एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी हत्या केल्याचा आरोप, तरुणाने रचला स्वतःच्याच मृत्यूचा बनाव

फोटो स्रोत, Facebook/GaneshChavan
- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
(या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील.)
मृत्यूनंतर आपल्या जीवन विम्याचे एक कोटी रुपये मिळावेत यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली आहे. हत्येचा बनाव करण्यासाठी सदर तरुणाने एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप या तरुणावर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण याला अटक केली आहे. गणेश हा रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता.
गणेश गोपीनाथ चव्हाण याने हत्या केल्याचे आपल्या कबुली जबाबात सांगितले आहे, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
काय घडलं?
शनिवार 13 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना डायल 112 द्वारे एका कारला आग लागल्याची माहिती मिळाली.
वानवडा पाटी ते वानवडा रस्त्यावर कारला आग लागली होती.
माहिती मिळाल्यानंतर औसा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणल्यानंतर कारमध्ये अर्धवट जळालेला मानवी सांगाडा आढळून आला.
सुरुवातीला हा अपघात किंवा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

फोटो स्रोत, Facebook/GaneshChavan
तपासादरम्यान जळालेल्या वाहनाचा क्रमांक एम.एच. 43 ए.बी. 4200 असल्याचं स्पष्ट झालं. या वाहनाचा वापर गणेश चव्हाण करत असल्याची माहितीही समोर आली.
गणेश घरातून रात्री 10 च्या सुमारास बाहेर पडल्यानंतर घरी परतला नसल्याचंही तपासात समोर आलं.
गणेशचा मोबाइल नंबरही बंद येत होता. त्यामुळं मृतदेह गणेश चव्हाणचाच असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला.
तसंच, कारमध्ये आढळून आलेलं हातातलं कडं गणेशचं असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं. त्यामुळं मृतदेह गणेशचाच असल्याची ओळख प्राथमिकदृष्ट्या पटवण्यात आली.
औसा पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन पोलिसांनी तपास सुरू केला.
चव्हाण आर्थिक अडचणीत होता आणि त्याच्यावर बरंच कर्ज असल्याचं तपासात समोर आलं. तसंच त्यानं एक कोटीं रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढला होता याबाबतही माहिती मिळाली.
असा उघडकीस आला गुन्हा
पोलिसांनी तपास सुरू केला आणि गणेश चव्हाणचे कॉल रेकॉर्डस तपासले. गणेश हा गेल्या काही दिवसांपासून ज्या व्यक्तीच्या सर्वाधिक संपर्कात होता त्या व्यक्तीचेही कॉल रेकॉर्डस तपासले.
त्यात एक महिलेचा नंबर मिळाला. गणेश तिच्याशी दुसऱ्या मोबाईलवरुन चॅटिंग करत असल्याचे लक्षात आले.

फोटो स्रोत, Facebook/GaneshChavan
तांत्रिक विश्लेषण आणि कॉल डिटेल्सच्या आधारे मिळवलेल्या अधिकच्या माहितीतून गणेश चव्हाण जिवंत असल्याचं स्पष्ट झालं.
पोलिसांनी त्याच्या तिसऱ्या मोबाइल क्रमांकाच्या लोकेशनचा शोध घेतला आणि पाठलाग करून त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ताब्यात घेतलं.
विम्याच्या रकमेसाठी कट
आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी आणि कुटुंबाला विम्याची रक्कम मिळावी यासाठी स्वत:च्या मृत्यूचा कट रचल्याचं गणेश चव्हाणनं सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशनं मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गोविंद किशन यादव (वय 50) या व्यक्तीला लिफ्ट दिली आणि निर्जनस्थळी घेऊन गेला.
गणेशने त्या व्यक्तीला चिकन विकत घेऊन दिले. चिकन खाल्ल्यावर आधीच दारुच्या अंमलाखाली असलेली व्यक्ती पाठीमागच्या सीटवर झोपी गेली. त्यानंतर गणेशने त्या गोविंद किशन यांना ड्रायव्हिंग सीटवर बसवले आणि कारला आग लावली.
कारचा मोठा भडका उडावा म्हणून फ्युएल टँकचे झाकन देखील काढले. त्यानंतर कारचा मोठा भडका उडाला आणि कारने पेट घेतला त्यात गोविंद यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यासाठी गणेशनं त्याच्या हातातलं कडंही तिथंच सीटवर ठेवलं. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने हे केले होते.
घटनेनंतर आरोपीनं विविध ठिकाणी प्रवास करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांच्या वेगवान तपासामुळं हा गुन्हा 24 तासांत उघडकीस आला. आरोपीविरुद्ध खून व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीबीसी मराठीने या प्रकरणातील आरोपी गणेश चव्हाणच्या कुटुंबीयांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही. आरोपीच्या कुटुंबाची किंवा वकिलांची बाजू मिळाल्यावर बातमीत अपडेट करण्यात येईल.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
आत्महत्येचे विचार येत असतील तर त्यासाठी समुपदेशन उपलब्ध आहे.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











