पुतिन यांच्यासाठी आयोजित डिनरमध्ये शशी थरूर यांना बोलवण्यामुळे का होतोय वाद?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सन्मानार्थ शुक्रवारी राष्ट्रपती भवनामध्ये देण्यात आलेल्या स्टेट डिनरमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण न देता काँग्रेस खासदार शशी थरूर यांना निमंत्रण देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना या डिनरला आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं.

सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केले असतानाच, शशी थरूरही आपल्याच पक्षाच्या टीकेचे धनी बनलेले आहेत.

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं आणि विचारलं की, "थरूर यांना चालू असलेल्या या सगळ्या 'खेळा'बद्दल माहिती नव्हतं का?"

या घटनेकडे आता लोकांचं लक्ष वेधलेलं आहे आणि काही विरोधी नेत्यांनीही या सगळ्या प्रकारावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी आधीच विरोधी पक्षनेत्याला निमंत्रण न देणं हा प्रकार 'विचित्र' असल्याचं आधीच म्हटलेलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक्स वर लिहिलं की, "सर्वांचं लक्ष वेधून घेणारी एक बातमी: राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना पुतिन यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रपतींच्या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं, परंतु शशी थरूर हे प्रमुख आमंत्रितांमधील एक होते."

सरदेसाई यांनी पुढे म्हटलंय की, "राजकारण जसजसं संकुचित होत चाललं आहे आणि ध्रुवीकरण अधिकाधिक वाढत चाललं आहे, तर कुणालाही असंच वाटेल की, कमीतकमी राष्ट्रपती भवन तरी या सगळ्यापासून दूर असेल."

मात्र, भाजपने शशी थरूर यांना दिलेल्या निमंत्रणाचं समर्थन केलं आहे.

भाजप खासदार राजेश मिश्रा म्हणाले, "काँग्रेस खासदार डॉ. शशी थरूर हे परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीचे प्रमुख आहेत. त्यांना परराष्ट्र व्यवहारात तज्ज्ञता आहे. फक्त पात्र लोकांनाच बोलावलं जातं."

शशी थरूर यांच्याबाबत काँग्रेसनं काय म्हटलं?

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी या डिनरचं आमंत्रण स्वीकारण्याच्या शशी थरूर यांच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ते म्हणाले की, "ही गोष्टच खूप आश्चर्यकारक आहे की, त्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आणि त्यांनी ते स्वीकारलंदेखील. प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या आत्मसन्मानाचा एक आवाज असतो."

पुढे ते म्हणाले की, "जेव्हा माझ्या नेत्यांना आमंत्रित केलं जात नाही पण मला आमंत्रित केलं जातं, तेव्हा आपण हे समजून घेतलं पाहिजे की काहीतरी 'खेळ' का खेळला जातो आहे, तो कोण खेळत आहे आणि आपण त्याचा भाग का नसलं पाहिजे."

मात्र, काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले की, "थरूरजी जात आहेत यात आश्चर्य नाही. त्यांना अनेकदा आमंत्रित केलं जातं आणि जायचं की नाही, हा त्यांचा निर्णय आहे.

पण विरोधी पक्षाच्या नेत्याला आमंत्रित न करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांचेही प्रतिनिधित्व असले पाहिजे, विशेषतः रशियासारख्या देशांसाठी."

काँग्रेस नेते उदित राज म्हणाले की, "अशा प्रसंगीही पंतप्रधान मोदी कधीही कट रचण्यात अपयशी ठरत नाहीत. जर विरोधी पक्षाचे नेते आलेल्या प्रतिनिधींना भेटले असते तर त्यांनी समजूतदारपणे त्यांच्याशी संवाद केला असता.

राहुल गांधी रशियन शिष्टमंडळाला भेटले असते तर त्यांनीही समजूतदारपणे संवाद केला असता आणि भारत आणि रशियामधील दीर्घकालीन मैत्री अधिक मजबूत झाली असती. केवळ दिखावेगिरीने देशाला आतापर्यंत काहीही मिळालेले नाही."

सोशल मीडियावरही या मुद्द्यावरील चर्चा तीव्र झाली आहे. काही लोक शशी थरूर यांच्या पार्टी लाईनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

माजी टीएमसी खासदार जवाहर सरकार यांनी 'एक्स'वर लिहिलंय की, "एवढा राजकीय घोळ का? जेव्हा मी टीएमसीशी असहमत होतो, तेव्हा मी पक्ष आणि खासदार पद दोन्ही सोडलं. ते असं का करू शकत नाही?"

माजी आयपीएस अधिकारी यशोवर्धन झा आझाद यांनी 'एक्स'वर लिहिलंय की, "मतभेद बाजूला ठेवून, तुम्हाला तुमची लोकशाही बाहेरील लोकांना दाखवावी लागेल. अर्थात, थरूर किंवा तुमच्या बाजूने येऊ शकणाऱ्या इतर कोणत्याही खासदाराला आमंत्रित करण्याचा तुम्हाला अधिकार आहे.

परंतु, विरोधी पक्षाच्या नेत्याला आणि सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या अध्यक्षांना आमंत्रित केले पाहिजे, ही लोकशाहीचीच मागणी आहे."

शशी थरूर काय म्हणाले?

डिनरला उपस्थित राहण्यापूर्वी शशी थरूर यांनी सांगितलं होतं की, त्यांना आमंत्रण मिळालेलं आहे आणि ते उपस्थित राहतील. मात्र त्यांनी असंही म्हटलं होतं की, विरोधी नेत्यांना आमंत्रित न करणं हे काही 'योग्य नाही'.

