बाबा बुझा सिंग : भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले, पण स्वतंत्र भारतात पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले

बुझासिंग

फोटो स्रोत, PUNEET BARNALA

फोटो कॅप्शन, 'गदर' आणि 'कीर्ती' या पत्रकांमुळे बुझा सिंग यांच्या मनात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याची प्रेरणा निर्माण झाली
    • Author, अवतार सिंग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बुझा सिंग या स्वातंत्र्यसेनानीचा स्वतंत्र भारतात पोलीस 'एन्काउंटर' झाला.

त्यानंतर शिव कुमार बतालवी यांनी 'फांसी' या कवितेतून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिव कुमार यांनी लिहिलं,

"त्यांच्यात अनेक दोष आहेत: त्यांची पानं त्यांच्या जागीच आहेत,

ती नेहमीच लाल होत असत, वारा नसतानाही ती उडत असत"

गदर चळवळीनंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पंजाबमध्ये सुरू झालेल्या चळवळीमध्ये बुझा सिंग यांनी भाग घेतला होता. वयाच्या 82 वर्षी त्यांचं निधन झालं.

हे एन्काउंटर 55 वर्षांपूर्वी, 27-28 जुलै 1970 च्या रात्री, नैमजारा (नवीन शहर) इथं झालं होतं.

पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाचं सरकार असताना तिथल्या विधानसभेत या घटनेचे पडसाद उमटले होते. त्यावेळेस प्रकाशसिंग बादल हे पंजाबचे मुख्यमंत्री होते.

बुझा सिंग कोण होते?

पंजाबमध्ये गदर चळवळीनंतर अनेक चळवळी झाल्या. बुझा सिंग हे कामगार चळवळ, मुजारा चळवळ, कम्युनिस्ट पक्ष आणि नक्षलवादी चळवळीत राजकीय कार्यकर्ते होते. ते 'बाबा बुझा सिंग' या नावानं ओळखले जात.

अजमेर सिद्धू हे पंजाबी कथाकार आणि ऐतिहासिक साहित्याचं लेखन करणारे लेखक आहेत. त्यांनी 'बाबा बुझा सिंग, गदरपासून ते नक्षलबाडीपर्यंत' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्या पुस्तकात अजमेर लिहितात, बाबा बुझा सिंग यांचा जन्म चक मैदास गावात झाला होता. हे सध्याच्या नवाशहर जिल्ह्यात आहे. बाबा बुझा सिंग यांच्या जन्मतारखेचे अनेक संदर्भ आहेत.

जालंदर येथील शहीद स्मारक समितीच्या मते, बाबा बुझा सिंग यांचा जन्म 1888 मध्ये झाला होता.

अर्जेंटिनामधील इंडिया ऑफिस रेकॉर्ड ब्रिटिश लायब्ररी लंडन ॲक्टिविटी इन अर्जेंटिनामधील पासपोर्ट आणि फाईलनुसार बुझा सिंग यांचा जन्म 19 डिसेंबर 1903 ला झाला.

सिद्धू सांगतात शेतकरी संकटामुळे बुझा सिंग 1930 मध्ये अर्जेंटिनामध्ये गेले.

तिथे गेल्यानंतर ते तेजा सिंग सुतार आणि भगत सिंग यांचे काका अजित सिंग यांच्याबरोबर गदर चळवळीत सक्रीय झाले.

'गदर' आणि 'कीर्ती' या पत्रकांमुळे बुझा सिंग यांच्या मनात स्वातंत्र्य चळवळीबद्दल प्रेरणा निर्माण केली होती. ते पक्षाचे सदस्य झाले होते.

बुझासिंग

फोटो स्रोत, PUNEET BARNALA

फोटो कॅप्शन, पंजाबात गेलेल्या गदर पार्टीच्या सदस्यांनी 'कीर्ती' नावाचं मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली, त्यानंतर 'कीर्ती पार्टी'ची स्थापना झाली.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दर्शन खाटकर राजकीय कार्यकर्ते आणि राजकीय गुरू आहेत. ते म्हणतात, "बुझा सिंग तरुणपणापासूनच ब्रिटिश राजवटीविरोधातील चळवळीत सक्रिय होते. त्या काळात स्थापन झालेल्या अकाली मोर्चांसाठी ते लंगरची देखील व्यवस्था करायचे."

"गदर चळवळीचा पहिला टप्पा अयशस्वी झाल्यानंतर, बुझा सिंग यांना अर्जेंटिनातून मॉस्कोला पाठवण्यात आलं. रशियन क्रांतीनंतर, सैद्धांतिक ज्ञान मिळवण्यासाठी आणि शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी ते रशियात दोन वर्षे राहिले."

