You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
15 वर्षांनंतर कुटुंबाला भेटल्यानंतर आनंद मावेना गगनात, वर्ध्यातली हरवलेली मुलगी हरियाणात कशी सापडली?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
"इतक्या वर्षानंतर बहीण भेटली तर फारच आनंद वाटला. मला तिला पाहून रडायला येत होतं. आई-बाबांची साथ सुटल्यानंतर मी आजी आणि मामाकडे होतो. माझ्याजवळ माझे जवळचे लोक होते. पण, माझी बहीण एकटी राहत होती. इतक्या अनोळखी लोकांमध्ये ती इतके वर्ष कशी राहिली असेल? हे आठवूनच डोळ्यात सारखं पाणी येत होतं."
25 वर्षीय अनिकेत ढोके या वर्धा जिल्ह्यातील तरुणाला हसावं की रडावं हेच कळत नाहीये. कारण, त्याला लहानपणीच हरवलेली बहीण 15 वर्षानंतर सापडली, तर दुसरीकडे आपली बहीण इतके वर्ष एकटी कशी राहिली असेल? हे आठवून दुःखही होत आहे. पण, आता बहिणीला चांगलं उच्च शिक्षण देऊन नोकरी मिळवून देण्याचा निश्चय अनिकेतनं केलाय.
पण, अनिकेतची हरवलेली बहीण 15 वर्षानंतर कशी आणि कुठे सापडली? याआधी ती कशी हरवली होती? हे बघुयात.
अनिकेतने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडील खूप दारू प्यायचे. त्यामुळे 2009 ला शेवटी शेवटी त्याची आई त्याच्या 8 वर्षांच्या बहिणीला घेऊन घरातून निघून गेली. आईची वाट पाहिली पण आई आलीच नाही. शेवटीला त्यांच्या मामा आणि आजीनं वर्धा जिल्ह्यातील तामसवाडी इथं नेलं. तो तिथं मामाजवळ राहू लागला.
अनिकेतचे काका महेंद्र ढोके यांनी 2010 मध्ये वर्धा शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पण, त्यावेळी आई आणि मुलीचा शोध लागू शकला नव्हता.
अनिकेत 25 वर्षांचा होऊन नोकरीवर लागला तरी त्यानं आई आणि बहीण परत येईल ही आशा सोडली नव्हती. आता अचानक त्याला त्याची लहानपणी हरवलेली बहीण ईशा परत मिळाली. सध्या ईशा 22 वर्षांची आहे.
अचानक 15 वर्षानंतर अनिकेतला बहीण कशी सापडली?
हरियाणा अँटी ह्युमन ट्रॅफिक युनिटचे पंचकुलाचे एएसआय राजेश कुमार एका हरवलेल्या मुलीच्या कुटुंबाची भेट घालून देण्यासाठी सोनीपत इथल्या बालग्राम या सरकारी आश्रमात गेले होते. यावेळी ईशाने राजेश कुमार यांना आपल्या कुटुंबाला शोधून देण्याची विनंती केली होती.
"मी या आश्रमात गेल्या 13 वर्षांपासून राहत असून माझे आई-बाबा कोण आहेत मला माहिती नाही. मला त्यांची खूप आठवण येते. त्यांना तुम्ही शोधून द्याल का?" असा नेहानं आपल्याला विचारल्याचं राजेश कुमार बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगतात.
त्यानंतर कुमार यांनी तिचं समुपदेशन करून तिच्याकडून आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण, तिला गावाचं नावही आठवत नव्हतं. माझ्या बाबांना चिंधू म्हणायचे आणि आमच्या घरचे मोठे लोक डोक्यावर टोप्या घालत होते.
माझ्या आईचं नाव कविता आहे. आमच्या गावाला रेल्वे स्टेशन आहे. घराजवळ दोन छोट्या गल्ल्या होत्या इतकी माहिती तिने दिली. त्या आधारावर हरियाणा पोलिसांनी तिच्या कुटुंबाला शोधण्याचा प्रयत्न केला.
राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा सोनीपतच्या सरकारी आश्रमात 2012 मध्ये पानीपतवरून आलेली होती. तिथेच ती गेल्या 13 वर्षांपासून राहतेय.
पानीपतमध्ये 2010 मध्ये ती पोलिसांनी भेटली होती. त्यानंतर पोलिसांनीच तिला तिथल्या एका आश्रमशाळेत टाकलं होतं. ती आश्रमशाळा बंद झाल्यानंतर तिथून ती 2012 मध्ये सोनीपतच्या सरकारी आश्रममध्ये आली.
नेहाच्या (ईशा) समुपदेशनात तिनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिच्या कुटुंबाला शोधण्याचा प्रयत्न केला तर ती महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यातली असल्याचं समजलं. हरियाणा पोलिसांनी 18 डिसेंबरला वर्धा पोलिसांसोबत संपर्क साधला. त्या मुलीसोबत वर्धा पोलिसांचं बोलणं झालं.
