'आम्ही शाळेत असतानाच सेक्सकॅम इंडस्ट्रीत आलो', वेबकॅमवर आयुष्य असलेल्या मुलींची कहाणी

सध्या 20 वर्षांची असलेल्या केइनीनं वयाच्या 17 व्या वर्षी वेबकॅम मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
फोटो कॅप्शन, सध्या 20 वर्षांची असलेल्या केइनीनं वयाच्या 17 व्या वर्षी वेबकॅम मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
    • Author, सोफिया बेटिझा
    • Role, वर्ल्ड सर्व्हिस, जागतिक आरोग्य प्रतिनिधी मेडेलिन, कोलंबिया येथून रिर्पोटिंग

सध्या 20 वर्षांची असलेल्या केइनीनं वयाच्या 17 व्या वर्षी वेबकॅम मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

एके दिवशी इसाबेला शाळेतून घरी जात होती. अचानक एका व्यक्तीनं तिच्या हातात एक पत्रक दिलं. त्यावर, "सौंदर्याच्या जोरावर तुम्हाला पैसे कमवायचे आहेत का?" असं लिहिलं होतं.

इसाबेला म्हणाली की, मॉडेल्स शोधणाऱ्या एका स्टुडिओनं बोगोटा (कोलंबियाची राजधानी) भागातील किशोरवयीन विद्यार्थिनींना लक्ष्य केलं होतं.

वयाच्या 17 व्या वर्षी तिला तिच्या दोन वर्षांच्या मुलालाही सांभाळायचं होतं. पैशांची खूप गरज होती, त्यामुळं ती अधिक माहिती घेण्यासाठी सांगितलेल्या पत्त्यावर गेली.

ती तिथे पोहोचली, तेव्हा तो एक सेक्सकॅम स्टुडिओ होता हे तिच्या लक्षात आलं.

एका घरात एक जोडपं हा स्टुडिओ चालवत होता. त्या घरात आठ खोल्या होत्या, आणि त्या सगळ्या खोल्या बेडरूमसारख्या सजवलेल्या होत्या.

स्टुडिओ छोटे आणि कमी खर्चात चालणाऱ्या ठिकाणांपासून मोठ्या व्यवसायांपर्यंत असतात.

त्यामध्ये प्रत्येक मॉडेलसाठी स्वतंत्र खोली असते, ज्यामध्ये लाईट्स, संगणक, वेबकॅम आणि इंटरनेट कनेक्शन असतं.

मॉडेल्स लैंगिक कृत्यं करतात आणि ते जगभरातील प्रेक्षकांना थेट दाखवले जातात.

प्रेक्षक त्यांना मेसेज करतात आणि मॉनिटर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यस्थांमार्फत विनंती (रिक्वेस्ट्स) पाठवतात.

शाळेत बाथरूममध्ये केले शुटिंग

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इसाबेला (बदललेले नाव) म्हणते की, कोलंबियामध्ये 18 वर्षांखालील वेबकॅम मॉडेल्सना कामावर ठेवणं बेकायदेशीर आहे. पण तरीही तिने दुसऱ्या दिवशी हे काम सुरू केलं.

तिने 'बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस'ला सांगितलं की, तिला किती पैसे मिळणार किंवा तिला कोणते अधिकार असतील, याचं कोणतंही लेखी करारपत्र करण्यात आलं नव्हतं.

"त्यांनी मला काही शिकवलंही नाही. फक्त म्हणाले, 'हा कॅमेरा आहे, चल आता सुरू कर.'"

त्या स्टुडिओनं तिला शाळेतूनच लाइव्हस्ट्रीम करण्यास सुचवलं. आजूबाजूचे वर्गमित्र इंग्रजीचे धडे घेत होते. त्यावेळी तिने शांतपणे आपला फोन काढला आणि डेस्कवर बसूनच स्वतःचं चित्रिकरण सुरू केलं, असं इसाबेलानं सांगितलं.

ती सांगते की, लाइव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांनी तिला विशिष्ट लैंगिक कृत्यं करण्यास सांगायला सुरुवात केली.