सिद्धू यांच्यानुसार, बुझा सिंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा तुरुंगात गेले. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबरदेखील काम केलं.

1963 ते 1968 या कालावधीत ते त्यांच्या गावचे सरपंचदेखील होते.

सुरिंदर कुमारी कोचर यांनी बुझा सिंग यांच्याबरोबर काम केलं आहे. त्या म्हणतात, "बुझा सिंग मार्क्सवादी विचारसरणीचे तज्ज्ञ होते. ते सर्वसामान्य लोकांना त्यांच्याच भाषेत, त्यांच्या शोषणाबद्दल, श्रीमंत आणि गरिबांमधील दरीबद्दल समजावून सांगत असत. महिलांनी त्यांचे निर्णय स्वत:च घ्यावे आणि नोकरी करावी यासाठी ते त्यांना प्रेरित करत असत."

सुभाषचंद्र बोस यांना रशियात नेण्याची जबाबदारी

पंजाबमध्ये पोहोचलेल्या गदर पक्षाच्या सदस्यांनी 'कीर्ती' हे मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 'कीर्ती पार्टी'ची स्थापना झाली.

मात्र 1934 मध्ये ब्रिटिश सरकारनं 'कीर्ती पार्टी'ला बेकायदेशीर घोषित केलं. या बंदीनंतर, कीर्ती पक्षाच्या अनेक नेते काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले.

दर्शन खाटकर म्हणतात की याच काळात, बुझा सिंग यांनीदेखील काँग्रेस पक्षासाठी काम करण्यास सुरुवात केली.

अजमेर सिद्ध म्हणतात की 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या विजयात बाबा बुझा सिंग आणि कीर्ती पार्टीचा मोठा हात होता.

नेताजी सुभाषचंद्र बोस

फोटो स्रोत, Netaji research bureau

फोटो कॅप्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस

ते म्हणतात, "1941 मध्ये बुझा सिंग यांना नेताजी सुभाषचंद्र बोसांना रशियात नेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गदर चळवळीच्या कार्यकर्त्यांना सुभाषचंद्र बोसांची भेट जोसेफ स्टॅलिन यांच्याशी करून द्यायची होती."

"मात्र, बुझा सिंग यांना मार्गातच अटक करण्यात आली. मात्र बुझा सिंग यांना जी जबाबदारी देण्यात आली होती, त्यातून त्यांची महता, योग्यता दिसून येते."

सिद्धू यांच्या पुस्तकानुसार, 1947 मध्ये देशाची फाळणी झाली, त्यावेळेस झालेल्या सांप्रदायिक हिंसाचाराच्या विरोधात बुझा सिंग आणि त्यांचे सहकारी एकत्र आले.

1962 मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळेस बुझा सिंग यांनी भारत सरकारवर टीका केली होती. त्यामुळे त्यांना अटक देखील झाली होती.

जमीन हस्तगत करण्यात आघाडीवर

बुझा सिंग यांनी 1964 मध्ये सीपीआयसाठी (मार्क्सवादी) जालंदर जिल्ह्यातील समितीचे सदस्य म्हणून काम केलं होतं.

अजमेर सिद्धू लिहितात, "नक्षलबाडी चळवळ सुरू झाल्यानंतर, बुझा सिंग 1968 मध्ये समन्वय समिती पंजाबमध्ये सहभागी झाले. 22 एप्रिल 1969 मध्ये बुझा सिंग यांची सीपीआय (एमएल) राज्य संघटन समितीचे सदस्य म्हणून निवड झाली."

ते पुढे लिहितात, "1968 च्या अचरवाल कट प्रकरणात पोलिसांनी बुझा सिंग यांच्या विरोधात वॉरंट जारी केलं होतं. 8 डिसेंबर 1968 ला सामोनमध्ये जमीन जप्त करण्यात तसंच जून 1969 मध्ये किला हाकिमा (संगरुर)मध्ये जमीन जप्त करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली."

बुझासिंग

फोटो स्रोत, Ajmer Sidhu

फोटो कॅप्शन, नंतर स्थापन झालेल्या न्यायमुर्ती व्ही एम तारकुंडे आयोगानं इतर प्रकरणांसह बुझा सिंग यांच्या प्रकरणाची चौकशी केली, आयोगानं असं म्हटलं की ही कोणताही संघर्ष न होता झालेली हत्या होती आणि ती पोलिसांनी क्रूरपणे केली होती.

