एकनाथ शिंदेंच्या भावावर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप, साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत काय माहिती समोर आलीय?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
काही फोटोग्राफ दाखवत सुषमा अंधारेंनी ड्रग्जसंदर्भात कारवाई करण्यात आलेल्या जागेसंदर्भात काही गंभीर दावे केले आहेत.
एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
मुंबई पोलिसांनी 13 डिसेंबर 2025 रोजी सातारा जिल्ह्यात सावरी या ठिकाणी ड्रग्जसंदर्भात एक छापा टाकला होता.
यात पोलिसांनी मेफेड्रॉन (MD) अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून 7.5 किलो वजनाचा एमडी (मेफेडॉन), 38 किलो वजनाचा लिक्वीड एमडी (मेफेड्रॉन) आणि अंमली पदार्थ निर्मितीसाठीचा आवश्यक कच्चा माल असा 115 कोटी किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
मात्र, कारवाई करण्यात आलेल्या जागेसंदर्भात सुषमा अंधारे यांनी काही गंभीर दावे केले आहेत.
या प्रकरणी अंधारेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटीची वेळ मागितल्याचं सांगितलं असून आपण राज्यपालांनाही भेटणार असल्याचं सांगितलं आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे? आणि यात आतापर्यंत कोणती माहिती समोर आली आहे? हे या बातमीतून सविस्तर जाणून घेणार आहोत.

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, "13 डिसेंबरला पहाटे साताऱ्यातील सावरीमध्ये ड्रग्जसंदर्भात कारवाई झाली. त्यापूर्वी वर्धा आणि मुलुंडमध्ये 11 डिसेंबरला कारवाई झाली. मुलुंडच्या कारवाईतून मिळालेले धागेदोरे घेऊन पुढे पुण्यात कारवाई झाली.
"पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा पदाधिकारी विशाल मोरे याला ताब्यात घेण्यात आले. विशाल मोरेची चौकशी सुरू झाली. यात मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसरी कारवाई झाली सावरीमध्ये. हे गाव सातऱ्यापासून 40 किमी अंतरावर आहे. सावरी गाव हे बामणोलीच्या जवळ आहे."
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत या जागेचे काही फोटो कॅमेऱ्यासमोर दाखवले. यावेळी त्यांनी कोयनेच्या बॅकवॉटरचे फोटो दाखवले. तिथल्या एका रिसॉर्टच्या बांधकामाचे फोटोसुद्धा त्यांनी दाखवले.

रिसॉर्टच्या फोटोंसह एका पत्र्याच्या शेडचा फोटो देखील अंधारेंनी दाखवला.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, "हा मोठा गोल म्हणजे रिसॉर्ट आहे. हा छोटा गोल म्हणजे पत्र्याचं शेड आहे. हे अंतर साधारण गावात महामार्ग जातो. 1200 मिटरचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता आहे. याची निविदा माझ्याकडे आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार 75 लाख रुपयांचा रस्ता बांधला आहे. इथे गाव नाही, लोकवस्ती दिसत नाही. कोणीही राहत नाही. मग रस्ता का बांधला? गाव नाही, घर नाही. वर्दळ नाही, मग या शेडला जोडणारा रस्ता का बांधला?"

त्यांनी पुढे आणखी काही फोटो दाखवत आरोप केले की, "या रिसॉर्टमध्ये सात-आठ रूम बांधून तयार आहेत. आणखी काम सुरू आहे. हा पत्र्यांचा शेड आहे. इथे डस्टर गाडी दिसते, जी कारवाईसाठी गाडी गेली होती. ही कारवाई झाली. यात 45 किलोचं ड्रग सापडलं. मी काही लोकांना विचारत होते. साधारण 52 ग्रॅम ड्रग्ज घ्यायचा असेल तर 10 लाख रुपये लागतात. तर 45 किलो ड्रगला साधारण 115 कोटी रुपये होतात. 115 कोटी रुपयांचं ड्रग्ज या ठिकाणी सापडलं."
"हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे या व्यक्तीच्या मालकीचं आहे. प्रकाश शिंदे कोण आहेत? त्यांचा काय संबंध आहे? ते इकडे का गेले होते? तर या शेडचा मालक आहेत गोविंद शिनकर आहे. गोविंद शिनकर यांच्या शेड चावी ओंकार डिगेने मागितली. पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज सापडलं. याचा सातबारा गोविंद शिनकरच्या नावावर आहे. आता यानंतर हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचं आहे," असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
त्या पुढे सांगतात, "जर साताऱ्यात हे सगळं घडत होतं तर मुंबईचे पोलीस का गेले? आत्मजी सावंत यांनीच धाड टाकली होती, तेच साताऱ्यात गेले होते. साताऱ्याचे पोलीस का गेले नाही? हे रिसॉर्ट कोणी चालवायाला घेतलं होतं तर रणजीत शिंदे यांनी चालवायला घेतलं होतं. ओंकार डिगेला ताब्यात घेऊन का सोडण्यात आलं? रणजीत शिंदे दरे गावचा सरपंच आहे, पण तो हे हॉटेल चालवत होता."