त्यामुळे तिने शिक्षकांकडून टॉयलेटला जाण्याची परवानगी मागितली आणि एका क्यूबिकलमध्ये स्वतःला बंद केलं आणि ग्राहकांनी सांगितलेली कृती केली.

तिच्या शिक्षकाला काय चाललं आहे, याची काहीच कल्पना नव्हती, "मग मी ही गोष्ट इतर वर्गांमधूनही करायला सुरुवात केली," असं इसाबेला म्हणते.

"मी सतत विचार करत होते, 'हे माझ्या मुलासाठी आहे. मी त्याच्यासाठी हे करत आहे.' त्यामुळे मला बळ मिळालं."

रिसायकल केलेली खाती आणि बनावट आयडी

जागतिक सेक्सकॅम उद्योग झपाट्यानं वाढत आहे.

अ‍ॅनालिटिक्स कंपनी सेमरशच्या माहितीनुसार, 2017 पासून वेबकॅम प्लॅटफॉर्म्सवर होणाऱ्या मासिक व्ह्यूजची संख्या तीनपटींहून जास्त वाढून एप्रिल 2025 मध्ये सुमारे 1.3 अब्ज एवढी झाली.

फेनलवेब या कोलंबियाच्या अ‍ॅडल्ट वेबकॅम क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेनुसार, सध्या कोलंबियामध्ये 4 लाखांपेक्षा जास्त मॉडेल्स असून 12 हजार सेक्सकॅम स्टुडिओ आहेत.

इतर कोणत्याही देशापेक्षा ही संख्या जास्त असल्याचा अंदाज आहे.

हे स्टुडिओ कलाकारांचे व्हीडिओ तयार करून जागतिक वेबकॅम प्लॅटफॉर्मना देतात. ते लाखो रुपये देणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवतात.

प्रेक्षक मॉडेल्सकडे विनंत्या करतात, टिप्स देतात आणि त्यांच्यासाठी भेटवस्तूही घेतात.

अनेक मॉडेल्स ज्या स्टुडिओत काम करतात, त्यांना घरात खासगी जागा, उपकरणं किंवा चांगलं इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे त्या स्टुडिओत काम करतात. यातील बहुतांश गरीब, तरुण असतात आणि पालकांसोबत राहणारे असतात.

बोगोटामधील आंदोलकांनी वेबकॅम मॉडेल्सच्या हक्कांचं संरक्षण करण्याची आणि या उद्योगावर कडक नियमावली लागू करण्याची मागणी केली आहे.
फोटो कॅप्शन, बोगोटामधील आंदोलकांनी वेबकॅम मॉडेल्सच्या हक्कांचं संरक्षण करण्याची आणि या उद्योगावर कडक नियमावली लागू करण्याची मागणी केली आहे.

हे काम करणाऱ्या मॉडेल्सनी 'बीबीसी'ला सांगितलं की, ज्या देशातील एक तृतीयांश लोक हे गरीबीत जीवन जगतात, त्यांना हे स्टुडिओ सहज पैसे कमावता येतील असा शब्द देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

काही स्टुडिओ व्यवस्थित पद्धतीनं चालवले जातात आणि कलाकारांना तांत्रिक व इतर प्रकारे मदतही केली जाते. परंतु, बऱ्याच फसव्या स्टुडिओंमध्ये सर्रासपणे शोषण केलं जातं, असं मॉडेल्सनी सांगितलं.

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेत्रो यांनी स्टुडिओ मालकांचं वर्णन 'गुलामांचे मालक' असं केलं आहे.

हे स्टुडिओ इसाबेलासारख्या महिलांना आणि मुलींना चांगले पैसे मिळतील असं खोटं सांगून, फसवून त्यांना या व्यवसायात ओढतात.

स्टुडिओमधून व्हीडिओ प्रसारित करणाऱ्या चार मोठे वेबकॅम प्लॅटफॉर्म्स बोंगाकॅम्स, चॅटरबेट, लाइव्हजास्मिन आणि स्ट्रिपचॅट हे युरोप आणि अमेरिकेतून चालतात.

