You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विराट आणि राहुल : 'धावा धावताना 25 वर्षं लग्नाला झालेल्या जोडप्या प्रमाणे ते एकमेकांची मनं ओळखतात’
- Author, द्वारकानाथ संझगिरी
- Role, क्रिकेट समीक्षक
चाळीस वर्षं होऊन गेली त्या गोष्टीला. इंग्लंडच्या टनर्ब्रिजवेल्सच्या, पेंटींग काढल्यागत वाटणाऱ्या मैदानावर भारत विरुद्ध झिंबाब्वे सामना कव्हर करायला गेलो होतो. मी पत्रकार, लेखक म्हणून नवखा होतो. जेमतेम 200 माणसं मैदानावर होती.
शून्यावर दोन भारतीय फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर भारताचा धावफलक 4 बाद 17 इतका लाजिरवाणा कधी झाला कळलंच नाही.
पराभवाची मानसिक तयारी आम्हा सर्वांची झाली. देवाची करूणा भाकली. पुराणात देव प्रसन्न व्हायचे हे वाचलं होतं. कलियुगात देव प्रसन्न होतात हे अनुभवलं किंवा ऐकलं नव्हतं.
पण त्यादिवशी मी एका देवाला प्रसन्न होताना पाहीलं. कपिल देव असं त्या देवाचं नाव होतं. तो प्रसन्न झाला आणि एक हाती तो दैवी खेळी खेळून गेला. ती आकाशातल्या देवाने सुद्धा मिरवली असती. भारतीय संघाने तो सामना जिंकला.
40 वर्षांनी रविवारी ( 8 ऑक्टोबर ) चेन्नईच्या प्रेसबॉक्समधे ‘सपर’ला दहीभात खात असताना विजयाचे डोहाळे लागले होते.
आणि अचानक 1 बाद दोन, 2 बाद दोन, 3बाद 2 असा धावफलक अंधार पडत चाललेल्या वरच्या आकाशासारखा काळवंडत गेला.
पुन्हा एकदा देवाचा धावा केला. गीतेतल्या उक्ती प्रमाणे " ग्लानिर्भवती भारतीय संघ" ही अवस्था होती.
आणि दोन देव अवतरले. ते दिसत होते मर्त्य मानवासारखे. एकाने विराट रूप दाखवलं. आणि राहुल त्याच्या नावाला जागला. राहुल म्हणजे सक्षम, कार्यक्षम. त्याने जिंकून देण्याचं टर्नकी प्रोजेक्ट पूर्ण करण्याची क्षमता दाखवली. आणि चावी कर्णधाराच्या हातात सोपवली.
अर्थात एक गोष्ट स्पष्ट करतो कपिल देवच्या त्या नाबाद 175 धावाच्या खेळीशी तुलना करता येणार नाही. ती खेळी अतुलनीय ह्या शब्दाची खरीखुरी व्याख्या होती. विराट राहुलच्या खेळींचं वलय वेगळं होतं.
3 बाद 2 ह्या कड्यावर भारतीय संघ उभा होता. तेव्हा तो तुटलेला कडा संघाला घेऊन कोसळण्याच्या जय्यत तयारीत होता. विराटचा पूल वर आकाशात चंद्रयाना सारखा उडला, तेंव्हा ते अलगद उतरणारं यान मार्शच्या हातात उतरणार की कॅरीच्या एव्हढंच ठरायचं होतं.
‘विराट सवयीने शतकाकडे निघाला होता’
धावांची इमारत जादूची कांडी फिरवून उभी राहत नाही. त्यासाठी आधी पाया रचावा लागतो. आपण आशा निराशेचा खेळ अनुभवत होतो तेंव्हा त्यांनी पाय रोवले.
कधी विराटच्या फ्लिक्स गवताला आणि आपल्याला गुदगुल्या करत सीमापार गेले. कधी राहुलने त्याच ऑफच वैभव दाखवलं.
पाया रचला गेल्यावर 11 ते 40 षटकात मजले चढवायला सुरुवात झाली. कारण तेव्हा चेंडू स्विंग व्हायचा थांबला. वर्तुळाबाहेर चारच क्षेत्र रक्षक होते.
त्यावेळी स्ट्रॉबेरी पिकिंग सारखं धावा पिकींग सुरू होत. ते दोघं अनेकदा एकत्र खेळले आहेत. त्यामुळे धावा धावताना 25 वर्षं लग्नाला झालेल्या जोडप्या प्रमाणे ते एकमेकांची मनं ओळखतात.
त्यात ऑस्ट्रेलियाकडे फिरकी गोलंदाज नव्हते. त्यांचा भरवसा जास्त झम्पा वर. राहुलने पहिल्या षटकात 3 चौकार ठोकून त्याची लय बिघडवली. लेग स्पिनरला लय सापडली नाही की तो धावांच घाऊक मार्केट वाटतो.
विराट सवयीने दात घासतो, अंघोळ करतो तसं शतक काढतो. तो सवयीने शतकाकडे निघाला होता. वाटेत एक बंपर हेल्मेट वर बसला. पण पुढचा स्टार्कचा चेंडू स्क्वेअर बाऊंडरीला फेरफटका मारून आला.
पण कालचा दिवस त्याचा पुलचा दिवस नव्हता. एक आकाशात गेला. दुसरा मिड विकेटच्या हातात. ऑस्ट्रेलियन एक चूक दोनदा करत नाहीत.
प्रामाणिकपणे सांगतो काल राहुल विराटपेक्षा थोड जास्त चांगला खेळला. शतकाने ही मनाने राहुलच्या खेळीला वरलं होत. पण मुहूर्त टळला.
जिंकून देताना आणि शतकाकडे जाताना त्याने भांड लपवलं नाही. त्याने दैवाकडे चौकर मगितला. दैव जरा बिंडोकपणे वागलं. असो. त्या खेळीची किंमत एरवीच्या सुखाच्या दिवसातल्या द्विशतकी खेळी पेक्षा मोठी होती.
'रोहित, अय्यरनंही वाटा उचलला पाहीजे'
विराट आणि राहुल, दोघांच्या खेळाने घातल्या घातल्या उसवलेला शर्ट रफू केला. असा रफू केला की तो एकसंघ वाटला.
पण हे प्रत्येक वेळी जमणार नाही. पुढे रोहीत शर्माचे पाय तत्परतेने हलायला हवेत. वन डे त एखादा चेंडू सोडणं हा फाऊल नाही हे श्रेयस अय्यरने समजून घ्यायला हवं.
पाच फलंदाज, दोन अष्टपैलू आणि मोठं शेपूट घेऊन खेळताना नेहमी राहुल आणि विराट अर्जुन होऊ शकत नाही. इतरांनी वाटा उचलला पाहीजे.
शून्यातून उभारलेले दोन्ही विजय ग्रेटच पण कपिलच शतक हा देवाचा प्रसाद होता. विराट राहुलच्या खेळ्या ही मानवाची चटकदार रेसिपी होती.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)