पोलिसांनी 13 डिसेंबरला एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून 7.5 किलो वजनाचा एमडी (मेफेड्रॉन), 38 किलो वजनाचा लिक्विड एमडी (मेफेड्रॉन) आणि अंमली पदार्थ निर्मितीसाठीचा आवश्यक कच्चा माल असा एकूण 115 कोटी रुपयांच्या किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याबाबत प्रेस नोट जारी केली आहे.
यात दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर 2025 रोजी मुलुंड पश्चिम, मुंबई येथे दोन इसमांकडून 136 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. याबाबत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या पुढील तपासात घोडबंदर इथं राहणाऱ्या आरोपी इसमाचे सांगण्यावरुन पुणे येथील इसमाने सदर अंमली पदार्थ हे पुण्याच्या रावेत येथील सॅन्टोसा हॉटेलसमोर दिल्याचे सांगितले होते.
त्यानंतर दोन पथके तयार करुन एका आरोपीस घोडबंदर रोड, ठाणे येथून आणि दुसऱ्या आरोपीस पुणे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती.
पुणे येथून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासात सदर आरोपी आणि त्याचे तीन सहकारी हे एका शेतातील प्लॅस्टर नसलेले विटांचे शेड/ घर, मु. सावरीगाव, पोस्ट-बामनोली, ता. जावळी, जि. सातारा या ठिकाणी एमडी (मेफेड्रॉन) तयार करीत असल्याची माहिती दिली, अशीही माहिती या प्रेस नोटमध्ये दिली आहे.

या माहितीनंतर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बामनोली येथील सावरी गाव या ठिकाणी छापा टाकला. तिथून एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून 7.5 किलो वजनाचा एमडी (मेफेड्रॉन), 38 किलो वजनाचा लिक्विड एमडी (मेफेड्रॉन) आणि अंमली पदार्थ निर्मितीसाठीचा आवश्यक कच्चा माल असा एकूण 115 कोटी रुपयांच्या किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याबाबत प्रेस नोट जारी केली आहे.
तसंच, सदर ठिकाणाहून तीन आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काही आरोपांनंतर सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमांमधल्या व्हीडिओसंदर्भातही काही स्पष्टीकरण पोलिसांनी प्रेस नोटच्या माध्यमातून दिल्याचं समोर आलं.
पोलिसांनी स्पष्टीकरणात म्हटलंय की, "सावरीगाव, पोस्ट-बामनोली, ता. जावळी, जि. सातारा येथे एम.डी. बनविण्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. कारवाई करते वेळी इसम नामे ओंकार तुकाराम डिगे, वय-30 वर्षे याचा उल्लेख आल्याने त्यास बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न न झाल्याने त्याला अटक करण्यात आली नाही."
या गुन्ह्याचा पुढील तपास चालू असून इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली असल्याने गुन्ह्यातील अटक आरोपींची नावे प्रेसनोटमध्ये जाहीर केली असता, पाहिजे असलेले आरोपी पळून जाण्याची शक्यता असल्याने आरोपींच्या नावांचा प्रेसनोटमध्ये उल्लेख करण्यात आला नाही, असंही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या गुन्ह्याच्या कारवाईदरम्यान एमडी बनविण्याच्या कारखान्यातील अटक आरोपींच्या अंगझडतीमध्ये एकूण सहा हजार रुपये इतकी रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. त्या व्यतिरिक्त कोणतीही रक्कम त्यांच्याकडे, तसेच घटनास्थळी सापडली नाही. सदर पंचनाम्यादरम्यान स्थानिक पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, दोन पंच यांचे समक्ष व्हीडिओग्राफी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसंच, या गुन्ह्याच्या कारवाईदरम्यान एमडी बनविण्याच्या कारखान्यामध्ये कायम नजर अब्बास सयद उर्फ सद्दाम, राजीकुल खालीकुर रहमान, हाबीजुल फकरूल इस्लाम या आरोपींना अटक करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
'या अटक आरोपींपैकी एक आरोपी हा जिल्हा पालघर येथील आणि दोन आरोपी हे ता. जि. मोरीगाव, राज्य-आसाम येथील असल्याचे आतापर्यंत केलेल्या तपासात निष्पन्न झालेले आहे,' असंही पोलिसांनी प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, 'या गुन्ह्याच्या कारवाईदरम्यान एमडी बनविण्याच्या कारखान्यामध्ये सापडलेल्या आरोपींना तेजयश हॉटेल येथून जेवण पुरविले जात असल्याचे केलेल्या तपासात निष्पन्न झालेले नाही. तसेच, दरे गाव येथील सरपंच रणजीत शिंदे यांचा नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत कोणताही संबंध निदर्शनास आलेला नाही,' असंही पोलिसांनी म्हटलंय.

