पुतिन-मोदी भेटीत 'या' महत्त्वाच्या करारांवर सहमती, दोन्ही नेते काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (5 डिसेंबर) नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं स्वागत केलं.

तिथे भारत आणि रशियामधील 23 वी वार्षिक परिषद झाली. संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि आर्थिक सहकार्य यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधील दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी मजबूत करणं, हा या भेटीमागचा उद्देश होता.

पुतिन चार वर्षांनी भारताच्या दौऱ्यावर आले असून त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे.

सकाळी पुतिन राजघाटावर गेले आणि त्यांनी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी तिथे पुष्पहार अर्पण केला आणि व्हिजिटर बुकवर सही केली.

राजघाटावर येण्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं राष्ट्रपती भवनात अधिकृत स्वागत करण्यात आलं. तिथं तिन्ही सेनादलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांचं स्वागत केलं. यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, दिल्लीचे उप राज्यपाल व्ही. के. सक्सेना, सीडीएस जनरल अनिल चौहान आणि दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोउसौफ आणि क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कॉव्ह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पुतिन यांच्यासोबत आले आहेत.

कोणकोणते करार झाले?

भारत आणि रशिया यांच्यात सहकार्य आणि स्थलांतर, आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षितता आणि मानकं, ध्रुवीय जहाजं आणि सागरी सहकार्य आणि खते या क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे करार झाले आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "आर्थिक सहकार्य नव्या उंचीवर नेण्यास आमचं संयुक्त प्राधान्य आहे. हे साध्य करण्यासाठी आज 2030 पर्यंतसाठीच्या एका आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर आमचं एकमत झालं आहे. यामुळे आमच्यातील व्यापार आणि गुंतवणूक वैविध्यपूर्ण, संतुलित आणि शाश्वत होईल."

ते म्हणाले, "आज राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि मला इंडिया-रशिया बिझनेस फोरमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. मला खात्री आहे की हा व्यासपीठ आमच्या व्यापारी संबंधांना नवीन बळ देईल. यामुळे निर्यात, संयुक्त-उत्पादन आणि संयुक्त-नाविन्यतेचे नवे दरवाजेदेखील खुले होतील."

पंतप्रधान मोदी म्हणाले, "दोन्ही देशांमध्ये कनेक्टिविटी वाढवण्यास आमचं प्रमुख प्राधान्य आहे. आयएनएसटीसी, नॉर्दर्न सी रूट, चेन्नई-व्लाडिवोस्टॉक कॉरिडॉरवर आम्ही नव्या ऊर्जेनं पुढील वाटचाल करू."

ते म्हणाले, "भारताच्या सीफेरर्सच्या ध्रुवीय सागरातील प्रशिक्षणासाठी सहकार्य करतील. यामुळे आर्क्टिक प्रदेशातील आमच्या सहकार्याला नवीन बळ मिळेलच, त्याचबरोबर भारतातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधीदेखील निर्माण होतील."

"जहाज बांधणीतील आमच्या सखोल सहकार्यात मेक इन इंडियाला ताकद देण्याची क्षमता आहे. यामुळे रोजगार, कौशल्य आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला या सर्वांना बळ मिळेल."

पंतप्रधान मोदी म्हणाले, "नागरी अणु ऊर्जेच्या क्षेत्रात दशकांपासून असलेलं सहकार्य, स्वच्छ ऊर्जेच्या संयुक्त प्राधान्याला साकार करण्यासाठी महत्त्वाचं ठरलं आहे."

"आम्ही हे सहकार्य सुरूच ठेवू. संपूर्ण जगात सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी असण्याची खातरजमा करण्यासाठी, महत्त्वाच्या खनिजांच्या बाबतीत असलेलं सहकार्य महत्त्वाचं आहे. यामुळे स्वच्छ ऊर्जा, उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन आणि न्यू-एज इंडस्ट्रीतील आमच्या सहकार्याला भक्कम पाठिंबा मिळेल."

"अलीकडेच रशियामध्ये भारताच्या दोन नवीन वकिलाती (वाणिज्य दूतावास) सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये संपर्क आणि जवळीक वाढेल. यावर्षी ऑक्टोबरमध्ये लाखो भक्तांना काल्मिकियामध्ये इंटरनॅशनल बौद्ध फोरममध्ये भगवान बुद्धाच्या पवित्र अवशेषांचा आशिर्वाद मिळाला," असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "मनुष्यबळाच्या स्थलांतरामुळे दोन्ही देशाच्या लोकांना जोडण्याबरोबरच दोन्ही देशांना नवीन ताकद मिळेल आणि संधी निर्माण होईल. याला वाढवण्यासाठी आज दोन करार करण्यात आले आहेत."

"आम्ही एकत्रितपणे व्यावसायिक शिक्षण (व्होकेशन एज्युकेशन), कौशल्य विकास आणि प्रशिक्षणावरदेखील काम करू. आम्ही दोन्ही देशांमधील विद्यार्थी, विद्वान आणि खेळाडूंची देवाण-घेवाणदेखील वाढवू."

"पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला असो की क्रॉकस सिटी हॉलवर झालेला भित्रट हल्ला असो, या सर्वांचं मूळ एकच आहे. भारताला खात्री आहे की दहशतवाद हा मानवतेच्या मूल्यांवरील थेट आघात आहे."

"याच्या विरोधात जागतिक एकजूट ही आमची सर्वात मोठी ताकद आहे. दोन्ही देशांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ, जी20, ब्रिक्स, एससीओ आणि इतर व्यासपीठांवर जवळचं सहकार्य राहिलं आहे."

