पुणे रेव्ह पार्टीबाबत पोलिसांनी काय माहिती दिली? जावयाच्या अटकेवर खडसे काय म्हणाले?

एकनाथ खडसे आणि त्यांचे जावाई प्रांजल खेवलकर

फोटो स्रोत, facebook/Ekanath Khadse

फोटो कॅप्शन, एकनाथ खडसे आणि त्यांचे जावाई प्रांजल खेवलकर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील कथित रेव्ह पार्टीमध्ये सहभागी असल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

प्रांजल खेवलकर हे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह आणखी चार पुरुष आणि दोन महिलांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

काल शनिवारी (26 जुलै) मध्यरात्री तीन वाजता पोलिसांनी या खराडी भागामधील फ्लॅटवर छापा टाकला. एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरु होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या छाप्यामधून पोलिसांनी ड्रग्ज, हुक्का आणि दारू जप्त केली असून एकूण सात जणांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फ्लॅट ऑनलाईन पद्धतीने बुक करण्यात आला होता. प्रांजल खेवलकर यांच्या नावाने हे बुकिंग होतं. 25 जुलै ते 28 जुलैपर्यंत हे बुकींग करण्यात आलं होतं.

या पार्टीमध्ये अंमली पदार्थही मिळाले आहेत. या पार्टीत सहभागी असलेल्या एकूण पाच पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

छाप्यात पोलिसांनी काय काय केलं जप्त?

पुणे पोलिसांनी आज रविवारी (27 जुलै) पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणासंदर्भात माहिती दिली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, "गोपनीय माहितीच्या आधारे शहरातल्या एका आयटीचं वातावरण असणाऱ्या उच्चभ्रू वस्तीत पुणे शहर क्राईम ब्रँचकडून रेड करण्यात आली. तिथं ड्रग्ज पार्टी चालू होती. तिथं साडेतीन वाजण्याच्या सुमारास काही आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर 'एनडीपीएस कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

यामध्ये, प्रांजल खेवलकर (41), निखिल पोपटानी, समीर सैयद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव यांच्यासमवेत या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्यामध्ये, 2.7 ग्रॅमचा कोकेन सदृश पदार्थ, 70 ग्रॅम गांजासदृश पदार्थ, दहा मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्का पॉटचा सेट आणि फ्लेवर आणि दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

खराडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्टच्या कलम 8C, 22 B, 21 B, 27 तसेच, कोटपा ऍक्ट (COTPA ACT) च्या कलम 7(2) आणि 20(2) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरु आहे, ते वातावरण पाहता असं काहीतरी घडू शकतं, असा अंदाज थोडा थोडा मला येत होता. कारण, काहीजणं अत्यंत अडचणीमध्ये आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये येणार आहेत. मी त्यावर फारसं बोलणार नाही, परंतु जी काही घटना पुण्यामध्ये घडल्याचं सांगितलं जातंय, ते मी माध्यमांमधूनच पाहिलं. माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलेलं नाही, कारण ते पोलिसांच्या ताब्यात आहेत."

एकनाथ खडसे
फोटो कॅप्शन, एकनाथ खडसे

खडसे पुढे म्हणाले की, "माझं असं म्हणणं आहे की, ती खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्यात आमचे जावई असतील, तर मी त्यांचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे तपास करावा, अशी अपेक्षा आहे. कारण, पोलीस काहीही करु शकतात, अशी भावना जनमानसामध्ये आहे. त्यामुळे, नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजेत. तरच यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारे यावर भाष्य करणं चुकीचं होईल. मी नंतरही यावर पत्रकार परिषद घेईन. दोषी असेल तर शासन झालं पाहिजे मात्र अडकवण्याचा प्रयत्न झाल्यास ते सहन केलं जाणार नाही."

गिरीश महाजन काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅप प्रकरणात गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करत आहेत.

हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढाशी संबंध असल्याचा आरोप करत मंत्री महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी खडसे यांनी केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर, एकनाथ खडसे यांनी 'असं काहीतरी घडेल, याचं वातावरण दिसत होतं,' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत मंत्री गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "मला यासंदर्भात काहीच माहिती नव्हती. मला माध्यमांमधूनच माहिती मिळाली आहे."

महाजन पुढे म्हणाले की, "एकनाथ खडसे यांना अशा पद्धतीने जावई ट्रॅप होईल याची कल्पना होती तर त्यांनी जावयाला सतर्क करायला हवे होते. जे झालं ते मान्य करायला हवं. कुणी चूक केली असेल तर त्याच्या गळ्यात पडेल. काही कारवाई झाली तर हे षडयंत्र आहे, असं बोलणं योग्य नाही. प्रत्येकवेळी षडयंत्र कसं होईल? पुणे पोलिसांच्या तपासातून काय असेल ते उघड होईल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)