी जोडले गेले होते. फक्त पुरूषच नाही तर स्त्रियाही.

"अनुभवमंटपात 700 पुरूष आणि 77 स्त्रिया असल्याची नोंद आहे. त्यातल्या 35 स्त्रिया वचनं रचत होत्या. त्या सगळ्या स्त्रियांच्या जवळपास 1350 वचनांचा 'शरणींची वचनं' नावाचा एक स्वतंत्र खंडही कर्नाटक सरकारने प्रकाशित केला आहे," राजू जुबरे सांगतात.

यात सर्वात जास्त म्हणजे 434 वचनं अक्कामहादेवींची आहेत.

काम निवडण्याचं स्वातंत्र्य

लिंगायत झालेल्या पुरूषांना शरण तर स्त्रियांना शरणी मानलं जाई. इतर धर्मांसारखं स्त्रियांमुळे किंवा संसारात राहून मोक्ष मिळत नाही अशी संकल्पना लिंगायत चळवळीत नव्हती.

उलट, शरण-शरणी दाम्पत्यानं एकत्र येऊन केलेली साधना अधिक श्रेष्ठ मानली जात होती.

"लिंगायत चळवळीतली ही समानता वरवरची नव्हती. एखाद्या धर्मपीठाच्या धर्मगुरूंसारखं दुसऱ्याला लिंगायत धर्माची दीक्षा देण्याचं स्वातंत्र्यही महिलांना होतं.

"गुड्डापुरच्या दानम्मा नावाच्या एका शरणीने कर्नाटकात फिरून हजारो लोकांना लिंगायत धर्माची दीक्षा दिली होती. आजही कुडलसंगमला बसवधर्मपीठ नावाच्या एका मठात गंगामाताजी नावाच्या महिला प्रमुख गुरू आहेत. अशा अनेक मठांच्या मठाधीश महिला आहेत," राजू जुबरे सांगतात.

अनुभवमंटपात आणि लिंगायत चळवळीत आलेल्या बहुतेक बहुजन, दलित वर्गातल्या स्त्रिया होत्या.

प्रत्येक माणसानं जगण्यासाठी आवश्यक असं काही ना काही काम केलंच पाहिजे, अशी अनुभव मंटपात येण्यासाठीची अटच होती. या कामाला बसवण्णांनी 'कायक' असा शब्द वापरला होता.

काय कायक करायचं ते निवडायचं स्वातंत्र्य मात्र सगळ्यांनाच होतं. अगदी स्त्रियाही मोकळेपणाने त्यांना हवं ते काम करत होत्या.

काश्मीरच्या सापदलक्ष राज्याची महाराणी महादेवी आयुष्याचा उत्तरार्ध घालवण्यासाठी कल्याणला येऊन स्थायिक झाली होती. नियमाप्रमाणं तिनंही जंगातील लाकडं तोडून मोळ्या विकण्याचं कायक स्विकारलं. म्हणून तिचं नाव मोळिगे महादेवी असं पडलं होतं.

'आय्दक्की लक्कमा'चे काय सांडलेले धान्य निवडून गोळा करणे, रेमव्वाचे सूत कातणे, रेवम्माचे सौंदर्यप्रसाधने विकणे, सोमम्माचे धान कांडणे, काळव्वाचे सुतारकामच अशा कितीतरी ज्ञात, अज्ञात शरणी कवियत्रींची थोडक्यात माहिती 'स्त्री स्वातंत्र्याची वाटचाल अक्कामहादेवी' या पुस्तकात निशा शिवूरकर देतात. त्या महिला हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

"सृष्टीची उत्पत्ती, निसर्ग, आई-मूल नाते, परमेश्वराची भक्ती, शरण चळवळीतील दोष, रुढी-परंपरा, जातियतेचे चटके, सत्याचा शोध, करुणा, दया, मानवी संबंध अशा अनेक विषयांवर संत स्त्रियांनी वचने लिहिली आहेत. त्यांच्या वचनांमध्ये नैतिक आचरणाचा आग्रह, पुरस्कार आहे," त्या लिहितात.

वेश्यांचं पुर्नवसन आणि विधवांचा सन्मान

सत्यक्क्या या केर-कचरा साफ करण्याचं काम करणाऱ्या शरणीचं एक वचन शिवूरकर पुस्तकात देतात. ते असं :

असता स्तन नि केशसंभार,

हे नारी म्हणण्यास नसे प्रमाण.

ती असे हो जगाची दृष्टी,

नव्हे ती जाणकारांची नीती.

फळ म्हणण्या माधुर्यच कारण.

फळ असो मग कोणतेही,

भले सौंदर्यहीन असले तरी,

पुष्प म्हणण्या गंधच कारण.

मर्म याचे तुम्हीच जाणे, शंभुजक्केश्वरा.

लांबसडक केस, वाढलेले स्तन हे स्त्री असण्याचं प्रतीक नाही हा लिंगभाव समानतेचा फार पुढचा विचार सत्यक्क्यांच्या वचनातून दिसून येतो.

अशी त्यांची 27 वचनं उपलब्ध आहेत. प्रत्येक शरणीप्रमाणे त्यांनीही शेवटी 'शंभुजक्केश्वरा' ही अंकितमुद्रा वापरलेली दिसते.

तसंच, अनुभवमंटपात आलेली संकव्वा ही वेश्याव्यवसायाचं काम करत असे. बसवण्णांच्या सहवासात आल्यानंतर तिने ते काम सोडलं. तिच्यासारख्या अनेक वेश्यांना मार्गदर्शन करून, त्यांचे विवाह घडवून आणून बसवेश्वरांनी उपजीविकेचं दुसरं साधन त्यांना उपलब्ध करून दिलं.