या स्टुडिओंनी व्हीडिओत सहभागी मॉडेल्स हे 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत याची खात्री करण्यासाठी काही तपासणी प्रणाली ठेवलेल्या आहेत.

युरोपियन युनियन आणि अमेरिकेचे कायदे 18 वर्षांखालील व्यक्तींचा सहभाग असलेले लैंगिक कंटेंट प्रसारित करण्यास सक्त मनाई करतात.

परंतु, काही मॉडेल्सनी 'बीबीसी'ला सांगितलं की, जर एखाद्या स्टुडिओला अल्पवयीन मुलींना कामावर ठेवायचं असेल, तर या तपासण्या सहजपणे चुकवल्या जाऊ शकतात.

त्यासाठी एक पर्याय म्हणजे ज्यांनी वयाची अट पूर्ण केली आहे, पण आता काम करत नाहीत अशा जुन्या मॉडेल्सचं खातं 'पुन्हा वापरणं'(रिसायकल) आणि ते अल्पवयीन मुलींना देणं.

इसाबेला म्हणते की, ती 17 वर्षांची असतानाच चॅटरबेट आणि स्ट्रिपचॅट या दोन्हीवर सक्रिय होती.

आता ती 18 वर्षांची आहे. "स्टुडिओ मालकानं सांगितलं की मी अल्पवयीन आहे, यात काही अडचण नाही. तिने दुसऱ्या महिलेचं खातं वापरलं आणि मग मी तिच्या आयडीखाली काम सुरू केलं."

'बीबीसी'शी बोललेल्या इतर काही मॉडेल्स सांगतात की, स्टुडिओनं त्यांना बनावट ओळखपत्रं दिली होती. केइनी सांगते की, यामुळेच ती 17 वर्षांची असताना बोंगाकॅम्सवर दिसू शकली.

त्या स्टुडिओंना भेट देऊन तिथल्या कामकाजाची पाहणी केली असल्याचे कोलंबियातील बोंगाकॅम्सच्या प्रतिनिधी मिल्ली अचिंते यांनी सांगितले.
फोटो कॅप्शन, त्या स्टुडिओंना भेट देऊन तिथल्या कामकाजाची पाहणी केली असल्याचे कोलंबियातील बोंगाकॅम्सच्या प्रतिनिधी मिल्ली अचिंते यांनी सांगितले.

कोलंबियातील बोंगाकॅम्सच्या प्रतिनिधी मिल्ली अचिंते यांनी 'बीबीसी'ला सांगितलं की, ते 18 वर्षांखालच्या व्यक्तींना काम करण्यास परवानगी देत नाहीत आणि हा नियम मोडणारी खाती बंद केली जातात.

त्यांनी सांगितलं की, प्लॅटफॉर्म कोलंबियन सरकारच्या वेबसाईटवर ओळखपत्रांची तपासणी करतो आणि जर "एखाद्या मॉडेलनं आमच्याशी संपर्क साधला आणि त्यानं स्टुडिओ सोडल्याचं कळलं, तर त्यांना त्यांचा पासवर्ड दिला जातो, जेणेकरून ते आपलं खातं बंद करू शकतील."

चॅटरबेटनं एका निवेदनात सांगितलं की, त्यांनी खोटं ओळखपत्र (बनावट आयडी) वापरणं पूर्णपणे बंद केलं आहे. मॉडेल्सना नियमितपणे स्वतःच्या फोटोसोबत सरकारी आयडीचा फोटो सबमिट करावा लागतो, जे डिजिटल आणि मॅन्युअली तपासले जातात.

त्यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे सुमारे एका व्हेरिफायरवर दहापेक्षा कमी ब्रॉडकास्टर असतात आणि कोणत्याही खात्याचा पुनर्वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाते. कारण वयोमर्यादा तपासणीची प्रक्रिया सातत्यानं प्रत्येक ब्रॉडकास्टवेळी केली जाते.