नंतर, ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या माहितीला दुजोरा दिला की, विरोधी पक्षनेत्याला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं.

डिनरनंतर बोलताना शशी थरूर भारत-रशिया संबंधांवर म्हणाले की, "हे समजून घेतलं पाहिजे की राजकारणातील कूटनिती ही प्रतीकात्मकता आणि मतितार्थ या दोन्हींवर आधारित असते. प्रतिकात्मकता हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

जेव्हा पंतप्रधान विमानतळावर जातात, जेव्हा ते त्यांना त्यांच्या गाडीतून घेऊन जातात, जेव्हा ते त्यांना एका खाजगी जेवणासाठी घेऊन जातात, अथवा जेव्हा ते त्यांना गीतेचा रशियन अनुवाद भेट देतात, तेव्हा ही सगळीच खूप महत्त्वाची प्रतीकं असतात. मात्र, ही खऱ्या सुसंवादाला पर्याय असू शकत नाहीत.

पुढे ते म्हणाले की, "खरं बोलणं सध्या बंद दाराआड सुरू आहे. नेमकी काय चर्चा होत आहे, हे आम्हाला माहिती नाही. परंतु मला याबाबत काहीही शंका नाहीये की, आपल्या दीर्घकाळापासून चालत आलेल्या संबंधांच्या सातत्यतेचं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे."

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, "हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे एक महत्त्वाचं नातं आहे आणि ते बऱ्याच काळापासून आहे. आजच्या अस्थिर जगात, जिथं नातेसंबंध चढ-उतारांना तोंड देत आहेत, तिथे आपलं नातं मजबूत ठेवणं फार महत्त्वाचं आहे. याचा इतर देशांसोबतच्या आपल्या संबंधांवर परिणाम होईल असा गैरसमज कोणीही बाळगू नये.

ते म्हणाले की, "अलीकडच्या वर्षांत आम्हाला रशियाकडून भरपूर तेल आणि गॅस मिळाला आहे. तसेच, ऑपरेशन सिंदूर दरम्यान एस-400 हवाई संरक्षण प्रणालीनं आम्हाला पाकिस्तानी क्षेपणास्त्रांपासून वाचवलं, तेव्हाही संरक्षण आयातीचं महत्त्व पुन्हा एकदा सुस्पष्ट झालं आहे. माझ्या मते, हे ना अमेरिकेसोबतच्या संबंधांच्या किंमतीवर येतं, ना चीनसोबतच्या."

काय आहे परंपरा?

डिनरला जाण्यापूर्वी शशी थरूर यांनी संसदेबाहेर पत्रकारांना सांगितलं होतं की, "मला माहिती नाही की आमंत्रणं कोणत्या आधारावर देण्यात आली आहेत. पण मी जाईन."

संसदीय परंपरांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "एक काळ असा होता की, परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीच्या अध्यक्षांना नियमितपणे आमंत्रित केलं जात असे. असं दिसतं की, ही परंपरा काही वर्षांपासून बंद होती. मला आमंत्रित केल्यामुळे ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे."

मात्र, दुसऱ्या बाजूला, काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही परदेशी पाहुण्यांना भेटण्याच्या परंपरेची आठवण करून दिली.

ते म्हणाले की, "ही एक परंपरा आहे. अटलबिहारी वाजपेयीजींनीही ती पाळली. जेव्हा जेव्हा परदेशी पाहुणे येत असत, तेव्हा ते त्यांना सोनियाजींशी ओळख करून देत असत.

जेव्हा त्या विरोधी पक्षनेत्या होत्या तेव्हाही किंवा विरोधी पक्षनेते पदावर असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीशी भेट घालून दिली जात होती."

शुक्ला म्हणाले की, "ही परंपरा मनमोहन सिंगजींनी चालू ठेवली. या लोकांनी येऊन ती पूर्णपणे नष्ट केली. या संसदीय परंपरा नष्ट होऊ नयेत. भारताचे रशियाशी असलेले संबंध गांधी कुटुंबानेच विकसित केले होते."

"1971 च्या युद्धादरम्यान, इंदिराजींनी ब्रेझनेव्ह यांना बोलावलं होतं आणि याच बोट क्लबमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती. संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. गांधी कुटुंबानेच हे संबंध जोडले होते आणि आज त्यांनाच भेटू दिलं नाही हे विचित्र आहे."

एक दिवस आधी, राहुल गांधी यांनी आरोप केला होता की त्यांना परदेशी पाहुण्यांना भेटण्यापासून रोखण्यात येतं.

ते म्हणाले की, "आजकाल, जेव्हा परदेशातून पाहुणे येतात किंवा मी कुठेतरी बाहेर जातो तेव्हा सरकारकडून त्यांना विरोधी पक्षनेत्याला भेटू नये, असं सुचवलं जातं."

गेल्या काही महिन्यांपासून शशी थरूर आणि काँग्रेस हायकमांडमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांच्यात आणि काँग्रेस पक्षात सर्व काही ठीक नाहीये, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

त्यांनी इंग्रजी कवी थॉमस ग्रे यांचे एक वाक्य शेअर केलं होतं, ज्याचा हिंदीत अर्थ आहे - 'जिथे अज्ञानातच आनंद असतो, तिथं शहाणं असणं हाच मूर्खपणा ठरतो.'

गेल्या मार्चमध्येही त्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं.

या वर्षी सिंदूर ऑपरेशननंतर परदेशात भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या नेत्यांमध्ये शशी थरूर यांचं नाव देखील होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)