नितेश राणे, शायना एनसी ते संजयकाका पाटील; महायुतीत उमेदवारांची उसनवारी

फोटो स्रोत, ANI
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती, तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी रिंगणात आहे.
राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होताना दिसतेय. पण, यासाठी उमेदवारांची आपआपसांत अदलाबदल झालेली दिसतेय.
भाजपनं त्यांच्या नेत्यांना शिंदेंच्या धनुष्यबाण आणि अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर लढायला लावलंय.
त्यासाठी संबंधित नेत्यांनी पक्षप्रवेश करून तिकीटही मिळवलं आहे. तसेच महाविकास आघाडीत देखील ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्याला पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे.
मग महायुतीत अशी उमेदवारांची अदलाबदल का केली जात आहे? भाजप आपल्या नेत्यांची निर्यात मित्रपक्षात का करत आहे? हे बघुयात. पण, त्याआधी भाजपच्या कोणत्या नेत्यांना शिंदे आणि अजित पवारांनी उमेदवारी दिली? यावर एक नजर टाकुयात.
भाजपमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाऊन उमेदवारी मिळविणारे नेते
1. भाजपमधून शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊन उमेदवारी मिळविणारे पहिले नेते म्हणजे निलेश राणे. निलेश राणे यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना एकनाथ शिंदेंनी कुडाळ मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. याठिकाणी भाजपचा नेता हा शिंदेंच्या धनुष्यबाणावर लढणार आहे.
2. भाजपचे नेते मुरजी पटेल यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुरजी पटेल हे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंविरोधात भाजपचे उमेदवार होते. पण, ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.
त्यानंतर या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल यांना भाजपकडून उमेदवारी हवी होती. पण, हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेला सुटल्यानं मुरजी पटेल यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून ते धनुष्यबाणावर लढणार आहेत.

3. कन्नड विधानसभा मतदारसंघातही भाजपच्या नेत्या आणि चिन्ह शिंदेंचं असं चित्र दिसतंय. कारण, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.
संजना जाधव भाजपकडून लढण्यासाठी इच्छूक होत्या. पण, हा मतदारसंघ शिंदेसेनेला सुटल्यानं आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
4. भाजपचे बोईसर विधानसभा क्षेत्र प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे विलास तरे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला असून त्यांना एकनाथ शिंदेंनी बोईसरमधून उमेदवारी जाहीर केली आहे.


भाजपमधून अजित पवारांच्या गटात जाऊन उमेदवारी मिळविणारे नेते
1. भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांना अर्जुनी मोरगाव इथून अजित पवारांनी उमेदवारी दिली. गेल्या 2019 च्या निवडणुकीत बडोले यांचा राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रीकापुरे यांच्याकडून निसटता पराभव झाला होता.
इथले विद्यमान आमादर चंद्रीकापुरे पक्षफुटीनंतर अजित पवारांसोबत गेले. तरीही त्यांचं तिकीट कापून भाजपमधून बडोलेंना आयात करून त्यांना तिकीट देण्यात आलं.
2. भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला आहे. संजयकाका पाटील तासगाव कवळमहांकाळ इथून निवडणूक लढायला इच्छूक होते. पण, ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली.
त्यामुळे भाजपनेच आपला नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवला आणि त्यांना तिथून उमेदवारी द्यायला सांगितली. आता संजयकाका पाटील हे अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील. त्यांचा सामना आर. आर. पाटलांचा मुलगा रोहित पाटलांसोबत होणार आहे.

फोटो स्रोत, facebook/Rajkumar Badole
3. भाजपमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आयात झालेले उमेदवार म्हणजे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रताप पाटील यांना विधानसभेत उतरवायचा निर्णय भाजपनं घेतला होता.
पण, त्यांनी तयारी केलेल्या लोहा मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेला. त्यामुळे भाजपनं प्रताप पाटील चिखलीकर यांना अजित पवारांकडे पाठवून ही जागा पदरात पाडून घेतली.
4. इस्लामपूरमधून जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपनं आपल्याच नेत्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवलं आहे.
भाजपचे नेते निशिकांत पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना अजित पवारांनी तिकीट दिलं आहे.

फोटो स्रोत, X/@praful_patel
5. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ देखील अजित पवारांकडे सुटला. पण, इथं मूळ उमेदवार भाजपचा असून तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.
सचिन सुधाकर पाटील हे फलटण कोरेगाव मतदारसंघाचे भाजपचे विधानसभा प्रमुख होते. तसेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आता भाजपनं त्यांना अजित पवारांकडे पाठवलं असून त्यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे.
उमेदवार चेहरा काँग्रेसचा, पण चिन्ह ठाकरेंचं
फक्त भाजपच नाहीतर विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंनी सुद्धा हाच फॉर्म्युला वापरला आहे. त्यांनीही काँग्रेसकडून उमेदवार घेत त्यांना तिकीट दिलं आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला हवा होता. पण, ठाकरे या मतदारसंघासाठी अडून होते. या मतदारसंघातून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना ठाकरेंकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. पण, त्यांच्या नावाला बुलढाण्यातील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध होता. त्यामुळे ठाकरे उमेदवाराच्या शोधात होते.
अखेर त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिलेली आहे. इथंही उमेदवाराचा चेहरा काँग्रेसचा पण चिन्ह मात्र ठाकरेंचं असणार आहे.
महायुती, महाविकास आघाडीत मित्रपक्षांकडून उमेदवार आयात करणं का सुरूये?
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आपआपसांत उमेदवारांची अदलाबदल झाली होती.
आढळराव पाटील यांनी दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, तर भाजपच्या अर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अमर काळे यांना काँग्रेसमधून आयात करून उमेदवारी दिली होती.

पण, महायुती असो की महाविकास आघाडी मित्र पक्षांमधूनच उमेदवार आयात का करत असावे? तर ही आपआपसातील तडजोड आहे, असं ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांना वाटतं.
ते म्हणतात, "महायुती किंवा महाविकास आघाडी मित्रपक्षांचा उमेदवार आयात करणं ही एकमेकांसाठी केलेली तडजोड असते. एखाद्या मतदारसंघावर मित्रपक्षाचा प्रबळ दावा असेल आणि त्यांच्याकडे तगडा उमेदवार नसले तर मग त्यांना उमेदवार पुरवला जातो."
"भाजपकडे तगडे उमेदवार असतील तर ते मित्र पक्षांना पुरवतात. तसेच पक्षाच्या सर्व्हेमध्ये देखील कोण चांगली लढत देऊ शकतं हे समजतं. त्यानुसार आपआपसात उमेदवारांची अदलाबदल केली जाते," भातुसे सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