स्ट्रिपचॅटनेही सांगितलं की, त्यांच्याकडे 'कमी वयाच्या मॉडेल्सबाबत शून्य सहिष्णुता धोरण (झिरो टॉलरन्स)' आहे आणि मॉडेल्सना 'संपूर्ण वय तपासणी प्रक्रिया' पार पाडावी लागते.

त्यांची इन-हाऊस मॉडरेशन टीम थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन सर्व्हिसेससोबत मॉडेल्सची ओळख पडताळून पाहतात.

त्यांनी सांगितलं की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रिसायकल केलेले अकाउंट वापरता येत नाहीत, आणि अलीकडील नियमांनुसार प्रत्येक स्ट्रीमवर अकाउंट धारकाची उपस्थिती असावी लागते.

"म्हणजे जर एखादी मॉडेल स्वतंत्रपणे काम करण्यासाठी नवीन अकाउंटवर गेली, तर तिचे जुने अकाउंट निष्क्रिय होते आणि स्टुडिओला ते वापरता येत नाही."

'बीबीसी'नं याबाबत लाइव्ह जास्मिन यांच्याशीही संपर्क केला परंतु, त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.

'तुम्ही तरुण दिसता, तेव्हा पाहणाऱ्यांना आवडतं'

कोलंबियातील वेबकॅम मॉडेल केइनी स्ट्रिमिंग सुरू करण्याची तयारी करत आहे.

केइनी आता 20 वर्षांची आहे आणि मेडेलिनमधील तिच्या बेडरुममधून ती काम करते. तिचं स्ट्रीमिंग ती एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या स्टुडिओच्या माध्यमातून करते.

जर या बेडरुममध्ये ही हाय-टेक उपकरणं म्हणजे रिंग लाईट्स, एक कॅमेरा आणि एक मोठी स्क्रीन नसती तर, ही खोली एखाद्या लहान मुलाची खोलीच वाटली असती.

खोलीत सुमारे डझनभर सॉफ्ट टॉइज, गुलाबी युनिकॉर्न आणि टेडी बेअर्स आहेत.

ती म्हणते, "'तुम्ही जेव्हा तरुण दिसता, तेव्हा दर्शकांना ते खूप आवडतं. "

"कधी कधी मला हे अडचणीचं वाटतं. कारण काही क्लायंट्स म्हणतात की, तुम्ही खरंच लहान मुलासारखं वागत आहात, आणि ते ठीक नाही, असं म्हणतात."

माझ्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतल्यानंतर या व्यवसायात येण्याचा मी निर्णय घेतला, असं तिने सांगितलं.

मी काय करते, हे माझ्या वडिलांना माहीत आहे आणि त्यांचा मला पाठिंबाही आहे, असं ती म्हणाली.

कोलंबियातील वेबकॅम मॉडेल केइनी स्ट्रीमिंग सुरू करण्याची तयारी करताना
फोटो कॅप्शन, कोलंबियातील वेबकॅम मॉडेल केइनी स्ट्रीमिंग सुरू करण्याची तयारी करताना

मागे वळून पाहताना केइनीला वाटतं की, जेव्हा तिने वयाच्या 17 वर्षी या कामाला सुरुवात केली होती, तेव्हा ती या क्षेत्रात येण्यासाठी खूपच लहान होती. पण तरीही, ती आपल्या पूर्वीच्या कंपनीवर टीका करत नाही.

केइनीला वाटतं की, त्यांनीच तिला नोकरी मिळवायला मदत केली. आता ती दर महिन्याला सुमारे 2,000 डॉलर (1,500 पौंड) कमावते.

कोलंबियात किमान वेतन हे 300 डॉलर (225 पौंड) आहे आणि ती या किमान वेतनापेक्षा खूप जास्त कमावते.

"या नोकरीमुळे मी माझ्या आईला, वडिलांना आणि बहिणीला म्हणजेच संपूर्ण कुटुंबाला मदत करू शकते," असं ती म्हणते.