सुषमा अंधारे यांनी दावा केला आहे की, प्रकाश शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू आहेत.
त्या म्हणाल्या, "प्रकाश शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. आता म्हणतील तुम्ही चुकीची माहिती सांगत आहेत असं सांगतील. वडिलोपार्जित सातबारामध्ये प्रकाश शिंदे दिसतात.
"पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी आहे की, या शेडमध्ये तीन लोक राहत होते. या तीन लोकांची नावे, नजर अब्बास सय्यद, हाफीझूल अस्लम, राजीकूल खलीलूल रेहमान ही तीन माणसं आसामहून इकडे कशी आली? त्यांना कोणी आणलं असेल? याची उत्तरं शोधली पाहिजेत."

ड्रग्ज तस्करीचा आरोप तुमच्यावर करण्यात आला आहे, यावर प्रकाश शिंदे म्हणाले, "माझा या जागेशी काही संबंध नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे, निराधार आणि खोटे आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले जात आहेत. एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन शेतकऱ्याच्या मालकीची आहे. ती जमीन माझ्या मालकीची नाही. त्याच्याशी माझा संबंध नाही."
पुढे ते म्हणाले की, "माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही. जिथे छापा टाकण्यात आला ती जमीन जमिनीपासून अडीच ते तीन किमी अंतरावर आहे. माझ्या जमिनीचा सात-बारा सतरा/एक या क्रमांकाचा आहे. छापा पडलेल्या जमिनीचा सर्वे क्रमांक 4/1 आहे. सुषमाताई माहिती घेऊन बोलल्या असत्या तर बरं झालं असतं."

पुढे ते म्हणाले, "आमची जमीन वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे ही जमीन याचा क्रमांक 30/10 आहे. घटना घडली ती पंधरा ते सोळा किमी अंतरावर आहे. आमच्याकडे कुठलेही फाईव्हस्टार हॉटेल होणार नाही. कृषी पर्यटन करण्याचा मानस आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा हा एक उद्देश आहे. आमची ही जागा रणजीत शिंदेला विकण्यात आलेली आहे त्याची ही कागदपत्रं आहेत."
"रणजित शिंदे कुठेही फरार झालेला नाही. तो गावातच आहे. तुम्ही त्याची खात्री करू शकता. पोलिसांच्या एफआयरमध्ये रणजित शिंदे यांच्या नावाचा कोणताही उल्लेख नाही. त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही. पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे."
"आरोपींना कोणतंही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशीत सांगितलेलं आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी हे आरोप केले जात आहेत. आमच्या कुटुंबाला बदनाम करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस मी देणार आहे. त्यांनी आरोप मागे घेतले नाही तर त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल. जे आरोपी या गुन्ह्यात पकडलेले आहेत, त्यांना सक्त आणि कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे," असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

सुषमा अंधारे यांनी तपासासाठी एकनाथ शिंदे यांनी पदावरून काही काळ बाजूला राहावं, अशी मागणीही केली आहे.
माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "प्रकाश शिंदे तर आपले सख्खे भाऊ आहेत. प्रकाश शिंदे वेगळाच माणूस आहे अशी स्टोरी चालू होती. आता ते प्रकाशझोतात आले आहे. त्यांच्यावर कारवाई करताना उपमुख्यमंत्री असल्याचा प्रभाव तपास यंत्रणेला प्रभावित करू शकतो असं वाटत असेल आणि आपल्याला खरंच सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या लेकरांची काळजी असेल तर तो तपास नि:पक्षपणाने होण्यासाठी आपण काही काळ बाजूला थांबावं. आमच्या पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. तसंच, राज्यपालांना भेटणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही वेळ द्यावी. गृहमंत्री म्हणून तुमची इच्छाशक्ती आहे का?"

तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित सर्व आरोप फेटाळले असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.
मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं की, "पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांनी पुन्हा आरोप केलेले आहेत. केवळ राज्यात सध्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न अंधारे यांचा आहे.
"अंधारे यांना सांगतो की प्रकाश शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा याच्याशी दुरान्वये कसलाही संबंध नाही. कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत. पण केवळ शिंदे यांचं नाव घेऊन सनसनाटी निर्माण करायची आणि स्वत:च्या पक्षात मी कशापद्धतीनं शिंदे यांना डॅमेज करतेय हे भासवण्याचा प्रयत्न अंधारे करत आहे."
"जावळी, बामनोली प्रकरणासंबंधीचं वक्तव्य मागे घेतलं नाही तर या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. शिंदे कुटुंबाला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. निश्चितपणे त्यांना न्यायालयीन प्रक्रियेतून तोडीस तोड उत्तर आम्ही या प्रकरणात देऊ", असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











