You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पुतिन यांची भेट घेण्यासाठी खरंच 40 मिनिटं ताटकळत बसावं लागलं का?
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत एका आंतरराष्ट्रीय मंचावर झालेली भेट सध्या चर्चेत आहे.
शहबाज शरीफ तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथे शांतता आणि विश्वास पुनर्स्थापनेसाठीच्या उपायांवर झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.
या जागतिक मंचावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआनही उपस्थित होते.
बीबीसी उर्दूने पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) हवाल्याने सांगितलं की, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराण, रशिया आणि तुर्की व्यतिरिक्त तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिजिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली.
मात्र, सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा शहबाज शरीफ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या भेटीची झाली.
दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही द्विपक्षीय बैठक झाली नसली, तरी पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या एका व्हीडिओमध्ये शहबाज शरीफ आणि व्लादिमीर पुतिन हे हस्तांदोलन करताना आणि संवाद साधताना दिसत आहेत.
काही माध्यमांच्या अहवालांनुसार, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट होण्यापूर्वी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीदरम्यान काय घडलं?
बीबीसी उर्दूनुसार, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील उघड केलेला नाही. मात्र, रशियन मीडिया प्लॅटफॉर्म आरटी इंडियाने त्यांच्या 'एक्स' हँडलवर एक व्हीडिओ पोस्ट केला असून, त्यावर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.
परंतु, हा व्हीडिओ नंतर डिलीट करण्यात आला. त्यानंतर आरटी इंडियाने आणखी एक पोस्ट करत म्हटलं की, "पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागल्याबाबतची यापूर्वी केलेली पोस्ट आम्ही डिलीट केली आहे. या पोस्टमध्ये घटनांचे चुकीचे वर्णन दिले गेल्याची शक्यता होती."
आरटी इंडियाने एक्सवर 14 सेकंदांचा व्हीडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये शहबाज शरीफ हे एका खुर्चीवर बसलेले दिसतात. त्यांच्या मागे पाकिस्तानचा झेंडा आहे, तर त्यांच्या शेजारी रशियन झेंडा असलेली खुर्ची रिकामी दिसते.
या व्हीडिओमध्ये उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री इशहाक डार आणि सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांची उपस्थितीही दिसून आली.
रशियातील माध्यमं काय म्हणत आहेत?
आरटी इंडियाने दावा केला की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची 40 मिनिटे वाट पाहिली. नंतर ते उठून थेट रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांची चर्चा सुरू असलेल्या खोलीत गेले.
बीबीसी उर्दूने या प्रकरणावर स्पष्टीकरणासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, हा एक 'गैरसमज' आहे आणि आरटी इंडियाने ती पोस्ट हटवली आहे.
दुसरीकडे, आरटी इंडियाने देखील त्यांची पोस्ट हटवल्याबद्दल दुजोरा दिला.
असं असलं तरी, रशियाच्या सरकारने आणि काही रशियन माध्यमांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यातील बैठकीचे संक्षिप्त वृत्तांत प्रसिद्ध केले आहेत.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्दोआन आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यातील बैठकीनंतर रशियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांनी रशिया आणि तुर्कीमधील सहकार्य वाढवणे, व्यापार, अर्थव्यवस्था, बाह्य दबाव आणि युक्रेन तसेच इतर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
या विधानाच्या शेवटच्या ओळीत असे म्हटले, "पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील नंतर बैठकीत सामील झाले."
या घटनेबद्दल रशियन वृत्तपत्र 'कोमरसंट'ने लिहिलं, "पुतिन यांच्याशी त्यांची (अर्दोगानची) भेट इतकी लांबली की, जवळच्या खोलीत वाट पाहत असलेले पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना अर्धा तास एकटे बसून कंटाळा आला. शेवटी, ते उठले, दार उघडले आणि व्लादिमीर पुतिन आणि रेचेप तैय्यप अर्दोआन यांच्यातील बैठकीत सहभागी झाले."
"एमकेआरयू" या दुसऱ्या रशियन वृत्तपत्रानेही या बैठकीचा थोडक्यात उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील तुर्की आणि रशियन राष्ट्राध्यक्षांमधील बैठकीत उपस्थित होते आणि "या प्रदेशातील सुरक्षा समस्या आणि मध्यस्थ म्हणून तुर्कीची भूमिका" यावरही चर्चा झाली.
असं असलं तरी, या संयुक्त बैठकीनंतर पाकिस्तान सरकारने कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.
सोशल मीडियावर काय चर्चा सुरू?
शाहबाज-पुतिन-अर्दोगान भेटीबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. एकीकडे, युजर्स पुतिन यांनी ताटकाळत ठेवल्याबद्दल पाकिस्तानी पंतप्रधानांची खिल्ली उडवत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे समर्थक त्यांच्या नेत्याला 'जागतिक नेत्यांचे लक्ष वेधून घेणारे केंद्र' म्हणत आहेत.
नसीम अब्बास नावाच्या एका युजरने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना वाट पाहायला लावण्यात आल्याच्या दाव्यावरील पोस्टमध्ये म्हटले, "ही घटना आंतरराष्ट्रीय मंचावर घडली आणि जगातील माध्यमं या बातमीवर हसत आहेत."
दुसऱ्या युजरने म्हटलं, "शहबाज शरीफ यांनी 40 मिनिटे पुतिन यांची वाट पाहिली, पण ते आले नाहीत. त्यांची राजनैतिक अनुपस्थिती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित करत आहे."
दुसरीकडे, पाकिस्तानी पंतप्रधानांचे आंतरराष्ट्रीय माध्यम प्रवक्ते मुशर्रफ झैदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, शाहबाज शरीफ यांनी तुर्कमेनिस्तानमधील इतर नेत्यांसोबत "रचनात्मक बैठकी" केल्या.
"संबंधांमध्ये सामान्य सौहार्द होतं आणि पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष अर्दोगान, राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि इतर प्रमुख जागतिक नेत्यांसोबत दिवस घालवला," असं त्यांनी नमूद केलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.