तसाच मान-सन्मान विधवांनाही होता. कोणत्याही समारंभात किंवा धार्मिक विधींमध्ये विधवांना मुक्त सहभाग होता. केशवपन, सती जाणे अशा कर्मकांडांच्या बसवेश्वर विरोधात होते.

"संत स्त्रियांपैकी चौदा जणी अविवाहीत होत्या. विवाहाला नकार देण्याचे स्वातंत्र्य बसवण्णांच्या चळवळीमुळे त्यांना मिळाले.

"अनुभवमंटपात, शरण चळवळीत त्यांना सन्मानाने वागवले जात होते. त्यांनी लिहिलेल्या वचनांवर चर्चा केली जात होती. स्त्रियांचे लिखित साहित्य जतन करण्याचा प्रयत्न होत होता, ही लक्षणीय बाब आहे," निशा शिवूरकर लिहितात.

सत्याच्या बाजूने बोलण्याचं धाडस

बसवण्णांच्या लिंगायत चळवळीनं गरीब, दलित स्त्रियांमध्येही आत्मविश्वास निर्माण करून त्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवलं होतं.

कल्लेयाची नावाच्या एका सोलापूरच्या शरणाची गोष्ट राजू जुबरे सांगत होते. त्याची तरुण मुलगी पाणी आणायला म्हणून नदीवर गेली. ती परत येत असताना दोन तीन ब्राह्मणांचा तिला स्पर्श होतो.

त्यावर ती माझं पाणी विटाळलं असं म्हणून मडक्यातलं पाणी ओतून देते आणि पुन्हा दुसरं पाणी आणायला जाते.

रागावलेले ब्राह्मण कल्लेयाच्या घरी येतात. आमच्या स्पर्शाने तुझी मुलगी पवित्र व्हायला पाहिजे. उलट, ती आम्हालाच विटाळ कसं ठरवू शकते असं ते विचारत होते.

तेव्हा कलेल्याची मुलगी मोठ्या धाडसानं सांगते, 'दुसऱ्याच्या श्रमावर ऐतखाऊपणे जगणाऱ्या माणसांचा आम्हाला विटाळच आहे.'

प्रस्थापित सत्तेविरोधात सत्याच्या बाजूने बोलण्याचं धाडस बसवेश्वरांनीच महिलांना दिलं होतं.

ज्ञानाच्या रक्षासाठी लढलेल्या शरणी

म्हणूनच बसवण्णांच्या शेवटच्या काळात झालेल्या गृहयुद्धांत या स्त्रिया वचनांच्या रक्षणासाठी लढू शकल्या.

लिंगायत चळवळीत येणाऱ्या हरळ्ळ्या पूर्वाश्रमीच्या चर्मकार समाजातील व्यक्तीने आपल्या शीलवंत या मुलाचं आणि मधुवय्या या ब्राह्मणाच्या कलावती या मुलीशी लावून दिलं. बाराव्या शतकातलं हे आंतरजातीय लग्न बसवेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली लागलं.

मात्र, या विवाहानं धर्म बुडतो असं मानणाऱ्या सनातनी लोकांनी राजाकडे याची तक्रार केली. हरळ्ळ्या, मधुवय्या आणि शीलवंत या तिघांनाही हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं आणि बसवेश्वरांनाही आोरपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं.

त्यातून पेटलेल्या गृहयुद्धांत शरण-शरणींच्या कत्तली सुरू झाल्या. अनुभवमंटपाला आग लावली गेली. त्यातली जितकं वचनं हाताशी लागली ती घेऊन शरण शरणी बसवकल्याणहून पळाले.

पण सैन्य त्यांच्या मागावरच होतं. "या कठीण काळात महिलांनी हातात शस्त्र घेऊन साहित्याचं रक्षण केलं आहे. बसवेश्वरांची बहिण अक्कानागलांबिका हीच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली होती," राजू जुबरे सांगतात.

आत्तापर्यंत जगात जमिनीसाठी, सत्तेसाठी, संपत्तीसाठी अनेक लढाया झाल्या. पण ज्ञानाच्या रक्षणासाठी झालेली ही पहिली लढाई होती. त्यासाठीही महिलांनी तलवारी उचलल्या होत्या.

"आज पितृसत्तेनं किंवा सांप्रदायिक व्यवस्थेनं आपल्यासमोर नवी आव्हानं उभी केली आहेत. एका बाजुला स्त्री शिक्षणाचा एवढा प्रसार झालेला असताना दुसऱ्या बाजुला कुंकू लावा, टिकली लावा, साडी नेसा, अमुकतमुक कपडे घाला अशी जुनी बंधनं उकरून काढली जात आहेत," बीबीसीशी बोलताना निशा शिवूरकर सांगत होत्या.

"भारतातला कुणी नेता स्त्रियांनी किती मुलं जन्माला घालावीत हे सांगतो तर तिकडे ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर स्त्री-पुरूष या दोन लिंगापेक्षा दुसरं काहीच मानणार नाही असं म्हणतो.

"बसवेश्वरांचा वारसा समजून घेऊन सध्या सुरू असलेले स्त्रियांना मागे नेण्याचे प्रयत्न आपण वेळीच ओळखायला हवेत आणि त्यांच्या वारश्यातूनच पुन्हा एकदा लढण्याचं बळ मिळवायला हवं," त्या म्हणाल्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.