हीच भूमिका काही स्टुडिओंनीही मांडली आहे. त्यापैकी काही स्टुडिओंना ते आपल्या मॉडेल्स किंवा परफॉर्मर्सची योग्य काळजी घेतात, हे दाखवून द्यायचं आहे.

आम्ही सर्वात मोठ्या स्टुडिओपैकी एक असलेल्या एजे स्टुडिओला भेट दिली. तिथे आम्हाला एका इन-हाउस मानसशास्त्रज्ञाशी (सायकोलॉजिस्ट) ओळख करून देण्यात आली. हा सायकोलॉजिस्ट मॉडेल्सच्या मानसिक आरोग्यासाठी नेमलेला होता.

तसंच आम्हाला एक स्पा देखील दाखवण्यात आला, जिथे पेडिक्युअर, मसाज, बोटॉक्स आणि लिप फिलर्स 'सवलतीत' किंवा महिन्याच्या सर्वोत्तम कर्मचाऱ्याला (एम्प्लॉयीज ऑफ द मंथ) बक्षीस म्हणून दिलं जातं.

सर्वोत्तम कर्मचारी म्हणजे असे मॉडेल्स जे जास्त कमाई करतात किंवा एकमेकांच्या सहकार्यानं काम करतात आणि इतर मॉडेल्सना देखील मदत करतात.

टॉयलेट ब्रेकसाठीही दंड

पण कोलंबियाच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक कलाकाराला चांगली वागणूक मिळत नाही किंवा चांगले पैसे मिळत नाहीत. त्यांच्या नवीन कामगार कायद्यामुळे कडक नियम लागू होतील का? याची ते पाहणी करत आहेत.

मॉडेल्स आणि स्टुडिओंनी बीबीसीला सांगितलं की, स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्स दर्शकांकडून मिळणाऱ्या शुल्काचा सुमारे 50 टक्के भाग घेतात. त्यातील स्टुडिओ हे 20 ते 30 टक्के घेतात, आणि उरलेला पैसा मॉडेल्सना मिळतो.

म्हणजे जर एखाद्या शोने 100 डॉलर (75 पौंड) कमावले, तर मॉडेलला साधारणपणे 20 डॉलर (15 पौंड) ते 30 डॉलर (22 पौंड) मिळतात. त्यांनी सांगितलं की, काही स्टुडिओ यापेक्षाही जास्त पैसे घेतात.

एखाद्यावेळी दर्शकांअभावी मॉडेल्सची कमाईही कमी होते. जेव्हा ते 8 तासांच्या सत्रासाठी लॉगइन करतात. तेव्हा कधी कधी त्यांच्या स्ट्रिमिंगला जास्त व्ह्यूज मिळत नाहीत. अशा वेळी ते 5 डॉलरपर्यंतच (4 पौंड) कमावतात, असं काही मॉडेल्सनी सांगितलं.

काही स्टुडिओ तर मॉडेल्सवर त्यांनी कोणताही ब्रेक न घेता 18 तास स्ट्रिमिंग करण्यासाठी दबाव आणतात. या काळात या मॉडेल्सना खाण्यासाठी किंवा टॉयलेटला जाण्यासाठीही ब्रेक दिला जात नाही.

जर कोणी असं केलं तर त्यांना दंड लावला जातो, असंही काहींनी सांगितलं.

या माहितीची ह्यूमन राइट्स वॉच या मोहिमेतील डिसेंबर 2024 मध्ये प्रकाशित अहवालाने पुष्टी केली आहे. यावर या बातमीसाठी लेखिका एरिन किलब्राइड यांनी 'बीबीसी'साठी अधिक संशोधन केलं होतं.

यात त्यांना काही लोकांना अतिशय छोट्या अशा घाणेरड्या खोलींमध्ये ढेकूण आणि झुरळांनी भरलेल्या जागी चित्रीकरण करायला लावणं, त्याचबरोबर त्यांना वेदनादायक आणि अपमानजनक लैंगिक कृत्यं करण्यास जबरदस्ती केली जात असल्याचं आढळून आलं.