भारत न्यूट्रल नाही - मोदी

हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेच्या वेळेस भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पंतप्रधानांचे मुख्य सचिव शक्तिकांत दास आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची स्तुती करताना म्हणाले, "तुमचा हा दौरा खूपच ऐतिहासिक आहे. 2001 मध्ये तुम्ही पदभार स्वीकारला होता आणि पहिल्यांदा भारतात आले होते. त्या दौऱ्याला 25 वर्षे झाली आहेत. त्या पहिल्या दौऱ्यात आपल्या व्यूहरचनात्मक भागीदाराचा भक्कम पाया घातला गेला होता."

पंतप्रधान मोदी म्हणाले, "माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवरदेखील ही आनंदाची बाब आहे. मला वाटतं की 2001 मध्ये तुम्ही जी भूमिका पार पाडली होती, त्यातून दिसतं की एक दूरदृष्टी असलेला नेता कशाप्रकारे विचार करतो, कुठून सुरूवात करतो आणि संबंध कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. भारत-रशियामधील संबंध याचं सर्वोत्तम उदाहरण आहे."

युक्रेन संकटाबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, "युक्रेन संकटानंतर आमची सातत्यानं चर्चा होत होती. तुम्हीदेखील वेळोवेळी एका खऱ्या मित्राप्रमाणे आम्हाला सर्व गोष्टींची कल्पना दिली आहे. हा विश्वास आपल्या संबंधांमधील मोठी ताकद आहे..."

"आपण सर्वांनी मिळून शांततेचा मार्ग शोधला पाहिजे. अलीकडच्या काळात जे प्रयत्न सुरू आहेत, त्यामधून मला पूर्ण खात्री आहे की जग पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाकडे वळेल."

"मी नेहमीच म्हटलं आहे की भारत न्यूटल नाही. भारताची बाजू आहे आणि ती बाजू शांततेची आहे. आम्ही शांततेच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो. शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत," असंही मोदींनी नमूद केलं.

राष्ट्राध्यक्ष पुतिन काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर, भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की त्यांनी आणि मोदींनी अनेकदा चर्चा केली आहे.

ते म्हणाले, "आम्ही टेलीफोनवर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत चर्चा करत असतो. रशिया आणि भारतामधील परस्परसंबंध अतिशय भक्कम आहेत. आमचे आपसातील संबंध अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांसह अनेक बाबतीत भक्कम होत आहेत."

"आमचा व्यापार रुबल आणि रुपयांमध्ये होतो आहे. आम्ही 'मेक इन इंडिया'मध्ये सहकार्य करू. दोन्ही देश लॉजिस्टिक मार्ग बनवण्याबाबत देखील चर्चा करत आहेत. आम्ही हिंदी महासागराच्या मार्गावर देखील चर्चा करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयाच्या जवळ असलेल्या आम्ही मेक इन इंडिया प्रोग्रॅममध्ये देखील सहकार्य करण्यास तयार आहोत," असं पुतिन यांनी सांगितलं.

पुतिन पुढे म्हणाले, "आम्ही व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाबाबत पुढील चर्चा करत आहोत. रशिया आणि इंडियन इकॉनॉमिक सहकार्य संघटना एकत्रितपणे काम करत आहेत."

ऊर्जेबाबत बोलताना पुतिन म्हणाले की रशिया, भारताला 'इंधनाचा सातत्यपूर्ण पुरवठा' सुरू ठेवण्यास तयार आहे. भारतानं रशियाकडून कच्चे तेलाची आयात करू नये यासाठी अमेरिका दबाव टाकते आहे.

पुतिन यांनी त्यांच्या भाषणात त्या 'फ्लॅगशिप प्रोजेक्ट'चा देखील उल्लेख केला. यात भारतातील सर्वात मोठी अणुभट्टी तयार करण्यासाठी रशिया मदत करतो आहे.

ते म्हणाले की, आज रशिया टुडे (आरटी) न्यूज नेटवर्कच्या भारतातील ब्युरोची सुरूवात केल्यामुळे भारतीय लोकांना रशियाबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल.

पुतिन म्हणाले की आरटी भारतात 'निष्पक्ष आणि सत्या'वर आधारित माहिती प्रसारित करेल. यामुळे लोकांना माहित होईल की रशियात काय घडतं आहे.

त्यांनी परराष्ट्र धोरणासंदर्भातील भारत-रशियामधील सहकार्याचाही उल्लेख केला. पुतिन म्हणाले की भारत आणि रशिया, ब्रिक्स देशांबरोबर मिळून एक 'अधिक न्याय्य' आणि 'बहुध्रुवीय जगा'च्या दिशेनं काम करत आहेत. पुतिन असंही म्हणाले की दोन्ही देश संरक्षण आणि लष्करी क्षेत्रात देखील मजबूत सहकार्य करत आहेत.

ब्रिक्स अनेक मोठ्या विकसित होत असलेल्या देशांचा गट आहे. यामध्ये भारत, रशिया, चीन आणि ब्राझील यात सुरूवातीपासून आहेत. नंतर दक्षिण आफ्रिकादेखील यात सहभागी झाला.

जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेमधील अमेरिका आणि युरोपच्या 'एकतर्फी प्रभावा'ला आव्हान देता यावं आणि विकसनशील देशांचा आवाज मजबूत व्हावा यासाठी 2006 मध्ये या गटाची स्थापना झाली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)