पुस्तकात देण्यात आलेल्या पोलीस एफआयआरनुसार, बुझा सिंग आणि त्यांचे काही सहकारी, जाडला येथील मोती सिंह राणा नावाच्या जमीनदाराला मारणार होते.

याच दरम्यान, नैमजारा इथं एक चौकी उभारण्यात आली होती.

"रात्री 3 वाजेच्या सुमारास, मजारा कलान इथून चार जण पुलाकडे येताना दिसले. जवळ आल्यानंतर ते ओरडले, 'थांबा, कोण आहे?...'आणि त्या लोकांनी त्यांच्या हातातील शस्त्रांनिशी समोरच्या पार्टीवर गोळीबार केला."

एफआयआरनुसार, बुझा सिंग यांचा त्यावेळेस झालेल्या चकमकीमध्ये मृत्यू झाला.

दर्शन खाटकर म्हणतात की बुझा सिंग यांना फिलौरजवळच्या एका छोट्या गावातून आधीच अटक करण्यात आली होती.

ते म्हणतात,"...पोलिसांनी त्यांना पुलावर नेलं आणि तिथं बनावट चकमकीचं चित्र निर्माण केलं."

विधानसभेत उमटले पडसाद

या प्रकरणासंदर्भात नंतर न्यायमुर्ती व्ही एम तारकुंडे आयोगाची स्थापना झाली होती. त्यांना बुझा सिंग यांच्या प्रकरणासह इतर प्रकरणांना संघर्ष न होता झालेली हत्या मानलं आणि या पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या हत्या असल्याचं म्हटलं.

पत्रकार कुलदीप नय्यर आणि अरुण शौरी देखील या समितीचे सदस्य होते.

सिद्धू म्हणतात की तत्कालीन आमदार सतपाल डांग आणि दिलीप सिंग तापियाला यांनी हा अहवाल पंजाबच्या विधानसभेत सादर केला होता.

विधानसभेत त्यावेळेस जे कामकाज झालं, ते अजमेर सिद्धू यांच्या पुस्तकात देण्यात आलं आहे.

या कामकाजानुसार मुख्यमंत्री म्हणाले होते, "अध्यक्ष महाशय, दंडाधिकारी चौकशी झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी चौकशीची आवश्यकता नाही. त्यांनी उल्लेख केलेला तारकुंडे समितीच्या अहवाल ही एक खासगी चौकशी होती."

"सरकारनं त्यांना कोणतीही कागदपत्रं दिलेली नाहीत. कायद्यानुसार जे व्हायला हवं होतं, तेच झालं आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी चौकशीची आवश्यकता नाही."

जगभरातील अनुभव आणि तरुणांना प्रशिक्षण

बुझा सिंग यांचा विवाह धंती (धन कौर) यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. नसीब कौर उर्फ रेशम कौर आणि अजित कौर या मुली आणि हरदास सिंग हा मुलगा.

हरदास सिंग यांच्या कन्या हरदीप कौर 71 वर्षांच्या आहेत. त्या अमेरिकेत राहतात.

त्या म्हणतात, "बुझा सिंग यांच्या जीवनप्रवासातून माणसानं कसं जगावं हे आपल्याला शिकायला मिळतं. एक म्हणजे बाबाजी यांनी गुरबानी भाषेत अभ्यास केला होता."

"दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या गाठीशी असणारा चीन, दक्षिण अमेरिका, इंग्लंड आणि रशियामधील अनुभव. त्यांनी जगभरातून अनुभव घेतला. त्यानंतर ते जेव्हा भारतात आले, तेव्हा म्हणाले होते की इथं बदल घडवावा लागेल."

बुझासिंग

फोटो स्रोत, Jaspal Singh

फोटो कॅप्शन, रविवारी (27 जुलै) बुझा सिंग यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अमेरिकेतील मॅसेच्युएट्समधील मेडफोर्ड गुरुद्वाऱ्यात प्रार्थना करण्यात आली.

हरदीप कौर यांच्या मते, "बुझा सिंग यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही काम केलं नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीची एखाद्या विचारांवर, कल्पनेवर विश्वास असतो आणि त्याला वाटतं की तसं केलंच पाहिजे."

"तेव्हा त्यात वयाचा अडथळा येत नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्यभरात संघर्ष सोडला नाही. ते तरुणांना सांगायचे की आपण क्रांती केली पाहिजे."

त्या पुढे म्हणतात, "जगभरातून अनुभव, ज्ञान घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या कल्पना सोडल्या नाहीत. त्यांना वाटत होतं की जगभरात ज्या चुका झाल्या आहेत, त्या भारतात किंवा पंजाबात होऊ नयेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)