सोफीनं सांगितलं की, ज्या स्टुडिओमध्ये ती काम करत होती, त्या स्टुडिओनं तिला नको असलेली लैंगिक कृत्यं करण्यासाठी दबाव आणला होता.

फोटो स्रोत, Jorge Calle / BBC

फोटो कॅप्शन, सोफीनं सांगितलं की, ज्या स्टुडिओमध्ये ती काम करत होती, त्या स्टुडिओनं तिला नको असलेली लैंगिक कृत्यं करण्यासाठी दबाव आणला होता.

मेडेलिन येथे राहणारी दोन मुलांची आई असलेली सोफी पूर्वी नाइटक्लबमध्ये वेट्रेस होती. परंतु, ग्राहकांकडून सतत होत असलेल्या अपमानामुळे ती वैतागली आणि एकेदिवशी ती वेबकॅम मॉडेलिंगकडे वळली.

परंतु, 26 वर्षांची सोफी सांगते की, ज्या स्टुडिओसाठी ती काम करत होती, त्यांनी तिच्यावर शारीरिकदृष्ट्या वेदनादायक आणि अपमानजनक लैंगिक कृत्यं करण्यासाठी दबाव टाकला, ज्यामध्ये तिला तीन इतर मुलींसोबत परफॉर्म करायला लावलं.

ती सांगते की, या विनंत्या ग्राहकांकडून केल्या जात आणि त्या स्टुडिओच्या मॉनिटर्सकडून मान्यही केल्या जात असत. हे मॉनिटर्स म्हणजे मॉडेल्स आणि प्रेक्षकांमधील मध्यस्थ म्हणून काम करणारे कर्मचारी होते.

अशी कृत्यं करण्यास जेव्हा ती त्या स्टुडिओला नकार देत असे तेव्हा, ते तिला "हे करण्याशिवाय तिच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे सांगत," असं सोफी सांगते.

ती पुढे म्हणते, "शेवटी मला ते करावं लागलं, कारण नाहीतर ते माझं अकाउंट बंद करतील असं त्यांनी सांगितलं होतं."

सोफी अजूनही वेबकॅम स्टुडिओमध्ये काम करत आहे, कारण तिच्या म्हणण्यानुसार, कोलंबियामधील सरासरी पगारात दोन मुलांचं पालनपोषण करणं तिला कठिण ठरतं.

ती सध्या कायद्याच्या पदवीचा अभ्यास करण्यासाठी पैशांची बचत करत आहे.

सोफी म्हणते की, सेक्सकॅम उद्योगातील तिचं काम तिच्या मुलांचा खर्च भागवायला आणि कायद्याची पदवी मिळवण्यासाठी बचत करायला मदत करतं.
फोटो कॅप्शन, सोफी म्हणते की, सेक्सकॅम उद्योगातील तिचं काम तिच्या मुलांचा खर्च भागवायला आणि कायद्याची पदवी मिळवण्यासाठी बचत करायला मदत करतं.

ही समस्या फक्त कोलंबियालाच नाही तर इतर देशांनाही भेडसावत आहे, असं एरिन किलब्राइड म्हणतात.

त्यांना असं आढळून आलं की, त्या चार मोठ्या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सकडून कोलंबियाव्यतिरिक्त आणखी 10 देशांमधील स्टुडिओंचा कंटेंट प्रसारित केला जातो. त्यात बल्गेरिया, कॅनडा, चेक प्रजासत्ताक, हंगेरी, भारत, रोमानिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, युक्रेन आणि अमेरिका यांचा समावेश होतो.

त्या म्हणतात की त्यांनी "प्लॅटफॉर्मच्या धोरणांमध्ये व कार्यपद्धतींमध्ये अशा त्रुटी ओळखल्या आहेत, ज्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाला मदत करतात किंवा त्यात भर घालतात."

