पुणे : मावळमध्ये 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, आरोपीला अटक

पुण्यातील मावळ येथे 5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना रविवारी (14 डिसेंबर) समोर आली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
32 वर्षीय आरोपी पीडित मुलीच्या घराजवळच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने मावळ परिसरात खळबळ उडाली असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
14 डिसेंबरला 5 वर्षीय मुलगी आपल्या घराबाहेरून बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती कुठेच आढळून आली नाही. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि शेजाऱ्यांकडून प्राप्त माहितीच्या आधारे मुलीच्या घराजवळ राहणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मुलीच्या हत्येची कबुली दिली.
याप्रकरणी पॉक्सो कलम 4, 6, 8 आणि 12 अंतर्गत लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बाळासाहेब कोपनर म्हणाले, "रात्री 11.30 च्या दरम्यान 5 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आल्याचा फोन पोलीस ठाण्यात आला. त्यानुसार, आमच्या विविध पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि लोकांकडून प्राप्त माहितीच्या आधारे तपास केला. यानंतर 32 वर्षीय आरोपीला संशयित म्हणून ताब्यात घेतले."
"आरोपी मुलीच्या घराजवळच राहतो. ही मुलगी आपल्या भावासोबत घराजवळ खेळत होती. आरोपी तिला चॉकलेटचे आमीष दाखवत तेथून घेऊन गेला आणि नंतर हे कृत्य केले."

"आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने ज्या ठिकाणी मुलीची हत्या केली तिथे तो आम्हाला घेऊन गेला. घटनास्थळी आम्हाला मुलीचा मृतदेह सापडला."
"घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन त्यालाही वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अहवालानंतर विविध कलमे वाढवून पुढील कारवाई करण्यात येईल," अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी दिली.
आरोपीलाही फाशीची शिक्षा व्हावी – रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

फोटो स्रोत, X/@RRPSpeaks
पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं, "मावळमध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची बातमी अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी आहे."
"राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मान्य केलं, हे बरं झालं. आता या गुन्ह्यांना आळा घालण्याची जबाबदारीही राज्य सरकारवर आहे. त्यामुळं या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी," अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
"हा खटला फास्टस्ट्रॅक कोर्टात चालवावा. असं झालं तरच अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल," अशीही मागणी त्यांनी केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