यावेळी "माझं नाव ईशा आहे. मला घरी छकुली म्हणत होते आणि माझ्या आईचं नाव कविता आहे", अशी माहिती तिनं वर्धा पोलिसांना दिली. त्यानंतर वर्धा पोलिसांनी 2005 पासून जुन्या मिसिंगच्या तक्रारी शोधून काढल्या. यामध्ये 15 मार्च 2010 ची ईशा आणि कविता नावाची मिसिंगची तक्रार सापडली. त्यानंतर अँटी ह्यमुन ट्रॅफिकींग युनिटनं त्याच दिवशी तिच्या दयाल नगरमधील घरी भेट दिली.
यावेळी घरात वडील आणि तिची सावत्र आई होती. मुलगी त्यांचीच असल्याची ओळख पटवून घेतली. मुलगी त्यांचीच असल्याचं समजल्यानंतर हरियाणा पोलिसांच्या मदतीनं घरच्यांसोबत सायंकाळी व्हिडिओ कॉलवर भेट घालून दिली, अशी माहिती वर्धा पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी आणि एपीआय सुमंतराज भुजबळ यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना दिली.
हरियाणा पोलिसांकडून आला व्हिडिओ कॉल
ईशाचा भाऊ सेलू येथील अॅग्रो कंपनीत नोकरी करतो. त्याला हरियाणा पोलिसांनी संपर्क साधला आणि तुमची बहीण सापडल्याचं सांगितलं. तसेच बहिणीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलणं करून दिलं.
अनिकेत सांगतो, "मावशी, मोठेबाबांचा मुलगा, मी, आजी आम्ही सगळे 18 डिसेंबरला व्हिडिओ कॉलवर माझ्या बहिणीसोबत बोललो. आमच्यापैकी दोन-तीन जणांना तिनं ओळखलं आणि मी पण तिला ओळखलं. आम्ही बहीण-भाऊ आहोत तर एकमेकांना ओळखणारच होतो ना. बहिणीला बघून रडायला येत होतं."
बहिणीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर तिला प्रत्यक्ष भेटायची इच्छा होती. पण, मला भेटता आलं नाही. कारण, माझं ओडिशामध्ये ट्रेनिंग होतं आणि तिकडे मला जावं लागणार होतं. त्यामुळे मामी आणि मामाच्या मुलाला तिला भेटायला पाठवलं.
18 डिसेंबरला व्हिडिओ कॉलवर बोललो. दुसऱ्याच दिवशी ट्रेनचं तिकीट बघितलं पण मिळालं नाही. तत्काळही मिळत नव्हतं.
मग आम्हाला 20 दिवसानंतरच तिकीट मिळालं. त्यानंतर मामी आणि मामाचा मुलगा तिला 15 जानेवारीला भेटून आला. त्यांनी आश्रमात व्हेरीफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली, असंही अनिकेत सांगतो.
बहीण भेटली, पण तिला आताच घरी आणणार नाही, कारण...
अनिकेतला त्याची बहीण ईशा भेटली. पण, तिला आताच घरी आणणार नाही. कारण, ईशा सध्या बीए द्वितीय वर्षाला शिकतेय.
अनिकेत सांगतो, "तिला तिचं पदवीचं राहिलेलं एक वर्ष पूर्ण करायचं आहे आणि आश्रमवाले पण म्हणाले की एक वर्षात तिची पदवी पूर्ण होईल. त्यामुळे तिला आश्रममध्ये ठेवू शकता.
ती तिथे सुरक्षित आहे. त्यामुळे आम्ही तिला एक वर्ष तरी तिथेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर इकडे परत आणून तिला जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण मी देणार आहे. कारण, मी आता नोकरीवर आहे."
गेल्या 15 जानेवारीला हरियाणा पोलिसांनी ईशाची तिच्या मामी आणि मेव्हण्यासोबत ईशाची भेट घालून दिली. यावेळी आपलं कोणीतरी भेटलं हे बघून ईशाला रडू येत होतं.
सध्या ईशाची मामी आणि तिच्या मामाचा मुलगा सोनीपतवरून परत वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा इथं परत आले आहेत. आता मार्च महिन्यात तिचा भाऊ अनिकेत तिला भेटायला जाणार आहे.
ईशाला आता काही दिवसांसाठी घरी आणायची अनिकेतची इच्छा होती. पण, मध्येच असं घरी आणायला आश्रमाकडून परवानगी नाही. तसेच मामीला भेटल्यानंतर ईशानं ती इथून सोडून गेल्यानंतर कुठं राहत होती याचीही माहिती सांगितली. त्यानुसार, ईशा आपल्या आईसोबत वर्ध्याहून ट्रेन बदलत बदलत पानीपतला पोहोचली.
सुरुवातीला ती पानीपतमध्ये किरायानं एका खोलीत राहत होती. काही दिवस आईसोबत राहिली. पण, एक दिवस येतो म्हणून आई अचानक निघून गेली तर कधी परतच आली नाही. दोन-तीन महिने घरमालकानं तिचं पालनपोषण केलं. त्यानंतर तिला सोडून दिलं. त्यानंतर पोलिसांनी तिला आश्रमात सोडलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.