आम्ही प्लॅटफॉर्मला त्यांनी स्ट्रिम केलेल्या स्टुडिओंच्या परिस्थितीबद्दल विचारलं, तेव्हा बोंगाकॅम्समधील मिली अचिंते यांनी काही माहिती दिली.

त्या म्हणाल्या की, त्या अशा आठ महिलांच्या टीमचा भाग आहेत, ज्या कोलंबियातील काही स्टुडिओंना भेट देतात, "मॉडेल्सना पैसे मिळत आहेत का, खोल्या स्वच्छ आहेत का, आणि मॉडेल्सवर अन्याय होत नाही ना, याची ते खात्री करतात."

त्यांनी सांगितलं की, ते कलाकारांची थेट नियुक्ती करत नाहीत, त्यामुळे स्टुडिओ आणि मॉडेल्समधील अटींमध्ये ते हस्तक्षेप करत नाहीत.

पण दोघांनीही आम्हाला सांगितलं की, ते कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण राखण्यास कटिबद्ध आहेत.

स्ट्रीपचॅटनंही म्हटलं की, या स्टुडिओंनी 'कामाच्या ठिकाणी सन्मानपूर्ण आणि आरामदायक वातावरण' असल्याची खात्री करणं अपेक्षित आहे.

जर एखाद्या मॉडेलवर काहीतरी करण्यासाठी बळजबरी केली जात आहे, असं आम्हाला वाटलं तर आमच्याकडे त्यात हस्तक्षेप करण्यासाठी टीम्स आहेत, असं बोंगाकॅम्स, स्ट्रीपचॅट आणि चॅटरबेट यांनी सांगितलं.

'त्यांनी मला फसवलं'

इसाबेला सांगते, दोन महिने पहाटे 5 वाजता उठून वेबकॅमिंग, शाळा आणि माझ्या मुलाची काळजी घेणं असा संघर्ष करत असताना, मला माझ्या पहिल्या पेमेंटची खूप उत्सुकता होती.

पण प्लॅटफॉर्म आणि स्टुडिओने त्यांचा हिस्सा घेतल्यानंतर, मला केवळ 1,74,000 कोलंबियन पेसो (42 डॉलर; 31 पौंड) मिळाले, असं इसाबेलानं सांगितलं.

तिला अपेक्षित असलेल्या रकमेपेक्षा हे पैसे खूपच कमी होते. तिला वाटतं की स्टुडिओनं तिला ठरलेल्या टक्केवारीपेक्षा खूपच कमी पैसे दिले आणि तिच्या कमाईतले भरपूर पैसे त्यांनी चोरले.

'त्यांनी मला फसवलं', असं ती म्हणते. हे पैसे खूपच कमी होते, आणि हे पैसे दूध आणि डायपर खरेदी करण्यासाठीही पुरले नाहीत, असंही ती म्हणाली.

इसाबेला, अजूनही शाळेत आहे, तिने फक्त काही महिन्यांसाठी वेबकॅम मॉडेल म्हणून काम केलं आणि नंतर तिने ते काम सोडून दिलं.

एवढ्या लहान वयात तिला जी वागणूक मिळाली, त्याचा तिच्या मनावर खूप वाईट परिणाम झाला. ती सतत रडतच राहायची, त्यामुळे तिच्या आईनं तिला मानसशास्त्रज्ञाकडे घेऊन जाण्याची व्यवस्था केली.

ती आणि त्या स्टुडिओच्या आणखी सहा माजी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन राज्याच्या अभियोक्ता कार्यालयात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. त्यांनी स्टुडिओवर अल्पवयीन तरुणांचे शोषण, कामगारांचे शोषण आणि आर्थिक दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे.

"मी अल्पवयीन असतानाचे व्हीडिओ अजूनही ऑनलाइन आहेत," असं इसाबेला सांगते.

हे व्हीडिओ काढून टाकण्यासाठी मी असहाय्य आहे असं मला वाटतं. "याचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे आणि मला याबद्दल आणखी जास्त विचार करायचा नाही," असं ती म्हणते.

वुडी मॉरिस यांचे अतिरिक्त वार्तांकन.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)