पुतिन-मोदी भेटीमुळे युरोप आणि ट्रम्प अस्वस्थ? रशियन माध्यमांनी काय दावा केला?

    • Author, बीबीसी मॉनिटरिंग

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचा दौरा केला. या दौऱ्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष होतं. पुतिन यांच्या भारत दौऱ्यावर जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.

रशियाच्या सरकारी टीव्हीवरील करंट अफेअर्स शोच्या होस्टने पुतिन यांच्या भारत दौऱ्यावर युरोपीय मीडियांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतला.

हा शो शुक्रवारी (5 डिसेंबर) प्रसारित झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांचं ज्या उत्साहानं स्वागत केलं, त्यामुळे 'रशियाचे विरोधक नक्कीच अस्वस्थ झाले असतील,' असं रशिया-1 या चॅनलच्या '60 मिनिट' या कार्यक्रमाच्या होस्ट ओल्गा स्काबेयेवा यांनी म्हटलं.

"रशियाचा द्वेष करणारे लोक आता चिडले आहेत. रशियाला एकटं पाडण्यात ते अपयशी ठरले, पुतिन यांचं इतकं भव्य स्वागत हे पाश्चिमात्य देशांसाठी आणि ट्रम्प यांच्यासाठीही अपमानास्पद ठरलं आहे," असं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच स्काबेयेवा म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, "ट्रम्प यांनी भारताला रशियन तेल खरेदी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचा काही विशेष परिणाम झाला नाही."

यानंतर त्यांनी पाश्चात्य वृत्तपत्रांचा हवाला देत म्हटलं की, "पुतिन यांचा दिल्ली दौरा जगभरात चर्चेत आहे. फ्रान्सच्या 'ले मोंद' या वृत्तपत्रात लिहिलं आहे की, पाश्चात्य देशांच्या दबावानंतरही मोदी रशियन राष्ट्राध्यक्षांचं रेड कार्पेटने स्वागत करून ग्लोबल साउथच्या देशांसाठी एक आदर्श निर्माण करत आहेत."

त्या हेही म्हणाल्या की, "जर्मनीच्या 'फ्रँकफुर्टर ऑलगेमीन'च्या (एफए) वृत्तानुसार, भारतावर 50 टक्के टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेला मोदींनी एक अप्रिय संदेश दिला आहे."

स्काबेयेवा पुढे म्हणाल्या, "हा दौरा इतका यशस्वी झाला की, ब्रिटनने याकडे पाश्चात्य देशांसाठी एक राजकीय अपमान म्हणून पाहिलं."

"पुतिन यांच्या स्वागताची तुलना 'टेलिग्राफ'ने दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या अपयशी दौऱ्याशी केली. त्या वेळी मोदींनी पुतिन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन आपला खरा मित्र कोण आहे हे दाखवून दिलं होतं."

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात स्काबेयेवा यांनी रशिया आणि भारतातील वाढती जवळीकता आता अमेरिकेला अस्वस्थ करत असल्याचं म्हटलं.

'जणू अणूबॉम्बच फुटला…'

पुतिन यांचा भारत दौरा हा "डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आत्मपरीक्षण करण्याचा क्षण आहे," असं परराष्ट्र विषयांचे तज्ज्ञ अलेक्सी नौमोव्ह यांनी म्हटलं.

ते म्हणाले, "मला वाटतं, रशिया-भारत संबंध सुधारताना पाहून ट्रम्प खरोखरंच थोडेसे चिडलेले असतात."

चॅनेल वनच्या 'व्रेम्या पोकाझेत' (काळच सांगेल) शोच्या को-होस्ट ओलेस्या लोसेव्हा म्हणाल्या, "पाश्चात्य पत्रकारांनी पुतिन यांच्या भारत दौऱ्याबाबत त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लगेच लिहायला सुरुवात केली, जणू हे त्यांच्यासाठी एक आव्हानच होतं."

पाश्चात्य मीडियाच्या अनेक रिपोर्ट्सचा हवाला दिल्यानंतर लोसेव्हा म्हणाल्या, "पाहा, त्यांच्याकडून येत असलेल्या प्रतिक्रिया पाहता अणूबॉम्बचा स्फोट झाला आहे, असंच वाटतं.

त्यांच्यासाठी ही परिस्थिती कदाचित खूप गुंतागुंतीची आहे. ते कुठं जात आहेत, हे त्यांना अजूनही समजलेलं नाही. ज्याचा कोणताच शेवट नाही, अशा मार्गावर ते चालले आहेत."

फ्रान्सच्या 'फ्रान्स 24' या चॅनेलने मोदींनी स्वतः विमानतळावर जाऊन पुतिन यांचं स्वागत केल्याच्या मुद्द्यावर जोर दिल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रोटोकॉलचं उल्लंघन समजलं जातं. परंतु, यामुळं परस्पर विश्वास आणि अनौपचारिकतेचे स्पष्ट संकेत मिळतात, असंही त्या म्हणाल्या.

त्यांचे को-होस्ट रुसलान ओस्ताश्को म्हणाले की, "पाश्चात्य मीडियात काही प्रमाणात बिथरलेपणा दिसून आला. पाश्चात्य देशांनी सर्व काही करून पाहिलं, भारतावर रशियासोबतच्या व्यापारावर निर्बंध घालण्यापासून ते राजकीय दबावापर्यंत. परंतु, काहीही उपयोग झाला नाही."

'पुतिन यांची भेट जगभरात चर्चेचा विषय'

पुतिन यांचा भारत दौरा खऱ्या अर्थाने जागतिक घटना आहे, असं विश्लेषक व्लादिमीर कॉर्निलोव्ह म्हणाले.

ते म्हणाले, "पाश्चिमात्य देशही आता ही गोष्ट मान्य करत आहेत. मी सध्या युरोपमधील माध्यमांत सतत वाचतोय की, खरं एकटं कोण पडलं आहे? एवढे दिवस आम्ही ओरडून सांगत होतो की, रशिया एकटा पडला आहे आणि बहिष्कृत झाला आहे."

"आता दिसून येत आहे की, चीन, भारत, अमेरिका, आफ्रिका आणि जगातील इतर मोठे देश रशियासोबत मैत्रीपूर्ण किंवा जवळचे संबंध ठेवत आहेत.

खरंतर युरोपीय देश एकमेकांपासून दूर उभे असल्याचे दिसत आहेत. ते स्वतःच बाजूला फेकले गेले आहेत. ही परिस्थिती युरोपसाठी अनेक प्रश्न उपस्थित करते."

रशियाचं व्यावसायिक वृत्तपत्र 'कोमरसेंट' आणि सरकार समर्थक दैनिक 'इझवेस्तिया' यांनीही या दौऱ्याबाबत पाश्चिमात्य माध्यमांत आलेल्या काही प्रतिक्रिया प्रकाशित केल्या.

"पुतिन आणि मोदी आपले संबंध मजबूत करत आहेत, ज्यामुळे ट्रम्प नाराज झाले आहेत," असं कोमरसेंटने 'वॉल स्ट्रीट जर्नल'चा हवाला देत लिहिलं आहे.

तर पुतिन आणि मोदींनी 'अमेरिकन दबाव असूनही एकमेकांची भेट घेतली,' असं 'इझवेस्तिया'ने ब्लूमबर्गचा हवाला देत सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)